लिफ्टिंग ‘टॅकल’ ला सुद्धा नीट टॅकल करा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    21-Nov-2021   
Total Views |
प्रचलित कार्यसंस्कृतीमध्ये उत्पादनाचा अत्युच्च दर्जा, जास्तीतजास्त वेग आणि कमीतकमी किंमत या गोष्टींबरोबरच सुरक्षिततेलाही महत्त्व देणे गरजेचे बनले आहे. कारखान्यात प्रत्यक्ष घडलेल्या काही घटनांच्या आधारे या लेखमालेमध्ये कारखान्यातील सुरक्षिततेबाबत चर्चा केली आहे.
 
 
Tackle the lifting ‘tackl
 
इंजिन फॅक्टरीमध्ये सकाळचा भोंगा झाला आणि कामाची गडबड सुरू झाली. शिफ्ट बदलताना शांत असलेल्या मशीन पुन्हा धडधड करू लागल्या. अहवालांची देवाणघेवाण, लोकांची लगबग, मधूनच उशिरा कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांची धावपळ, जड सामान इकडे तिकडे नेणारी फोर्कलिफ्ट, अधिकारी वर्गाची आपले सहकारी मागे पुढे घेत सगळीकडचा राउंड, सगळे काही झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे एकदम सर्वत्र सुरू झाले.
 
हेवी सिलिंडर ब्लॉक विभागात रात्री तयार झालेला ब्लॉक लाइनच्या शेवटी आपल्याला कुणीतरी उचलण्याची जणू वाट बघत होता. सुमारे दीड हजार किलो वजनाचा हा ब्लॉक होता. तो उचलण्यासाठी चांगले जाडजूड स्पेशल लिफ्टिंग 'टॅकल' डिझाइन केलेले होते. स्टीलच्या जाड पट्टीतून विविध आकार कापून वेल्ड केलेले, कात्रीच्या आकाराचे हे वेडेवाकडे टॅकल, क्रेनचा हूक त्यातील वरच्या रिंगमध्ये अडकवून ब्लॉकवर विशिष्ट जागी बसविले की ब्लॉक कुठेही न हलता नीट उचलता येई. 
 

Fig. No. 1_1  H 
 

चित्र क्र. 1

 
विठ्ठल गायकवाडने शेजारी रॅकवर ठेवलेले विशेष लिफ्टिंग टॅकल क्रेनच्या हूक रिंगमध्ये अडकवून लाइनवरच्या सिलिंडर ब्लॉकवर बसविले. ब्लॉक कुठे खालच्या बाजूला अडकविला नाही ना याची खात्री केली आणि क्रेनने तो अलगद उचलला. फार वर न नेता शेजारीच ठेवलेल्या ट्रॉलीवर तो आणला. ट्रॉलीवर योग्य जागी खाली आणून ठेवण्यासाठी तो खाली वाकून खात्री करीत होता, तेवढ्यात धाडकन आवाज आला आणि लिफ्टिंग टॅकल तुटून अख्खा सिलिंडर ब्लॉक ट्रॉलीवर पडला. विठ्ठल थोड्या लांब अंतरावर उभा असल्याने सुदैवाने त्याला काही इजा झाली नाही. कास्टिंगमधून केलेल्या सिलिंडर ब्लॉकचा खालचा आडवा भाग तात्काळ मोडला. हा सिलिंडर ब्लॉक अर्थातच पूर्णपणे वाया गेला. ट्रॉलीची थोडी मोडतोड झाली, ती पुढे दुरुस्त करता येईल. चित्र क्र. 1 पहा.
 
या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी येथे लक्षात घ्यायला हव्यात.
 
1. हे मोडलेले विशेष लिफ्टिंग टॅकल सुमारे आठ वर्षे वापरात होते.
2. आठ महिन्यांपूर्वी त्याची 'क्रॅक टेस्ट' झाली होती आणि काहीही दोष निदर्शनास आले नव्हते.
 
अपघात होण्याचे कारण काय?

1. हे विशेष लिफ्टिंग टॅकल ज्या जागी मोडले, त्या भागाची अत्यंत सूक्ष्मदर्शी (मायक्रोस्कोपिक) तपासणी केली असता, त्या जागी एक भेग (क्रॅक) निर्माण झाली असल्याचे आढळून आले. ही भेग 'फटिग'मुळे निर्माण होते. अति अवजड सामान उचलणारे विशेष लिफ्टिंग टॅकल किमान दर तीन महिन्यांनी 'क्रॅक टेस्ट' म्हणजेच कुठे भेग/तडा गेलेली नाही ना यादृष्टीने त्याची तपासणी करणे आवश्यक आहे.

2. कदाचित असेही घडले असू शकते की, आठ महिन्यांपूर्वी त्याची 'क्रॅक टेस्ट' केली आणि काहीही दोष निदर्शनास आले नव्हते. म्हणजे तपासणी योग्य पद्धतीने झाली आहे का याची खात्री करायला हवी. जड वस्तूंची क्रॅक टेस्ट करताना दोन्ही स्प्रे नीट करणे, मध्ये योग्य वेळ जाऊ देणे, डेव्हलपर स्प्रे हलक्या हाताने मारल्यानंतर क्रॅक नीट तपासणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

3. अति अवजड सामान उचलणारे विशेष लिफ्टिंग टॅकल किमान दर सहा महिन्यांनी लोड टेस्टदेखील म्हणजेच भाग उचलण्यास सक्षम आहेत का याची तपासणी करायला हवी.

लिफ्टिंगसाठी डिझाइन केलेल्या कस्टमाइज्ड् साधनांसाठीचे मानक, OSHA स्टँडर्ड 29 CFR 1926.251(a)(4) या कलमात दिलेले आहे. या कलमामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, ग्राहकानुसार (कस्टमाइज्ड्) डिझाइन केलेले ग्रॅब, हुक, क्लॅम्प किंवा लिफ्टिंग साधनांवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून किती भार द्यावा याचे स्पष्ट निर्देश दिलेले असावेत. तसेच निर्देशित भाराच्या तुलनेत या साधनांची 125 टक्क्यांपेक्षा अधिक भाराने आधीच तपासणी (प्रूफ टेस्ट) केलेली असावी. 
 
अपघात झाल्यानंतर केलेल्या अल्पकालीन (शॉर्ट टर्म) उपाययोजना

1. कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना या अपघाताची पूर्ण कल्पना देण्यात आली आणि या प्रकारची काळजी कशी घ्यावी हे समजावून सांगितले गेले.
 
2. कारखान्यातील लहान, मोठे असे सर्व लिफ्टिंग टॅकलची पुन्हा एकदा काळजीपूर्वक क्रॅक टेस्ट करण्यात आली.
 
3. कारखान्यातील लहान, मोठे, असे सर्व लिफ्टिंग टॅकल त्या त्या डिझाइननुसार आहेत ना याची तपासणी करण्यात आली. डिझाइननुसार नसलेले लिफ्टिंग टॅकल बाजूला काढले गेले.

अपघात झाल्यानंतर केलेल्या दीर्घकालीन (लाँग टर्म) उपाययोजना

1. डिझाइननुसार नसलेले लहान, मोठ्या अशा सर्व लिफ्टिंग टॅकल दुरुस्त करून मगच कारखान्यात वापरात आणले गेले.
 
2. सर्व विभागातील लिफ्टिंग टॅकलना अनुक्रमांक दिले गेले. त्यांचे सर्व तपशील नोंद करण्याचे व्यवस्थापन अंमलात आणले गेले.
 
3. लिफ्टिंग टॅकलची क्रॅक टेस्ट आणि लोड टेस्ट करण्याची पद्धत आणि वारंवारिता (फ्रीक्वेंसी) ठरवून दिली गेली. सुरक्षा व्यवस्थापनाकडेदेखील या बाबीचे ऑडिट करण्याचे अधिकार दिले गेले.
 
या अपघातात सुदैवाने काही प्राणहानी झाली नाही. परंतु, अशा गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे, अन्यथा काही अनर्थ घडू शकतो. लिफ्टिंग टॅकलसारखा साधा विषयसुद्धा याचसाठी व्यवस्थित 'टॅकल' करायला हवा! 
 
(लेखन साहाय्य : अच्युत मेढेकर)
9822650043
उद्धव दहिवाळ यांना मेंटेनन्स आणि औद्योगिक सुरक्षितता या क्षेत्रातील सुमारे 35 वर्षांचा अनुभव आहे. ते सध्या विविध कारखान्यांना सुरक्षितता सल्लागार सेवा पुरवितात. 
 
@@AUTHORINFO_V1@@