संपादकीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    08-Nov-2021   
Total Views |
gffg_1  H x W:  
 
 
सर्वप्रथम धातुकाम मासिकाच्या सर्व वाचकांना उद्यम प्रकाशन परिवारातर्फे दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मागील जवळपास 1.5 ते 2 वर्ष आपणा सर्वांसाठीच त्रासाचे आणि चिंतेचे गेले आहे. कोव्हिड 19 विषाणूंमुळे आपल्या एकूणच जीवनमानावर गंभीर परिणाम झालेले सर्वांनीच अनुभवले. तिसऱ्या लाटेचे असलेले मळभ या दीपावलीतील दिव्यांचा प्रकाश नक्कीच दूर करेल अशी आशा या सणाच्या निमित्ताने आपण करू. येणारे वर्ष आमचे सर्व वाचक, जाहिरातदार, वर्गणीदार, लेखकांना उत्तम आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो अशा मनापासून शुभेच्छा!
 
दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकजण नवीन व्यवसायाला सुरुवात करतात, तर काहीजण व्यवसायाचा विस्तार करीत असतात. नवीन व्यवसाय आणि विस्ताराचे नियोजन करताना बाजारपेठेतील बदलांचा अभ्यास करून बाजारपेठेचा कल लक्षात घेण्यावर अधिक भर दिला जातो. उत्पादांचे विकसन, कारखान्यातील बदल, प्रक्रियेतील बदल, उत्पादांची विक्री आणि विपणन अशा सर्व महत्त्वाच्या घटकांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जाते. कोव्हिडनंतर जगभरातील सर्वच कारखान्यांच्या प्रत्यक्ष मानवी व्यवहारांवर बंधने आली होती. त्यामुळे निर्मिती क्षेत्रात कधी नव्हे इतका ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’चा वाढलेला वापर आपण सर्वांनीच पाहिला. नवीन व्यवसायाचे नियोजन करताना किंवा उद्योगाचा विस्तार करताना उद्योजकांनी यांसारखे नवीन मार्ग ओळखून, सातत्यपूर्ण उत्पादनावर भर देण्याबाबत आग्रही असावे किंबहुना त्यामध्ये वाढ करण्यावर त्यांनी भर देण्याच्या दृष्टीने काम करावे. 
 
मासिकाच्या निमित्ताने विविध कारखान्यांना आम्ही भेटी देत असतो. या भेटींदरम्यान कारखान्यांचे मालक असो किंवा कामगार असो, कारखान्यातील हे मानवी घटक बदलांचा स्वीकार करताना दिसू लागले आहेत. बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वतःला त्याप्रमाणे अद्यतन ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. काही तरुण कामगारांशी/अभियंत्याशी चर्चा करताना, स्वतःचा ‘स्टार्टअप’ उभारण्याकडे त्यांचा अधिक कल असल्याचे निदर्शनास आले. तरुण वर्गाचा ‘स्टार्टअप’चा विचार लघु मध्यम क्षेत्राला अधिक उंचीवर नेण्यामध्ये विशेष महत्त्वाचा वाटतो. या तरुण वर्गाच्या मते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0, मशीन लर्निंग यांसारख्या प्रगत तंत्राचा प्रभावी वापर अतिशय सहजपणे रोजच्या कामांमध्ये केला जाऊ शकतो. या प्रगत तंत्राचा अंतर्भाव कारखान्यांत केल्यास, कमी वेळेत अतिशय उत्कृष्ट दर्जाचे काम केले जाऊ शकते. मात्र त्यासाठी कुशल मनुष्यबळाची नितांत आवश्यकता भासणार आहे.

स्पर्धात्मक जगात नवीन उद्योजक जागतिक बाजारपेठेशी जोडला जावा यासाठी आवश्यक ते ज्ञान आणि माहिती देण्याचे काम आम्ही धातुकाम मासिकातून नेहमीच करीत असतो. धातुकामच्या या अंकात होनिंग प्रक्रिया आणि प्रकारांची सविस्तर माहिती दिली आहे. बहुउद्देशीय मशीनचे प्राथमिक तपशील देणाऱ्या लेखाबरोबर मॅक्रोज प्रोग्रॅमिंगचा लेखही आपल्याला उपयुक्त ठरेल. iSCOUT Vision 4.0 या स्वयंचलित दृष्य (व्हिज्युअल) तपासणी प्रणालीचा पर्याय आणि सिलिंडर हेडच्या विविध प्रकारच्या मोजमापनासाठी तयार केलेल्या गेजचे तांत्रिक तपशील सांगणारे लेख आपल्या ज्ञानात भर घालतील. ब्रोचिंग प्रक्रिया, ECM, फेस ग्रूव्हिंग या यंत्रण प्रक्रियांविषयी आपल्याला या अंकात वाचावयास मिळेल. त्याचबरोबर नेहमीच्या लेखमालाही आपल्याला रोजच्या कामांमध्ये फायदेशीर ठरतील अशी खात्री आहे.

लघु मध्यम उद्योजकाला आणि कर्मचाऱ्याला नवनवीन तंत्रज्ञानाची आणि उत्पादांची माहिती, प्रकियांची देवाणघेवाण मातृभाषेतून देणे या विचाराने आम्ही धातुकाम मासिक सुरू केले. या मासिकाच्या धातुकार्य (हिंदी) आणि लोहकार्य (कन्नड) आवृत्तींना 3 वर्षे पूर्ण होऊन दोन्ही आवृत्त्या चौथ्या वर्षांत पदार्पण करीत आहेत, तर धातुकाम (गुजराती) आवृत्तीला या महिन्यात 1 वर्ष पूर्ण होत आहे. धातुकामचे हे व्यासपीठ मराठीसह, हिंदी, कन्नड आणि गुजराती भाषांमधून आपल्यासाठीच उपलब्ध आहे. मासिकामधील लिखाण अधिक दर्जेदार करण्यासाठी आपणा सर्वांची साथ आम्हाला हवी आहे आणि ती मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.
 

सई वाबळे

 

 

@@AUTHORINFO_V1@@