प्लॅस्टिकचे आवरण गरम करून सील करण्यासाठी चिमट्याप्रमाणे काम करणारे पोर्टेबल सीलर वापरून मोठ्या प्लॅस्टिकच्या रोलमधून पिशव्या तयार करता येतात. दूर अंतरावर पाठविल्या जाणाऱ्या अवजड तसेच मोठ्या आकाराच्या वस्तूंना किंवा यंत्रांना संरक्षक म्हणून प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून त्यात बाहेरची हवा जाणार नाही अशा पद्धतीने सीलबंद करण्यासाठी हे सीलरवापरतात. वजनाने हलके असल्याने काम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नेऊन हवाबंद करण्याचे काम हा सीलर करू शकतो.
एखाद्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये त्यातील सुट्या भागांच्या संरचनेत (डिझाईन), कच्च्या मालामध्ये आणि पद्धतीमध्ये एकात्मिक पद्धतीने (इंटिग्रेटेड ॲप्रोच) विचार करून बदल केले तर कशा पद्धतीने हितावह ठरतात याचे एक उदाहरण म्हणजे ’पोर्टेबल हँड सीलर’.
जुनी पद्धतया उत्पादनामध्ये सिलिंग जॉज, बॉडी आणि हँडल असे यांत्रिकी भाग असतात. ही वस्तू हाताने काम करायची असल्याने गरजेनुसार कामाच्या ठिकाणी नेण्यास सुलभ होण्यासाठी, वजनाला हलक्या अशा ॲल्युमिनिअमच्या कच्च्या मालापासून तयार होत असे. या भागांपैकी बॉडी आणि हँडल यांचा अंतिम आकार आणि मापे गुंतागुंतीची असल्याने ते पूर्ण आयताकृती ठोकळ्यापासून पोखरून तयार करण्याची पद्धत होती. त्यामध्ये मिलिंगचे काम करत असताना अधिक वेळ खर्च होत होता. तसेच जवळपास 80% कच्च्या मालाचे भंगारामध्ये रुपांतर होत असे. बाजारातील स्पर्धात्मक वातावरणामुळे उत्पादन खर्च कमी करण्याचीदेखील गरज भासत होती. यावर खालील मुद्यांच्या आधारे अभ्यास केला गेला.
1) वजन न वाढविता स्वस्तातील कच्चा माल वापरात आणता येईल का?
2) मशिनिंग (मिलिंग) वेळ कमी करता येईल का?
3) पर्यायी एकदम वेगळी उत्पादन पद्धती वापरता येईल का?
नवीन पद्धत वरील मुद्द्यांच्या आधारे अभ्यास केल्यानंतर खालील बदल करण्यात आले.
1) बॉडी आणि हँडल हे भरीव ॲल्युनिमिअममधून बदलण्याऐवजी पोलादी, पातळ पत्र्यापासून पोकळआकारामध्ये बनविले.
2) पत्र्यामधून तयार होणारा अंतिम पोकळ आकार, लेझर कटिंग, बेंडिंग अशा फॅब्रिकेशनमधील अत्याधुनिक पद्धती वापरल्याने मिलिंगची खर्चिक पद्धती पूर्णपणे रद्द झाली.
3) सुट्टया भागांचे वजन कमी झाल्याने अंतिम उत्पादन हाताळण्यास अधिक हलके, सुलभ झाल्याने कामगाराला काम करताना येणारा थकवा कमी झाला.
4) परिणामी उत्पादनाची किंमत कमी झाली आणि दर्जा सुधारला. (कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया यांच्या खर्चाचा तपशील तक्ता क्र. 1 मध्ये.)
उत्पादन खर्चातील निव्वळ घट
2150 - 266 = 1884 रुपये
अंतिम वजनातील निव्वळ घट
जुनी पद्धत - 2.2 किग्रॅ.
नवीन पद्धत - 1.9 किग्रॅ
2.2 किग्रॅ. - 1.9 किग्रॅ = 0.300 कि.ग्रॅ.
मासिक उत्पादन 20 युनिट (मासिक बचत)
20 x 1884 = 37680/- रुपये