मॅक्राे प्राेग्रॅमिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    08-Feb-2021
Total Views |

1_1  H x W: 0 x
सी.एन.सी. सिस्टिममधील मॅक्रोचा ( macro programming ) वापर भाषाआधारित (लँग्वेज बेस) प्रोग्रॅमिंगने केला जातो. या लेखामध्ये मॅक्रोची वैशिष्ट्ये फायदे आदींबद्दल माहिती देणारा लेख.
मॅक्रो प्रोग्रॅमिंग हे पार्ट प्रोग्रॅमिंगचे तंत्रज्ञान असून पारंपरिक प्रोग्रॅमिंग पद्धतीमध्ये अधिक नियंत्रण वैशिष्ट्ये (कंट्रोल फीचर) घालून ते तयार होते. त्यामुळे जास्त क्षमता असलेली आणि लवचीक अशी प्रोग्रॅम पद्धती तयार होते. सी.एन.सी. सिस्टिममधील मॅक्रोचा वापर भाषाआधारित (लँग्वेज बेस) प्रोग्रॅमिंगने केला जातो. कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्च दर्जाच्या भाषा उदाहरणार्थ, C++, व्हिज्युअल बेसिक त्यातील फॉर्म्स आणि डेरिव्हेटिव्हज सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी उपयोगात येतात. सी.एन.सी. मॅक्रोमध्ये उच्च दर्जाच्या भाषेमधील बरीच वैशिष्ट्ये वापरण्याची क्षमता असते. तरीही मॅक्रो ही प्रोग्रॅमिंग भाषा नाही तर सी.एन.सी. मशीनसाठी खास बनविलेले सॉफ्टवेअर आहे. परंतु, या उत्कृष्ट कार्यप्रणालीचा व्यवहारामध्ये फारसा वापर केलेला दिसत नाही.
मॅक्रोची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये
1. बीजगणिती आकडेमोड
कार्यवस्तूच्या ड्रॉइंगवरून प्रोग्रॅम बनवित असताना काहीवेळा चित्रांवरून मापे किंवा कोऑर्डिनेट काढावे लागतात. त्यासाठी आकडेमोड करावी लागते. ही आकडेमोड थोडक्या वेळेत अचूक करण्याची सुविधा उपलब्ध असते. यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ अशा प्रकारची आकडेमोड करता येते. याचबरोबर काही वेळेला गुंतागुंतीच्या किचकट कार्यवस्तूच्या ड्रॉइंगवरून वर उल्लेख केलेल्या गणितीय आकडेमोडीमधून आवश्यक कोऑर्डिनेट किंवा मापे मिळत नाहीत. त्यासाठी बीजगणितातील सूत्रे, डेरिव्हेशन, इंटिग्रेशन यासारख्या प्रक्रियांचा वापर करावा लागतो. ही सोय सी.एन.सी. नियंत्रकांमध्ये असते.
2. भौमितिक आकडेमोड
त्रिकोण, चौकोन, आयात, वर्तुळ, इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला अशासारख्या भौमितिक आकृतींचा वापर कार्यवस्तूच्या ड्रॉइंगमध्ये करून हवी असणारी मापे, कोऑर्डिनेट, क्षेत्रफळ काढता येते. या आकारासाठी आवश्यक असणारी सूत्रे आणि माहिती या सॉफ्टवेअरमध्ये मिळते.
 
3. बदलणारा माहिती साठा
प्रोग्रॅमप्रमाणे बदलत जाणाऱ्या, प्रोग्रॅममध्ये # चा वापर करून टाकलेल्या मूल्यांची साठवण प्रोग्रॅम क्रमांकाप्रमाणे केली जाते. त्यालाच बदलणारा माहिती साठा असे म्हणतात.
4. तार्किक (लॉजिकल) प्रक्रिया
हवी असणारी माहिती दिल्यानंतर किंवा मिळविल्यानंतर त्याप्रमाणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता तार्किक प्रक्रियेद्वारे येते.
5. ब्रांचिग आणि लूपिंग
या प्रोग्रॅमिंगमधील सुविधा असून आपल्याला ठराविक ठिकाणी शाखा देणे (ब्रांचिंग) त्याचबरोबर हव्या असणाऱ्या ठिकाणी लूपिंग म्हणजेच परत मूळ बिंदूपाशी जाण्याची व्यवस्था असते. प्रोग्रॅममध्ये काही विविक्षित खुणांचा वापर या दोन्ही कामांसाठी केला जातो. यामुळे फायदा असा होतो की, प्रोग्रॅमची लांबी कमी होते. प्रोग्रॅमिंगमधील एकच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करण्यासाठी लूपिंगचा वापर केला जातो.
6. फरक ओळखणे
# मध्ये दिलेली मूल्ये ओळखणे आणि #1 किंवा #2 मधील फरक ओळखून त्यानुसार पुढची कारवाई करणे या प्रक्रियेद्वारे केले जाते.
7. अलार्म तयार करणे
कोणत्याही प्रोग्रॅममधील सुरुवातीची पद्धत करीत असताना टॉलरन्सच्या बाहेर जाणारा वेग, फीड, मापनामधील फरक ओळखून त्यासाठीचा अलार्म स्क्रीनवर दाखविला जातो.
8. इनपुट/आउटपुट
गरजेप्रमाणे नियंत्रकामध्ये इनपुट करणे आणि प्रोसेस आउटपुट घेणे या गोष्टी या वैशिष्ट्याद्वारे करता येतात.
मॅक्रो प्रोग्रॅम साधारणपणे पारंपरिक सी.एन.सी. प्रोग्रॅमसारखाच दिसतो. परंतु, त्यात काही वेगळी वैशिष्ट्ये असतात. काही वैशिष्ट्ये प्रोग्रॅम क्रमांक 2 मध्ये दाखविली आहेत, (#1 आणि #2) जी नेहमीच्या प्रोग्रॅमिंगमध्ये नसतात. मॅक्रो प्रोग्रॅम रेग्युलर सबप्रोग्रॅम म्हणून साठविला जातो. तो त्याच्या स्वतःच्या प्रोग्रॅम नंबरमध्ये साठविला जातो. मुख्य प्रोग्रॅममधून आणखी एका मॅक्रोद्वारे तो बोलविला जातो. त्यासाठी खास G65 या कोडचा वापर केला जातो. आता आपण एक उदाहरण पाहू.
चित्र क्र. 1 मध्ये चार खाचांचे रफिंग करावयाचे आहे. त्यासाठी नेहमीचा प्रोग्रॅम, प्रोग्रॅम क्र. 1 प्रमाणे असेल.
प्रोग्रॅम क्र. 1
N1 G21
N2 G17 G40 G80
N3 G90 G00 G54 X 25.0 Y30.0 S1200 M03
N4 G43 Z2.0 H01 M08
N5 G01 Z-5.0 F100.0
N6 Y80.0 F200.0. खाच 1
N7 G00 Z2.0
N8 X36.0
N9 G01 Z-5.0 F100.0
N10 Y30.0 F200.0 खाच 2
N11 G00 Z2.0
N12 X47.0
N13 G01 Z-5.0 F100.0
N14 Y80.0 F200खाच 3
N15 G00 Z2.0
N16 X58.0
N17 G01 Z-5.0 F100.0
N18 Y30.0 F200.0.खाच 4
M19 G00 Z2.0 M09
N20 G28 Z2.0 M05
M21 M30
%
• वरील प्रोग्रॅममध्ये दोन फीड रेटचा वापर परत परत केला आहे.
F100.0 प्लंजिंगसाठी,
F200.0 खाच यंत्रणासाठी
• तसेच प्रत्येक सरकवेग (फीड रेट) एका खाचेसाठी एकदा येतो.
• खाचा जितक्या जास्त तितके प्रोग्रॅम्ड् सरकवेग
• जर तुम्हाला एक किंवा दोन्ही सरकवेग बदलावयाचे असतील, तर प्रत्येक स्वतंत्र खाचेसाठी त्याला बदलावा लागेल.
• खाचा जास्त असतील तर ही प्रक्रिया वेळ खाणारी ठरू शकते.
अशावेळी प्रोग्रॅममध्ये मॅक्रो फीचरचा वापर केल्यास कार्यवस्तूचे यंत्रण करणे अतिशय सोपे होते. यातील मेख म्हणजे दोन सरकवेग व्हेरिएबल म्हणून साठवायचे. हे काम प्रोग्रॅम सुरू होताना करावे लागते. व्हेरिएबल ओळखण्यासाठी # ही खूण वापरली जाते. वरील प्रोग्रॅम मॅक्रो वापरून कसा होतो, ते पाहू.
प्रोग्रॅम क्र. 2 (मॅक्रो वापरून)
N1 G21
N2 G17 G40 G80
N3 #1 =100.0 प्लंजिंग फीड रेट
N4 #2=200.0 कटिंग फीड रेट
N5 G90 G00 G54 X25.0 Y30.0 S1200 M03
N6 G43 Z2.0 H01 M08
N7 G01 Z-5.0 F#1
N8 Y80.0 F#2खाच 1
N9 G00 Z2.0
N10 X36.0
N11 G01 Z-5.0 F#1
N12 Y30.0 F#2खाच 2
N13 G00 Z2.0
N14 X47.0
N15 G01 Z-5.0 F#1
N16 Y80.0 F#2खाच 3
N17 G00 Z2.0
N18 X58.0
N19 G01 Z-5.0 F#1
N20 Y30.0 F#2खाच 4
N21 G00 Z2.0 M09
N22 G28 Z2.0 M05
N23 M30
%
#1 व्हेरिएबलमध्ये बदल करून सर्व प्लंजिंग सरकवेग आपोआप बदलतील आणि #2 बदलून कटिंग सरकवेग आपोआप बदलतील. मॅक्रोमध्ये असणाऱ्या अफाट शक्तीचा हा एक साधा नमुना आहे. या प्रोग्रॅममध्ये सरकवेग मॅक्रो फंक्शन म्हणून वापरले आहे.
मॅक्रो प्रोग्रॅमिंगचे फायदे
1. प्रोग्रॅमिंग लांबी कमी होते.
2. लांबी कमी झाल्याने मेमरीमधील जागा कमी व्यापली जाते.
3. किचकट प्रोग्रॅम सुटसुटीत होतात.
4. कार्यवस्तू कमी वेळात तयार होते.
5. अचूक मोजमापाची कार्यवस्तू तयार होते.
6. पुन्हा पुन्हा अतिरिक्त तयार होणाऱ्या प्रोग्रॅमिंगच्या पायऱ्या कमी करता येतात.
7. सध्याच्या बहुतेक सर्व सी.एन.सी. नियंत्रकामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
@@AUTHORINFO_V1@@