कारखान्यातील सुरक्षितता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    10-Mar-2021   
Total Views |
प्रचलित कार्यसंस्कृतीमध्ये उत्पादनाचा अत्युच्च दर्जा, जास्तीतजास्त वेग आणि कमीतकमी किंमत या गोष्टींबरोबरच सुरक्षिततेलाही महत्त्व देणे गरजेचे बनले आहे. कारखान्यात प्रत्यक्ष घडलेल्या काही घटनांच्या आधारे या लेखमालेमध्ये कारखान्यातील सुरक्षिततेबाबत चर्चा केली आहे.
 
देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी औद्योगिक उत्पादन आवश्यक आहे आणि उद्योगाशी निगडित सर्व बाबींची निगराणी महत्त्वाची आहे. कोणत्याही उद्योगामध्ये कामगार, व्यवस्थापन, शेअरहोल्डर इत्यादी अनेक घटकांचे योगदान महत्त्वाचे असते. उद्योग सुरळीत आणि प्रगतीपथावर चालणे हे या सर्व घटकांना पोषक ठरते.

1_1  H x W: 0 x
उद्योगक्षेत्रात प्रगतीसाठी यंत्रांचे प्रमाण वाढले, त्याचबरोबर अधिक शक्ती, अधिक वेग आणि अधिक उत्पादकता हे परवलीचे शब्द बनले. अशा वाढीबरोबरच अपघाताचे प्रमाणदेखील वाढते आणि हे प्रमाण शून्यवत करण्यासाठी उद्योगातील सर्व घटकांचे योगदान महत्त्वाचे आहे. ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन (OSHA) या 1971 मध्ये स्थापन झालेल्या जागतिक संस्थेने मार्गदर्शक नियम तयार केले आहेत. त्याआधी म्हणजे 1966 मध्ये भारतीय सुरक्षितता परिषद (नॅशनल सेफ्टी कौन्सिल) अस्तित्त्वात आली. त्यांनी घालून दिलेले नियम आणि भारत सरकारने मंजूर केलेले विविध कायदे उद्योगांमध्ये पाळले जाणे बंधनकारक आहे.
 
भारतीय सुरक्षितता परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कारखान्यातील एकंदर वातावरण, आरोग्य आणि सुरक्षितता यांचा परामर्श घेतला जातो आणि यासाठी सुरक्षितता धोरण तयार करणे, त्याच्या अंमलबजावणीसाठी सुरक्षितता अधिकारी नेमणे, धोरण आढावा आणि पाठपुरावा इत्यादी बाबी पार पाडण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असते. अपघातांमुळे होणारी इजा आणि मृत्यू हा खूप संवेदनशील विषय आहे. OSHA च्या जागतिक अहवालानुसार, 2019 साली कामावरील अपघातांमुळे सुमारे 30 लाख लोकांना काही इजा झाल्या, एकूण5,333 जणांचा मृत्यू झाला. हे टाळण्यासाठी याबाबतीत खूप काही करण्याची गरज आहे. कारखान्यांमध्ये कामगारांच्या हिताच्या आणि सुरक्षिततेच्या बाबी योग्य पद्धतीने राबविल्या गेल्या, त्यांचे प्रबोधन केले गेले, त्यांच्या सहभागाने सुधारणा घडवून आणल्या तर अपघात कमी होऊन सकारात्मकता वाढणे शक्य आहे.
 
एखादा अपघात झाला, तर केवळ कर्मचाऱ्याला इजा होते असे नाही, तर कारखान्याच्या दृष्टीने अनेक प्रकारचे नुकसान होते. यंत्रसामग्री बिघडते, उत्पादन नेहमीसारखे सुरू होण्यामध्ये वेळ वाया जाऊ शकतो. याउलट, संपूर्ण सुरक्षितता असलेल्या उद्योगांमध्ये एकंदर उच्च दर्जाची उत्पादकता, गुणवत्ता आणि पोषक वातावरण दिसते. या सकारात्मकतेचे पडसाद अर्थातच ग्राहकांपर्यंत काही ना काही बाबतीत पोहोचलेले दिसतात.
 
गेल्या काही दशकांमध्ये औद्योगिक सुरक्षितता या विषयाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. कर्मचारी, विविध सुरक्षितताविषयक संस्था आणि सर्वसाधारण जनता यांच्या अपेक्षा बदलल्या आहेत. पूर्वी अपघात झाला, की त्या कर्मचाऱ्याचे नक्कीच काहीतरी चुकले असणार अशी दृढ भावना असे. आता, बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावे लागते. जर कोणी सूचनांनुसार काम केले नसेल, तर वरिष्ठांनी त्याची खात्री करणे आवश्यक आहे. सूचना स्पष्ट होत्या का? त्याला सूचना कळल्या होत्या का? त्याला अर्जंट इतर काम दिले होते का? त्याच्या बौद्धिक आणि शारीरिक कुवतीमध्ये ते बसत होते का? सहजी होते तशी काही अनावधानाने काही चूक झाली आहे का? औद्योगिक सुरक्षितता उत्तम राखायची असेल तर अशा एक ना अनेक प्रश्नांवर योजनाबद्ध रीतीने कार्य करणे आवश्यक बनले आहे. अपघात होऊ नयेत यासाठी अधिक विचार करून, एकूण कार्याचा आराखडा आणि त्याची कामाची पद्धत याची खात्री करून अपघाताची शक्यता पूर्णपणे नष्ट करणे हे नवीन ध्येय झाले आहे.
कोणतीही प्रक्रिया निश्चित करताना, अपघात होणार नाहीत अशाच पद्धतीने केली जाते. पण त्यामध्ये काही सुरक्षाविषयक त्रुटी सुरुवातीपासून राहून जातात किंवा कालांतराने निर्माण होतात. दुर्दैवाने अशा बऱ्याच बाबी अपघात घडल्यावर लक्षात येतात. अशा गोष्टींचा आपण अभ्यास केल्यास, किमान पुढे होणाऱ्या संभाव्य घटना टाळता येतील.
 
कुठलाही अपघात हा एका साखळीचा अंतिम टप्पा असतो आणि प्रत्येक अपघाताला कारण आणि उपायही असतो.औद्योगिक अपघातांचा आढावा घेतला असता असे दिसून येते की, बहुसंख्य अपघातांची तीन प्रमुख कारणे आहेत.
1. असुरक्षित परिस्थिती (अनसेफ कंडिशन) : सर्वात जास्त अपघात या प्रकारच्या कारणांमुळे होतात. यांनाच 'तांत्रिक कारणे' असेही म्हटले जाते. असुरक्षित पद्धतीची यंत्रसामग्री, टूल, साहित्य, अपुरी सुरक्षा उपकरणे, प्रकाशव्यवस्था, वायुवीजन, गोदाम व्यवस्था, मशीनरीची चुकीची जागा इत्यादी असंख्य कारणे यात मोडतात. ओव्हरटाइम, कामातील एकसुरीपणा, वैताग, थकवा अशाही अनेक कारणांनी कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित होऊन अपघाताला निमंत्रण मिळते.
2. असुरक्षित कार्य (अनसेफ अॅक्ट) : असुरक्षित परिस्थिती खालोखाल याचा नंबर लागतो. अपुरे किंवा शून्य प्रशिक्षण, शारीरिक दोष, चुकीचा दृष्टिकोन या महत्त्वाच्या बाबी आहेत. याचबरोबर अनाधिकाराने केलेले कार्य, सुरक्षा उपकरणे न वापरणे, वस्तू काळजीपूर्वक न हाताळणे, चुकीच्या (कमी किंवा अधिक) वेगाने काम करणे, बेफिकिरी, वादविवाद करणे इत्यादी बाबीसुद्धा अपघाताला कारणीभूत असू शकतात. 
3. इतर कारणे : असुरक्षित प्रसंग, बदलते हवामान, कामाच्या पद्धतीतील अचानक बदल, अति आवाज, उष्णता, वातावरणातील आर्द्रता, निसरडी जमीन, प्रखर प्रकाशाची तिरीप, धूळ, धुराचे लोट या गोष्टी कार्यामध्ये असुरक्षितता आणतात. प्रसंगी कामगार/अधिकारी वर्गाची बेफिकीर वृत्ती कार्यातील सकारात्मकता नष्ट करून अपघाताला कारणीभूत ठरू शकते.
बहुधा अपघातांना एकापेक्षा जास्त प्रकारची कारणे लागू होतात. अपघात हे अनपेक्षितरित्या घडतात. असे घडावे यासाठी कोणतीही योजना झालेली नसते. परंतु, अपघात घडू नयेत यासाठी योजनाबद्ध आणि सातत्याने संघटित काम करावे लागते.
बहुतेक कारखान्यांमध्ये औद्योगिक सुरक्षितता वाढविण्याविषयी काम होतच असते. त्यामधील कायदे, नियम, अडचणी इत्यादी बाबी विचाराधीन असतात. याच बरोबर, आपल्या परिवारातील अन्य ठिकाणी झालेल्या एखाद्या अपघाताच्या माहितीतून आपण बोध घेऊन काही मार्ग निश्चित करू शकतो. आम्ही यासाठी काही प्रत्यक्ष घटनांवर आधारित लेखमाला सादर करीत आहोत. यामध्ये अपघाताची कारणे आणि अपेक्षित सुधारणांची मीमांसा करण्याचा प्रयत्न आहे. त्यामधून आपले प्रबोधन होईल आणि काही अंशी का होईना, विविध उद्योगांमध्ये अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
(लेखन साहाय्य : अच्युत मेढेकर)
 
@@AUTHORINFO_V1@@