पोस्ट प्रोसेसिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    09-Mar-2021   
Total Views |
धातुकाम मासिकात डिसेंबर 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या लेखात, आपण मल्टिटास्किंग यंत्रण म्हणजे काय आणि त्याच्यामुळे यंत्रणाची कार्यक्षमता कशी वाढते आणि खर्च कसा कमी होतो याबाबत जाणून घेतले होते. या लेखात, CAM प्रोग्रॅमिंगचा महत्त्वाचा भाग असलेल्या पोस्ट प्रोसेसिंगविषयी जाणून घेणार आहोत.
 
सी.एन.सी. पोस्ट प्रोसेसर म्हणजे काय?
यापूर्वी प्रकाशित झालेल्या सात लेखांमध्ये आपण CAM प्रोग्रॅमिंगचे विविध प्रकार आणि सी.एन.सी. मिल, लेथ किंवा बहुअक्षीय मशीनिंग सेंटरवरील यंत्रणात केल्या जाणाऱ्या त्याच्या वापराबद्दल जाणून घेतले होते. CAM प्रणालीमध्ये टूलमार्ग (पाथ) तयार केले जातात आणि नंतर ते पोस्ट प्रोसेसरकडे पाठविले जातात. पोस्ट प्रोसेसर हा CAM सॉफ्टवेअरद्वारा गणना केलेल्या टूल हालचालींचा NC कोडमध्ये अनुवाद करणारा सॉफ्टवेअरमधलाच एक विभाग असतो. त्याने निर्माण केलेले NC कोड विशिष्ट मशीनद्वारे कार्यान्वित केले जाऊ शकतात.
संगणकाच्या इतिहासात पोस्ट प्रोसेसरची व्याख्या 'अन्य प्रोग्रॅमचा आउटपुट एखाद्या विशिष्ट उपकरणासाठी फॉरमॅट करण्याचे काम करणारा प्रोग्रॅम' अशी केली जाते. दुसऱ्या शब्दात याचा अर्थ असा आहे की, पोस्ट प्रोसेसर हा एक संरचित (स्ट्रक्चर्ड) कॉन्फिगरेटर असतो. सामान्यतः ही एक एन्कोड केलेली फाइल असते, जी कटर आणि मार्ग/स्थानाच्या माहितीवर (डाटा) कार्य करते आणि दिलेल्या मशीन टूल आणि नियंत्रकासाठी (कंट्रोलर) फॉरमॅट केलेले G आणि M कोड बनविते.
पोस्टिंग प्रक्रिया पुढील तुकडे एकत्र करते.
• यंत्रभागाच्या फाइलमधील NCI माहिती (डाटा)
• मशीन परिभाषा
• नियंत्रक परिभाषा
• यंत्रभागाच्या फाइलमधील इतर सेटिंग आणि पॅरामीटर
तसेच पोस्टिंग ही CAM प्रोग्रॅमिंगची अंतिम पायरी (तक्ता क्र. 1) आहे. यामुळे हे सुनिश्चित होते की, टूलमार्ग निर्माण करण्यातील सर्व कामे तो मार्ग नंतर कोणत्या मशीनवर वापरला जाणार असेल, यावर अवलंबून नसतात. यात जरी कायनेमॅटिक निर्बंध असले, तरीही प्रोग्रॅमरला विविध धोरणे आणि दृष्टिकोन वापरून टूलमार्ग तयार करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते. तसेच, पोस्ट प्रोसेसरवर नमूद केलेली माहिती विचारात घेत आणि ज्या सी.एन.सी. मशीन आणि नियंत्रकावर काम होणार असेल, त्यानुसार त्या माहितीची रचना केली जाते.
1_1  H x W: 0 x
 
t1_1  H x W: 0  
व्यवस्थित कॉन्फिगर केलेला पोस्ट (प्रोसेसर), कारखान्यातील कामाचा प्रवाह (वर्क फ्लो), माहिती हाताळण्याच्या कार्यपद्धती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मशीन टूल आणि नियंत्रकाच्या आवश्यकतेनुसार माहितीचा सर्वोत्तम उपयोग करून तिला योग्यप्रकारे प्रस्तुत करू शकतो. उदाहरणार्थ, सी.एन.सी. नियंत्रकासाठी वर्क ऑफसेट, टूल ऑफसेट आणि कॅन्ड् केलेली आवर्तने, अशासारख्या माहितीचे फॉरमॅटिंग आणि एका विशिष्ट प्रकारे केलेली मांडणी अपेक्षित असते. मशीन शॉपसाठी सुरक्षा ब्लॉकचे मानक किंवा कामामध्ये आवश्यक टिप्पण्या पोस्ट प्रोसेसरद्वारा दिल्या जाव्यात, अशी अपेक्षा असू शकते. पोस्ट (प्रोसेसर) दुय्यम कामे करीत असलेल्या उपकरणांसाठी अलार्म किंवा संकेत (सिग्नल) असे अतिरिक्त आउटपुटदेखील निर्माण करू शकतो. दिलेल्या CAD प्रणालीमध्ये सध्या उपलब्ध असेल त्यापलीकडची कामे करण्यासाठी काही पोस्ट प्रोग्रॅम केल्या जाऊ शकतात.
कार्यपद्धती
कटर लोकेशन फाइलमधील माहिती NC कोडमध्ये कशी अनुवादित केली जाते, ते चित्र क्र. 1 मध्ये दिलेल्या उदाहरणातून आपण समजून घेऊ.
2_1  H x W: 0 x
• बाह्य व्यास (OD) 150 मिमी. सह टर्निंग प्रोफाइल, स्टेप व्यास 100 मिमी., स्टेप टर्निंग लांबी 50 मिमी.
• बाहेरील काप (आउटसाइड कट) 200 मिमी. X 100 मिमी. सह मिलिंग पॉकेट प्रोफाइल
फिनिशिंग पाससाठीचा टूलमार्ग NC मध्ये पुढीलप्रकारे अनुवादित केला जातो. टूल मार्गाची माहिती एका मानक कोड फॉरमॅटवर आधारित असलेल्या रॅपिड मूव्ह, लिनीयर मूव्ह किंवा सर्क्युलर मूव्ह म्हणून ASCII फॉरमॅटमध्ये संचयित केली जाते. एकदा पोस्ट प्रोसेसर चालू झाले की, ते या टूल मार्गाच्या माहितीचे (CL डाटा) पार्सिंग करते म्हणजे त्यातील शब्दांचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित करते. (डाटा पार्सिंगमध्ये डाटाची एक स्ट्रिंग भिन्न प्रकारच्या डाटामध्ये रूपांतरित होते. म्हणजे समजा आपली माहिती HTML मध्ये आहे, तर पार्सर तो HTML घेतो आणि त्याला सहजपणे वाचता आणि समजता येईल अशा अधिक वाचनीय (रीडेबल) माहितीच्या स्वरूपात रूपांतरित करतो.) पोस्ट प्रोसेसर त्रिकोणमितीय माहिती आणि गणना वेगळ्या ब्लॉकमध्ये ठेवतो. ASCII फाइलमध्ये कटर लोकेशन प्रोग्रॅम कसे दिसतात ते चित्र क्र. 2 मध्ये दाखविले आहे.
3_1  H x W: 0 x
हे ब्लॉक त्यांच्या सी.एन.सी. मशीनद्वारा वाचता येण्याजोग्या समकक्ष कोडमध्ये G आणि M मानक स्वरूपात अनुवादित केले जातात, ते प्रोग्रॅम चित्र क्र. 3 मध्ये दाखविले आहे.
 
3_1  H x W: 0 x
पोस्ट प्रोसेसर : संपादन (एडिटिंग)
आपल्याकडील पोस्ट प्रोसेसरमध्ये संपादन करणे, हे CAM पुरवठादाराने असे संपादन करण्यासाठी त्याला सक्षम केले आहे का, यावर मुख्यत्त्वे अवलंबून असते. सामान्यत:, साध्या 2 आणि 3 अक्षीय यंत्रणासाठी असलेल्या पोस्ट प्रोसेसरमध्ये काही ठराविक प्रकारचे संपादन करण्याचा पर्याय दिलेला असतो. वापरकर्त्याच्या इच्छेनुसार आउटपुटमध्ये ग्राहकानुरूप बदल करता येतात. उदाहरणार्थ, जर वापरकर्त्यांना आउटपुट फाइलमध्ये एक टिप्पणी घालायची असेल, जी नंतर सी.एन.सी. नियंत्रकाला दिली जाईल, तर पोस्ट प्रोसेसरमध्ये निर्धारित वाक्यरचना आणि त्याच्याशी संबंधित बदलणारे घटक (व्हेरिएबल) समाविष्ट करून तसे करता येईल.
तथापि, बहुतेक सगळ्या प्रगत बहुअक्षीय, मिल-टर्न किंवा स्विस लेथ पोस्ट प्रोसेसरमधील संपादनक्षमता मशीन टूल आणि/अथवा ऑपरेटर यांचे अपघाती नुकसानापासून संरक्षण करण्यापुरती मर्यादित असते.
अर्थात, कुशल सॉफ्टवेअर अभियंते, या क्षेत्रातील ज्येष्ठ विशेषज्ञ आणि पोस्ट प्रोसेसर विकसक, CAM पुरवठादाराद्वारे परवानगी असल्यास, ओपन पोस्ट प्रोसेसरद्वारे, पोस्ट प्रोसेसर ग्राहकानुरुप (कस्टमाइज) करू शकतात. मात्र, क्लोज्ड् पोस्ट प्रोसेसरमध्ये, केवळ CAM पुरवठादारच संपादन करू शकतात.
पोस्ट प्रोसेसर : विविधता आणि वापरकर्ते
मशीन टूल निर्माते हे नवीन पोस्ट प्रोसेसरचे प्रथम ग्राहक असतात. जेव्हा नवीन मशीन टूल विकसित केले जात असते, तेव्हा CAM सॉफ्टवेअरचा विकसक, मशीन टूलचे निर्माते आणि नियंत्रकाचे पुरवठादार, हे परस्परांच्या सहकार्याने एकत्रपणे काम करून नवीन मशीन टूलच्या आउटपुटसंबंधित बहुतांश आवश्यकता पूर्ण करणारा एक प्रारंभिक जेनेरिक पोस्ट प्रोसेसर विकसित करतात. कोणत्याही CAM सॉफ्टवेअर विकसकाचा बऱ्याच मशीन टूल विक्रेत्यांशी रोजचा संबंध असतो. या संबंधांमुळे सॉफ्टवेअर विकसक नवीन मशीन टूलवर पोस्ट प्रोसेसरच्या निर्मितीचे आणि चाचणी घेण्याचे काम करू शकतात.
 
ज्या कारखान्यांमध्ये नवीन मशीन टूलच्या सुरुवातीच्या चाचण्या घेतल्या जातात, तिथे हे जेनेरिक पोस्ट प्रोसेसर थोड्या (आवश्यक असल्यास) बदलांसह, लेखी स्वरूपात वापरले जाऊ शकतात. नवीन वापरकर्त्यांना उपकरणे वापरताना चांगली उत्पादकता मिळण्यासाठी जेनेरिक पोस्टमध्ये (प्रोसेसर) पुरेशी क्रियात्मकता (फंक्शनॅलिटी) असणे आवश्यक असते. तथापि, या टप्प्यावर पोस्ट प्रोसेसरचे विकल्प कमीतकमी ठेवले पाहिजेत. अन्यथा, काही ग्राहक समाधानी असतील, तर काहींना सी.एन.सी. उत्पादनाचा वर्कफ्लो तयार करण्याच्या त्यांच्या पद्धतीसाठी हा पोस्ट प्रोसेसर पूर्णपणे गैरलागू वाटेल. त्यामुळे प्रत्येक अंतिम वापरकर्त्याच्या विशिष्ट गरजा ओळखून त्यानुसार अंतिम कॉन्फिगरेशन तयार करण्यासाठी हा दृष्टिकोन उपयुक्त ठरू शकतो.
साधारणपणे अंतिम वापरकर्ते तीनपैकी एका श्रेणीत येतात. जसे की, बऱ्याच लोकांचा असा अनुभव असतो की, त्यांच्या गरजा जेनेरिक पोस्ट प्रोसेसर (पुनर्विक्रेत्याद्वारे काही किरकोळ सुधारणांसह किंवा त्याशिवाय) पूर्ण करू शकतात. इतरांना कधी अगदी थोड्या, तर कधी भरपूर अशा काही विशिष्ट ग्राहकानुरुप बदलांची आवश्यकता असते. बहुधा, या सुधारणा किंवा विशिष्ट बदल करण्याचा खर्च, पूर्णपणे नवा ग्राहकानुरुप पोस्ट प्रोसेसर विकसित करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा अगदी छोटा भाग असतो. वापरकर्त्यांच्या बहुतेक सगळ्या, आवश्यकता आधीपासूनच पूर्ण करणारी सामान्य आवृत्ती (जेनेरिक व्हर्जन) वापरणे, हा बऱ्याच जणांसाठी प्रारंभिक बिंदू असू शकतो.
 
तिसऱ्या प्रकारच्या अंतिम वापरकर्त्यांमध्ये सी.एन.सी. प्रोग्रॅमर आणि मशीन ऑपरेटर येतात, जे पोस्ट प्रोसेसरमध्ये जाऊन आणि कोडच्या ओळी बदलून त्याची क्रियात्मकता बदलू शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा आधीपासून प्रोग्रॅम केलेल्या यंत्रभागामध्ये किरकोळ बदल करणे आवश्यक वाटत असते, तेव्हा बरेच मशीन ऑपरेटर फक्त मशीनमधील G आणि M कोडमध्ये थोडीशी सुधारणा करतात. तथापि, यंत्रभागातील असे बदल वारंवार केले जात असल्यास, पोस्ट प्रोसेसरमध्ये संपादन करून, तसे बदल करण्यासाठी काही परिमाणीय चल (व्हेरिएबल) प्रविष्ट करून स्वयंचलितपणे नवीन कोड निर्माण करणे, हा एक अधिक कार्यक्षम उपाय असू शकतो.
पोस्ट प्रोसेसर : ओपन पोस्ट प्रोसेसर ग्राहकानुरुप आणि संपादित करायला शिकणे
मानक CAM इन्स्टॉलेशनसोबत मिळणाऱ्या मूलभूत प्रशिक्षणाद्वारे, बरेच प्रोग्रॅमर सक्षमपणे उपयुक्त बदल करू शकतात. थोडक्यात, वापरकर्त्यांना त्यांच्या सी.एन.सी. मशीनवर प्रोग्रॅम कसा पोस्ट करायचा किंवा CAM पॅकेजमध्ये तयार केलेल्या प्रोग्रॅममध्ये सामान्य बदल करण्यासाठी तक्त्यांमधील काही माहिती कशी बदलायची, हे माहित असणे आवश्यक आहे.
दरम्यान, याबाबत ज्यांना अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी, इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. वेगवेगळ्या CAM पुरवठादारांचे पोस्ट प्रोसेसर ग्राहकानुरुप चर्चा करणारी असंख्य नियंत्रित मंच आणि मंडळे आहेत. त्यामुळे हीदेखील एक चांगली सुरुवात असू शकते.
एखादा वापरकर्ता प्रगत पोस्ट प्रोसेसर प्रशिक्षण अभ्यासक्रमाचासुद्धा विचार करू शकतो. संहिता लिहिण्याची योग्यता असलेल्यांसाठी, हे ज्ञान त्यांना त्यांच्या कारखान्यातील सी.एन.सी. मशीनची उत्पादकता वाढविण्यात मदत करू शकते.
पोस्ट प्रोसेसर : CAM खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी काय जाणून घ्यावे?
पोस्ट प्रोसेसर CAM प्रणालीचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग असतात. म्हणूनच, आपण ज्या CAM प्रणालीचा विचार करीत असाल, तिच्या कोणत्याही इतर वैशिष्ट्यांप्रमाणेच पोस्ट प्रोसेसरचेही संपूर्ण मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी पुढील काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
• CAM प्रणालीत बाह्य सी.एन.सी. पोस्ट प्रोसेसर वापरला जातो का? तसे असल्यास, यामुळे आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या नियंत्रकांना हाताळण्याची लवचिकता मिळते. जिथे वेगवेगळ्या प्रकारची सी.एन.सी. उपकरणे असतील, अशा कारखान्याच्या गरजा भागविण्यासाठी मशीन कोडचा आउटपुट मिळण्यासाठी पोस्ट प्रोसेसरवर अवलंबून नसलेली, CAM प्रणाली पुरेशी लवचीक असू शकत नाही.
• सॉफ्टवेअरच्या किंमतीत पोस्ट प्रोसेसर समाविष्ट आहे का? आपल्याकडील सर्व मशीनसाठी एकत्रपणे पोस्ट प्रोसेसर घेण्याची किंमत जाणून घ्या. अतिरिक्त पोस्ट प्रोसेसर नंतर हवा असला तर त्यासाठी किती खर्च येईल? बहुअक्षीय नियंत्रकासाठी नवीन पोस्ट प्रोसेसरची किंमत किती आहे? आपण सध्याचा पोस्ट प्रोसेसर बदलू इच्छित असल्यास किती खर्च असेल?
• आपल्या प्रणालीसाठी NC आउटपुट कोण ग्राहकानुरुप करेल? आपले कंट्रोल आणि आपल्या कारखान्यातील कामाच्या पद्धतीनुसार NC आउटपुटचे फाइन-ट्युनिंग करण्याची आवश्यकता असू शकते. पुनर्विक्रेता पोस्ट प्रोसेसर ग्राहकानुरुप करेल की सॉफ्टवेअर कंपनी हे बदल करून देईल? काही पुनर्विक्रेते इतरांपेक्षा अधिक सक्षम असतात. त्याचप्रमाणे, काही कंपन्या बदल करून देण्याच्या विनंत्यांना इतरांपेक्षा अधिक चांगला प्रतिसाद देतात.
• CAM उत्पादात पोस्ट प्रोसेसर ग्राहकानुरुप करण्यासाठी आवश्यक टूल समाविष्ट आहेत का? ग्राहकानुरुप बदल करण्याची क्षमता असलेल्या पोस्ट प्रोसेसरमध्ये आपण स्वत: किंवा तांत्रिक ज्ञान असलेले कोणीही बदल करू शकतात. तथापि, पोस्ट प्रोसेसरमध्ये लिहिणे किंवा संपादित करणे, हे अनुभव नसलेल्या माणसाचे काम नाही. पण, जर ट्रू स्टेप डीबगर, इंटिग्रेटेड टेक्स्ट एडिटर आणि सर्वसमावेशक संदर्भ दस्तऐवजीकरण यासारखी साधने उपलब्ध असतील, तर पोस्ट प्रोसेसरचे यशस्वी आणि विश्वासार्ह संपादन अधिक सहजपणे करता येते. ही साधने काय आहेत, हे स्पष्टपणे सांगण्यासाठी आणि त्यापैकी काय उपलब्ध आहे, त्याचे वर्णन करण्यासाठी CAM पुरवठादार सक्षम असले पाहिजेत. त्याशिवाय कारखान्यात पोस्ट प्रोसेसर कार्यान्वित करण्यापूर्वी वापरकर्त्याने पुरवठादाराकडे त्याची कसून तपासणीदेखील करणे आवश्यक आहे.
• एका मशीनमधून दुसऱ्या मशीनमध्ये प्रोग्रॅम टाकणे सोपे आहे का? काही CAD/CAM प्रणालींमध्ये, तोच टूलमार्ग वेगळ्या सी.एन.सी. मशीन नियंत्रकामध्ये न्यायचा/वापरायचा असेल, तर फक्त वेगळा पोस्ट प्रोसेसर वापरावा लागतो. इतर प्रणालींमध्ये आपल्याला यंत्रभागाची फाइल पहिल्यापासून पुन्हा प्रोग्रॅम करावी लागते, जे गैरसोयीचे आणि अकार्यक्षम असते.
• आपल्या CAM प्रणालीसाठी पोस्ट प्रोसेसर प्रशिक्षण उपलब्ध आहे का? चांगले पोस्ट प्रोसेसर आपल्या सी.एन.सी. उत्पादन प्रणालीमध्ये लवचिकता आणि कार्यक्षमतेचे नवीन परिमाण जोडू शकतात. याचा फायदा घेत, पोस्ट प्रोसेसर कसे कार्य करते हे समजून घेणे आवश्यक आहे. संभाव्य CAM पुरवठादार पोस्ट प्रोसेसरचे कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देणार आहे, ते जाणून घ्या.
सारांश
पोस्ट प्रोसेसर CAM सॉफ्टवेअरचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, प्रत्येक पोस्ट प्रोसेसर संबंधित मशीन टूल, नियंत्रक आणि त्यातील कायनेमॅटिक्स यांच्यावर अनन्यपणे आधारित असतो. बऱ्याच CAM पुरवठादारांद्वारे काही साधे, सोपे संपादन करण्याची अनुमती बहुधा दिलेली असते, तरीही पोस्ट प्रोसेसरच्या प्रगत संपादनासाठी प्रोग्रॅमिंग कौशल्ये तसेच मशीन नियंत्रक आणि कायनेमॅटिक्सचे ज्ञान आवश्यक असते. एक कार्यक्षम पोस्ट प्रोसेसर सी.एन.सी. मशीनवर चालणाऱ्या CAM प्रोग्रॅमला सुरक्षा, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता प्रदान करतो.
आमच्या CAM सॉफ्टवेअरच्या 8 भागांच्या लेखमालेचा हा शेवटचा लेख असून या लेखमालेतून वाचकांना CAM सॉफ्टवेअर आणि प्रणालींबद्दल उपयुक्त माहिती मिळाली असेल, अशी आम्हाला आशा आहे. या पुढील लेखांमध्ये आम्ही आपल्याला असाच काही विशिष्ट केस स्टडींबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
 
@@AUTHORINFO_V1@@