संपादकीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    09-Mar-2021   
Total Views |

1_1  H x W: 0 x
2020-21 या आर्थिक वर्षातील हा शेवटचा महिना जवळजवळ वाया गेलेल्या वर्षातील शेवटची संधी असलेला महिना आहे आणि पूर्ण उद्योगजगत याचा जास्तीतजास्त लाभ कसा करून घेता येईल यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. IHS मार्किट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजरचा निर्देशांक गेले 6 महिने सतत चढती कमान दाखवीत आहे. जानेवारी 2021 मध्ये त्याने उच्चांकी 57.7 चा टप्पा गाठला. औद्योगिक उत्पादन वाढत असल्याचे हे प्रमाण आहे.
 
1 फेब्रुवारी रोजी सादर झालेले केंद्रीय अंदाजपत्रक लघु मध्यम उद्योगासाठी आशादायक आहे. कोव्हिड 19 ने कंबरडे मोडलेल्या लघु मध्यम उद्योगासाठी या वर्षीच्या केंद्रीय अंदाजपत्रकात भरघोस मदत करण्याचे नियोजन केले आहे. लघु मध्यम उद्योगासाठी 2020-21 च्या अंदाजपत्रकातील 7572 कोटी रुपयांची तरतूद, आता 2021-22 च्या अंदाजपत्रकात 15,700 कोटी रुपयांची झाली आहे. म्हणजे सुमारे दुप्पट वाढ केलेली दिसते आहे.
 
याचे थोडक्यात तपशील पाहिले तर लक्षात येते की, खादी ग्रामोद्योग, सोलर चरखा अशासारख्या ग्रामीण विकासाला हातभार लावणाऱ्या योजनावरील तरतूद गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे. गतवर्षी सुमारे 2500 कोटींच्या घरात असलेली ही रक्कम या वर्षी 1400 कोटींच्या आसपास आहे. औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञान विकास आणि गुणवत्ता प्रमाणीकरणासाठी गतवर्षी असलेली 683.91 कोटींची तरतूद कमी होऊन यंदा ती फक्त 330.31 कोटी आहे, तर ग्रामीण उद्योजकता विकासासाठी नियोजित तरतूदही 15 कोटींवरून 7.5 कोटींपर्यंत कमी केली आहे. या आणि इतर काही योजनावरील तरतुदी कमी करून या अंदाजपत्रकात प्रधानमंत्री रोजगार निर्माण योजना (PMEGP) आणि इतर वित्त्तीय सहाय्यक योजनांवरील तरतुदीमध्ये 2800 कोटींवरून 12499.7 कोटींपर्यंत वाढ केली आहे. यात खरेतर PMEGP वरील तरतूद 500 कोटींनी कमीच केली आहे आणि गॅरंटी इमर्जन्सी क्रेडिट लाईन (GECL) या लघु मध्यम उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या योजनेसाठी 10000 कोटींची तरतूद केली आहे. कर्जासाठी मोठी रक्कम उपलब्ध करताना विपणन आणि परदेशी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी मिळणाऱ्या साहाय्यासाठी असलेल्या तरतुदीत मात्र 130 कोटींवरून 65 कोटींपर्यंत कपात केली आहे. कौशल्य विकास योजनेसाठी असलेल्या तरतुदीत लक्षणीय बदल दिसत नाही.
 
आर्थिक पातळीवर सरकारी धोरणे आपल्यासाठी तेव्हाच उपयुक्त ठरतात, जेव्हा आपण आपल्या व्यवसायातील बदल आणि सुधारणा आत्मसात करण्याबद्दल सजग असतो. धातुकाम मासिकातून आम्ही यासाठी यंत्रण आणि कारखान्याशी संबंधित विषय वाचकांपर्यंत पोहोचवीत असतो. गेली 2-3 वर्षे मासिकातून सी.एन.सी. प्रोग्रॅमिंग, जिग्ज आणि फिक्श्चर्स, टूलिंगमधील सुधारणा, मशीन मेंटेनन्स, अशा अनेक विषयांवरील लेखमाला प्रकाशित केल्या आहेत. या अंकापासून आम्ही कारखान्यात घडणाऱ्या गंभीर आणि गंमतीदार गोष्टींतून होणाऱ्या शिक्षणावर आधारित ‘किस्से’, काम करताना आलेल्या समस्या कशा सोडविल्या ते सांगणारी ‘युक्त्या आणि क्लृप्त्या’, सुरक्षिततेची जाणीव वाढविणारी ‘औद्योगिक सुरक्षितता’ अशा नवीन लेखमाला सुरू करीत आहोत. त्याचबरोबर उत्पादनातील गुणवत्ता राखण्यासाठी मदत करणाऱ्या प्रगत गुणवत्ता तंत्रांची ओळख करून देणारी आणि गेल्या काही अंकांपासून सुरू असलेली सी.एम.एम.चे अंतरंग उलगडणारी लेखमालाही आपल्याला उपयुक्त माहिती देत राहील. नवीन तंत्र, मशीन, टूलिंग इत्यादी विषयातील तांत्रिक माहिती देणारे लेखही असणारच आहेत. यंत्रण उद्योगातही आता महिलांचा लक्षणीय सहभाग असल्याचे दिसून येत आहे. 8 मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका यशस्वी महिला उद्योजकाचा प्रवास उलगडणारा विशेष लेखही या अंकात समाविष्ट केलेला आहे.
किस्से, समस्यानिवारण, सुरक्षितता या विषयांवरील लेखामालांमध्ये आपणही सहभाग घ्यावा अशी आग्रहाची विनंती.
 
 
दीपक देवधर
@@AUTHORINFO_V1@@