सर्वांना नवीन आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा. एव्हाना उद्योजकांची ‘मार्च अखेरीची’ कामे संपून नवीन आर्थिक वर्षातील नियोजनानुसार कामाला सुरुवातदेखील झाली असेल. कोरोना महामारीमुळे मागील वर्ष सर्वच क्षेत्रांसाठी आव्हानात्मक होते. टाळेबंदीच्या काळात उद्योग-व्यवसाय टिकवून ठेवणे महत्त्वाचे, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विकासाची सर्वच क्षेत्रे यात भरडली गेल्याने देशाचा विकासाचा वेगही मंदावला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता दुसरी लाट पुन्हा येते की काय, असे काहीसे चित्र असले तरी कोरोना प्रतिबंधक लस आशेचा किरण ठरत आहे. दुसरी सकारात्मक बाब अशी की, 2021-22 मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 13.7 टक्क्यांवर जाण्याची शक्यता असून देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे संकेत जागतिक दर्जाच्या ‘मुडीज’ या रेटिंग एजन्सीने दिले आहेत. तर भारताचा चालू आर्थिक वर्षातील GDP दर 7 टक्क्यांवरच राहणार असल्याचेही म्हटले आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षात GDP आणि औद्योगिक उत्पादनात पहिल्या तिमाहीत (24.4%) आणि दुसऱ्या तिमाहीत (7.3%) अशी सातत्याने घट झाली होती. या सलग घसरणीनंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत GDP मध्ये 0.4 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. हीच वाढ मागील आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत 3.3 % नोंदली गेली होती. मागील आर्थिक वर्षात GDP 4 टक्क्यांनी वाढला असला, तरी 2020-21 या आर्थिक वर्षात GDP 8 % घसरण्याचा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होतो.
भारतीय औद्योगिक उत्पादनातील वाढ अथवा घट प्रामुख्याने वाहन उद्योगातील तेजी अथवा मंदीवर अवलंबून असते. हे वर्ष संपताना तसेच पुढील वर्षभरात वाहन उद्योगामधील वाढ कायम राहील अशी चिन्हे आहेत. सध्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर या नवीन आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल आहे. मात्र, चार्जिंग स्टेशनची कमतरता आणि जास्त किंमती अशा समस्या असूनसुद्धा या प्रकारच्या वाहन खरेदीची आकडेवारी वाढते प्रमाण दर्शविणारी आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याची जागरूकता 22 एप्रिल या दिवशी साजऱ्या होणाऱ्या ‘जागतिक वसुंधरा दिवसा’च्या धोरणांना पूरक अशीच आहे. व्यक्तिगत पातळीवर वाढत असलेली ही जागरूकता उद्योग पातळीवरसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसणे गरजेचे आहे. उद्योगांतून बाहेर पडणाऱ्या विविध वायूंमुळे, तेलांमुळे आणि इतर प्रदूषक रसायनांमुळे आपल्या भोवतालच्या पर्यावरणाचा निश्चितच ऱ्हास होतो आहे. आपल्या उद्योग-व्यवसायामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमीतकमी कसा होईल किंवा तो होणारच नाही, या दृष्टीने आपण सर्वांनी पावले टाकली पाहिजेत. यासाठी अनेक कंपन्या पुढाकारही घेत आहेत. अनेक कंपन्या विकासाचे शाश्वत मॉडेल अवलंबत आहेत. टाकाऊ वस्तूंचे व्यवस्थापन (वेस्ट मॅनेजमेंट), ऊर्जेचा इष्टतम वापर (ऑप्टिमम एनर्जी कन्झम्प्शन), कार्बनचे उत्सर्जन कमी करणे या दृष्टीने कारखान्यांची पुनर्रचनादेखील केली जात आहे. यापुढील काळ हा शाश्वत निर्मितीस (सस्टेनेबल मॅन्युफॅक्चरिंग) प्राधान्य देणारा काळ असणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या व्यवसायात आवश्यक सुधारणा करणे रास्त ठरणार आहे.
व्यवसाय अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर व्हावा यासाठी प्रत्यक्ष यंत्रण प्रक्रियेमध्ये होत असलेले बदल आम्ही धातुकाम मासिकातून वाचकांपर्यंत पोहोचवित असतो. धातुकामच्या या अंकात टर्निंग प्रक्रियेविषयी अधिक सविस्तर माहिती दिली आहे. यंत्रभागाच्या उच्च गुणवत्तेसाठी गरजेनुसार आडव्या आणि उभ्या सी.एन.सी. टर्निंग सेंटरद्वारे त्याचे यंत्रण केले जाते. या आडव्या आणि उभ्या टर्निंग सेंटरमधील मूलभूत फरक समजावून सांगणाऱ्या लेखाबरोबरच, टर्निंग प्रक्रियेतील टॉलरन्स आणि भौमितिक अचूकता उत्कृष्टपणे साध्य करण्यासाठी परिणामकारक असलेल्या महत्त्वाच्या बाबींची चर्चा या अंकात केली आहे. टर्निंग सेंटरवरील चालित हत्यारधारकाविषयी आणि HRSA वर टर्निंग करताना लक्षात घेण्याजोग्या महत्त्वाच्या तांत्रिक बाबींची माहिती या अंकात दिली आहे. याबरोबरच कारखान्यातील सुरक्षितता, आर्थिक नियोजन, यंत्रणातील काही युक्त्या आणि क्लृप्त्या, कारखान्यात घडणारे किस्से या लेखमालांतून मनोरंजनाबरोबरच आपले शिक्षणदेखील होईल ही अपेक्षा.
दीपक देवधर
[email protected]