इंडस्ट्री 4.0 ही उद्योगामधली एक स्वयंचलन प्रणाली आहे. या लेखामध्ये प्रणालीचे MSME कंपन्यांना होणारे फायदे आदींबाबत भाष्य करण्यात आले आहे.
इंडस्ट्री 4.0 हे फक्त मोठ्या कंपन्यांसाठी आहे. लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योगांसाठी (MSME) ते उपयुक्त नाही आणि त्यांना ते परवडणारही नाही, असा एक मोठा समज उद्योगक्षेत्रात प्रचलित आहे. हे साफ चुकीचे आहे! कोणत्याही आकाराची कंपनी असो, इंडस्ट्री 4.0 त्यांना फायदेशीर आणि परवडणारेच असते.
इंडस्ट्री 4.0 ही उद्योगामधली एक स्वयंचलन प्रणाली आहे. मशीनला जोडलेले संवेदक (सेन्सर), इंटरनेट आणि क्लाउड यांचा वापर करून माहिती (डाटा) गोळा करणे, हस्तांतरित (ट्रान्स्फर) करणे आणि त्याचे विश्लेषण करणे, हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. ही या प्रणालीची ढोबळ व्याख्या आहे आणि त्यात किती प्रमाणात स्वयंचलन आहे, आपण गोळा केलेल्या माहितीचे काय करता येते इत्यादी कोणत्याही गोष्टींचा समावेश नाही. यात प्रामुख्याने थेट मशीनमधून माहिती गोळा केली जाते, त्यानंतर त्याचे विश्लेषण केले जाते, मग काय कृती करावयाची ते सांगितले जाते किंवा परिस्थितीचा अहवाल दिला जातो. हे सगळे स्वयंचलितपणे एका सॉफ्टवेअरद्वारे केले जाते. संवेदक हा यातील मुख्य घटक आहे, जो मशीनमधून माहिती मिळवून क्लाउडला पाठवितो. क्लाउडवरील सॉफ्टवेअर त्या माहितीचे विश्लेषण करते आणि त्याचा अहवाल देते किंवा इतर कारवाई करते. आजमितीला यापैकी कोणतीही गोष्ट उच्च तंत्रज्ञानाची किंवा महागडी नाही.
इंडस्ट्री 4.0 चा MSME ला फायदा होऊ शकतो का?
बहुतांशी सूक्ष्म किंवा लघु उद्योग एका मालकाद्वारे चालविले जातात. तिथे व्यवस्थापनाची उतरंड नसते, मालकच सर्वेसर्वा असतो. जेव्हा मालक कारखान्यात शॉपफ्लोअरवर असतो, तेव्हा उत्पादनक्षमता जास्त असते. जेव्हा तो शॉपफ्लोअरवर नसतो, तेव्हा मशीन बऱ्यापैकी निष्क्रिय असतात आणि उत्पादन कमी असते. मालक सर्वकाळ कारखान्यात शॉपफ्लोअरवर हजर राहू शकत नाही. ग्राहक आणि विक्रेत्यांना भेटणे, कर कार्यालयात जाणे, बँकेत जाणे वगैरे अशी इतरही बरीच कामे त्याच्याकडे असतात. समजा पहिली पाळी सकाळी 6 वाजता सुरू होते, परंतु मशीन प्रत्यक्षात साडेसहा वाजता चालू होते. जेवणाची आणि चहाची सुटी त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे अधिक घेतली जाते. रात्रपाळीचे उत्पादन नेहमीच कमी असते. वीज जाणे, मशीन बिघडणे, कच्चा माल नाही, टूल नाही अशा तक्रारी वारंवार येत असतात. यापैकी काही प्रश्न कार्यपद्धतीशी निगडित आहेत, तर काही समस्या कामाच्या आचारसंहितेच्याही आहेत. बऱ्याच कारखान्यांमधील मशीन 30% ते 40% वेळ बंद असतात, परंतु मालकांना ती मशीन किती वेळ बंद असतात किंवा का बंद असतात याची कल्पनाही नसते.
इंडस्ट्री 4.0 आधारित मशीन संनियंत्रण प्रणाली (मॉनिटरिंग सिस्टिम), मालकाला शॉपफ्लोअरवर नेमके काय घडते आहे, (चित्र क्र. 1, 2, 3 आणि 4) ते जाणून घेण्यास सक्षम करते. मशीनचा अनुत्पादक वेळ किती आहे आणि त्याची कारणे, मालकाला माहिती होतात. तो समस्यांचे वेळेवर निराकरण करू शकतो आणि नफ्याचे प्रमाण वाढवू शकतो. विशेष म्हणजे हे सर्व तो कारखान्यात न जातादेखील करू शकतो. तो त्याच्या मोबाइल फोन, टॅब किंवा लॅपटॉपवर कधीही, कुठूनही त्याच्या मशीनचा मागोवा (ट्रॅक) घेऊ शकतो.
फायदे
• कामाच्या आचारसंहितेमुळे आणि कार्यपद्धतीतील त्रुटींमुळे होणारा अनुत्पादक वेळ कमी करता येतो.
• उत्पादनात वाढ
• मशीनचा उपयोग, OEE सुधारतो.
• उत्पादनामधील अस्वीकृती (रिजेक्शन) कमी होते.
• कन्झ्युमेबलचा (उदाहरणार्थ इन्सर्ट, शीतक, ऊर्जा इत्यादी) अपव्यय कमी होतो.
• उत्पादनात फरक न करता कामाच्या पाळ्या कमी करणे शक्य होते.
• नवीन मशीनवरील भांडवली खर्च कमी होतो.
उत्पादन आणि उत्पादकता यांचा मागोवा (ट्रॅकिंग) घेणे, ही इंडस्ट्री 4.0 प्रवासाची सुरुवात आहे. इंडस्ट्री 4.0 ची आपल्या विशिष्ट कारखान्याला लागू होणारी व्याख्या पुढील गोष्टींवर आधारित असेल.
• आपल्याला सुधारणा करण्यासाठी आवश्यक वाटणाऱ्या बाबी
• आपले अंदाजपत्रक
• आपल्या कारखान्यातील/संस्थेतील कार्यसंस्कृती बदलण्याची क्षमता
• आपल्याला अपेक्षित फायदे
कंपनी जसजशी वाढत जाईल, तसतसा उद्योजक इंडस्ट्री 4.0 मध्ये अधिक वैशिष्ट्यांचा समावेश करेल आणि मशीनमधील माहिती वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकेल. उदाहरणार्थ, प्रतिबंधात्मक देखभालीचा (प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स) समावेश करणे, ERP शी संलग्न फीड करणे, जस्ट-इन-टाइम डिलिव्हरी सक्षम करण्यासाठी उत्पादन माहिती लॉजिस्टिकमध्ये प्रविष्ट करणे, मशीनमधून घेतलेल्या रिअल टाइम डाटाच्या आधारावर वेतन आणि आर्थिक प्रोत्साहन देण्याची योजना करणे.
MSME साठी इंडस्ट्री 4.0 चा वापर करणे हे केवळ शहाणपणाचेच नाही, तर कारखाने फायदेशीरपणे चालविण्यासाठी ती एक अत्यावश्यक गोष्ट आहे.
इंडस्ट्री 4.0 मधील सर्वात मोठा फायदा म्हणजे एखाद्या कारखान्यामधील निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना उत्पादन आणि उत्पादकता यांच्याविषयीची अचूक माहिती वेळेवर उपलब्ध असते. भांडवल गुंतवणूक, निश्चित आणि बदलते खर्च (फिक्स आणि व्हेरिएबल कॉस्ट) अशा आपल्या उद्योगाच्या नफ्यावर थेट परिणाम करणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी त्यांना आवश्यक माहिती मिळते.
इंडस्ट्री 4.0 वापरून फायदा झालेल्या MSME ची दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.
1. नवीन सी.एन.सी. मशीनवरील भांडवली खर्च थांबविला
आमचे लीनवर्क्स हे इंडस्ट्री 4.0 शी सुसंगत असणारे सॉफ्टवेअर बाजारात वितरित केल्याच्या एका महिन्यानंतर एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या निदर्शनास आले, की सर्व मशीनवरील अनुत्पादक वेळ 40 टक्क्यांपर्यंत आहे. त्यांना लीनवर्क्सकडून प्रत्येक सोमवारी सकाळी OEE आणि अनुत्पादक वेळेचा अहवाल
(चित्र क्र. 5 आणि 6) आणि दर महिन्याच्या पहिल्या तारखेला साप्ताहिक ट्रेंड स्वयंचलितपणे ईमेलद्वारा मिळू लागले. या अहवालांवरून त्यांनी असा निष्कर्ष काढला, की त्यांच्याकडे 40% अतिरिक्त क्षमता आहे. अनुत्पादक वेळ वाजवी पातळीवर आणेपर्यंत, त्यांनी 1 वर्षासाठी नवीन मशीनची खरेदी रोखून ठेवली.
2. तिसऱ्या पाळीतील काम थांबवून निश्चित खर्च (फिक्स कॉस्ट) कमी केला
सी.एन.सी.वर एअरोस्पेस यंत्रभाग बनविणाऱ्या एका लीनवर्क्सच्या वापरकर्त्याच्या असे लक्षात आले की, बहुतेक मशीनवरील स्पिंडल केवळ 30% वेळच कार्यरत आहेत. मशीन 3 पाळ्यांमध्ये कार्यरत होती. लीनवर्क्स स्थापित केल्यानंतर त्यांनी चांगल्या कामगिरीचे लक्ष्य साध्य करणाऱ्या प्रत्येकासाठी वेतनवाढ करण्याचे जाहीर केले. 3 महिन्यांत स्पिंडल वापर 30 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत सुधारला आणि पूर्वी 3 पाळ्यांमध्ये होत असलेले काम, आता 2 पाळ्यांमध्ये पूर्ण होऊ लागले. त्यांनी नुकतीच तिसरी पाळी चालविण्याचे थांबविले आहे. यामुळे अर्थातच वीज आणि मजुरीवरील खर्च कमी झाला.
इंडस्ट्री 4.0 प्रणालीची किंमत
बाजारात विविध प्रकारच्या प्रणाली उपलब्ध आहेत. त्यापैकी बऱ्याच प्रणाली MSME ला परवडणाऱ्या आहेत आणि मासिक हप्त्यांवरही उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, लीनवर्क्स क्लाउड या खास MSME साठी डिझाइन केलेल्या प्रणालीचा दररोजचा खर्च फक्त एक कप कॉफीइतका आहे आणि ती दररोज त्याच्या 5 ते 10 पट रक्कम वाचविते. ही प्रणाली प्रत्येक मशीनशी जोडण्यासाठी सुमारे 15 मिनिटे लागतात आणि उद्योजक किंवा कारखानदार मोबाइल फोनवर त्वरित अहवाल पाहणे आणि अॅलर्ट मिळविणे सुरू करू शकतात.
इंडस्ट्री 4.0 मध्ये मॅन्युअली चालणाऱ्या मशीनचा समावेश होऊ शकतो का?
इंडस्ट्री 4.0 मध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत,
1. संवेदक वापरून मशीनमधून माहिती गोळा करून मशीनचा मागोवा घेणे.
2. क्लाउडवरील सॉफ्टवेअरवर इंटरनेटद्वारे
(इंटरनेट ऑफ थिंग्ज, IoT) माहितीचे हस्तांतरण.
3. माहितीचे विश्लेषण आणि त्यानंतर मशीनचे नियंत्रण किंवा संबंधितांना अहवाल देणे.
संवेदक
'इंडस्ट्री 4.0 मध्ये मॅन्युअली चालणाऱ्या मशीनचा समावेश होऊ शकतो का?' या प्रश्नाचे उत्तर 'होय', असे आहे. यात संवेदकाद्वारे मागोवा घेता येऊ शकणारी कोणतीही मशीन समाविष्ट आहेत. संवेदक कोणत्याही मशीनचा मागोवा ठेवू शकत असल्याने, इंडस्ट्री 4.0 मध्ये कोणतेही मशीन समाविष्ट होऊ शकते, उदाहरणार्थ, मॅन्युअली चालणारी मशीन, सी.एन.सी. मशीन, पी.एल.सी. नियंत्रित मशीन, रोबो. तसेच प्रक्रिया कोणतीही असू शकते. उदाहरणार्थ, टर्निंग, मिलिंग, रोबो वापरून होणारे यंत्रण, प्रेस, प्लॅस्टिक इंजेक्शन मोल्डिंग, प्रेशर डाय कास्टिंग, वाळूचा साचा बनविणे, वेल्डिंग, उष्णोतोपचार इत्यादी.
आपल्या लक्षात येईल की, संवेदकामध्ये (चित्र क्र. 8) मशीनच्या स्वयंचलनाची पातळी दर्शविणारे असे काहीही नाहीये. 'मशीनमधून माहिती गोळा करणे' म्हणजे मशीनची स्थिती जाणून घेणे, किती यंत्रभाग बनलेले आहेत, अनुत्पादक वेळ किती आहे आणि तापमान, कंपने इत्यादी पॅरामीटर (वैकल्पिकरित्या) अशी माहिती त्यातून गोळा करणे हे काम संवेदकाचे आहे. कोणत्या प्रकारचे मशीन आहे आणि त्याचा हेतू काय आहे, त्यावर आपण काय माहिती गोळा करणे आवश्यक आहे ते अवलंबून असते. आपण एखाद्या संवेदकाला मशीनशी जोडू शकत असल्यास, त्या मशीनच्या स्वयंचलनाच्या स्तराकडे दुर्लक्ष करून आपण त्याचा मागोवा घेऊ शकता. आपल्याला कोणती माहिती घ्यावयाची आहे यावर संवेदकाचा प्रकार अवलंबून आहे आणि आजचे संवेदक असंख्य प्रकारच्या पॅरामीटरचा मागोवा घेऊ शकतात.
लीनवर्क्स क्लाउड मशीन संनियंत्रण प्रणाली कोणत्याही मशीनशी जोडली जाऊ शकते. मशीनकडे योग्य इलेक्ट्रॉनिक सिग्नल नसल्यास, सिग्नलना संवेदकाबरोबर फक्त रेट्रोफिट करावे लागते. 'संवेदक' हा शब्द ऐकल्यावर तो फार महागडा आहे, असे वाटते. परंतु प्रत्यक्षात मात्र तो खूप परवडणारा आहे. बऱ्याच कामांसाठी आपल्याला फक्त चालू/बंद (ऑन/ऑफ) प्रकारचे संवेदक, स्प्रिंग लोडेड मेकॅनिकल स्विच, इंडक्टिव्ह किंवा ऑप्टिकल प्रॉक्सिमिटी संवेदक यांची आवश्यकता असते. त्यांची किंमत फक्त रुपये 300 इतकी असते.
निष्कर्ष
MSME उद्योजकांनी इंडस्ट्री 4.0 या संकल्पनेला घाबरून जाऊ नये. MSME साठी इंडस्ट्री 4.0 अत्यंत परवडणारे असून त्याचे भरपूर फायदे आहेत, जे लेखात नमूद केलेले आहेतच. इंडस्ट्री 4.0 च्या अंमलबजावणीसाठी फक्त काही तास लागतात आणि काही आठवड्यांतच गुंतविलेले पैसे वसूल होतात.