प्रचलित कार्यसंस्कृतीमध्ये उत्पादनाचा अत्युच्च दर्जा, जास्तीतजास्त वेग आणि कमीतकमी किंमत या गोष्टींबरोबरच सुरक्षिततेलाही महत्त्व देणे गरजेचे बनले आहे. कारखान्यात प्रत्यक्ष घडलेल्या काही घटनांच्या आधारे या लेखमालेमध्ये कारखान्यातील सुरक्षिततेबाबत चर्चा केली आहे.
इंडिया केमिकल्सच्या गेटमधून आत शिरतानाच विठ्ठल पाटीलच्या लक्षात आले, शॉपमधील त्याच्या लाइनच्या कामगारांनी कालच कायझेनच्या मिटिंगमध्ये त्याला एक मोठा ड्रम मागितला होता. काम करताना तयार होणाऱ्या अनावश्यक/अतिरिक्त गोष्टी टाकण्यासाठी नेहमीचे कचऱ्याचे डबे पुरत नसत आणि ते लवकर भरले जात. लाइनवर एक मोठा लोखंडी ड्रम ठेवला तर सर्व कचरा एकत्र राहील, भक्कम असल्याने ड्रम कलंडणार नाही, शॉपवर स्वच्छता आणि नेटकेपणा राहील हे सुपरवायझर या नात्याने त्यालाही पटले होते. सकाळी लगेचच याची कार्यवाही सुरू करावी म्हणून तो तडक मेंटेनन्स इंजिनियर लक्ष्मण शिंदेकडे गेला. शिंदे कालच्या रात्रीचे रिपोर्ट वाचत होता, त्याने मान वर करून विचारले, ''काय पाटीलसाहेब, आज इकडे कुठे? लाइन तर व्यवस्थित चालू आहे?''
''शिंदेसाहेब, आमच्या लाइनवर स्क्रॅप ठेवण्यासाठी एक ड्रम पाहिजे. आपल्याकडे असलेला एखादा जुना ड्रम आपण ओपन करून ठेवूया. शॉपवरचे डबे पुरत नाहीत आणि फ्लोअरवर कचरा पडतो. आजच्या दिवसात मिळेल का?'' पाटीलने विचारले.
''काही हरकत नाही. आपल्या स्क्रॅपयार्डमध्ये बरेच ड्रम पडलेत. तुम्हाला पाहिजे तो घ्या आणि फोर्क लिफ्ट ड्रायव्हरला सांगा, म्हणजे मी वेल्डिंग शॉपमधून त्याचा टॉप काढून त्याला पिवळे पट्टे मारून चार तासात लाइनवर देतो.'' शिंदेने आश्वासन दिले.
पाटील स्क्रॅपयार्डमध्ये गेला आणि त्याने तिथला एक त्यातल्यात्यात जाड असलेला ड्रम पसंत केला. नुकताच पावसाळा संपला होता. त्यामुळे ड्रम जरा गंजला होता आणि काही मार्किंग दिसत नव्हते. पण ड्रम जाडजूड आहे म्हणजे चांगला आहे असे त्याने ठरविले. फोर्क लिफ्ट ड्रायव्हरला सांगून त्याने तो ड्रम वेल्डिंग शॉपमध्ये पाठविला आणि तो आपल्या लाइनवर पुढचे काम बघायला गेला.
इकडे वेल्डिंग शॉपमध्ये शिंदेने आपल्या एका वेल्डरला बोलावले आणि त्या ड्रमचा वरचा सर्व भाग गॅस कटिंगने कापून टाकायला सांगितले. वेल्डरने तो ड्रम उभा केला, त्याचे ढिले असलेले छोटे झाकण काढून टाकले आणि वरच्या बाजूचा भाग कापण्यासाठी गॅस कटरची फ्लेम जवळ नेऊन अॅडजस्ट करायला सुरुवात केली. इतक्यात ड्रमच्या छोट्या तोंडातून कसलासा धूर यायला सुरुवात झाली आणि कुणाला काही कळायच्या आत त्या धुराची आणि गॅस फ्लेमची गाठ पडली. काही क्षणांच्या आतच एक मोठा स्फोट झाला. ड्रमच्या वरच्या भागाचे तुकडे झाले आणि त्यातल्या एका तुकड्याने वेल्डरच्या गळ्याची एक बाजू अक्षरशः चिरली गेली. त्याच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. नशिबाने शिंदे फार लांब उभा नव्हता. त्याने ढांग टाकत येऊन वेल्डरला सावरले आणि प्रसंगावधान राखून त्याच्या जखमेवर आपला हात दाबून धरून रक्तस्त्राव थांबविण्याचा जमेल तितका प्रयत्न केला. काही वेळातच अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टर तिथे पोहोचले. पेशंटला तत्परतेने जवळील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. नशिबाने थोडक्यात हात दिला होता. वेल्डरच्या गळ्याच्या समोरील बाजूला असलेल्या मोठ्या शिरेचा (जुग्यूलर व्हेन) फक्त बाहेरचा भाग कापला गेला होता. आतला भाग किंवा श्वास नलिका थोडक्यात बचावली त्यामुळे जिवावर बेतले नाही. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी मिळाली.
हा अपघात घडण्याचे कारण काय?
1. दुर्दैवाने, निवडला गेलेला ड्रम हा घातक (हॅझार्डस) आणि ज्वालाग्राही रसायनाचा रिकामा ड्रम होता. असे ड्रम वापरताना रसायनांच्या वरच्या बाजूस थोडे पाणी भरून ठेवले जाते. यामुळे वाहतूक करताना रसायन सहजी पेट घेत नाही. बरेच वेळा वापरल्यानंतर ड्रम टाकून दिला होता, कालांतराने त्यावरील मार्किंगदेखील निघून गेलेले होते.
2. ड्रममधील शिल्लक उरलेले थोडे रसायन काही काळाने घट्ट झाले आणि त्याचा साका पाण्याखाली तसाच पडून होता. ड्रम बराच काळ पडून राहिल्याने वरचे पाणी थोडेच उरले असावे. झाकण काढल्यानंतर बाहेर आलेल्या ज्वालाग्राही रसायनाच्या वाफांनी गॅस फ्लेममुळे पेट घेतला. शिल्लक असलेल्या सर्व रसायनाचा एकदम स्फोट झाल्याने ड्रमचे तुकडे झाले आणि एखाद्या बॉम्बप्रमाणे त्यांनी वेल्डरला गाठले.
आपण या अपघाताची मूळ कारणे शोधण्याची एक पद्धत पाहूया.
अपघाताच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी 'व्हाय व्हाय अॅनालिसिस' (तक्ता क्र. 1) हे विश्लेषण तंत्र वापरले गेले.
जबाबदारी आणि काळजी
1. घातक आणि ज्वालाग्राही रसायनाचा ड्रम रिकामा करून स्क्रॅप करताना, त्यावर पूर्ण माहितीचे लेबलिंग करणे, त्याचा वेगळ्या ठिकाणी साठा केला जाईल हे पाहणे आणि त्याची स्क्रॅपयार्डच्या योग्य व्यक्तीला जाणीव करून देणे आवश्यक आहे.
2. असे ज्वालाग्राही पदार्थासाठी वापरलेले ड्रम कधीही गॅस कट करता कामा नयेत.
3. याचबरोबर, असे ड्रम कोणत्याही प्रकारच्या पुनर्वापरासाठी घेता कामा नयेत. ते ड्रम पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावेत. त्यानंतर त्यामध्ये पाणी भरून घेऊन, पुन्हा वापरता येणार नाहीत अशा पद्धतीने त्यांचे तुकडे करणे ही क्रिया, ज्या प्रक्रियेमध्ये ठिणगी उडणार नाही अशा प्रकाराने (उदाहरणार्थ, हॅकसॉ वापरून) आपल्याच विभागात पूर्ण केली पाहिजे. याचा ठळक बोर्ड त्या विभागात लावला पाहिजे.
4. अॅसिडचा साठा करण्यासाठी लोखंडी ड्रम वापरता कामा नयेत आणि त्या ड्रमची विल्हेवाटदेखील अशाच पद्धतीने लावली पाहिजे.
5. कंपनी व्यवस्थापनाने अशा प्रकारच्या पद्धतींचा आढावा घेऊन मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना तयार केल्या पाहिजेत, त्याचे प्रशिक्षण सर्व संबंधितांना दिले पाहिजे आणि त्या सूचना योग्य ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित केल्या पाहिजेत.
मुख्य म्हणजे सर्वानुमते ठरविलेली मार्गदर्शक तत्त्वे, धोकादायक काम करण्याच्या पद्धती, त्या कामातील संभाव्य धोके आणि त्या धोक्यांवर मात करण्यासाठी ठरविलेली कार्यप्रणाली या सर्व बाबींचे रीतसर प्रशिक्षण त्या त्या विभागातील अधिकारी आणि कामगारांना देणे अत्यंत आवश्यक आणि बंधनकारक आहे. शिवाय प्रशिक्षण दिल्याची नोंद करून ठेवणेसुद्धा महत्त्वाचे आहे. याचा फायदा, अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी नक्की होईल.
(लेखन साहाय्य : अच्युत मेढेकर)