कारखान्यात काम करताना आलेल्या समस्यांवर प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळे उपाय शोधले जातात. या लेखमालेमध्ये अशा प्रकारच्या समस्यांवर उपाय शोधताना वापरलेल्या युक्त्या आणि क्लृप्त्या देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
आमच्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला घुमटाकार आकाराच्या कास्ट यंत्रभागावर तेल वाहून नेण्यासाठी भोक पाडण्याचे काम दिले होते. टूल बदलताना प्रत्येकवेळी तो लांब आकाराचे ड्रिल कापून त्याची लांबी कमी करून मागत असे. संबंधित विभागातील कर्मचाऱ्याशी असलेल्या स्नेहबंधामुळे ही मागणी पूर्ण करून दिली जात होती. दरम्यान, संबंधित विभागात स्नेहबंध असलेल्या कर्मचाऱ्याची, धार लावणाऱ्या विभागातून (री-शार्पनिंग) बदली झाली. त्याच्या जागेवर बदली आलेल्या कर्मचाऱ्याला ज्यावेळी ड्रिल कापून त्याची लांबी कमी करून देण्यास सांगण्यात आले त्यावेळी त्याने असे करण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच लांब ड्रिल कापून कमी करण्यामागचे कारण विचारले. ड्रिलिंग करणाऱ्या कामगाराने आत्तापर्यंत असे मिळत होते आणि त्याची गरज असल्याचे सांगितले. ते नवीन कर्मचाऱ्याच्या कार्यकक्षेत बसत नसल्याने त्याने नकार कायम ठेवला आणि हे प्रकरण वरिष्ठांकडे आले.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, संबंधित कर्मचारी ठरविलेल्या पद्धतीने काम करीत नसल्याची बाब निदर्शनास आली. कॉलम ड्रिल मशीन वापरून ऑइल वाहून नेणारे छिद्र तयार करण्याची (चित्र क्र. 1) ही क्रिया होती. याच्या फिक्श्चरमध्ये गाइड बुश असलेली एक ड्रॉप लिंक होती. प्रत्येक छिद्र केल्यानंतर ही लिंक उचलली जायची आणि तो भाग (पार्ट) फिरविला (इंडेक्स) जायचा. अशा पध्दतीने (चित्र क्र. 2) आठ छिद्रे केली जायची. ही संपूर्ण प्रक्रिया वापरकर्त्यास वेळखाऊ वाटल्याने त्याने काही प्रयोग करून ती लिंक काढून टाकून फिक्श्चर आणि गाइड बुशशिवाय छिद्र करण्यास सुरुवात केली. मात्र असे केल्याने छिद्र करताना लांब ड्रिल चालत नव्हते तर केवळ आखूड ड्रिल काम करीत होते. यासाठी संबंधित कर्मचारी कंपनीतून लांब आकाराचे ड्रिल कापून लहान करून घेत होता.
तेलाचे वहन होण्यासाठी पाडलेल्या छिद्रांचा टॉलरन्स मोठा असतो. गाइड बुश न वापरता पाडलेली छिद्रे तपासणी करणाऱ्या गेजमध्ये पास होत असल्याने टूलिंग विभागाने गाईड बुश न वापरता काम करण्यास परवानगी दिली. यास डिझाइन विभागाकडून खातरजमा केल्यानंतर त्यास परवानगी दिली. त्यानंतर आखूड ड्रिल (स्टब) वापरण्याचे ठरविले. पुढे आखूड ड्रिलचा वापर नियमितपणे सुरू झाला.
निष्कर्ष : अशा प्रकारच्या कामांमध्ये वापरकर्त्याचे मत विचारात घेणे महत्त्वाचे असते. यामुळे नुकसान कमी होऊन पैसा वाचविता येऊ शकतो.