...आणि अंगठा गमावला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    12-May-2021   
Total Views |
चाळीशेजारील मंदिरात रात्रीचे भजन रंगात आले होते. सुरेश अगदी तल्लीन होऊन पखवाज वाजवत होता. भजन संपतच आले, इतक्यात सुरेशची बायको त्याला बोलवायला आली.
"अहो, उद्या शुक्रवार आहे, कामाला जायचय ना वेळेत? चला आता, नाहीतर उद्या उठायला उशीर होईल आणि परत लेट मार्क पडेल."
"बरोबर आहे तिचे, चला आता भैरवी होऊ द्या" करीत भजनी मंडळींची वेळेवर पांगापांग झाली. सुरेशनेदेखील घरी येऊन आपले आवरले. उद्या वेळेवर जाणे भागच आहे. या महिन्यात आणखी एक लेट मार्क झाला तर एका दिवसाचा पगार जाणार. नाहीतरी महिनाअखेर आहे, तर जरा लवकरच जाऊया असे ठरवूनच तो झोपी गेला.
***
फॅब्रिकेशन शॉपमध्ये प्रॉडक्शन मॅनेजरनी सुपरवायझरला तातडीने बोलावून घेतले.
"कदम, आपली 9 इंची रॉडची ऑर्डर पूर्ण व्हायला पाहिजे. काम अर्जंट आहे आणि महिनाअखेरला दोन दिवस आहेत, त्याच्याआत डिस्पॅच करायचे आहे. पण आताच स्टोअरमधून निरोप आला आहे की, ग्राहकाने पाठविलेला कच्चा माल (रॉ मटेरियल) एक मीटर लांबीच्या रॉडमध्ये आला आहे. हे स्पेशल मटेरियल आहे, त्यामुळे तेच वापरायला पाहिजे. आपल्याला इतर काही करता येणार नाही. तेव्हा तुम्ही ताबडतोब ते प्रोसेसला घ्या."
"सर, मी मघाशीच ते पाहून आलो. पुढच्या प्रोसेसला पाठविण्यापूर्वी त्या सर्व एक मीटर रॉडमधून 9.2 इंच लांबीचे तुकडे कापून त्यांना दोन्हीकडून डीबरिंग करून घ्यावे लागतील. मशीन शॉपवर असे मशीन मोकळे नाही, पण देखभाल विभागाकडे एक जुना पोर्टेबल कटर ग्राइंडर सापडला आहे, तो वापरता येईल असे वाटते," कदमने माहिती दिली. हे पोर्टेबल कटर ग्राइंडर मशीन म्हणजे एक कमी जाडीचे वेगाने फिरणारे ग्राइंडर व्हील असलेले मशीन होते.
 
"ठीक आहे, पण ते सगळे वेळेवर करून घ्या. ऑर्डर परवा जायला पाहिजे," प्रॉडक्शन मॅनेजरने नेहमीची रेकॉर्ड लावली.
सुपरवायझर कदमने देखभाल विभागात जाऊन तो पोर्टेबल कटर ग्राइंडर शोधला. फार काही चांगल्या अवस्थेत नव्हता, पण चालू होता. एका हेल्परकडून त्याने तो फॅब्रिकेशन शॉपमध्ये एका टेबलवर बसवून घेतला. कनेक्शन लावून तो चालू आहे याची खात्री केली आणि आता या कामावर कोणाला लावायचे याचा विचार करताना त्याला सुरेशची आठवण झाली. त्याच्याकडे लोड जरा कमी आहे, तर हे काम त्याच्याकडून करून घेऊ या विचाराने त्याने सुरेशला बोलावून काय काम करायचे ते दाखविले.
"सर्व रॉडवर 9.2 इंचाचे मार्किंग करून घ्यायचे. ग्राइंडरच्या पुढच्या कडेसमोर 9.2 इंचाचे मार्किंग केलेल्या ठिकाणी रॉड दाबून धरायचा आणि व्हीलने तो हव्या त्या ठिकाणी कापायचा. कापल्यावर समोरच्या बाजूला आलेली बर, व्हीलच्या बाजूच्या फिरत्या भागावर रॉड दाबून धरला की निघून जाईल. साधा जॉब आहे, आज दुपारपर्यंत सर्व रॉड कापून आणि दोन्ही बाजूंना डीबर करून झाले पाहिजेत. रॉड जास्त लांबीचे आल्यामुळे हे वाढीव काम लागले आहे. आपल्याला परवापर्यंत त्यावरील आपले बाकीचे सर्व काम संपवून डिलिव्हरी करायची आहे. त्यामुळे तुला दिलेले हे काम होताना टप्प्याटप्प्याने रॉड पुढे कामाला पाठव. काही शंका असतील तर मला बोलाव." सुरेशला एवढे सर्व समजावून सांगून कदम आपल्या कामाला निघून गेला.
 
सुरेशने जॉब करायला घेतले. काम अगदी साधे होते. जेवायच्या सुट्टीपर्यंत सर्व संपवून टाकू या विचाराने पहिले दहा बारा रॉड कट आणि डीबर करण्याचे काम त्याने फटक्यात संपविले. मध्येच हाताला आलेला घाम पुसायला त्याने रुमाल बाहेर काढला. कालच्या भजनाची आठवण काढत त्याने हातातला रॉडचा झालेला तुकडा पुढून डीबर करायला व्हीलच्या बाजूच्या फिरत्या भागावर दाबून धरला, तेवढ्यात त्याच्या घामट हातातून तो तुकडा उडाला आणि जोर लावलेला त्याचा डाव्या हाताचा अंगठा व्हीलच्या समोरील बाजूने उडवून टाकला. क्षणभर, आपल्याला काय झाले ते त्याला कळलेच नाही. रक्ताची चिळकांडी आणि वेदनेने तो हबकलाच आणि आपल्याला बाजूच्या कोणी तरी सावरले एवढेच त्याला कळले.
***
भजनी मंडळ सुरेशला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा त्याची बायको डोळे पुसत होती.
"'लय वंगाळ झालं गड्या, आता लवकर बरा हो आन घरी ये" कोणीतरी म्हणाले.
"आता कुठला पखवाज आन कुठलं भजन! तुझ्याबिगर काय मजा न्हाय गड्या" दुसरा म्हणाला.
"कामाचं तरी काय हुनार काय म्हायती, पन कंपनीची लोकं चांगली हायेत म्हनं, कायतरी काम देत्याल गरिबाला" तिसरा म्हणाला.
सुरेश खिन्नपणे ऐकत आढ्याकडे नजर लावून पडला होता. आपल्या मुलाबाळांचे, संसाराचे पुढे काय होणार याचे त्याला काही कळत नव्हते.
***
हा अपघात घडण्याचे कारण काय?
1. असुरक्षित कार्य (अनसेफ अॅक्ट)
• बार कापल्यावर बर काढण्यासाठी त्याचा समोरील भाग फेस ग्राइंडरवर घासला गेला पाहिजे, हे पाळले गेले नाही.
• बार कापताना ग्राइंडरसमोरील व्हाइसमध्ये त्याला घट्ट धरून ठेवून (चित्र क्र. 1) मगच कापायला पाहिजे, ही पद्धतदेखील पाळली गेली नाही.

1_1  H x W: 0 x
• जुन्या पोर्टेबल कटर ग्राइंडरवर हे काम करताना कोणते धोके असू शकतील याचा विचार झाला नाही.
• सुरक्षेची उपकरणे उदाहरणार्थ, हातमोजे, चष्मा इत्यादी वापरले गेले पाहिजेत, याकडे दुर्लक्ष झाले.
2. असुरक्षित परिस्थिती (अनसेफ कंडिशन)
• डीबर करण्यासाठी फेस ग्राइंडरसारख्या योग्य मशीनचा वापर केला गेला नाही.
• या जुन्या पोर्टेबल कटर ग्राइंडरवर, ग्राइंडरच्या हालचालीप्रमाणे आपोआप खाली वर होणारा गार्ड नव्हता.
• बार कापण्यासाठी बार हॅकसॉ वापरता आली असती, परंतु काम लवकर होण्यासाठी कटर ग्राइंडर वापरला गेला. अशाच काही कारणाने बँड सॉ वापरली गेली नाही.
• महिनाअखेर आणि इतर घाईची कारणे यांमुळे मिळेल त्या जुन्या यंत्रावर काम केले गेले.
3. इतर
• अशा प्रकारचे कार्य करताना, अधिकारीवर्गाने त्याचे प्रोसेस शीट केले नाही, तसेच या कामातील धोके लक्षात घेतले नाहीत.
• वरील बाबी लक्षात घेता, व्यवस्थापनाचा एकूण सुरक्षाविषयक दृष्टिकोन पूर्ण बदलणे गरजेचे आहे. जुन्या पोर्टेबल कटर ग्राइंडरवर हाताने बारचा पुढचा भाग डीबर करणे धोकादायकच आहे. कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनीदेखील, काम करताना आपली सुरक्षा महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन त्याविषयी काही शंका असतील तर खात्री करून घेतली पाहिजे.
• गार्ड नसलेल्या यंत्रावर काम करताना अपघात होऊ शकतो, याची चर्चा आधी होणे गरजेचे आहे. चित्र क्र. 2 मध्ये दर्शविल्याप्रमाणे, पोर्टेबल कटर ग्राइंडरवर कामानुसार खाली वर होणारा हलता गार्ड असतो.

2_1  H x W: 0 x
• आपल्या कारखान्यात वापरली जाणारी यंत्रसामग्री वापरास योग्य आणि सुरक्षित आहे ना, याची खात्री करणे व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे. सर्व प्रकारच्या कामांचे या दृष्टीने मूल्यमापन करायला हवे, आणि विविध कामांच्या कार्यसूचना (वर्क इन्स्ट्रक्शन) तयार करून, तपासून प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे प्रशिक्षण त्या त्या कर्मचाऱ्यांना दिल्याची खात्री करायला हवी. सुरक्षिततेचे नियमदेखील यामध्ये हवेत. हा अपघात झाला त्या ठिकाणी यामधील काहीही पाळले गेले नाही.
कारखान्यातील प्रत्येक नियमित (रुटीन) आणि अनियमित (क्वचित येणारे काम, दुरुस्तीचे काम इत्यादी) कामांची लेखी यादी केली पाहिजे. त्या प्रत्येक कामाचे पहिल्या पायरीपासून ते शेवटच्या पायरीपर्यंत, काम करतानाचे धोके आणि त्या धोक्यांपासून बचाव करण्याच्या पद्धती नोंद केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, पायात सेफ्टी शूज, ग्राइंडिंग कटिंग करताना फेस शील्ड् वापरणे, कोणतेही मशीन वापरताना नीट तपासून घेणे इत्यादी. थोडक्यात, काम सुरू करण्यापूर्वी 'सुरक्षा मूल्यमापन सूची' करणे आवश्यक आहे.
कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची महत्त्वाची जबाबदारी आहे, पण आधी व्यवस्थापनाची!!
@@AUTHORINFO_V1@@