संपादकीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    06-May-2021   
Total Views |

1_1  H x W: 0 x
 
2019-20 हे आर्थिक वर्ष अनेक अर्थांनी अभूतपूर्व होते. या वर्षामध्ये आपल्याला मानवी व्यवहारांची संपूर्ण धाटणी बदललेली पहायला मिळाली. जगभरातील अनेक उद्योगधंद्यांना या काळात सर्वच आर्थिक परिमाणांचे नीचांक अनुभवायला लागले. हॉटेल, पर्यटन, प्रवास यासारखे उद्योग तर अजूनही गर्तेतच आहेत. भारतातही गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वत्र ठाणबंदीच होती, पण जून अखेरीस हळूहळू सुरू झालेल्या उद्योगधंद्यांनी पुढच्या काळात चांगलीच उमेद दाखविली आणि त्याचाच परिणाम म्हणून मार्च 2021 मधील GST चा भरणा 1.24 लाख कोटी या विक्रमी संख्येने झालेला दिसला. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये झालेला एकूण वार्षिक भरणा रुपये 12 लाख 22 हजार 119 कोटी रुपये होता. त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2020-21 मधला एकूण आकडा 11 लाख 36 हजार 803 कोटी रुपये एवढा होता. म्हणजे एकूण 7 टक्क्यांचीच घट झाल्याचे आपल्याला दिसून येते. भारत सरकारच्या अंदाजानुसार, भारतीय अर्थव्यवस्था सन 2020-21 मध्ये 8 टक्क्यांनी संकुचित होणे अपेक्षित होते. परंतु त्याचबरोबर आर्थिक सर्वेक्षणानुसार, सन 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 11 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तविला जात आहे. याला जागतिक बँकेने व्यक्त केलेल्या अंदाजाने (ज्यामध्ये हीच वाढ अंदाजे 10.1 टक्के असल्याचे म्हटले आहे.) पुष्टीच मिळाली आहे.
 
टेक्नाव्हिओ या जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान, संशोधन आणि सल्लागार क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतातील मशीन टूल बाजारपेठ पुढच्या 4-5 वर्षांच्या काळामध्ये दरवर्षी 13 टक्क्यांनी वाढणार आहे. 2025 पर्यंत हा उद्योग 1.9 बिलियन डॉलरने वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. कोरोनाच्या काळातील घडामोडींचा परिणाम म्हणून सध्या जरी हा उद्योग थोडासा मंदावला असला, तरी इंडस्ट्री 4.0 ची वाढती लोकप्रियता आणि संगणकीकृत उत्पादन व्यवस्थेकडे झुकणारा कल या बाजारपेठेला आवश्यक गती मिळवून देईल. सर्वच उद्योगांमध्ये स्वयंचलनामध्ये होणारी वाढ, उत्पादन प्रक्रियेमधील काटेकोरपणा आणि अचूकता यांची वाढलेली गरज, सी.एन.सी. आधारित मशीन टूलची मागणी वाढण्यासाठी पूरक ठरणारी असणार आहे. यामध्ये अर्थातच दक्षिण आशियाई क्षेत्रामध्ये भारत हे वाहन उद्योगाचे प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून बस्तान बसवित असल्याचा मोठा परिणाम आहे. वाहन उद्योगाबरोबरच रेल्वे, बांधकाम, जहाज बांधणी, विमान उद्योग आणि पवनउर्जा उद्योग यांसारख्या उद्योगांमधील अपेक्षित वाढही मशीन टूल उद्योगाला पूरक ठरणारी असेल असे भाकीत वर्तविले जात आहे.
 
या सर्व अंदाजांवरून आपल्याला एक नक्की लक्षात येते की, भविष्यकाळामध्ये तगून रहायचे असेल आणि वाढायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या उत्पादन प्रक्रियेमधील सहभाग वाढविण्यावाचून तरणोपाय नाही. आतापर्यंतच्या ‘धातुकाम’च्या अंकांमधून आम्ही वारंवार नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रक्रिया यांची ओळख लघु मध्यम उद्योगात काम करणाऱ्या तंत्रज्ञ आणि उद्योजकांना व्हावी यासाठी कायम प्रयत्न करीत आलो आहोत. या अंकातही आम्ही सी.एन.सी. टर्निंगमध्ये प्रस्थापित होत असलेल्या मल्टी स्पिंडल स्विस तंत्रज्ञानाविषयी माहिती देणारा लेख दिला आहे. छोट्या आकाराच्या आणि बहुसंख्येने उत्पादन करण्याची गरज असलेल्या उत्पादकांना हे तंत्रज्ञान नक्कीच आकर्षक वाटेल. त्याचबरोबर उत्पादनातील अचूकता मोजण्यासाठी असो किंवा जुन्या उत्पादामध्ये योग्य ते बदल करून त्याचा काटेकोरपणा वाढविण्याचे असो, अशा आव्हानात्मक कामांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या लेझर स्कॅनिंग तंत्राचा परिचय करून देणाऱ्या लेखात या तंत्राची व्याप्ती आपल्यासमोर मांडली आहे. गेली 40 वर्षे भारतीय मशीन उद्योगाला दर्जेदार चक पुरविणाऱ्या कंपनीकडून आलेल्या लेखात लेथवरील चकची देखभाल कशी करावी याचे नेमके मार्गदर्शन मिळेल. प्रक्रिया सुधारणा विभागामध्ये उत्पादकता वाढविण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांची माहिती देणारे लेख समाविष्ट केले आहेत, तर सी.एन.सी. मशीन आगीपासून सुरक्षित कसे राहील या प्रणालीची माहिती देणारा लेखही आपले लक्ष वेधून घेईल. नेहमीप्रमाणे युक्त्या आणि क्लृप्त्या, कारखान्यातील किस्से, सुरक्षितता अशा लेखमालाही आपल्या कामातील समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास आहे.
 
 
दीपक देवधर
@@AUTHORINFO_V1@@