संपादकीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    07-Jun-2021   
Total Views |

swedfdgh_1  H x
या अंकापासून धातुकाम मासिक पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेल्या 4 वर्षांचा हा वेगळ्या वाटेवरचा प्रवास आमचे वाचक, लेखक, जाहिरातदार आणि इतर सुहृदांच्या सहकार्यामुळे यशस्वी होण्यास मदत झाली. पूर्णपणे तांत्रिकी विषयाला वाहिलेले मासिक सुरू करणे हीच मुळात एक साहसी कृती आहे, असे मत बऱ्याचजणांनी सुरुवातीला आमच्यापाशी व्यक्त केले होते. परंतु शॉप फ्लोअरवरील माणसाला त्याच्या भाषेत अभियांत्रिकीविषयक ज्ञान आणि माहिती देणे, या ध्येयाने प्रेरित झालेल्या ‘उद्यम’च्या चमूला या सगळ्या प्रवासात भरघोस मदत मिळत गेली आणि आज महाराष्ट्रातील बहुतांश औद्योगिक क्षेत्रामध्ये धातुकाम मासिक पोहोचलेले दिसते. या प्रवासात अनेक खाचखळगे, चढ-उतार अनुभवायला मिळाले. परंतु आमच्या वाचकांकडून मिळणारी कौतुकाची पावती, या सर्व अडचणी सहजपणे पार करण्याची शक्ती देत गेली. मराठीपासून सुरू झालेली ही वाटचाल आता हिंदी, कन्नड, गुजराती भाषेतही दमदारपणे सुरू आहे, तर लवकरच तमिळ भाषिकांपर्यंतही हे मासिक पोहोचविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.
 
 
 
या सर्व वाटचालीत अनेक उद्योजकांना, शॉप फ्लोअरवर काम करणाऱ्या तंत्रज्ञांना, भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळत गेली. विशेषतः लघु, मध्यम उद्योगामधील सर्वचजण अनंत अडचणींचा सामना करीत, प्रत्येकवेळी त्यांच्यावर मात करून पुढे कसे जाता येईल, अशा सकारात्मक दृष्टिकोनातून आपले काम करीत असल्याचे अनुभवास आले. गेल्या वर्षीच्या कोरोना महामारीच्या झटक्यानंतरसुद्धा वाया गेलेल्या 3-4 महिन्यांचा परिणाम पूर्ण आर्थिक वर्षावर कमीतकमी कसा होईल यावर सर्वांनी भर दिला आणि मोठ्या OEM पासून ते छोट्या जॉब शॉप असणाऱ्या उद्योजकांपर्यंत सर्वांनीच अथक प्रयत्न करून ठरविलेल्या ध्येय धोरणांची पूर्तता केली. बऱ्याचजणांनी तर ठरविलेली उद्दिष्टे पार करून जास्तीचासुद्धा व्यवसाय केला असल्याची उदाहरणे आहेत.
 
 
या पार्श्वभूमीवर येणारे वर्ष चांगले जाईल अशा हुरुपाने सर्वांनी कामाला सुरुवात केली, परंतु दुर्दैवाने महामारीने पुन्हा आपला डंख मारला. मशीनिंग क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता मोठ्या प्रमाणात जबाबदार असलेल्या वाहन उद्योग क्षेत्राने मार्च 2021 च्या तुलनेत एप्रिल 2021 मध्ये खूपच कमी उलाढाल केल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे चीनशी स्पर्धा करीत जागतिक बाजारपेठेमध्ये एक प्रमुख उत्पादक देश म्हणून स्थान मिळविण्याची उमेद बाळगणाऱ्या भारतीय उद्योजकाला, आज त्याच्या कर्तृत्वाला सरकारी ध्येय धोरणांची पूरक जोड मिळणे आवश्यक झालेले आहे. नुसतेच कर्ज वाटपाचे धोरण जाहीर करून पुरेसे नाही, तर उद्योग धंद्याच्या वाढीकरता लागणारी मूलभूत संसाधने म्हणजे वीज, जमीन आणि पाणी यांच्या उपलब्धतेमध्ये फार मोठे काम होण्याची निकड जाणवते आहे. एकीकडे इलेक्ट्रिकल वाहनांना पूरक धोरणे सादर करीत असतानाच ऊर्जा निर्मितीचे पर्यायी स्रोत बळकट करणे आणि त्याला पूरक पुरवठा साखळी (सप्लाय चेन) स्थानिक पातळीवर कशी उभी राहील यावर काम करण्याचीही गरज आहे.
 
 
कर्तबगारी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतीय उद्योजक सध्या अनुभवत असलेल्या संकटावरही निश्चितच मात करेल. याच प्रयत्नांना पूरक अशी माहिती देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. धातुकामच्या या अंकात इलेक्ट्रिकल वाहने आणि त्यामुळे बदलल्या जाणाऱ्या उद्योगाची थोडक्यात ओळख करून देण्याच प्रयत्न केला आहे. छोटे यंत्रभाग तसेच वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे इम्प्लांट्स यांच्या उत्पादनामध्ये अचूकता आणणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी असणारे लेख आपल्याला नक्की उपयोगाचे वाटतील. प्रक्रिया सुधारणा विभागातील लेखांमध्ये कमीतकमी खर्चात उत्पादन कसे वाढविता येते याची उदाहरणे बोलकी आहेत. ड्रिलिंग आणि बोरिंग या प्रक्रिया सी.एन.सी. टर्निंग सेंटरवर करताना लक्षात घ्यावयाचे बारकावे समजावून सांगणारा लेख, प्रत्यक्ष काम करताना आपल्याला मदत करणारा ठरेल अशी खात्री आहे. सी.एम.एम., मूलभूत गुणवत्ता तंत्र, कारखान्यात घडणारे किस्से आणि वापरल्या गेलेल्या युक्त्या आणि क्लृप्त्या या लेखमालाही किफायतशीर उत्पादनासाठी महत्त्वाची माहिती देणाऱ्या ठरतील अशी अपेक्षा आहे.
येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वांनी आपली आणि आपल्या परिवाराची योग्य काळजी घ्यावी हीच सदिच्छा!
 
 
दीपक देवधर
@@AUTHORINFO_V1@@