काळजी 100 % न घेतल्यामुळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    07-Jun-2021   
Total Views |

प्रचलित कार्यसंस्कृतीमध्ये उत्पादनाचा अत्युच्च दर्जा, जास्तीतजास्त वेग आणि कमीतकमी किंमत या गोष्टींबरोबरच सुरक्षिततेलाही महत्त्व देणे गरजेचे बनले आहे. कारखान्यात प्रत्यक्ष घडलेल्या काही घटनांच्या आधारे या लेखमालेमध्ये कारखान्यातील सुरक्षिततेबाबत चर्चा केली आहे.
 
प्रेस शॉपमध्ये मालकाने रतन पांडेला बोलावून घेतले.
"अरे रतन, आपल्या 20 टनी प्रेसचे फूट स्विच तूच लावले होतेस ना?"
"साहेब, काय प्रॉब्लेम आला काय?" पांडेने घाबरून विचारले.
"अरे तसं नाही," साहेब हसत हसत म्हणाले, "ते मेकॅनिकल लिंकेज काढून फूट स्विच लावल्यावर काम चांगले झाले, म्हणून चौकशी करत होतो. प्रेसची कंपनी ते काम करायला फारच वेळ घेणार होती आणि जास्त पैसे सांगत होती. पण तू एका दिवसात केलेस. माझ्या लक्षात आहे."
"साहेब, आपन कायपन जुगाड करू शकतो. धा वर्स झाली, तुमी फकस्त सांगा," पांडे खुशीत आला.
"हे बघ, आपल्याला प्रेस मशीनवर एक मोठी ऑर्डर आली आहे, पण पार्ट जरा लहान आहे. नेहमीच्या मोठ्या पार्टला फूट स्विच लागणार, पण लहान पार्ट लावताना दोन हातांचा सेफ्टी स्विच लावायला पाहिजे. उद्या सुट्टी आहे. दोन्ही मशीनवर हे लगेच करून घे म्हणजे शुक्रवारपासून नवीन पार्ट लावता येतील. तुला काय लागेल ते सामान घेऊन ये," साहेबांनी सांगितले.
"व्हय साहेब, मी आज संध्याकाळी आपल्या इलेक्ट्रिकच्या दुकानातून दोन मशीनचे सामान घेऊन येतो आणि उद्या दुपारच्या आत फिट करून टाकतो." काहीतरी जुगाड करायचा म्हटले की पांडेला सुरसुरी चढे.
दुसऱ्या दिवशी सकाळीच पांडे प्रेस शॉपमध्ये सामान घेऊन आला आणि 3-4 तासांतच त्याने दोन्ही प्रेस मशीनवर एकाच वेळी दोन्ही हातांनी बटणे दाबल्यावर चालू होणारे सेफ्टी स्विच बसविले. यामुळे, प्रेसच्या टेबलवर पार्ट ठेवला आणि दोन्ही हात बाजूला काढून दोन्ही बाजूंचे स्विच एकदम दाबले, की त्या फुल रेव्होल्युशन प्रेसचा प्रेस कॉलम खाली येतो. पार्ट 20 टन लोडने अपेक्षित आकारात दाबला जाऊन पुढच्या कामासाठी तयार होतो. दोन हातांनी चालू होणारा स्विच बसविल्यामुळे, काम करताना प्रेस कॉलमच्या खाली हात अडकून चेपला जाण्याची शक्यता उरत नाही.
 
sdfvg_1  H x W:
 
***
शुक्रवार सकाळ म्हणजे आठवड्याची सुरुवात. घाईचा दिवस. देखभालीचा अहवाल (मेंटेनन्स रिपोर्ट), नवीन आठवड्याचे नियोजन, कामगारांच्या रजा, नवीन मटेरियल, टूल, एक ना दोन... अनेक बाबी तपासण्याचा दिवस. मॅनेजर खुडेची सकाळपासूनच धांदल चालू होती. तेवढ्यात त्याला रतन पांडेचा फोन आला.
"सर, आपल्या साहेबांनी सांगितलं तसं दोन्ही 20 टनी प्रेस मशीनवर दोन्ही हातांचे सेफ्टी स्विच बसवलेत. तेवढे शिफ्ट चालू व्हायच्या आधी दोन्हीचे कनेक्शन चालू करून घ्या, म्हणजे नवीन पार्ट लगेच लावता येतील. माजी आज सुट्टी हाय म्हनून फोन केला."
"बर, बर..." म्हणून खुडेने फोन ठेवला. दोन्ही प्रेस मशीनवर नवीन पार्टचे डाय पंच बसविले होतेच. जॉब ऑर्डर आणि रॉ मटेरियलच्या प्लेटदेखील आल्या होत्या. नवीन स्विच लावून झाले तेव्हा आता काम सुरू व्हायला हरकत नाही, असे म्हणत शॉपमधून देखभाल विभागाकडे जाता जाता त्याने दोन्ही मशीनवरील मेन कनेक्शन चालू करून नवीन स्विचचे कनेक्शन चालू केले. देखभाल विभागासोबतच्या मीटिंगला जरा उशीरच झाला होता, तो घाईने तिकडे निघाला.
 
 
***
कार्ड पंचिंग करून आणि कॅँटीनमध्ये चहा पिऊन बबन आपल्या कामाच्या जागेवर आला तेव्हा त्यानेही नवीन स्विच बघितला. बर झालं, असे म्हणून त्याने डबा नीट जागेवर ठेवला. मशीनवर फडके झाडले. नवीन जॉब वगैरे पाहिला. प्रेस मशीनवर नवीन डाय पंच बसविले होतेच. पॅलेटमधून पहिला पार्ट काढून त्याने प्रेसवर बसविला आणि आपली जागा घेतली. त्याच्या लक्षात आले की, त्याचे बसायचे स्टूल जागेवरून हलले आहे. त्यामुळे आपल्याला वाकून काम करायला लागेल आणि नीट होणार नाही. बसल्याबसल्याच त्याने डावा हात टेबलवर टेकवून उजवा पाय जरा पुढे टाकून उजव्या हाताने आपले स्टूल आपल्या पायासकट जरा पुढे ओढले. त्याच्या काही लक्षात यायच्या आत, त्याच्या पुढे टाकलेल्या पायामुळे फूट स्विच दाबला गेला आणि तत्क्षणी प्रेसचा 20 टनी पंच, टेबलावर टेकविलेल्या त्याच्या डाव्या हातावर आदळला. मधल्या तीन बोटांचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. प्रचंड किंकाळी फोडून वेदनेने कळवळत असताना त्याच्या लक्षात आले की, आजूबाजूचे लोक त्याला मदत करायला धावताहेत.

sdvfxgh_1  H x  
 
हा अपघात घडण्याचे कारण काय ?
1. असुरक्षित परिस्थिती ( अनसेफ कंडिशन )
• या प्रेसवर पंच खाली आणण्यासाठी दोन प्रकारचे स्विच होते. एक (मोठ्या आकाराच्या पार्टसाठी) पायाने चालविण्याचा आणि दुसरा (छोट्या आकाराच्या पार्टसाठी) दोन हातांनी चालविण्याचा. या स्थितीमध्ये, एक पद्धत वापरात आणतेवेळी दुसरी व्यवस्था बंद करणे आवश्यक होते जे या ठिकाणी केले गेले नाही.
• दोन हातांचा स्विच चालू करताना, अधिकाऱ्याने फूट स्विचचे कनेक्शन बंद केले नाही आणि यासंबंधी काम करणाऱ्या सर्वांना प्रशिक्षण दिले नाही.
• पंच खाली येताना चुकून मध्ये हात जाऊ नये यासाठी प्रेसवर संरक्षक गार्ड बसविलेला नव्हता.
• पायाने चालविण्याचा स्विच (फूट स्विच) पूर्वी बसवायच्या वेळी, तो चुकून धक्का लागून चालू होऊ नये यासाठी त्यावर एक संरक्षक जाळी हवी, ती या प्रेसवर लावलेली नव्हती.
वरील दोन्ही ठिकाणी, संरक्षक जाळीच्या संदर्भात फॅक्टरी अॅक्ट 1948 या कायद्यातील सेक्शन 21 चे नियम लागू होतात, त्याकडे दुर्लक्ष झाले.
• प्रेसवर केलेले बदल सर्व संबंधितांना समजावून सांगितले
गेले नाहीत.
• मशीनमध्ये महत्त्वाचे बदल करताना मूळ उत्पादकाचा सल्ला घेणे किंवा त्यांची मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणणे आवश्यक आहे.
2. असुरक्षित कार्य (अनसेफ अॅक्ट )
• कोणत्याही परिस्थितीत मशीन चालू असताना, प्रेसचा पंच खाली येणाऱ्या जागेमध्ये आपला हात किंवा शरीराचा कोणताही भाग येऊ नये याची काळजी कामगाराकडून घेतली गेली नाही.
3. इतर
आपल्या कारखान्यामधील सर्व यंत्रसामग्री सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य आहे ना, याची कारखान्याच्या व्यवस्थापनाने नियमित तपासणी करून खात्री केली पाहिजे. सर्व यंत्रांच्या धोकादायक भागांवर संरक्षक जाळी असायला हवी. यंत्रसामग्री हा दीर्घकालीन संसाधनांचा घटक असल्याने त्यातील महत्त्वाचे केलेले बदल हे विविध पद्धतींनी तपासून घ्यायला हवेत. असे बदल करताना, कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतल्यास त्यांच्याकडूनही काही ठोस कल्पना मिळू शकतात.
कारखान्यामधील सर्वांचे सुरक्षितता आणि आरोग्य संवर्धनाचे प्रशिक्षण ठराविक कालावधीने होणे आवश्यक आहे. अशा वेळी, कर्मचाऱ्यांकडून या संदर्भात आलेल्या सूचनांचे स्वागत करणे, त्यातील व्यवहार्य भाग तत्परतेने अंमलात आणणे आणि चांगल्या सूचनांना प्रोत्साहन देणे अशा गोष्टी राबविल्यास कारखान्यामधील सर्वांची सकारात्मकता वाढते.
 
                                                                                                                                   (लेखन साहाय्य : अच्युत मेढेकर)
 
 
उद्धव दहिवाळ यांना मेंटेनन्स आणि औद्योगिक सुरक्षितता या क्षेत्रातील सुमारे 35 वर्षांचा अनुभव आहे.
ते सध्या विविध कारखान्यांना सुरक्षितता सल्लागार सेवा पुरवितात.
9822650043
@@AUTHORINFO_V1@@