पुनश्च दृश्यम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    07-Jun-2021   
Total Views |
इंजिनिअर होऊन मी औद्योगिक क्षेत्रात प्रवेश केलेल्या गोष्टीला आता 54 वर्षे झाली. कधीकधी काही गोष्टी अगदी सहजी समोर येऊन तरळून जातात आणि त्यातल्या घडलेल्या घटना डोळ्यासमोर पुन्हा उभ्या राहतात. परवाच काही तरुण इंजिनिअर मित्रांशी बोलत असताना फॉर्च्युना क्रँकशाफ्ट ग्राइंडिंग मशीनचा संदर्भ आला आणि मला माझ्या आयुष्यातील एक नाट्य आठवले.
 
त्यापूर्वी तुम्हाला आणखी एक वेगळी माहिती सांगायला हवी. बऱ्याच ग्राइंडिंग मशीनमध्ये क्रॉस स्लाइडवर एक डिस्प्ले डायल दिसेल. संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात, फक्त जर्मनीमध्ये निर्माण होणाऱ्या फॉर्च्युना ग्राइंडिंग मशीनवरच ही डिस्प्ले डायल दिव्यांनी उजळलेली (इल्युमिनेटेड) असते. यामध्ये पांढरी डायल, त्यावर कोरलेली काळी अक्षरे आणि आतमध्ये तीन छोटे दिवे अशी रचना असते. माझ्या मते, याचे कारण अगदी साधे असावे. त्याकाळी जर्मनीमध्ये रात्री अंधारातही काम करता यावे, अशा वेळी या व्यवस्थेचा खूप उपयोग होत असावा. काहीही कारणाने असेना का, पण ही व्यवस्था आपल्याला इतर मशीनवर पहायला मिळत नाही.
 
hjm,nb_1  H x W
 
या आठवणीतला पहिला भाग साधारणतः 1965 चा आहे. मी अजून ट्रेनी म्हणूनसुद्धा नोकरीला लागलो नव्हतो. माझ्यापेक्षा मोठे असलेले माझे मेव्हणे निगुडकर हे 'क्रॉस-मॉफी' या रेल्वे इंजिनाचे एक निष्णात तंत्रज्ञ होते. ते एके दिवशी म्हणाले, ''चल तुला टेल्को दाखवितो.'' मग काय, मी खुशीत त्यांच्याबरोबर गेलो. टेल्कोत गेल्याबरोबर आम्ही त्यांच्या 'जोजोबेरा प्लांट' या खात्यात गेलो. इकडे तिकडे सगळीकडे नीट मांडलेल्या मशीननी तो भाग नुसता भरून गेला होता. मी हाफ चड्डी आणि हाफ शर्टातला मुलगा होतो. अजून इंजिनिअर झालो नव्हतो आणि एखादे मशीन प्रत्यक्ष पहिल्यांदाच पहात होतो. फिरत असतानाच कोणी तरी निगुडकरांना हाक मारली, तसे ते तिकडे जाता जाता मला म्हणाले, ''तू इथेच थांब, कोठे जाऊ नको. मी आलोच.'' मी तिथेच काही वेळ समोर काय दिसते ते पहात उभा राहिलो.
 
 
समोर एका फॉर्च्युना ग्राइंडिंग मशीनवर क्रॅँकशाफ्ट ठेवण्याचे काम चालले होते. (अर्थात, फॉर्च्युना, क्रॅँकशाफ्ट आणि ग्राइंडर वगैरे मला खूप नंतर कळले.) त्यावर एक लांबूनच झळकणारी गोल तबकडी (डायल) होती. एका क्रेनवर, दोन हूक असलेल्या एका लिफ्टिंग टॅकलने तो जड क्रँकशाफ्ट खाली लांब प्लेटवर दोन V ब्लॉक होते त्यावर ठेवला. त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूने दोन सेंटर येऊन बसले आणि त्यामध्ये तो क्रॅँकशाफ्ट पकडला गेला. दोन सेंटरपैकी एक आहे तिथेच स्थिर होता, दुसरा थोडा मागेपुढे हलत होता. तेव्हढ्यात एक छोटा पाळणा असावा, असे काहीतरी खाली आले, त्याने क्रॅँकशाफ्टच्या पुढच्या वेबला स्पर्श केला, एक सेंटर थोडेसे मागेपुढे हलले, मग तो छोटा पाळणा वर गेला आणि लगेच ग्राइंडिंग व्हील पुढे येऊन ग्राइंडिंग सुरू झाले. ग्राइंडिंग झाल्यावर क्रेनने तो क्रॅँकशाफ्ट उचलून बाहेर ठेवला आणि दुसरा ठेवून परत आधीसारखे सर्व मशीन सुरू झाले. हे सर्व मी तीन चार वेळा होताना पहिले, तोपर्यंत निगुडकर परत आले आणि आम्ही पुढे इकडे तिकडे जात सर्व कारखाना पाहून खूप दमलेल्या अवस्थेत घरी आलो. ती उजळलेली डायल, तो खाली आलेला पाळणा आणि नंतर सुरू झालेले ग्राइंडिंग हे मात्र कुठेतरी माझ्या मनात कोरले गेले. कारखान्यातला माझा पहिला अनुभव म्हणून असेल कदाचित. ती तारीखही माझ्या लक्षात आहे, नाताळनंतरचा दुसराच दिवस होता, 26 डिसेंबर 1965!
 
 
जवळपास 36 वर्षांनी, मी एका (KTA Spindle Toolings) कंपनीत प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विभाग प्रमुख होतो. त्यावेळी म्हणजे 2001 साली मी IMTEX साठी दिल्लीला गेलो होतो. आमचा तिथे स्टॉल होता. आम्हाला वाढत्या व्यवसायासाठी काही मशीनदेखील घ्यायची होती. प्रदर्शनात स्टॉलवर उभा असताना मला तिथून जाणारा माझा मानलेला भाऊ सुधीर साठे दिसला, त्यासरशी मी 'सुधीर दादा!' अशी त्याला हाक मारली. तो जवळ आला खरा, पण तो माझा मानलेला भाऊ सुधीर साठे नव्हता, तर दुसराच, पण सुधीर साठे याच नावाचा. अगदी तस्साच दिसणारा होता. त्यामुळे अर्थातच त्याने मला ओळखले नाही. ओळख अशी गमतीशीर झाली. तो 'महिंद्रा' मध्ये नोकरीला होता आणि ग्राइंडिंग तज्ज्ञ असल्याने तो जुनी वापरलेली फॉर्च्युना ग्राइंडर मशीन विकत असे. हे कळल्यावर मी खूशच झालो. कामच झाले, आम्हाला हीच मशीन हवी होती आणि त्याचा अधिकारी समोर उभा होता. फॉर्च्युना ही जर्मन कंपनी आता ती ग्राइंडर मशीन स्वतः बनवित नाही आणि त्यांना कास्टिंग पुरविणारी 'लिव्ह्नीत्झा किकिंदा' ही सर्बियन कंपनी ती मशीन बनविते, हे या 'नव्या' सुधीरने सांगितले. पटकन निर्णय घेण्याच्या माझ्या स्वभावानुसार, त्याच्याशी बोलून मी युगोस्लाव्हियाला (आताचा सर्बिया) जाण्याचे लगेचच ठरविले.
 
 
'लिव्ह्नीत्झा किकिंदा' ही युरोपातील विविध उद्योगांना प्रतिदिवस तब्बल सहा हजार टन कास्टिंग पुरविणारी एक अजस्त्र कंपनी आहे. आपल्याकडेही त्यांची विविध कास्टिंग पहायला मिळतात. ड्रॅगन कुज्मानोव्ह या त्यांच्या विपणन संचालकाने (सेल्स डायरेक्टर) आमचे स्वागत केले. त्यांच्याकडे 1 मीटर ते 2.5 मीटर या रेंजची एकूण 27 मशीन होती. आम्ही ती सगळीच विकत घ्यायचे ठरविले. या सर्व मशीनवरील क्रॉस स्लाइडवर मला ती 'प्रकाशित' पांढरी डायल दिसली आणि माझी 36 वर्षांपूर्वीची स्मृती जागृत झाली. मी ड्रॅगन कुज्मानोव्हला, टेल्कोमध्ये त्या काळी पाहिलेली ती, ग्राइंडिंग सुरू होण्याआधी वेबचे सेन्सिंग करणारी अॅटॅचमेंट वर्णन करून सांगितली. पण या सत्तावीस मशीनपैकी एकावरही तसे काही नव्हते. तो बुचकळ्यात पडला. त्याने लिव्ह्नीत्झा किकिंदाच्या आंद्रिआ रोमचेक नावाच्या डिझाइन चीफला बोलाविले. मी परत त्याला हे सर्व वर्णन केले आणि ती अॅटॅचमेंट आम्हाला या मशीनवर हवी असल्याचे सांगितले. हे त्यालाही नवीन होते. "ठीक आहे, मी शोधतो," असे सांगून तो जो गुप्त झाला, तो तब्बल दीड तासाने उगवला. 'फॉर्च्युना'ने हा निर्मिती व्यवहार लिव्ह्नीत्झा किकिंदाकडे सोपविताना सर्व ड्रॉइंग त्यांच्याकडे पाठविली होती, ती त्यांच्या अर्काईव्हजमध्ये सुरक्षित ठेवली होती. या अर्काईव्हजमधून शोधून त्याने या विशिष्ट अॅटॅचमेंटच्या ड्रॉइंगचा एक गठ्ठा समोर आणून ठेवला. "सद्गृहस्थहो, ही अॅटॅचमेंट सर्व सत्तावीस मशीनवर आम्ही परत तयार करून देऊ शकतो, परंतु हे सर्व नवीन तयार करावे लागेल, प्रयोग करावे लागतील, त्याची बरीच किंमत वाढेल. आपल्याला ते मान्य होईल का?" त्याने विचारले.
 
 
मी ताबडतोब त्याला होकार दिला. त्या अॅटॅचमेंटचे महत्त्व मला गेल्या 36 वर्षांच्या अनुभवाने कळले होते. मी पूर्वी पाहिलेला तो पाळणा म्हणजे एक छोटा फ्लॅगिंग डिव्हाइस होता. मशीनवर क्रॅँकशाफ्ट ठेवण्याचे काम पूर्ण झाल्यावर तो खाली येतो, समोर असलेल्या एका प्रोबने तो क्रॅँकशाफ्टच्या पहिल्या वेबच्या पुढच्या पृष्ठभागाला स्पर्श करतो. त्यानंतर दोन सेंटरपैकी मागेपुढे होणारा मागचा सेंटर विशिष्ट अंतरावर पुढे येऊन क्रॅँकशाफ्टचे स्थान (पोझिशन) स्थिर केले जाते आणि व्हील पुढे येऊन ग्राइंडिंग सुरू होते. या पद्धतीमुळे, ग्राइंडिंग करताना एक संदर्भ (रेफरन्स) मिळतो आणि त्यामुळे इतर अनेक दोष अर्थातच टाळता येतात. पुढे आमच्या इतर अनेक उत्पादांना याचा फायदा होणार होता.
 
 
''ठीक आहे, आम्हाला तुम्ही एक महिना वेळ द्या, आम्ही तुम्हाला काय ते कळवितो,'' असे त्याने सांगितले आणि बाकी मूळ मशीनचा व्यवहार ठरवून मी परत आलो.
बरोबर एक महिन्याने मला मिस्टर रोमचेकचा फोन आला. त्यांचे 'अॅटॅचमेंट'वरील प्रयोग यशस्वी झाले होते. सर्व सत्तावीस मशीनवर या फ्लॅगिंग अॅटॅचमेंट लावण्यासाठी नवे कोरे वर्कहेड बसवावे लागणार होते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला यासाठी कोणतेही अधिक मूल्य द्यायची गरज नव्हती!
मी आश्चर्यचकित होऊन असे का म्हणून विचारले. त्यावर त्याने सांगितले की, या सत्तावीस मशीनवर घेतलेल्या चाचण्यांमुळे त्यांचे नवीन वर्कहेडचे विकसन झाले होते. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून ही त्यांच्यातर्फे विशेष भेट होती. माझे छत्तीस वर्षांपूर्वीचे झालेले 'पुनश्च दृश्यम्' असे प्रत्यक्षात अवतीर्ण होईल अशी शंकासुद्धा कधी माझ्या मनात आली नाही, पण ते अवतरले हे निश्चित!
 
प्रदीप खरेे फाय फाउंडेशन पुरस्काराचे विजेते आहेत.
त्यांना मशीनिंग क्षेत्रातील जवळपास 50 वर्षांचा अनुभव आहे.
नवीन माहिती, अनुभव, ज्ञान, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. 
9552528341
@@AUTHORINFO_V1@@