कटिंग टूलच्या साठ्याचे स्मार्ट व्यवस्थापन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    12-Jul-2021   
Total Views |
टूलिंगचा खर्च हा कंपनीच्या एकूण खर्चातील वारंवार येणारा अगदी रोजचा घटक आहे. प्रभावी वस्तूसाठा (इन्व्हेंटरी) व्यवस्थापनाद्वारे हा खर्च कमी केल्यास, उत्पादकाला प्रति भाग (पार्ट) खर्च (CPP) कमी करणे, नफा वाढविणे आणि अंतिम उत्पादनाची किंमत अधिक स्पर्धात्मक ठेवणे शक्य होते. टूलचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे या उद्देशाने विकसित केलेल्या स्मार्ट स्टोअरेज आणि कटिंग टूल इन्व्हेंटरी व्यवस्थापनाचे तपशील उलगडून सांगणारा लेख.
 
 

Cutting tools
 
    
आज, धातू यंत्रणाच्या उद्योगात किफायतशीर पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी, उत्पादकांना टूलिंगच्या खर्चावर लक्ष ठेवणे आवश्यक झाले आहे. उत्पादकांचे लक्ष नेहमीच ज्यात मोठी गुंतवणूक करावी लागते, अशा उपकरणांच्या खर्चावरच केंद्रित होत असल्याने, त्यांचे टूलिंगच्या खर्चाकडे दुर्लक्ष होते. परंतु, टूलिंगचा खर्च हा कंपनीच्या एकूण खर्चातील वारंवार येणारा अगदी रोजचा घटक आहे, हे त्यांना समजून घ्यावे लागेल. प्रभावी वस्तूसाठा (इन्व्हेंटरी) व्यवस्थापनाद्वारे हा खर्च कमी केल्यास, उत्पादकाला प्रति भाग (पार्ट) खर्च (CPP) कमी करणे, नफा वाढविणे आणि अंतिम उत्पादाची किंमत अधिक स्पर्धात्मक ठेवणे शक्य होईल.
 
यात, नव्याने येणाऱ्या आणि वापरल्या जाणाऱ्या टूलचे प्रभावी व्यवस्थापन, त्यांचा मागोवा ठेवण्याची क्षमता (ट्रेसेबिलिटी), टूल शोधण्यात लागणारा वेळ कमीतकमी करणे आणि हाताने नोंदी ठेवण्याच्या प्रक्रियेच्या जागी एक पद्धतशीर सॉफ्टवेअर आधारित टूल व्यवस्थापन उपाययोजना राबविणे, असे उपाय समाविष्ट आहेत.
 
 
प्रचलित पद्धतीतील समस्या
1. हाताने नोंदी ठेवण्यात अधिक कष्ट आणि चुका होण्याची शक्यता भरपूर असते.
2. टूल शोधण्यात फार वेळ लागत असल्यामुळे, ऑपरेटरची चिडचिड होणे आणि उत्पादकता कमी होण्याची शक्यता असते.
3. कारखान्यात कोणते कटिंग टूल कोठे असेल, या माहितीचा अभाव असतो.
4. वापरण्यात आलेल्या टूलचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नाही.
5. बाद झालेल्या (स्क्रॅप) टूलचे गलथान व्यवस्थापन
6. सर्वसमावेशी साठ्याचा विश्लेषण अहवाल उपलब्ध नसणे.
7. पारंपरिक रॅकमुळे टूल रूममधील जागेचा योग्य उपयोग न केला जाणे.
8. परिणामी टूलिंग खर्च आणि अनुत्पादक वेळ जास्त असणे.
 
 
पर्याय
वरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि धातु यंत्रण करणाऱ्या कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या टूलचा एकूण खर्च कमी करण्यासाठी, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे ग्राहकानुरूप बनविलेले अनेक पर्याय झोलर देऊ करते, जेणेकरून टूल व्यवस्थापनाच्या कामात शिस्त आणि सुव्यवस्था येईल.
 
 
हार्डवेअर - स्मार्ट कपाट
1. झोलर कीपर

Keeper cabinet
 
चित्र क्र. 1 : कीपर कपाट
 
कीपर कपाटे ही एक उभी साठवणूक प्रणाली आहे. पारंपरिक पद्धतीतील जागा अडविणाऱ्या खुल्या रॅकच्या ऐवजी ही प्रणाली वापरल्याने 1x1 वर्गमीटर इतक्या छोट्याशा जागेत, 240 ते 480 हत्यारधारक (टूल होल्डर) (हत्यारधारकांच्या आकार आणि प्रकारानुसार) आणि/अथवा अॅसेंब्ली ठेवता येऊ शकतात. यात उंचीनुसार दोन पर्याय (1000 मिमी. आणि 2000 मिमी.) आणि खणानुसार (ड्रॉवर) दोन पर्याय (3 खण आणि 5 खण) आहेत. उभ्या खणांच्या अंतर्गत कप्प्यांची रचना हत्यारधारकाच्या/अॅसेंब्लीच्या उंचीनुसार कशीही समायोजित (अॅडजस्ट) करता येते. प्रत्येक खणामध्ये 1000 किलो वजन ठेवण्याची क्षमता असते. 5 खण प्रकारांत ठेवलेल्या वस्तूंसाठी व्यासाची मर्यादा 150 मिमी. आहे, तर 3 खण प्रकारांत 300 मिमी.पर्यंत व्यासाच्या वस्तू ठेवता येतात. हत्यारधारकांच्या प्रकारानुसार (BT40, HSK63, Capto C4, इत्यादी.) त्यांना ठेवण्यासाठी विविध प्रकारचे प्लास्टिक इन्सर्ट पुरविता येतात. कीपर कपाट मॅन्युअल आणि इलेक्ट्रॉनिक या दोन प्रकारच्या लॉकिंग प्रकारात उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक प्रकारामध्ये खणाचे लॉकिंग टूल मॅनेजमेंट सोल्यूशन (TMS) कपाट कंट्रोल सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जाते. सुरक्षित साठवणूक, चांगली वजन क्षमता आणि जागेचा उत्कृष्ट उपयोग, हे या कपाटाचे काही मुख्य फायदे आहेत.
 
 
2. झोलर टूल व्यवस्थापक (ऑर्गनायझर)

Tool Manager
 
चित्र क्र. 2 : टूल व्यवस्थापक
 
या कपाटामध्ये उत्पादकाच्या गरजेनुसार हवे तितके पर्याय उपलब्ध करता येतील, अशी आडवी खण रचना असते. कटिंग टूल (इन्सर्ट आणि गोल टूल) आणि त्यांच्याशी संबंधित उपसाधनांसाठी टूल व्यवस्थापक सर्वात योग्य आहे. यात उंचीनुसार 600 मिमी., 900 मिमी. आणि 1225 मिमी. असे तीन मुख्य पर्याय आहेत. उत्पादकाच्या गरजेनुसार वैयक्तिक खणांची उंची 50 मिमी.पासून 300 मिमी.पर्यंत बदलता येते. प्रत्येक खणामधील कप्प्यांची संख्या 4 पासून 48 पर्यंत समायोजित करता येते. या कपाटामध्ये तीन प्रकारचे लॉकिंग उपलब्ध आहे. मेकॅनिकल, खणांचे लॉकिंग (खण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लॉक केलेले असतात आणि सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित असतात, पण कप्पे खुले असतात), कप्पे लॉकिंग (स्वतंत्र कप्पे किंवा पॉकेट, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लॉक केलेले असतात आणि सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित असतात). सुरक्षित साठवणूक, अधिक नियंत्रण आणि साठ्याचे अचूक वर्गीकरण ही टूल व्यवस्थापक कपाटाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
 
 
3. झोलर ट्विस्टर
ट्विस्टर कपाट म्हणजे कटिंग टूलचे व्हेन्डिंग मशीन आहे. विमानतळांवर किंवा कार्यालयीन इमारतींमध्ये शीतपेयांच्या बाटल्या किंवा खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी आपण अशी मशीन पाहिली असतील. त्याप्रमाणेच ट्विस्टर नवीन कटिंग टूलचा पुरवठा करते. याच्या आकारांमध्ये ट्विस्टर L (मोठा) मध्ये 70, ट्विस्टर S मध्ये 42 (लहान) आणि मायक्रोट्विस्टरमध्ये 24 प्रकारची टूल संग्रहित केली जाऊ शकतात. प्रत्येक हेलिक्समध्ये निवडलेल्या कॉन्फिगरेशननुसार 10 ते 24 साठा ठेवण्याच्या जागा असतात.

Twister cupboard
 
चित्र क्र. 3 : ट्विस्टर कपाट
 
हे सॉफ्टवेअरने नियंत्रित केलेले कपाट वापरल्याने, वापरकर्ते वापरण्यासाठी एकावेळी एकच वस्तू घेऊ शकतात. त्यामुळे आपल्याला नवीन टूलच्या इन्व्हेंटरीवर संपूर्ण नियंत्रण ठेवता येते. हे कपाट गोल टूल, इन्सर्ट बॉक्स आणि स्वतंत्र बॉक्समध्ये ठेवलेले इन्सर्ट यांच्यासाठी आदर्श आहे. एकावेळी एकच टूल देता येणे, उत्तम इन्व्हेंटरी नियंत्रण आणि सुरक्षित साठवणूक, ही ट्विस्टर कपाटाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
 
 
सॉफ्टवेअर - TMS (कॅबिनेट कंट्रोल)

Computer-assisted storage configuration in QuickPic module

चित्र क्र. 4 : क्विकपिक मॉड्यूलमध्ये संगणकावर करता येणारी साठवणूक रचना
 
झोलर TMS (टूल मॅनेजमेंट सोल्यूशन) सॉफ्टवेअर हा उत्पादन प्रक्रियेचा कणा आहे. याद्वारे, प्रक्रियेत भाग घेणाऱ्या विविध खात्यांतील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना एकाच सामाईक डाटाबेसमध्ये माहितीचे हस्तांतरण करता यावे, यासाठी एका सामाईक डाटाबेसवर आधारित एक मंच उपलब्ध करुन दिला जातो. जेव्हा आपण 'इंडस्ट्री 4.0' बद्दल बोलतो, तेव्हा आपल्या मनात येणारा पहिला शब्द म्हणजे 'माहिती'. परंतु आपली उत्पादन प्रक्रिया अधिक स्मार्ट बनविण्यासाठी योग्य मार्गाने माहितीचे व्यवस्थापन करणे, हे एक आव्हान आहे. झोलर TMS सॉफ्टवेअर अनेक प्रणालींबरोबर इंटरफेस करण्यासाठी सक्षम आहे, ज्यात CAD/CAM आणि ERP यांचा समावेश तर आहेच, परंतु ही क्षमता तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. या सॉफ्टवेअरमध्ये स्टॉकचे व्यवस्थापन करणे आणि आंतर-विभागीय माहिती हाताळणे, अशा क्षमतासुद्धा आहेत. त्यामुळे कोणत्याही कंपनीला त्यांची उत्पादन प्रक्रिया अधिक स्मार्ट करणे सुलभ होते आणि ती हळू हळू 'स्मार्ट फॅक्टरी' होण्याच्या मार्गाला लागते. या लेखात फक्त कॅबिनेट कंट्रोल सॉफ्टवेअर पॅकेजबद्दल चर्चा करण्यात आली आहे, जे TMS चा एक महत्त्वाचा भाग आहे.
 
 
1. गोदाम (वेअरहाउस) व्यवस्थापन
कॅबिनेट कंट्रोल सॉफ्टवेअरच्या 'स्टोअर' मॉड्यूलमध्ये उत्पादकाला प्रत्यक्ष कपाटाचे प्रतिनिधित्व करणारा आराखडा तयार करता येतो आणि प्रत्यक्ष असतात तशा साठवणूक जागा सॉफ्टवेअरमध्ये नियुक्त करता येतात. आपण सॉफ्टवेअरमध्ये आपल्या सर्व स्मार्ट तसेच पारंपरिक कपाट/रॅकसाठी साठवणूक जागा तयार आणि नियुक्त करू शकतो. यामुळे सर्व टूलच्या साठ्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवता येते आणि टूल शोधण्यात लागणारा वेळ टाळता येतो. सामान्यतः असे पाहण्यात येते की, पारंपरिक सेटअपमध्ये, प्रत्येक वस्तू ठेवण्याचे स्थान तेच रहात नाही आणि त्यामुळे गोंधळ होतो. वस्तू शोधण्यासाठी खूप वेळ लागतो. उत्पादकता कमी होते आणि ऑपरेटरची निराशा होते. या समस्येवर सॉफ्टवेअरद्वारे उपाय मिळतो, कारण यात वस्तू नेहमीच ठेवण्याच्या ठरलेल्या जागीच असतात. प्रत्येक वस्तूला कमाल आणि किमान साठ्याची संख्या ठरविता येते. जेव्हा कोणत्याही वस्तूचा साठा रीऑर्डर स्तरावर येतो, तेव्हा तिची खरेदी करण्यासाठी आवश्यक सूचना निर्माण केली जाते.
 
 
2. क्विकपिक मॉड्यूल

Information that can be easily entered into the software
 
चित्र क्र. 5 : सॉफ्टवेअरमध्ये सहजतेने भरता येणारी माहिती
 
ऑपरेटरला सॉफ्टवेअर वापरण्यास कोणतीही अडचण येऊ नये आणि योग्य टूल शोधण्यात त्याला कोणताही ताण वाटू नये, यासाठी त्याला एक अतिशय सुलभ व्यवस्था देणे गरजेचे आहे. स्क्रीनवर अगदी मोजकी बटणे आणि टूल किंवा उपसाधने घेण्यासाठी (चेक आउट) किंवा परत करण्यासाठी (चेक इन) एक तर्कशुद्ध कार्यपद्धती, हे 'क्विकपिक' मॉड्यूलचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही वस्तूचा मागोवा घेता येण्याची क्षमता, हे TMS सॉफ्टवेअरचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. ते पूर्ण करण्यासाठी एक मागणी पृष्ठ (क्वेरी पेज) निर्माण करणे आवश्यक आहे. या पृष्ठावर टूलची आवश्यकता असलेल्या व्यक्तीचे नाव, संबंधित मशीनिंग सेंटर, कॉस्ट सेंटर, डिपार्टमेंट इत्यादी माहिती असते. ही माहिती भरल्याशिवाय सॉफ्टवेअर कोणतीही वस्तू स्टोअरमधून बाहेर जाऊ देत नाही. याला झोलर स्मार्ट कपाटासोबत जोडले की, केवळ सॉफ्टवेअरद्वारे कप्पा किंवा खण, लॉक किंवा अनलॉक करून अधिक परिणामकारक नियंत्रण करता येते. प्रक्रियेत जास्तीतजास्त सुरक्षा राखण्यासाठी, TMS सॉफ्टवेअर वापरून टूल घेण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येक व्यक्तीस त्याचा/तिचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिले जातात. असे केल्याने सॉफ्टवेअरमध्ये व्यक्तीनिहाय क्रियाकलापांचा मागोवा घेतला जातो आणि ज्या त्या व्यक्तीच्या कामानुसार केवळ निवडक अॅक्सेस दिला जातो.
 
 
वस्तू परत करताना, योग्य वर्गीकरण आणि टूलचा जास्तीतजास्त वापर करण्याच्या दृष्टीने, वापरकर्त्याला काटेकोर पर्याय (सामान्य/नवीन/वापरलेली/नूतनीकृत/रीवर्क/स्क्रॅप) दिले जातात. या वैशिष्ट्यामुळे TMS सॉफ्टवेअरची खर्चात बचत करण्याची क्षमता कार्यरत होते. प्रभावी वर्गीकरणासाठी वेगवेगळ्या साठवणूक कप्प्यांना/क्षेत्रांना विशिष्ट प्रकारासाठी नियुक्त केले जाऊ शकते. कारखान्यात सद्यस्थितीत वापरल्या जात असलेल्या सर्व टूलचे संनियंत्रण (मॉनिटरिंग) करून हे सॉफ्टवेअर, नियंत्रण अजून वरच्या पातळीवर घेऊन जाते. जुने टूल, मग ते कोणत्याही स्थितीत असो, परत केल्याशिवाय कोणीही विनाकारण नवीन टूल घेऊ शकणार नाही, हेही यामुळे सुनिश्चित होते.
 
 
3. स्टॉक विश्लेषण
कोणतेही टूल व्यवस्थापन सॉफ्टवेअर, व्यापक स्टॉक विश्लेषण कार्याशिवाय (फंक्शन) अपूर्ण आहे. TMS सॉफ्टवेअर वापरून आपल्याला व्यक्ती निहाय, कॉस्ट सेंटर निहाय, मशीन निहाय, विभाग निहाय आणि स्टोअर निहाय, अशा विविध प्रकारे टूलच्या साठ्याचे आणि वापराचे विश्लेषण करता येते. हे विकल्प केवळ वानगीदाखल आहेत. प्रत्यक्षात हे सॉफ्टवेअर आपल्याला स्टॉक विश्लेषणाचे असंख्य पर्याय देते. हे वापरून टूल रूम व्यवस्थापकाला कारखान्यात काय चालले आहे, याचे स्पष्ट चित्र मिळते आणि एखाद्या समस्येचे (उदाहरणार्थ, मशीनिंग सेंटरच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या समस्येमुळे टूलचा जास्त वापर) मूळ कारण शोधण्यासाठी सक्षम करते. याद्वारे कंपनी समस्येचे निराकरण करू शकते, टूलचा वापर आणि टूलिंगचा खर्च कमी करण्यात मदत होते.
 
 
आजच्या स्पर्धात्मक जगात परिणामकारक टूल व्यवस्थापन आणि टूलिंग खर्चात कपात करणे, हे एकूण नफा वाढविण्यासाठी अत्यावश्यक आहे. ते साध्य करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. खुली विचारसरणी, उत्पादन क्षेत्रातील रोजच्या नव्या प्रगतीला आत्मसात करण्याची उत्कट इच्छा आणि दूरदृष्टी, हीच यशाची गुरुकिल्ली आहे!
 
 
उदाहरण
अंबड, नाशिक येथील पांचाळ इंजिनिअर्स इंडिया प्रा. लि. कंपनीत टूल व्यवस्थापनासाठी झोलर कंपनीची स्मार्ट स्टोअरेज आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापन सिस्टिम कार्यान्वित केलेली आहे. ही सिस्टिम आम्ही दोन वर्षांपासून वापरत असल्याचे कंपनीचे रुपेश जाधव यांनी सांगितले. कंपनीच्या एकूण कामकाजाविषयी बोलताना ते म्हणाले, "आमच्या कंपनीत सिलिंडर, एअर कॉम्प्रेसर, गिअर असेंब्ली आदी यंत्रभागांचे मशीनिंग करण्याचे काम केले जाते. कंपनीमध्ये दोन शॉप असून एका शॉपमध्ये तीन एच.एम.सी. आणि तीन व्ही.टी.एल. मशीन आहेत. तर दुसऱ्या शॉपमध्ये एक एक सी.एन.सी. आणि दोन व्ही.एम.सी. मशीन आहेत. पूर्वी टूल व्यवस्थापनासाठी मॅन्युअल पद्धतीचा वापर करण्यात येत होता. आमच्याकडे शॉपमध्ये साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचे 10 ते 12 प्रकारचे टूल आहेत, ज्यांची एकूण संख्या सुमारे 400 असते. याशिवाय जे स्पेशल टूल असतात त्यासाठी आम्ही वेगळी कॅटेगरी केलेली आहे, त्यांची संख्या सुमारे 100 असते. ज्यावेळी अॅसेंब्ली बदलली जाते त्यावेळी टूलदेखील बदलले जाते. रीग्राइंडिंग केलेल्या टूलचा वापर जशी आवश्यकता असते त्याप्रमाणे केला जातो, तर महिन्याला नवीन गरजांनुसार आम्ही साधारणतः 8 ते 10 नवीन टूल मागवितो.

software Reports
 
चित्र क्र. 6 : सॉफ्टवेअरमधून मिळणारे अहवाल
 
पूर्वी जो कर्मचारी हे काम बघत होता, केवळ त्यालाच टूलच्या साठ्याची माहिती असायची. मात्र, जेव्हापासून आम्ही झोलरची सिस्टिम कार्यान्वित केली आहे, तेव्हापासून टूलची सर्व माहिती (डाटा) सिस्टिममध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यावर अवलंबून असणे आता पूर्णपणे बंद झाले आहे. टूलची सर्व माहिती सॉफ्टवेअरमध्ये असल्यामुळे नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यालादेखील कोणत्या मशीनवर कोणत्या टूलचा वापर चालू आहे हे समजणे सोपे झाले आहे. जर टूल तुटले असेल किंवा त्याला रीग्राइंडिंगची आवश्यकता असेल त्याप्रमाणे त्याची नोंद सिस्टिममध्ये केली जाते. पूर्वी अशाप्रकारची नोंद रजिस्टरमध्ये हाताने करावी लागत होती. नवीन सिस्टिममध्ये जोपर्यंत (कोणत्या मशीनवर टूल हवे आहे, त्याची मागणी किती आहे, कोणत्या कामासाठी लागते आहे इत्यादी) सर्व बाबींची पूर्तता केली जात नाही तोपर्यंत संबंधित टूल स्वीकारले किंवा नव्याने दिले जात नाही. या सर्व स्टिस्टिममुळे चुकीचे टूल दिले जाणे किंवा दिलेले टूल स्टोअरमध्ये परत न येणे, या सर्व गोष्टी होणे पूर्णपणे बंद झाले. नव्याने केलेल्या सिस्टिममध्ये काही प्रमाणात त्रुटी किंवा समस्या येतात. त्यावेळी झोलर कंपनीकडून आवश्यक ती मदत ऑनलाइन पुरविली जाते. झोलरची सिस्टिम वापरण्यासाठी आम्ही कर्मचारी नेमलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या आणि देण्यात येणाऱ्या प्रत्येक टूलची शहानिशा करूनच त्याची नोंद संबंधित सॉफ्टवेअरमध्ये केली जाते. जर टूल खराब झालेले असेल, तर त्याप्रमाणे त्याच्या मागणीचा ई-मेल खरेदी विभागाला पाठविला जातो. त्यानंतर टूल नव्याने मागवायची का? हे संबंधित विभागाकडून निश्चित केले जाते. सिस्टिम नव्याने लावल्यानंतर सुरुवातीला एकदाच शॉपमध्ये किती टूल आहेत, कुठल्या प्रकारच्या टूलची संख्या किती आहे इत्यादीची माहिती आम्हाला त्यात टाकावी लागली, त्यानंतर आता त्याचे आउटपुट मिळण्यास सुरुवात झाली आहे."
 
 
फायदे
• झोलरच्या सिस्टिममुळे टूल इन्व्हेंटरी साधारणतः 5 ते 8% कमी होण्यास मदत झाली.
• सिस्टिममुळे विशेष टूलच्या वापरामध्येही फायदा झाला आहे. टूल कोणत्या मशीनवर आहे यासाठी पूर्वी शोधाशोध करावी लागत होती, ती सिस्टिममुळे कमी झाली.
• पूर्वी टूल सेटिंगसाठी अंदाजे एक तासाचा वेळ लागायचा तर या सिस्टिममुळे हे काम अंदाजे 20 मिनिटांत पूर्ण होऊ लागले आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन फायदा झाला.
• कोणत्या मशीनवर टूलचा जास्त वापर होत आहे याची माहिती मिळण्यास मदत झाली.
• सिस्टिममुळे मशीनवर होणारी टूलची आणि इन्सर्टची इन्व्हेंटरी कमी होण्यास मदत झाली. पूर्वी आम्ही साधारणतः 100 इन्सर्ट मागवित होतो जे आता आम्ही केवळ 60 मागवित आहोत.
 
 
अभिषेक तोडकर माळी इलेक्टॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियंता आहेत. त्यांना या क्षेत्रातील कामाचा 7 वर्षांहून अधिक अनुभव आहे. सध्या ते झोलर इंडिया प्रा. लि. कंपनीत उत्पादन व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. 
9823877280
@@AUTHORINFO_V1@@