मिटिंग रूमच्या बाहेरून विठ्ठलने शाफ्टची ढकलगाडी नेहमीप्रमाणे प्रचंड खडखड आवाज करत नेली. नेहमीप्रमाणे प्रॉडक्शन मॅनेजर साहेबांच्या कपाळावरच्या आठ्यांमध्ये वाढ झाली आणि ते मेंटेनन्स मॅनेजरवर खेकसले, "अरे किती दिवस मी सांगतोय हा आवाज कमी करा म्हणून? का होत नाही हे साधे काम?"
"साहेब, मी गेल्या दहा महिन्यात गाड्या या विषयावर तीन प्रपोजल दिली, अजून त्यातले एकही पास झाले नाही." मेंटेनन्स मॅनेजरने पुन्हा एकदा आठवण करून दिली. "सर्व गाड्यांची खराब झालेली लोखंडी चाके काढून पॉलियुरेथिनची चाके लावायला पाहिजेत आणि खड्डे पडलेला शॉपफ्लोअरवरचा पॅसेज पूर्ण बदलून नवीन काँक्रिटचा करायला हवा. याही तिमाहीला बजेट मिळाले नाही."
प्रॉडक्शन मॅनेजर साहेबांचा पारा अजून वर चढला. ते बाहेर येऊन विठ्ठलवर ओरडले, "अरे विठोबा जरा हळू चालव गाडी, मिटिंग चालू आहे कळत नाही का?"
"ओ सायेब, गाडी मला अर्जंट लावाया सांगितली हाये. येक तर लई जड गाडी. आन् चाकं बदला म्हनून मागं लागलोय तर न्हाई होत. म्या पैलवानकी क्येली म्हनून ढकलतोय. आनि कोन करल का? माज्यावर वरडण्यापेक्षा चाकं बदलायला सांगा." कुरकुरत विठ्ठल निघून गेला, साहेब नेहमीप्रमाणे आत आले आणि मिटिंग पुढे सुरू झाली.
***
सुपरवायझर शेडगे सेक्शनमध्ये कामावर येतानाच एचआरमधून एक बदली हेल्पर बरोबर घेऊन आला. आज विठ्ठल येणार नव्हता, त्याच्याऐवजी दिलेल्या हेल्परला त्याने शाफ्टची ढकलगाडी दाखविली आणि ती कोठे नेऊन द्यायचे ते सांगितले. ती जड गाडी पाहूनच बदली हेल्पर सटपटला आणि अजून एक बदली हेल्पर पाहिजे म्हणून हटून बसला. त्याच्याशी वाद घालत असतानाच फिनिशिंग सेक्शनमधून त्याला फोन आला, "अरे शेडगे सकाळचे नऊ वाजून गेले, शाफ्टची गाडी अजून का आली नाही? लवकर पाठव, इथे जॉब संपत आलेत."
चित्र क्र. 1 : प्रोपेलर शाफ्ट नेणारी ट्रॉली
सकाळी सकाळी वाद नको, काम सुरू व्हायला पाहिजे या विचाराने त्याने एचआरमधून आणखी एक बदली हेल्पर मागविला आणि पहिल्या हेल्परला हे सांगून तो प्रॉडक्शन मॅनेजर साहेबांच्या ऑफिसमध्ये गेला. मिटिंगच्या आधी साहेबांना माहिती द्यायची होती, उशीर होऊन चालणार नव्हते.
इकडे दुसरा हेल्पर आल्यावर दोघांनी ती गाडी पाहिली. अंदाजे साडे तीन फूट लांब, दोन फूट रुंद आणि साडेपाच फूट उंच गाडी होती. बरीच कळकट गाडी होती, रंग कधीच उडाला होता. गाडीत खाली लोखंडी सॉकेट होती, त्यात पाच रांगांमध्ये पाचपाच शाफ्ट उभे केले होते. वरच्या बाजूला खाचा केल्या होत्या, त्यातून उंच शाफ्ट पडू नयेत म्हणून लोखंडी कड्या लावल्या होत्या. तिच्या एका बाजूला एक मोठे हँडल होते आणि खाली फिरती चाके होती. पलीकडच्या बाजूला फिक्स चाके होती. गाडीत काल रात्रीच शाफ्ट उभे करून झाले होते. एकूण बरेच जड प्रकरण होते. पहिला म्हणाला, "मी हँडलच्या बाजूने ओढतो, तू पलीकडून ढकल. कुठे न्यायची ते मला माहित आहे." कशीबशी दोघांनी मिळून ती गाडी हलविली. थोडी लटपटत शेवटी ती सेक्शनमधून बाहेर काढली.
पुढच्या वळणावर एक खड्डा होता, त्याचा अंदाज या दोघांना आला नाही. गाडीचे एक फिरते चाक खड्ड्यात अडकले आणि धक्का बसला. गाडी ओढत असलेला पहिला हेल्पर वळला. ते चाक बाहेर काढण्यासाठी त्याने जोर लावला आणि मागच्यालाही त्याने जोरात ढकलायला सांगितले. इतक्यात चाक पुन्हा घसरून पूर्ण गाडीचाच तोल गेला तसा पहिला हेल्पर घसरला आणि आडव्या अंगाला तो पडताना गाडी त्याच्या अंगावर पडली. प्रचंड आवाजाने सगळे लोक धावत आले आणि सामान बाजूला काढून विव्हळत असलेल्या हेल्परला बाजूला काढून रूग्णवाहिकेने हॉस्पिटलला पाठविण्यात आले.
जागेवर धावत आलेल्या लोकांमध्ये प्रॉडक्शन मॅनेजर साहेबांच्या बरोबर मालकदेखील होते. हा हेल्पर पुढे चार महिने रुग्णालयामध्येच काढणार आहे अणि त्याची दोन-तीन महागडी ऑपरेशन करावी लागणार आहेत, याची आत्ता त्या दोघांनाही कल्पना नव्हती.
पार्श्वभूमी
ही शाफ्टची ढकलगाडी याच कारखान्यात फॅब्रिकेशन विभागाने लोखंडी अँगलमधून तयार केली होती. एक वेळेला, एक मीटर उंचीचे पंचवीस शाफ्ट नेता यावेत यासाठी ती सुमारे पावणेदोन मीटर उंच केली होती अणि विविध यंत्रांच्या मधून ती नेता यावी, यासाठी ती पाउण मीटर रुंद ठेवली गेली. अर्थातच, या गाडीचा गुरुत्वमध्य बराच वर होता.
गाडीच्या एका बाजूला रुंद हँडल लावले होते आणि त्याच बाजूला खाली फिरती चाके होती. दुसऱ्या बाजूला फिक्स चाके होती. याचा अर्थ, जिकडे हँडल लावले होते, तिकडून गाडी ओढायची नाही, तर ती ढकलायची होती. नवीन गाडीवर या बाजूने 'पुश' म्हणजे 'ढकला' अशी पाटी लावली होती, पण काळाच्या ओघात ती कधीच नष्ट झाली.
गाडीची लोखंडी चाके झिजली होती अणि ती खूप आवाज करत होती. विविध विभागात जाणारे सिमेंटचे रस्ते चौकामध्ये जिथे दोन स्लॅब जवळ येतात त्या टोकाशी खड्डे पडल्याने खराब झाले होते. अशा बाबींवर वेळेत खर्च केल्यास कमी त्रास झाला असता, परंतु आर्थिक बाबींवर मालकापुढे व्यवस्थापनाचे फारसे काही चालले नव्हते.
अपघाताची कारणमीमांसा
1. ढकलगाडी जिकडे हँडल लावले आहे तिकडून ओढायची नाही, तर ती ढकलायची आहे, एवढी साधी सूचना जरी वेळेत दिली गेली असती, तरी अपघात बऱ्याच प्रमाणात टाळता आला असता.
2. यंत्रांच्या देखभालीबरोबरच, ढकलगाडीसारख्या इतर साधनांची देखभालसुद्धा महत्त्वाची आहे, त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. गाडी स्वच्छ ठेवणे, नीट रंगविणे, त्यावरील सूचनांचे बोर्ड नीट लावणे इत्यादी बाबी पाळल्या गेल्या पाहिजेत. सामानवाहू गाड्यांवर ज्या ठिकाणी फिनिश झालेला यंत्रभाग बाहेरच्या भागाला स्पर्श करतो अशा सर्व जागी पॉलियुरेथिनचे अथवा इतर काही प्रकारचे पॅड लावल्यास वाहतूक करताना यंत्रभाग खराब होत नाहीत आणि त्यावर आपटल्याने आवाजदेखील होत नाही.
3. अशा सामानवाहू गाड्यांची चाके एकंदर लोड सांभाळत असतात. ही चाके पूर्वी लोखंडी असत, परंतु आता त्यांची जागा पॉलियुरेथिनच्या चाकांनी घेतली आहे. दणकट अणि आवाजरहित अशी ही नवी चाके खूप उपयुक्त अणि टिकाऊ असल्याने, अशी चाके जड सामानांच्या गाड्यांना लावायला पाहिजेत. याचबरोबर, चाकांच्या बेअरिंगची निवड आणि नंतरची देखभालदेखील महत्त्वाची आहे. त्यामुळे चाकांचे आयुर्मान वाढते.
4. कारखान्यामधील अंतर्गत रस्ते हादेखील साधनसामग्रीचा एक आवश्यक भाग आहे आणि त्यांची नीट देखभाल ठेवणे एकंदर सुरक्षेसाठी खूपच फायदेशीर ठरते.
5. ढकलगाडीचे डिझाइन अत्यंत सदोष आहे. तिचा आकार अरुंद आहे अणि गुरुत्वमध्य खूप वरच्या बाजूला आहे. अशा चुकीच्या डिझाइनची ढकलगाडी इतकी वर्षे वापरणे, कामगारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे अशा बाबी योग्य नाहीत. कमीतकमी खर्चात उत्पादन काढण्यासाठी केलेले असे उपाय शेवटी त्रासदायक ठरतात.
6. कारखान्यामधील कामगार, सुरक्षा अधिकारी, व्यवस्थापन (आणि वेगळा असल्यास मालकवर्ग) यांच्यामध्ये नियमित स्वरुपाचे चर्चासत्र असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामधून उद्योगासाठी पूरक अशा अनेक सूचना पुढे येऊ शकतात.
कारखान्याची भरभराट प्रत्येक घटकाच्या योगदानामधून होत असते. त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हे संपूर्ण व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे.
(लेखन साहाय्य : अच्युत मेढेकर)
उद्धव दहिवाळ यांना मेंटेनन्स आणि औद्योगिक सुरक्षितता या क्षेत्रातील सुमारे 35 वर्षांचा अनुभव आहे.
ते सध्या विविध कारखान्यांना सुरक्षितता सल्लागार सेवा पुरवितात.