संपादकीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    09-Jul-2021   
Total Views |
 
retytui;_1  H x
 
धातुकामचा हा 50 वा अंक आहे. जून 2017 पासून सुरू झालेले हे मासिक सातत्याने गेली 50 महिने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत. लघु मध्यम उद्योगातील शॉप फ्लोअरवर काम करणारी व्यक्ती डोळ्यापुढे ठेवून, प्रत्येक अंकाची जडणघडण कशी असावी याबद्दल काही धोरणे ठरवून मासिकाची सुरुवात केली होती. त्यावेळचा औद्योगिक माहोल, एकूण प्रगतीपथावर असलेला राष्ट्रीय GDP आणि त्याला पूरक असणारी सर्वच क्षेत्रातील अपेक्षित वाढ हे चित्र गेल्या दीड वर्षामध्ये बरेच बदललेले दिसते आहे.
 
 
उद्योग वाढवायचा असेल तर त्यासाठी अर्थातच बाजारात असलेल्या मागणीला पूरक ठरणारी संसाधने आपल्या कारखान्यात असणे गरजेचे असते. ती संसाधने घेण्याकरीता आवश्यक असलेले ज्ञान आणि माहिती या मासिकातून द्यावी या हेतूने आम्ही अंकामध्ये कायमच तशा मजकुराची आखणी करीत आलो आहोत. गेल्या दीड वर्षाचा महामारीचा फेरा आणि आता लघु मध्यम उदयोजकाशी झालेल्या संवादातून समजलेली सद्यस्थिती याचा विचार करता, ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती’ या काव्यपंक्तीची आठवण झाल्यावाचून रहात नाही. शब्दशः अशीच परिस्थिती आज बघायला मिळत आहे. वर्षानुवर्षे ज्या बाजारपेठेला पुरवठा करण्यासाठी उभा केलेला उद्योग त्या बाजारपेठेत तयार झालेल्या विपरीत परिस्थितीमुळे फारच कमी उपयोगाचा ठरतो आहे, अशी बऱ्याच जणांची परिस्थिती आहे. या बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना आपल्या उद्योगात ज्यांनी चटकन बदल केले किंवा नवीन बाजारपेठेशी जुळवून घेण्यास सुरू केले ते कारखाने नुसतेच तगले नाहीत तर वाढलेदेखील. काही उद्योजकांनी पारंपरिक ग्राहकांकडून कमी झालेली मागणी याकडे समस्या म्हणून न बघता नवीन ग्राहक शोधण्याची संधी म्हणून त्याकडे बघितले आणि आपला उद्योग डगमगू दिला नाही. काहीजणांनी स्वतःला निर्यातक्षम करण्यासाठी जी काही पूर्वतयारी लागते ती करून लॉकडाउनमुळे मिळालेला वेळ सत्कारणी लावला.
 
या काळात उदयोजकांशी बोलताना अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, ज्यांनी लव्हाळ्याप्रमाणे स्वतःला लवचीक ठेवले, त्यांच्याकडे कामाची कमी नाही अशी परिस्थिती आहे. बहुसंख्य उद्योगांनी, मग ते मोठे असोत किंवा छोटे असोत, बिकट परिस्थितीमध्येसुद्धा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना जास्तीतजास्त मदत कशी करता येईल हाच दृष्टिकोन समोर ठेवल्याचे आढळून आले. यामध्ये अर्थातच शिकून तयार झालेले कर्मचारी पुढे येणाऱ्या उत्पादन आणि दर्जासंबंधी मागण्यांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहेत, हा विचार असला तरी त्यातली माणुसकीची भावना नक्कीच कौतुकास्पद आहे. पुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याकरिता आवश्यक मोर्चेबांधणी करण्यामध्ये तांत्रिक बाबींविषयक माहिती आणि कौशल्य वाढविण्यासाठी धातुकाम मासिकातून प्रसिद्ध होणाऱ्या अभ्यासपूर्ण लेखांचा नक्कीच उपयोग होईल अशी आशा आहे.
 
 
धातुकामच्या या अंकामध्ये आम्ही आटे तयार करण्याच्या थ्रेडिंग प्रक्रियेविषयी तपशीलवार माहिती देणारा लेख प्रसिद्ध केला आहे. शॉपमध्ये नेहमी केल्या जाणाऱ्या या प्रक्रियेतील काही नवीन खुब्या वाचकांना नक्की आवडतील अशी खात्री आहे. त्याचबरोबर मोजमापनामधील नवीन तंत्रे आणि कटिंग टूलचे ‘स्मार्ट’ व्यवस्थापन कसे करावे याची तपशीलवार माहिती देणारे लेख या अंकात समाविष्ट केले आहेत. सी.एम.एम.चा प्रभावी उपयोग करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अल्गोरिदमविषयी सांगणारा लेखही प्रत्यक्ष कामात उपयुक्त माहिती देणारा ठरेल असा विश्वास आहे. गेल्या काही अंकांपासून सुरू केलेल्या नवीन लेखमालांमधून कारखान्यातील छोट्या पण महत्त्वाच्या सुधारणा, सुरक्षितता कशी वाढवायची याबद्दल तपशील माहिती देणाऱ्या लेखांबरोबरच उद्योगातील अर्थ नियोजन कसे करावे याचीही माहिती आम्ही मासिकामधून देत आहोत. आपल्याकडून याबद्दलचा प्रतिसाद आणि सुधारणा अथवा घडलेले किस्से आमच्यापर्यंत पोहोचवून आपला सहभाग अपेक्षित आहे.
 
दीपक देवधर
@@AUTHORINFO_V1@@