अर्धवट शिक्षणाचा परिणाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    02-Aug-2021   
Total Views |
sdsads_1  H x W
 
एकदा आमच्या कंपनीत स्टिअरिंग मेकॅनिझममधील एका भागावर केल्या जाणाऱ्या फॉर्म ग्राइंडिंग प्रक्रियेमध्ये समस्या निर्माण झाली. भागावरील फॉर्म स्पेसीफिकेशनप्रमाणे येत नव्हता. या ठिकाणी डायमंड ड्रेसरने ग्राइंडिंग व्हीलला ड्रेसिंग केले जात होते. मात्र, आयात केलेल्या या डायमंड ड्रेसरमध्ये दोष निर्माण झाला होता. मागील अनुभवावरून हा ड्रेसर आणखी 8 ते 10 महिने चालायला हवा होता. मग अचानक हा दोष कसा निर्माण झाला? दोनच महिन्यात हा कसा खराब झाला? सर्वसाधारणपणे ड्रेसरला दीर्घ आयुष्य असल्यामुळे अतिरिक्त ड्रेसरची साठवण केलेली नव्हती. त्यामुळे अॅसेम्ब्ली लाइनचे कार्य थांबले होते.
 
 
चौकशी केली असता असे लक्षात आले की, मशीनवर लावल्यानंतर ड्रेसर हबवर 'ट्रू' फिरत होता. त्यानुसार मशीन ऑपरेटरच्या अनुभवाप्रमाणे ड्रेसर चालायला हवा होता, पण तयार केलेला भाग फॉर्ममध्ये दोष दाखवित होता. दोष शोधण्यासाठी ड्रेसर मशीनवरून काढून तपासणीसाठी, तपासणी खोलीमध्ये आणण्यात आला.

sdsads_1  H x W 
 
चित्र क्र.1 डायमंड ड्रेसर
तपासणी दरम्यानची निरीक्षणे
• मशीनवर चालताना फेसवर 0.005 ते 0.008 मिमी. मध्ये रोलर ट्रू पाहिजे. यंत्रचालकाने त्याची खात्री केली होती.
• रोलरचा फॉर्म शाबूत होता, पण ड्रेस केलेला फॉर्म ठीक नव्हता. नवीन रोलर येण्यास अजून 4 महिन्यांचा अवधी होता. त्यामुळे काय करता येईल यावर विचार सुरू झाला.
• स्टील बॉडी अक्षावर अचूक फिरत होती, पण डायमंड रिंग 0.05 मिमी. ने आउट दिसली.
• स्टील बॉडी अक्षाभोवती अचूक ट्रू फिरते आहे याची खात्री ऑपरेटर करून घेत होता आणि असे गृहीत धरीत होता की, डायमंड रिंगही अचूक फिरते आहे. रिंगवरती चेकिंग केले जात नव्हते कारण त्याची गरजच पूर्वी उद्भविली नव्हती.
• साध्या स्टीलच्या दोन रिंग असलेले एक फिक्श्चर बनवून त्यात डायमंड रिंग सरळ करून 0.01 मिमी. मध्ये ट्रू केली गेली. त्यानंतर रोलर ड्रेसर चांगले काम करू लागला.
 
 
दोष येण्याची कारणे
मशीनच्या स्पिंडलवर ड्रेसर बसविणे (माउंटिंग) आणि काढण्यासाठी (डिसमाउंटिंग) पुलरचा वापर करावा, अशी ठरवून दिलेली प्रक्रिया होती. मात्र, सेटअप बदलताना जेव्हा हा ड्रेसर काढला गेला, तेव्हा चुकून हबऐवजी डायमंड ड्रिलिंग रिंगवर प्रहार केला गेला होता. मात्र घडलेला हा प्रकार कुणीच सांगण्यास पुढे आले नाही. दुसऱ्या पाळीत काम करणाऱ्या शिफ्ट सुपरवायझरच्या कपाटात पुलर असल्याने संबंधित पाळीतील ऑपरेटरला पुलर मिळाला नाही. पुलर उपलब्ध नसतानादेखील संबंधित पाळीतील ऑपरेटरने अतिआत्मविश्वासाने हातोड्याच्या साहाय्याने ड्रेसर काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे बाहेरील रिंग थोडीशी हलली आणि ही समस्या निर्माण झाली. यानंतर बाहेरील रिंग टूल रूममध्ये तयार केलेल्या प्रेस टूलने काळजीपूर्वक योग्य ठिकाणी पुन्हा बसवून उद्भवलेल्या समस्येचे निराकरण करण्यात आले. यानंतर मशीनचे कार्य अचूक सुरू झाले.
तात्पर्य : कोणतेही काम करताना त्यासाठी ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीचा वापर अचूकपणे होणे गरजेचे आहे. त्या कार्यपद्धती टाळून कुणीही काम करू नये, यामुळे संभाव्य अडचणी निर्माण होणार नाहीत.
 
 
सुरेंद्र दातार यांत्रिकी अभियंते असून, टाटा मोटर्समध्ये 34 वर्षे टूल इंजिनिअरिंग विभागात DGM पर्यंतच्या विविध पदांवर काम करून निवृत्त झाले आहेत.
9225631129
@@AUTHORINFO_V1@@