मागील अंकात आपण फायनल अकाउंट अर्थात बॅलन्स शीट व नफा आणि तोटा (प्रॉफिट अँड लॉस) अकाउंट या दोन पत्रकांबद्दल प्राथमिक स्वरूपाची माहिती घेतली. तसेच या दोन पत्रकांमध्ये ट्रायल बॅलन्सद्वारा लेजर अकाउंटमधून बॅलन्स ओढून घेताना कोणते निकष लावले जातात याविषयी थोडे जाणून घेतले. ट्रायल बॅलन्स या दोन पत्रकांमध्ये कसा विभागला जातो आणि विविध लेजर अकाउंट त्या पत्रकामधील कोणकोणत्या जागांवर स्थानापन्न होतात याबाबतची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
तक्ता क्र. 1 : नमुना बॅलन्स शीट
फायनल अकाउंटमधील अतिशय महत्त्वाच्या पत्रकांमध्ये असणाऱ्या विविध सदरांविषयीचे अधिक विवेचन लेखमालेच्या यानंतर येणाऱ्या भागांमध्ये असणार आहे. त्यामुळे प्रत्येक सदरासाठी एक संदर्भ क्रमांक एका कॉलममध्ये दिलेला आहे. याचा संदर्भ यानंतर येणाऱ्या संबंधित लेखांमध्ये असेल. त्यामुळे तेथे विशद केलेले मुद्दे सोदाहरण समजण्यास मदत होईल. तरी नमुना म्हणून घेतलेले हे पत्रक वाचकांनी जपून ठेवल्यास फायद्याचे ठरेल असे वाटते.
तक्ता क्र. 1 मध्ये दिलेल्या नमुन्याच्या आधारे फायनल अकाउंटबद्दल जाणून घेताना सुरुवातीला ताळेबंदामध्ये आलेल्या विविध संकल्पना आणि सदरांविषयी अधिक माहिती घेऊ. पूर्वी पाहिल्याप्रमाणे, धंद्याची कोणत्याही विशिष्ट तारखेची मालमत्ता आणि देणी यांची स्थिती कशी आहे हे आपण ताळेबंदामध्ये दाखवितो. सोप्या पद्धतीने समजण्यासाठी रोजच्या जीवनातील केंद्रीय अंदाजपत्रकाचे उदाहरण पाहू. वर्तमानपत्रांमध्ये केंद्रीय अंदाजपत्रकाविषयी ज्या बातम्या येतात त्यामध्ये बहुतेकवेळेला सरकारकडे जमा होणारा प्रत्येक रुपया कुठून कुठून जमा होणे अपेक्षित आहे आणि असा जमा झालेला रुपया वर्षभरात कशाकशावर खर्च करण्याचे सरकारचे नियोजन आहे हे 'पाय चार्ट' स्वरूपात एका चौकटीत दिलेले असते. या चौकटीवरून अंदाजपत्रकाबद्दल ढोबळ कल्पना वाचकाला येऊ शकते. ताळेबंदातसुद्धा संक्षिप्त स्वरूपात अशाच प्रकारे विशिष्ट दिवसाअखेरीस व्यवसायामध्ये देण्याच्या स्वरूपात किती पैसा जमा झाला होता आणि तो व्यवसायामध्ये कशाकशावर खर्च झाला होता, अर्थात त्या पैशांमधून कुठल्या मालमत्ता व्यवसायाला प्राप्त झाल्या होत्या याची माहिती मिळते.
ताळेबंद बनविताना ट्रायल बॅलन्समधील कुठली अकाउंट म्हणजे व्यवसायाच्या मालमत्ता आहेत आणि कुठली व्यवसायाची देणी आहेत याचा विचार प्रथम करावा लागतो. यासंदर्भात धातुकामच्या ऑगस्ट 2021 अंकामध्ये प्रकाशित झालेल्या लेखात आपण जाणून घेतले आहे. ट्रायल बॅलन्समध्ये असणाऱ्या प्रत्येक लेजर अकाउंटचा वर्ग आणि बॅलन्सची बाजू, यावरून ते अकाउंट ताळेबंदात येईल की नफा तोटा पत्रकात येईल हे ठरते. हे ठरवून झाले की, संबंधित पत्रकामध्ये विशिष्ट अकाउंट कोणत्या उभ्या भागात येईल हे ठरविता येते. प्रत्येक व्यवसायामध्ये कुठल्या वस्तू किंवा सेवांची विक्री होते या गोष्टीचा विचारही संबंधित अकाउंट व्यवसायाची मालमत्ता, देणे, उत्पन्न किंवा खर्च यापैकी कुठल्या प्रकारात असेल ते ठरते. तसेच संबंधित लेजर अकाउंटचा वर्ग काय असेल आणि टॅलीमधील त्या अकाउंटचा प्राथमिक गट काय असेल हे ठरवितानाही या गोष्टीचा विचार करावा लागतो. उदाहरण घ्यायचे झाले तर, वाहनांची खरेदी हे बहुतेक व्यवसायांसाठी रियल वर्गातील अकाउंट असते आणि त्या अकाउंटमधील डेबिट बॅलन्स व्यवसायाची मालमत्ता म्हणून ताळेबंदात दुसऱ्या उभ्या भागात दृश्य स्वरूपातील अचल मालमत्ता या सदराखाली वाहन म्हणून दाखविण्यात येते. टॅलीमधील त्या अकाउंटचा प्राथमिक गट फिक्स्ड् अॅसेट हा असतो, मात्र एखाद्या व्यवसायाचे बिझनेस मॉडेल जर वाहनांची खरेदी विक्री करण्याऱ्या डीलरचे असेल, तर विक्रीसाठी म्हणून केलेली वाहनांची खरेदी हे त्या धंद्यात नॉमिनल वर्गात मोडणारे अकाउंट असेल आणि त्यामधील डेबिट बॅलन्स, नफा तोटा पत्रकात विक्रीसाठीचा खर्च या सदराखाली दाखविण्यात येईल. टॅलीमधील त्या अकाउंटचा प्राथमिक गट हा खरेदीचा असेल. दुसऱ्या उदाहरणाद्वारे आपण अधिक समजून घेऊ. ट्रकची निर्मिती करणाऱ्या एखाद्या कंपनीमध्ये वर्षाखेरीस जे ट्रक शिल्लक राहिलेले असतील, ते ट्रक बनविण्यासाठी झालेल्या उत्पादन खर्चाची रक्कम त्या कंपनीच्या फायनल अकाउंटमध्ये चालू मालमत्ता या सदराखाली तयार मालाचा स्टॉक म्हणून ताळेबंदात दिसेल. तसेच टॅलीमधील त्या अकाउंटचा प्राथमिक गट करंट अॅसेट हाच राहील. मात्र, उत्पादन झालेल्या ट्रकपैकी एखादा ट्रक त्या कंपनीने आपल्या कारखान्यामध्ये मालाची ने-आण करण्यासाठी वापरायचा निर्णय घेतला, तर त्या ट्रकचा उत्पादन खर्च स्टॉक म्हणून चालू मालमत्ता या सदराखाली न दिसता अचल मालमत्ता म्हणून ताळेबंदात दिसेल. तसेच, टॅलीमधील त्या अकाउंटचा प्राथमिक गट फिक्स्ड् अॅसेट हा असेल.
या दोन उदाहरणांवरून लक्षात येईल की, लेजर अकाउंटचा वर्ग आणि त्याआधारे ते अकाउंट ताळेबंदात येईल की, नफा तोटा पत्रकात याबद्दलचा निकष तसेच टॅलीमधील त्या अकाउंटचा प्राथमिक गट या दोन्ही गोष्टी व्यवसाय काय स्वरूपाचा आहे यावरही अवलंबून असतात.
तक्ता क्र. 1 मधील ताळेबंदावर नजर टाकली असता लगेच काही प्रमुख गोष्टी लक्षात येतात. शीर्षकावरूनच चटकन लक्षात येणारी पहिली गोष्ट म्हणजे हा ताळेबंद अबक कंपनीच्या मालमत्ता आणि देणी यांची 31 मार्च 2021 या तारखेची स्थिती नक्त रुपयांमध्ये कशी होती हे सांगत आहे. दुसरे म्हणजे ताळेबंदाच्या पहिल्या उभ्या भागात सर्व देणी दाखविली आहेत, तर खालच्या दुसऱ्या उभ्या भागात सर्व मालमत्ता दाखविल्या आहेत. पर्सनल वर्गात येणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या अकाउंटमधील क्रेडिट बॅलन्स अर्थात त्यांना देय असलेल्या रकमा म्हणजे सर्वसाधारणपणे धंद्याची देणी असतात आणि ती ताळेबंदाच्या पहिल्या उभ्या भागात येतात. तसेच रियल वर्गात मोडणाऱ्या वस्तू आणि पर्सनल वर्गात येणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या अकाउंटमधील डेबिट बॅलन्स अर्थात त्यांच्याकडून येणे असलेल्या रकमा म्हणजे सर्वसाधारणपणे व्यवसायाच्या मालमत्ता असतात आणि त्या सर्व ताळेबंदाच्या दुसऱ्या उभ्या भागात येतात. तिसरी गोष्ट म्हणजे अबक कंपनीची 31 मार्च 2021 रोजीची एकूण देणी 25 लाख रुपयांची आहेत आणि त्याच रकमेच्या त्यादिवशी कंपनीकडे मालमत्ता आहेत. म्हणजेच देणी आणि मालमत्ता दोन्ही सारख्याच रकमेची आहेत. चौथी गोष्ट म्हणजे देणी आणि मालमत्ता या दोन्ही भागांमध्ये दाखविण्यात आलेल्या विविध लेजर अकाउंटची मांडणी त्यांचे गट बनवून विशिष्ट फॉरमॅटमध्ये केलेली आहे. ज्या सदराखाली आणि ज्या संकल्पनांच्या आधारे ही मांडणी केली गेली आहे त्याबद्दल आपण पुढील लेखात जाणून घेणार आहोत.
9822475611