संपादकीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    13-Sep-2021   
Total Views |

  Editorial

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, The only thing constant in the world is CHANGE. आपल्या सभोवतालचे जग फार भराभर बदलत आहे. विशेषतः कोविडनंतर तर याचा प्रत्यय अधिक प्रकर्षाने आला. रोजच्या व्यवहाराच्या पद्धतीमध्ये बदल झाले, शिक्षण व्यवस्थेत बदल झाला, उद्योग व्यवसायातील गरजा आणि निकष बदलले. यातून एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आणि ती म्हणजे बदल स्वीकारणे आणि त्याची अंमलबजावणी करणे अपरिहार्य आहे.

आत्ताच संपलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा आपण सगळ्यांनीच पाहिल्या आणि त्यातला थरार अनुभवला. एकूण 86 देशांना या स्पर्धेमध्ये किमान एकतरी पदक मिळाले. यात आर्थिकदृष्ट्या अतिशय खालच्या स्तरावर असलेल्या देशांपासून अत्यंत संपन्न देशांचा समावेश आहे. या 86 देशांत भारताचा क्रमांक 48 वा आहे. नेहमीप्रमाणे लोकसंख्येने जगात दुसरा क्रमांक आणि पहिल्या पाचातील आर्थिक व्यवस्था असलेल्या या देशात पदकविजेते का निर्माण होत नाहीत याविषयी खंत किंवा आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त म्हणजे 7 पदके मिळाल्याचा आनंद व्यक्त केला गेला. पदकविजेत्या देशांच्या यादीकडे जरा नीट बघितले तर पहिल्या दहा क्रमांकावर असलेले देश आकाराने, लोकसंख्येने कमी-जास्त असले तरी त्यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे हे सर्व देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश आहेत. जनतेचे राहणीमान उच्च दर्जाचे असलेले देश आहेत. त्यांच्याकडील उद्योग अत्याधुनिक आहेत आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून दर्जेदार उत्पादन करणारे आहेत. हाच विचार त्यांनी खेळामध्येही अंमलात आणल्यामुळेच त्यांची पदक संख्याही जास्त आहे. नवीन तंत्र, अथक मेहनत आणि योग्य प्रशिक्षणाच्या आधारे त्यांचे खेळाडू सर्वोच्च स्थान
मिळवू शकतात.

 

आपल्याकडील लघु मध्यम उद्योग क्षेत्राचा विचार करता शॉप फ्लोअरवर नवीन तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि वैयक्तिक प्रशिक्षण या 3 घटकांमध्ये गुंतवणूक करणे हाच टिकून राहण्याचा आणि पुढे जाण्याचा मार्ग आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. यापैकी नवीन तंत्रज्ञान आणणे हा बऱ्याचवेळा आर्थिक क्षमतेशी निगडित निर्णय असतो पण कार्यक्षमता आणि प्रशिक्षण हा कारखान्यातील संस्कृतीचा भाग आहे. कार्यक्षमता वाढविण्यासाठी ही प्रशिक्षणाची गरज असते. यामध्ये दरवेळी एखाद्या वर्गात बसून शिकणे म्हणजे प्रशिक्षण घेणे अभिप्रेत नसून सध्या उपलब्ध असलेल्या वेबसाइट, यू-ट्यूब तसेच तांत्रिक मासिके अशा माध्यमांचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे. काही कारखाने या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतात. विविध कार्यगटांच्या माध्यमातून कारखान्यातील समस्या सोडविण्यासाठी, प्रक्रिया सुधारणांसाठी तसेच एकूण कार्यक्षमता सुधारण्यासाठी नवीन पद्धती, नवीन तंत्रे समजून घेण्यासाठी आग्रही असतात.

कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तीला स्वत:ला प्रशिक्षित करून उन्नत करण्याची गरज ओळखूनच धातुकाम दर महिन्यात तंत्रविषयक माहिती देणारे लेख प्रसिद्ध करीत असते. यंत्रभागाच्या फॉर्म आणि प्रोफाइल यंत्रणाविषयी माहिती देणाऱ्या लेखांचा प्रामुख्याने या अंकामध्ये समावेश केलेला आहे. बहुविध काटेकोर पॅरामीटर असलेल्या यंत्रभागांच्या मोजमापनासाठी विकसित केलेल्या मशीनबद्दल माहिती देणाऱ्या लेखाबरोबरच यंत्रभागांच्या फॉर्म आणि प्रोफाइलच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या 3D CMM तंत्राची माहिती देणारा लेख आपण मोजमापन विभागात वाचू शकता. फॉर्म अथवा प्रोफाइलचे यंत्रण करण्यात विशिष्ट भूमितीच्या टूलचे तांत्रिक तपशील देणाऱ्या लेखांचा समाविश टूलिंग विभागात केला आहे. प्रोग्रॅमिंगची प्रक्रिया सुलभ करणारे मॅक्रो प्रोग्रॅमिंग तंत्र आणि त्याचा प्रत्यक्ष वापर केल्याचे उदाहरण या अंकात दिले असून ती माहिती वाचकांना उपयुक्त ठरेल. त्याबरोबरच सुरक्षितता, क्लुप्त्या आणि कारखान्यातील किस्से या नेहमीच्या लेखमालाही शॉप फ्लोअरवरील रोजच्या कामात आपल्याला उपयुक्त ठरत असतीलच असा विश्वास आहे.  

 

दीपक देवधर

[email protected]

@@AUTHORINFO_V1@@