मशीनवरील गार्डचे महत्त्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    09-Sep-2021   
Total Views |
प्रचलित कार्यसंस्कृतीमध्ये उत्पादनाचा अत्युच्च दर्जा, जास्तीतजास्त वेग आणि कमीतकमी किंमत या गोष्टींबरोबरच सुरक्षिततेलाही महत्त्व देणे गरजेचे बनले आहे. कारखान्यात प्रत्यक्ष घडलेल्या काही घटनांच्या आधारे या लेखमालेमध्ये कारखान्यातील सुरक्षिततेबाबत चर्चा केली आहे .
 

img00_1  H x W: 
 

शनिवार. कामावर जाताना मारुती मंदिरावरून जायचे म्हणजे थोडे लवकरच निघायला हवे, या विचाराने प्रभाकरने सकाळी जरा पटापट आटोपले आणि सायकलवर टांग मारली. देवळात गर्दी व्हायला लागली होती, त्याच्या आत दर्शन घेऊन तो वेळेत कंपनीत पोहचला. बाहेरच्या कँटीनमधे चहा पिऊन आणि कार्ड पंचिंग करून आपल्या सेक्शनमधे जाताना लांबूनच त्याला आपले बुलार्ड कंपनीचे उभे (व्हर्टिकल) लेथ मशीन दिसले. सुमारे सव्वापाच फूट व्यासाचे उभे टर्निंग टेबल असलेले हे निळे मशीन मोठे भव्य आणि आकर्षक दिसे. तीन वर्षांपूर्वी हे मशीन पहिल्यांदा आणले तेव्हापासूनच तो यावर काम करीत होता. पहिल्यांदा आपल्यालाच हे काम मिळाले हे आठवून तो नेहमी खूश होई.

 

img01_1  H x W: 
 

चित्र क्र. 1 : उभे लेथ मशीन

 

त्या विचारातच मशीनच्या जवळ जात त्याने आजची गोल आकाराच्या हाउसिंगची उंच उतरंड पाहिली. पहिल्या शिफ्टचे काम समोर तयार होते. डबा वगैरे ठेवून त्याने हातमोजे घातले आणि कामाला सुरुवात केली. भल्या मोठ्या उभ्या टर्निंग टेबलचे समोरचे गार्ड बाजूला काढून, त्याने जॉबला घट्ट धरून ठेवणारे चारही होल्डिंग क्लॅम्प योग्य जागी असल्याची खात्री करून घेतली. क्रेन खाली आणून आणि हुक अडकवून एक हाउसिंग त्याने उचलले आणि यंत्रण करावयाचा भाग वरती ठेवून काळजीपूर्वक ते सुमारे दोन फूट व्यासाचे हाउसिंग, होल्डिंग क्लॅम्पच्या मध्ये ठेवले. चारीही क्लॅम्प वापरून ते घट्ट बसल्याची खात्री केली. टेबलच्या सर्व बाजूचे गार्ड परत जागेवर बसविताना मात्र एका बाजूचा गार्ड त्याने खालीच ठेवला, काही अजून करावयाचे असावे बहुधा. टूल होल्डर आर्म आणि टूल व्यवस्थित आहे हे पाहिले आणि यंत्रण सुरू केले. 25 आर.पी.एम. ने गोल फिरणारे आडवे हाउसिंग आणि त्याच्या आतल्या बाजूने वरून स्लाइड होणारा टूल आर्म यायोगे आतल्या व्यासाचे अपेक्षित यंत्रण होत होते. हा जॉब आता पुढच्या साडेचार मिनिटांत पूर्ण होणार हे त्याला माहीती होते.

काही हाउसिंग झाल्यानंतर पुढच्या हाउसिंगचे यंत्रण होत असताना त्याच्या लक्षात आले, की यंत्रण करताना निघणारी बरची वेटोळी टूलभोवतीच अडकून फिरत आहेत. याचा परिणाम म्हणजे यंत्रण खराब होऊ शकते. त्याने एक लांब रॉड घेतला आणि गार्ड नसलेल्या भागातून तो आत घालून टूलच्या भोवतालची बर त्याने डाव्या हाताने बाजूला ढकलायचा प्रयत्न केला. हे करीत असतानाच त्याच्या हातातील मोजा फिरणाऱ्या होल्डिंग क्लॅम्पमध्ये अडकला. काही कळायच्या आत त्याचा डावा हात टूलच्या भोवती दाबला गेला आणि त्याची तीन बोटे तुटून पडली. त्याच्या किंकाळीने आजूबाजूचे कामगार धावत आले, त्यांनी मशीन बंद केले आणि प्रभाकरला सोडवून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

 

हा अपघात घडण्याची कारणे कोणती ?

 

1. टर्न टेबलवर होल्डिंग क्लँम्पच्यामध्ये हाउसिंग घट्ट बसविलेले असते. होल्डिंग क्लॅम्पचा काही भाग अर्थातच वरच्या बाजूस आलेला असतो. यंत्रण चालू असताना या फिरणाऱ्या भागांच्या मध्ये काहीही आल्यास गंभीर अपघात होऊ शकतो.

2. टर्न टेबलच्या समोरचा गार्ड दोन प्रकारची कामे करतो. एक म्हणजे यंत्रण करताना निघणारी बर बाहेर येत नाही. दुसरे म्हणजे कामगाराची सुरक्षा. गोल फिरणारे आडवे हाउसिंग आणि त्याच्या आतल्या बाजूने वरून स्लाइड होणारा टूल आर्म यामध्ये चुकून हात वगैरे जाऊ नये यासाठीच हा गार्ड दिलेला आहे. तो काढून यंत्रण करणे असुरक्षित असते.

3. प्रभाकर हातात रॉड घेउन टूलच्या भोवतालची बर ढकलत असताना, त्याचा हातमोजा टर्न टेबलवरील होल्डिंग क्लॅम्पमध्ये अडकला आणि तो स्वतः मशीनमध्ये ओढला गेला. सर्व गार्ड लावलेले असते तर गार्डवर आपटून त्याला कदाचित कमी इजा झाली असती, पण एक गार्ड जागेवर बसविलेला नसल्याने त्या अंदाजे दीड फूट उघड्या भागात प्रभाकरचा हात ओढला जाऊन टूलच्या संपर्कात आला आणि त्याची बोटे तुटली.

4. उपरनिर्देशित गार्ड बसविता त्याच स्थितीत यंत्रण करताना जॉब काही कारणाने निसटला, तर आजूबाजूच्या कामगारांना किंवा यंत्रसामग्रीला मोठी इजा होऊ शकते. इतक्या गंभीर स्वरूपाचे वर्तन या कामगाराने काही तास यंत्रण करून केले, यावरून त्याची अति आत्मविश्वास असण्याची वृत्ती स्पष्ट होते.

 

उपाय

 

1. विविध बाबतीतले सुरक्षा प्रशिक्षण कामगारांना दिले जाते. अशावेळी, प्रत्यक्ष कामे करताना असे कोणते भाग काढून आपण यंत्रण करतो, त्याची काय कारणे आहेत, अशा चर्चा वरचेवर व्हायला हव्यात. त्याने सर्वांचे समुपदेशन होते. सुरक्षा प्रशिक्षण शक्यतो बोली भाषेत दिले गेले तर ते जास्त प्रभावी ठरते.

2. शॉपमध्ये यंत्रण चालू असताना त्या त्या विभागाचे अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी यांनी उत्पादन आणि सुरक्षितता या दोन्ही बाबींकडे लक्ष देऊन खात्री करायला हवी. प्रत्यक्ष कार्यामध्ये नियंत्रण असण्यासाठी शॉपवर नियमित फेरी मारणे आवश्यक आहे.

3. असे प्रकार होऊ नयेत यासाठी, गार्ड काढून ठेवल्यास यंत्रण सुरू करता येऊ नये अशा पद्धतीचे 'बॅरियर स्विच' मशीनवर बसविता येतील काय याचाही विचार व्हावा.

 

(लेखन साहाय्य : अच्युत मेढेकर)

9822650043

उद्धव दहिवाळ यांना मेंटेनन्स आणि औद्योगिक सुरक्षितता या क्षेत्रातील सुमारे 35 वर्षांचा अनुभव आहे. ते सध्या विविध कारखान्यांना सुरक्षितता सल्लागार सेवा पुरवितात.
 
 
@@AUTHORINFO_V1@@