कोणत्याही सी.एन.सी. मशिनवर प्रोग्रॅमिंग करण्यापूर्वी त्यावर आपल्याला अपेक्षित कार्यवस्तू (जॉब) होणार की नाही, हे समजण्यासाठी मशिनच्या अक्षांवर टूलची कमाल आणि किमान हालचाल मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, सी.एन.सी. लेथ मशिनवर दंडगोलाकृती कार्यवस्तू करण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त व्यास आणि जास्तीत जास्त लांबी लक्षात घेऊन टूल पोस्टचे चारही संदर्भ बिंदू नक्की करावे लागतात. (चित्र क्र. 1)
चित्र क्र. 2 मध्ये टूलच्या हालचालीमुळे तयार होणारे अपेक्षित क्षेत्र (एरिया) आणि प्रत्यक्षात उपलब्ध क्षेत्र दाखविले आहे. तसेच चित्र क्र. 3 मध्ये चकमुळे तयार होणारे अपेक्षित क्षेत्र आणि प्रत्यक्षात उपलब्ध क्षेत्र दाखविले आहे.
सूचना - मशिनच्या भागांमुळे (चक, स्टेडी रेस्ट, क्रॉस स्लाईड) काम करण्यास उपलब्ध क्षेत्र कमी होते. या गोष्टींचा विचार प्रोग्रॅमिंग करत असताना न केल्यास टूलची हालचाल होताना, इतर भागांना धडक बसण्याची शक्यता असते.
काम करण्यास सुरक्षित भाग (सेफ्टी झोन वर्किंग एरिया)
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियंत्रकामध्ये (कंट्रोलर) ’सेफ्टी झोन वर्किंग एरिया’ हे वैशिष्ट्य (फीचर) ठेवण्यात आलेले असते. त्यांना बॅरिअर असे म्हणतात. टूलची चक आणि टेल स्टॉकला धडक होवू नये, असा यामागील हेतू असतो. यामध्ये जास्तीत जास्त तीन बॅरिअर घालता येतात. ‘टीच इन’ व ‘सेट-अप’ मोडमध्ये किंमती (व्हॅल्यू) घालता येतात. यावरून काम करण्यास सुरक्षित भाग ठरवता येतो. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे बॅरिअर कॉर्नर पॉईंट्स ठरविताना योग्य असेच टूल वापरले पाहिजे. तसेच चकपासून कॉर्नर पॉईंटचे अंतर योग्य असायला हवे. हे बॅरियर्स G फंक्शनचा वापर करून चालू/ बंद करता येतात. उदाहरणार्थ, चित्र क्र. 4 : चक बॅरिअर्स आणि चित्र क्र. 5 : टेलस्टॉक बॅरिअर्स दाखविले आहे.
धोका
बॅरिअर्स फक्त टूलच्या मोजलेल्या बिंदूनाच प्रतिसाद देतात. टूल होल्डरचे वाढलेले/बदललेले भाग विचारात घेतले जात नाहीत. त्यामुळे धडक होवू शकते.
इमर्जन्सी स्टॉप
क्रॉस स्लाईड कामाच्या ठरविलेल्या भागाच्या (दोन्ही दिशांनी) बाहेर जावू नये आणि बॉल स्क्रूच्या लिमिटच्या आत राहण्यासाठी मशिनवर मॅकॅनिकल इमर्जन्सी स्टॉप लिमिट स्विचेस बसवलेले असतात. हा स्विच दाबला गेल्यास मशिनवरील स्लाईडची हालचाल पूर्णपणे बंद पडते. मोटर्स बंद होतात. मॅन्युअल पल्स जनरेटरनेसुद्धा हालचाल करता येत नाही. अशा परिस्थितीत हाताने बॉल स्क्रू फिरवून बंद झालेला स्विच सोडवावा लागतो. (चित्र क्र. 6)
अक्ष व अक्षाच्या दिशा
1. सी.एन.सी. टर्निंग सेंटर अक्ष - X आणि सी.एन.सी. टर्निंग सेंटरमधील सरक दिशा (फीड) अक्ष - Z म्हणजे स्लाईडच्या हालचालीच्या दिशा असतात. X हा क्रॉस अक्ष असतो. X अक्षावरील किंमत व्यासावरून ठरते.
2. Z अक्ष - हा X अक्षाला काटकोनात आणि मशिन बेडला समांतर असतो.
अक्षाच्या दिशा (सी.एन.सी. टर्निंग सेंटर्स) (चित्र क्र. 7 व 8) वर्कपीस झिरो पॉईंट (W) वर्कपीस कोऑर्डिनेट सिस्टिम ठरवितो. त्याचा मेळ मशिन झिरो पॉईंटशी असतो. टूल पॉईंटची पोझिशन X आणि Z मोजमापे घेऊन ठरविली जाते.
सी.एन.सी टर्निंग सेंटर्ससाठी जास्त अक्ष
C अक्ष (चित्र क्र. 9,10) - C अक्षाचा वापर करून Z अक्षाभोवती कार्यवस्तू किती अंशात फिरणार याचे प्रोग्रॅमिंग करता येते, तसेच त्याचा स्वत:भोवती फिरण्याचा फीड ठरविता येतो.
R अक्ष चित्र क्र. 10 - R अक्षाचा उपयोग Z अक्षाला समांतर टेलस्टॉक प्रोग्रॅमिंगसाठी केला जातो.
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंग क्षेत्रामधील तज्ज्ञ असून ते याबाबत सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथ विषयावरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणक या विषयावर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून पुस्तके लिहिली आहेत.