रोटरी टेबल्स

30 Jul 2017 17:04:25
सी.एन.सी.च्या (संगणकीय संख्यात्मक नियंत्रण) तंत्रज्ञानाच्या वापराची सुरुवात झाल्यापासून ज्या उद्योगक्षेत्राची घोडदौड कोणी थांबवू शकत नव्हते आणि व्ही.एम.सी. (उभे यंत्रण केंद्र) आणि एच.एम.सी. (आडवे यंत्रण केंद्र) यांच्यामुळे ज्यात प्रगतीची परिसीमा गाठली गेली, त्या यंत्रण उद्योगात 3 अक्षीय मशिनच्या विकासाबाबतीत थोडा संथपणा आला असल्याचे वाटते. जरी 4 आणि 5 अक्षीय मशिन्स विकसित केली असली, तरी ती इतकी महाग आहेत की, ती 3 अक्षीय मशिन्सची जागा पूर्णपणे घेऊ शकतील असे वाटत नाही.

3 अक्षीय मशिन्सचे काही ठळक फायदे आहेत.
• त्याची रचना भक्कम असते.
• पाच अक्षीय मशिनपेक्षा ते बरेच स्वस्त असते.
• त्यावर काम करायला प्रशिक्षित ऑपरेटर्स सहजपणे मिळतात.
• आवश्यक टूल्स आणि कार्यवस्तू पकडण्याची साधने रास्त किंमतीत आणि सेवा आधारासहित (सर्व्हिस सपोर्ट) उपलब्ध असतात.

यामुळे धातुकाम उद्योगात 3 अक्षीय मशिन्स अतिशय लोकप्रिय आहेत, मात्र कोनीय यंत्रणाची (अँग्युलर मशिनिंग) सोय यात नाही, ही एक मोठी त्रुटी अजूनही यामध्ये आहे.

3 अक्षीय मशिन्स बहुपयोगी (फ्लेक्सिबल) म्हणजे बहुतेक सर्व कामांसाठी उपयुक्त ठरावीत, यासाठी रोटरी टेबल्स हा उत्तम उपाय आहे. रोटरी टेबल्सचे काही प्रातिनिधिक पर्याय पुढे सांगितले आहेत.

रोटरी टेबल्सचे उपलब्ध पर्याय
• 4 अक्षीय रोटरी टेबल्स (चित्र क्र. 1) - कार्यवस्तू टूलच्या योग्य संपर्कात आणण्यासाठी तिला योग्य जागी ठेवणे आणि तिला वेगळ्या अक्षात सतत हवी तशी फिरवणे.


fvcxcvcb_1  H x

• 4 आणि 5 अक्षीय कलणारी रोटरी टेबल्स (चित्र क्र. 2) - कार्यवस्तू टूलच्या योग्य संपर्कात आणण्यासाठी तिला मिश्र कोनामध्ये ठेवणे आणि तिला दोन वेगवेगळ्या अक्षात सतत हवी तशी फिरवणे.


fbgnfggb_1  H x

• एकाच वेळी अनेक यंत्रभागांचे यंत्रण करण्यासाठी मल्टि स्पिंडल रोटरी टेबल्स (चित्र क्र. 3)


fbcbbb_1  H x W

• अवजड आणि मोठ्या आकाराच्या यंत्रभागांसाठी मोठ्या आकाराची रोटरी टेबल्स (चित्र क्र. 4)


fghfggf_1  H x

हे पर्याय नेहमीच्या (स्टँडर्ड) संरचनेत उपलब्ध असतात. परंतु यंत्रणासाठीच्या आवश्यकतेनुसार त्यात बदल करता येतात. सध्याच्या 3 अक्षीय यंत्रण प्रणालीच्या तुलनेत रोटरी टेबल्सचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

1. कोनामध्ये इंडेक्सिंग आणि यंत्रण
तीन अक्षीय मशिनवर वेगवेगळ्या कोनांमधील यंत्रण करणे अवघड आणि वेळखाऊ असते. रोटरी टेबल्समुळे 3 अक्षीय मशिन बहुतेक सर्व प्रकारचे यंत्रण करू शकते. यंत्रभागाला योग्य जागी पकडणे व कोनामध्ये यंत्रण करणे यासाठी सी.एन.सी. रोटरी टेबल अथवा मल्टी स्पिंडल रोटरी टेबल हे आदर्श उपाय आहेत. ऑटोमोटिव्ह यंत्रभागांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी ’रोटरी प्रॉडक्शन सिस्टिम’ हा योग्य पर्याय आहे. यंत्रभागांच्या जलद आणि अचूक यंत्रणासाठी शून्य बॅकलॅश असणारे डायरेक्ट ड्राइव्ह रोटरी टेबल हा सर्वोत्कृष्ट उपाय आहे.

2. सेट-अप करण्याचा वेळ कमी करणे/ काढून टाकणे
एका स्टँडर्ड ऑटोमोटिव्ह यंत्रभागाच्या यंत्रण प्रक्रियेत जिथे सेट-अपमध्ये 2, 3 किंवा त्याहूनही अधिक बदल करावे लागत होते, त्याठिकाणी आता एकाच सेट-अपमध्ये काम होते. यामुळे सेट-अप करण्यात आणि फिक्श्चर्स बदलण्यात लागणारा वेळ कमी होतो किंवा अजिबात लागत नाही.

3. उत्पादनाला लागणारा वेळ कमी करणे
ऑटोमोबाईल यंत्रभागांच्या व्यवसायात उत्पादनाला लागणारा वेळ कमी करत राहणे हा निरंतर प्रयत्न असतो. रोटरी टेबल किंवा कलणारी रोटरी टेबल्स वापरल्याने फिक्श्चर्स बदलणे किंवा कार्यवस्तू एका पकड साधनातून दुसऱ्यामध्ये हस्तांतरित करणे, यात खर्च होणारा वेळ निघून जातो. त्यामुळे उत्पादनाला लागणारा प्रति यंत्रभाग वेळ आणि प्रति यंत्रभाग खर्च कमी होतो व अर्थातच नफा वाढतो.


dfbvcbb_1  H x

4. समर्पित अथवा बहुपर्यायी वर्कस्टेशन
सर्वसाधारण कारखान्यात धातू कर्तनाच्या विशिष्ट कामांसाठी ठराविक 3 अक्षीय मशिन्स राखून ठेवलेली असतात. यंत्रणातील सेट-अप करण्यास लागणारा वेळ वाचवणे आणि उत्पादनाचा प्रवाह संतुलित करणे, हा त्यामागील उद्देश असू शकतो. रोटरी टेबल्स असल्यावर प्रत्येक मशिन स्वतःच उत्पादनाची एक वाहिनी बनते. सेट-अप बदलण्याची गरज अतिशय कमी होते किंवा पूर्णपणे निघून जाते. त्यामुळे एका टप्प्यात यंत्रभागावरील सर्व काम पूर्ण करण्यासाठी 3 अक्षीय मशिन एक बहुपर्यायी अष्टपैलू वर्कस्टेशन होते.

5. तयार यंत्रभाग नापास होण्यात घट
जेव्हा कोणताही यंत्रभाग बनवताना त्याचे काही यंत्रण एका ठिकाणी करून, नंतर पुढील यंत्रणासाठी तो दुसऱ्या सेट-अपमध्ये नेला जातो, तेव्हा त्यात चुका होण्याची शक्यता काही प्रमाणात तरी वाढते. रोटरी टेबलच्या उपयोगाने सर्व यंत्रण एकाच सेट-अपमध्ये होते. त्यामुळे चुकांची शक्यता आणि पर्यायाने यंत्रभाग नापास होण्याचे प्रमाण कमी होते.

धातुकामाचे उद्योग जगत गुंतागुंतीची डिझाइन असणारी भूमिती आणि अचूक यंत्रण केलेले यंत्रभाग यांच्याकडे शीघ्र गतीने झेप घेत आहे. ग्राहक आता बिनचूक यंत्रण केलेले यंत्रभाग लवकरात लवकर मागू लागले आहेत. युकॅमच्या उत्तम रीतीने डिझाइन केलेल्या अभियांत्रिकी उपायांनी आपण आपल्या ग्राहकांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करू शकाल !

 
विनय जावळी 
विनय जावळी यांत्रिकी अभियंता असून त्यांनी मार्केटिंगमध्ये एम.बी.ए. केले आहे. मशीन टूल्स आणि अक्सेसरीजमधील विक्री आणि विपणनातील त्यांना 15 वर्षांचा अनुभव आहे. बंगळुरू येथील युकॅम कंपनीमध्ये विपणन विभागात ते कार्यरत आहेत.
vinayj@ucamind.com
Powered By Sangraha 9.0