कारखान्यात अनेकदा चालू मशिनमधील काही यंत्रभाग बिघडतात. बिघडलेले यंत्रभाग बदलताना ते योग्य आणि अचूक भागांनी बदलले गेले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम होऊन मशिनच्या यंत्रणात कायमस्वरुपी बिघाड होण्याची शक्यता असते. या लेखात आपण असेच उदाहरण पाहणार आहोत.
एका कंपनीमध्ये 1000 टन क्षमतेच्या प्रेसमध्ये 300 कि/सेमी२ दाबाऐवजी 150 कि/सेमी२ एवढाच दाब मिळत होता. त्यामुळे प्रेसची क्षमता 500 टनपर्यंत कमी झाली होती. अशी तक्रार कंपनीच्या देखभाल विभागाकडे नोंदविण्यात आली. देखभाल करणाऱ्या अभियंत्याने पंपाचा रिलीफ व्हॉल्व्ह वापरून दाब वाढविण्याचा प्रयत्न केला, पण तरीही दाब वाढत नव्हता. जेव्हा रॅमची हालचाल होत नसते तेव्हा रिलीफ व्हॉल्व्ह आणि डायरेक्शन व्हॉल्व्ह एकत्र काम करतात आणि पंपाच्या डिलिव्हरी भागातील तेल टाकीत सोडतात. यामुळे देखभाल विभागाच्या व्यवस्थापकाने रिलीफ व्हॉल्व्ह आणि डायरेक्शन व्हॉल्व्ह बदलण्याचा निर्णय घेतला. व्हॉल्व्ह विकत आणून बसविल्यावर पुन्हा योग्य दाब मिळू लागला. मात्र त्यानंतर तेलाचे तापमान वाढत असल्याचे लक्षात आले.
1) जास्त तापमानामुळे तेलाचा घट्टपणा (व्हिस्कॉसिटी) कमी होत होता.
2) जास्त तापमानामुळे बऱ्याच व्हॉल्व्हचे स्पूल तापून असमान प्रसरण पावत होते आणि हालचाल करताना अडकत होते. त्यामुळे प्रेस नीट चालत नव्हता. तो वारंवार बंद पडू लागला. अनेकवेळा प्रेस थांबवावा लागत होता आणि तेल थंड झाल्यानंतरच पुन्हा सुरू करावा लागत होता. या बिघाडामुळे प्रेसची उत्पादकता कमी झाली.
यावर अभ्यास करताना असे आढळून आले की, बऱ्याच दिवसांत प्रेसमधील तेल बदललेले नव्हते. त्यामुळे देखभाल विभागाच्या व्यवस्थापकाने तेल बदलण्याची सूचना केली. यासाठी 5000 लिटर तेलाची आवश्यकता होती. जुने तेल विकून येणारी किंमत वजा केली तरी, नवीन तेलासाठी 5 लाख रुपये खर्च आला. मात्र परिस्थितीत बदल झाला नाही. तेल बदलल्यानंतरसुद्धा तेलाचे तापमान वाढतच होते.
कारखान्यातील वातावरणाचे तापमान जास्त असल्यामुळे तेलाचे तापमान नैसर्गिकरीत्या कमी होत नसावे, असा विचार करून देखभाल व्यवस्थापकाने कारखान्यात योग्य उंचीवर हीट एक्स्चेंजर बसविला. त्याचे तेलाचे आणि कुलिंग टॉवरपासून पाण्याच्या पाईपचे पाईपिंग करण्यात आले. त्यासाठी 2 लाख रुपये खर्च आला. तरीही प्रेसमध्ये काहीच सुधारणा झाली नाही.
विविध प्रकारे प्रयत्न करूनही तेलाचे तापमान कमी होत नव्हते. या प्रयत्नांमध्ये प्रेसमधील बिघाड अधिकच गंभीर झाला. प्रेसमधील 75 किलोवॉटचा रेडियल पिस्टन पंप बिघडला. तो उघडल्यावर असे दिसून आले की, त्याचे पिस्टन झिजलेले होते आणि त्याचे इतर बरेच भाग खराब झाले होते. तो पंप दुरुस्तीसाठी उत्पादकाकडे पाठविण्यात आला. उत्पादकाने पंपाच्या दुरुस्तीसाठी काही भाग आयात करावे लागणार असल्यामुळे पंपाच्या दुरुस्तीला तीन महिने लागतील आणि 3 लाख रुपये खर्च येईल असे सांगितले.
दरम्यान पंप योग्य पद्धतीने दुरुस्त होऊन आल्यानंतर प्रेस परत सुरू करण्यापूर्वी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या क्षेत्रातील एका जाणकार सल्लागाराचा सल्ला घेतला. त्याने या बिघाडाची संपूर्ण माहिती घेतली. प्रेसचे बारकाईने निरीक्षण करून काही मुद्दे मांडले.
1) हायड्रॉलिक प्रेस एकदा सुरू केला की, उत्पादन थांबेपर्यंत त्याचा मुख्य पंप सुरूच राहतो. येथे पुढील सूत्र कार्यान्वित असते.
2) जोपर्यंत रॅम हालत असतो, तोपर्यंत ही ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित केली जाते.
3) उत्पादन सुरू असताना, कार्यवस्तू प्रेसवर तपासणी सुरू असताना, डायला वंगण लावताना आणि इतर काही वेळी रॅ थांबविलेला असतो. त्यावेळी डायरेक्शन व्हॉल्व्ह न्युट्रल अवस्थेत असतो आणि तेल परत टाकीत जात असते.
4) हा तेलाचा प्रवाह कोणत्याही दाबाशिवाय असतो. दाब शून्य असल्यामुळे ऊर्जाही शून्य असते.
5) चित्र क्र. 2 मधील हायड्रॉलिक सर्किट पाहिले, तर आधीच्या आणि नंतरच्या डायरेक्शन व्हॉल्व्हमधील फरक दिसून येईल. मूळचा डायरेक्शन व्हॉल्व्ह, प्रेस थांबला असताना तेल टाकीत पोहोचवत होता, तर नंतर बसविलेला डायरेक्शन व्हॉल्व्ह त्या तेलाचा प्रवाह थांबवत होता. त्यामुळे पंप रिलीफ व्हॉल्व्हच्या दाबाच्या विरुद्ध तेल पाठवत होता.
6) ही हायड्रॉलिक ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित न झाल्यामुळे औष्णिक ऊर्जेत रूपांतरित होत होती. त्यामुळे तेलाचे तापमान वाढत होते. वरील निरीक्षणांची नोंद झाल्यानंतर योग्य व्हॉल्व्ह बसविण्यात आला आणि प्रेस व्यवस्थित काम करू लागला.
देखभाल विभागाने बिघाडाच्या मूळ कारणाचे योग्य निदान केले होते, पण खराब भाग बदलून तो मूळ भागासारखाच न बसविल्यामुळे तेलाचे तापमान वाढण्याचा नवीन प्रश्न सुरू झाला. यामध्ये विनाकारण खर्च वाढत गेला, वेळेचा अपव्यय झाला, उत्पादन थांबले आणि मानसिक ताणही सहन करावा लागला. यामुळे मशिनमधील बिघाडांची उकल करताना आपण वरील सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक ठरते.
anilgupte64@rediffmail.com
अनिल गुप्ते इलेक्ट्रिकल अभियंते असून, त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील 53 वर्षांचा अनुभव आहे. टाटा मोटर्समधील मेंटेनन्स आणि प्रोजेक्टस् संबंधित प्लांट इंजिनिअरिंगमधील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून, सध्या ते तांत्रिक सल्लागार म्हणून काम करतात.