धातुकाम कल्पक सुधारणा स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या उद्यमबाग, बेळगाव येथील ’बेलगम ॲक्वा व्हॉल्व्ह प्रा. लि.’ कंपनीतील ही सुधारणा. 6 व्होल्ट लिथियम बॅटरीचा पर्याय वापरून कारखान्यातील मशिन किफायतशीर पद्धतीने कसे वापरण्यात आले याबाबतची ही सुधारणा.
आमच्या कारखान्यात सी.एन.सी., व्ही.एम.सी., व्ही.टी.एल. मशिन आहेत. त्यापैकी फानुक मशिनमध्ये 6 व्होल्ट बॅटरी ड्राईव्ह असतो. दरवेळेस सी.एन.सी. मशिनमधून धोक्याचा संदेश (अलार्म) मिळाला की, ही बॅटरी बदलावी लागते. हा धोक्याचा संदेश मिळाला की, ड्राईव्ह बॅटरीच्या कमी क्षमतेमुळे फानुक व्ही.टी.एल. मशिन सुरू करता येत नाही, ते चालविता येत नाही. थोडक्यात बॅटरी वापरा आणि फेकून द्या (युज अँड थ्रो) असा वापर होतो. साधारणपणे या बॅटरीची किंमत 1700 रुपये असते. त्यामुळे हा खर्च टाळण्यासाठी आम्ही पुढील सुधारणा केली.
ही सुधारणा करताना आम्ही कारखान्यात सध्याच्या बॅटरीच्या जागी तशीच नवीन बॅटरी बसवली, कारण ड्राईव्ह बॅटरी क्षमता कमी झाल्यामुळे अकार्यक्षम झाली होती. बॅटरीचे प्रमुख काम आणि महत्त्व याचा अभ्यास (व्होल्टेज, ॲम्पीअर्स) केला आणि त्यानुसार नवी 6 व्होल्टची बॅटरी निवडली. पुढील गोष्टी वापरून आम्ही एक उपकरण तयार केले.
1. ड्युरासेल - 4 नग.
2. 6 व्होल्ट बॅटरी होल्डर - 1 नग.
3. होल्डर कनेक्टर कॅप - 1 नग.
सुधारणेतील टप्पे
टप्पा 1 - कनेक्टरमधील बॅटरीची जुनी वायर कापली.
टप्पा 2 - बॅटरी सेल कनेक्टरमध्ये लावली आणि कॅप बसविली.(चित्र क्र. 1)
टप्पा 3 - कॅपची वायर आणि बॅटरीची जुनी वायर जोडून वरून विद्युत प्रतिबंधक टेप लावली. वायर जोडताना रंगाप्रमाणे धन /ऋण (पॉझिटिव्ह/निगेटिव्ह ) भाराच्या (पोलॅरिटी) वायर जोडली.
टप्पा 4 - मशिनवरील योग्य ठिकाणी एक टोक जोडले. (चित्र क्र. 2)
फायदे
1. ही सुधारणा केल्यामुळे सुमारे 80% पेक्षा अधिक आर्थिक बचत झाली.
2. ही सहज उपलब्ध होणारी सोपी पद्धत आहे.
3. रिचार्जेबल बॅटरी सेलसुद्धा वापरता येतात.
4. बॅटरी बदलून सहा महिने झाले तरी अजून मशिन व्यवस्थित सुरू आहे.
harish.nandikol@gmail.com
हरीश नंदीकोळ हे यांत्रिकी अभियंते आहेत. त्यांनी टूल आणि डाय मेकिंगमध्ये यांत्रिकी शिक्षण घेतले आहे. त्यांना या क्षेत्रातील कामाचा 4 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ’अशोक आयर्न वर्कस्’ कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करतात.