अभियांत्रिकी ड्रॉईंग युक्त्या : 7

05 Aug 2018 17:35:56

Engineering Drawing Tips: 7
 
या पूर्वीच्या लेखामध्ये आपण टीप (नोट) किंवा ड्रॉईंगमध्ये वेळोवेळी वापरत असलेले शब्द किंवा वाक्य या संदर्भातील युक्त्या अगदी बारकाईने अभ्यासल्या. ज्यासाठी आपण या कमांड वापरण्यापूर्वी खूप किचकट कृती करून अंमलात आणत होतो, उदाहरणार्थ, ड्रॉईंगमध्ये टीप देत असताना ती चुकून बाद (डिलीट) होऊ नये यासाठी विशेषत्वाने काळजी घेण्याकरिता 'Text to MText (text to multi-line text)' ही कमांड सोदाहरण सिद्ध केली. एखाद्या शब्दाला ठळकपणे दर्शविण्यासाठी त्या शब्दाभोवती विशिष्ट आकार कसा निश्चित करावा हे ‘TCIRCLE’ या कमांडमुळे सोपे केले. शब्दाला विशिष्ट संदर्भ देऊन त्या विशिष्ट कोनात फिरविण्यासाठीची ‘TORIENT’ ही कमांड पाहिली. या सर्व क्लृप्त्यांमुळे ड्रॉईंगमध्ये ड्रॉईंगव्यतिरिक्त करावा लागणारा खटाटोप आपण नियंत्रणात तर आणलाच परंतू तो अगदी सहज आणि सोपा केला.
 
या लेखात आपण अशाच काही वारंवार वापरणाऱ्या कमांड पाहणार आहोत. एखाद्या विषयामध्ये अद्ययावतता आणली की, त्याची नवीन आवृत्ती तयार होते. अशाच काहीशा गोष्टी आपण वापरत असलेल्या कमांडबद्दलही होत असतात. एखाद्या कमांडशी संलग्न काही विशिष्ट गरजा लक्षात घेऊन त्या गरजा त्या कमांडमध्येच सामावून घेतल्यामुळे त्यांच्या परिणामकतेमध्ये कमालीची व्यापकता येते आणि म्हणूनच त्या आधुनिक झाल्या आहेत असे आपण म्हणू शकतो. त्यापैकीच एका कमांडचा आपण अभ्यास करू.
 
SUPERHATCH
 
‘HATCH’ कमांड आपल्याला सर्वाना माहिती असलेली कमांड आहे, परंतु वर उल्लेख केल्याप्रमाणे याच कमांडमध्ये काही विशिष्ट बदल केले असता त्याची परिणामकता वाढून त्याचा आपल्याला रोजच्या ड्रॉईंगमध्ये खूप उपयोग होताना पहायला मिळतो.
 
‘HATCH’ या कमांडने आपण एखाद्या कार्यवस्तूमधील काही भाग हा ठळकपणे निर्देशित करू शकतो, परंतु त्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे लागू करावी लागतात. जसे की, ‘HATCH’ चा प्रकार, उपप्रकार, प्रमाण (स्केल) इत्यादी. परंतु काही ठिकाणी उदाहरणार्थ, ‘जनरल ॲरेंजमेंट (GA) ड्रॉईंगमध्ये’ तसेच प्लँट लेआऊटसारख्या ड्रॉईंगमध्ये निरनिराळी चित्रे तसेच एखादी विशिष्ट माहिती दर्शविणारे फलक इत्यादी प्रकारच्या गोष्टींचा अंतर्भाव भरपूर प्रमाणात असतो. त्यायोगे त्या दर्शविलेल्या गोष्टींचे तात्काळ आकलन होण्यास मदत होते. त्यावेळी ‘SUPERHATCH’ ही कमांड वापरल्याने आपण ही विशिष्ट गरज पुरवू शकतो. या दोन्हीतील फरक स्पष्ट होण्यासाठी चित्र क्र. 1 आणि चित्र क्र. 2 पहा.
A picture of a 'General Arrangement (GA) drawing' drawn in the usual manner 

Pictures of 'General Arrangement (GA) Drawing' drawn using SUPERHATCH 
 
चित्र क्र. 2 मध्ये दर्शविल्याप्रमाणे, त्या विषयाशी संबंधित चित्रे, प्रमाणित चिन्हे यांची छायाचित्रे आपण SUPERHATCH या कमांडने दर्शवू शकतो.
 
SUPERHATCH कमांड कशी वापरावी
 
• Express tools मधून SUPERHATCH कमांड निवडावी, अथवा कमांड लाईनमध्ये ती टाईप करावी.
• अपेक्षित असलेले छायाचित्र किंवा चिन्ह किंवा यापूर्वी तयार केलेला BLOCK सुद्धा यासाठी ग्राह्य धरता येईल.
• नेहमीप्रमाणे आपण जशी HATCH कमांड वापरतो, त्याचप्रमाणे त्याचे बाधित क्षेत्र निश्चित करावे, तसेच त्याचे प्रमाण निश्चित करावे.
• या टप्प्यांनी आपल्याला हवे असलेले छायाचित्र आपण संबंधित ड्रॉईंगमध्ये अंतर्भूत करू शकतो.
 
आधी उपलब्ध असलेल्या कमांडला आधुनिक स्वरूप दिले असता, त्या कमांडची सुधारीत आवृत्ती तयार होऊन त्याचा ड्रॉईंगकर्त्याला निश्चितच फायदा होतो.
 
SUPERHATCH कमांड मुळे होणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे
 
• कमांडमध्ये आमूलाग्र बदल नसल्यामुळे ती देण्याची पद्धतही फारशी बदलत नाही. त्यामुळे ही कमांड वापरण्यासाठी अगदी सोपी जाते.
• छायाचित्र दर्शवून काढलेले ड्रॉईंग निश्चितच समजण्यास सोपे जाते, कारण अक्षरांपेक्षा चित्रे नेहमी परिणामकारक ठरतात.
• छायाचित्रे, चिन्हे किंवा आपण आधीच तयार करून ठेवलेले BLOCKS यासाठी वापरता येत असल्यामुळे याची व्यापकता वाढते.
• परिणामी वेळेची बचत होते.
• ड्रॉईंगचा नेमका परिणाम साध्य होतो.
 
अशाच प्रकारच्या इतर काही आधुनिक कमांड आपण पुढील लेखात पाहणार आहोत, ज्यामुळे आपला वेळ तर वाचेलच शिवाय नेमकी परिणामकताही साध्य करता येईल.
 
iamitghole@gmail.com
अमित घोले यांत्रिकी अभियंते असून त्यांनी अ‍ॅटलास कॉपको, इमर्सन इनोव्हेशन सेंटर, थायसन क्रूप अशा मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये डिझाईन विभागात अनेक वर्षे काम केल्यानंतर ’इमॅजिका टेक्नोसॉफ्ट’ या इंजिनिअरिंग डिझाईन सोल्युशन आणि कॉर्पोरेट प्रशिक्षण देणाऱ्या कन्सल्टन्सीची स्थापना केली आहे.
 
Powered By Sangraha 9.0