व्हर्टिकल मिलिंग मशिनमधील बिघाड

01 Sep 2018 15:43:25
एका कंपनीने 12 वर्षांपूर्वी सिंगल कॉलम सी.एन.सी. व्हर्टिकल मिलिंग मशिन बसविले होते. ते उत्तम प्रकारे चालत होते आणि त्याच्यावर दर्जेदार उत्पादन होत होते. त्या मशिनमध्ये कॅरेजची वरच्या दिशेने हालचाल नीट न होण्याचा बिघाड झाला. ड्राईव्ह मोटरवर जास्त भार (लोड) येऊन ती ट्रिप होत होती.

Vertical milling machine
 
या मासिकाच्या जून 2018 च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखात दिलेल्या सूचनांप्रमाणे देखभाल विभागाच्या कर्मचार्‍यांनी मशिनची तपासणी केली. त्यांनी पॉवर सप्लाय कार्ड, ड्राईव्ह, सर्व्हो मोटर, लिनिअर स्केल, टॅको या भागांची तपासणी केली. तसेच यांत्रिक भागांपैकी वंगण व्यवस्था, वेज, बॉल स्क्रू, बॉल नट आणि त्यांची जोडणी यांचीही तपासणी केली. त्यात त्यांना काहीही बिघाड सापडला नाही. मात्र उभ्या (व्हर्टिकल) स्लाईडवर काही चरे (स्क्रॅच) आढळून आले, तसेच स्लाईडची काहीशी झीज झालेली दिसून आली. हे मशिन 12 वर्षे वापरलेले असल्यामुळे देखभाल कर्मचार्‍यांनी मशिनचे रीकंडिशनिंग तातडीने करण्याची गरज आहे असे अनुमान काढले आणि त्यांनी व्यवस्थापनाला त्याप्रमाणे सूचना केली.
 
व्यवस्थापनाने व्हर्टिकल स्लाईडचे ग्रार्ईंडिंग, स्क्रेपिंग, कॅरेज स्लाईडशी त्याचे मॅचिंग (रनिंग फिट टॉलरन्समध्ये) आणि बॉल स्क्रू, बॉल नट बदलणे या कामांना मान्यता दिली. रीकंडिशनिंग करणाऱ्या संस्थेने या कामांची किंमत दहा लाख रुपये सांगितली, तसेच या कामाला सहा आठवडे अवधी लागेल असेही सांगितले. त्यामुळे व्यवस्थापनाने या क्षेत्रातील अनुभवी सल्लागाराचे मत मागवले.
 
सल्लागाराने आधी मशिनची तपासणी केली आणि देखभाल करणाऱ्या कर्मचार्‍यांबरोबर चर्चा केली. त्या कर्मचार्‍यांनी बिघाडाचे कारण शोधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली, मात्र त्याचवेळी असे निदर्शनास आणून दिले की, त्यांच्याकडून व्हर्टिकल कॅरेजच्या काउंटर बॅलन्स वजन व्यवस्थेची तपासणी करण्याचे राहून गेले आहे. व्हर्टिकल मोटरवरील भार कमी करण्यासाठी काउंटर बॅलन्स वजन बसविलेले असते. मशिनमध्ये काउंटर बॅलन्स देण्यासाठी पुढील वेगवेगळ्या पद्धती वापरलेल्या असतात.
• लोखंडी वजन
• हायड्रॉलिक पिस्टन सिलिंडर
• न्युमॅटिक पिस्टन सिलिंडर
 
या मशिनमध्ये व्हर्टिकल कॅरेजला एक साखळी जोडलेली होती. ती एका स्प्रॉकेटवरून जात होती आणि तिच्या दुसऱ्या बाजूला एक वजन जोडलेले होते, जे कॉलमच्या पोकळीमध्ये वरखाली होत होते. (चित्र क्र. 2) सल्लागाराला देखभाल अभियंत्याने सांगितले की, त्यांना काउंटर बॅलन्स साखळी कधीही ढिली झालेली दिसली नव्हती किंवा कॉलमच्या वरच्या बाजूला बसविलेल्या सॉकेटमधून आवाज ऐकू आला नव्हता. त्यामुळे काउंटर बॅलन्स व्यवस्थेत काही बिघाड झालेला नसेल असे त्यांचे मत होते. तरीदेखील सल्लागाराने स्प्रॉकेट बेअरिंग आणि संपूर्ण साखळी तपासण्याचे ठरविले. त्यासाठी कॅरेजला आधार देऊन साखळी मोकळी करून त्या कॉलममधून साखळीसकट वजन बाहेर काढण्यास सांगितले.
 
Counter balance arrangement
 
काउंटर बॅलन्स वजन क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. वजन आणि साखळी यांना जोडणाऱ्या पिनवरील सरक्लिप तुटल्यामुळे ती पिन बाहेर निघून आल्याचे दिसले. ही पिन कॉलमच्या आतल्या बाजूला घासत होती आणि वजने वरखाली होण्याच्या हालचालीला अडथळा आणत होती. त्यामुळे कॅरेजच्या हालचालीला अडथळा येत होता.
 
नवीन पिन बनविण्यात आली आणि सरक्लिपसाठी योग्य खोलीची खाच त्या पिनवर बनविली. त्या पिनवरील खाचेत सरक्लिप बसवून सगळी यंत्रणा परत जोडण्यात आली. मशिन पुन्हा सुरू केले तेव्हा सुरळीत चालू लागले. रीकंडिशनिंगची कोणतीही गरज भासली नाही.
 
anilgupte64@rediffmail.com
अनिल गुप्ते इलेक्ट्रिकल अभियंते असून, त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील 53 वर्षांचा अनुभव आहे. टाटा मोटर्समधील मेंटेनन्स आणि प्रोजेक्टस् संबंधित प्लांट इंजिनिअरिंगमधील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून, सध्या ते तांत्रिक सल्लागार म्हणून काम करतात.
 
Powered By Sangraha 9.0