सी.एन.सी. मशिनवर कार्यवस्तूचे टोकदार कोपरे (शार्प कॉर्नर) यंत्रण करण्यासाठी नुसता प्रोग्रॅम केला आणि तो रन केल्यास टोकदार कोपरे मिळत नाहीत. चित्र क्र. 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याला टोकदार कोपऱ्यांसाठी टूल पाथ प्रोग्रॅम A-B-C असा करावा लागेल, म्हणजे टूल प्रथम A पासून B पर्यंत जाईल आणि त्यानंतर ते B पासून C पर्यंत जाईल. परंतु, प्रत्यक्षात मशिनमध्ये निर्माण होणाऱ्या हालचालींमुळे अक्ष लगेच थांबत नाहीत, तर हळू हळू थांबतात. चित्र क्र. 1 मध्ये Y अक्ष पूर्ण थांबण्यापूर्वीच X अक्षाची गती चालू होते. त्यामुळे कार्यवस्तूवर ज्या ठिकाणी आपल्याला टोकदार कोपरे हवे आहेत त्याठिकाणी वर्तुळाकार आकार तयार होतो.
टोकदार कोपरे आणण्यासाठी G09 या कमांडचा वापर करता येतो. पुढील प्रोग्रॅम कमांड पहा.
G91 G01 X 100 Y 100
ही लाइन कार्यान्वित होत असताना, कार्यवस्तूवर टोकदार कोपरे मिळणार नाहीत. कारण Y मोटर थांबण्यापूर्वी X मोटर चालू होते. आता पुढील लाइन पहा. ज्यामध्ये G09 चा वापर केला आहे.
G91 G09 X 100 Y 100
G09 ही कमांड पहिल्या Y मोटरला पूर्णपणे थांबण्यास भाग पाडते. त्यानंतर X मोटर चालू होते. असे केल्याने हवा असलेला टोकदार कोपरा मिळतो.
सूचना - G09 च्या वापरामुळे आवर्तन काळ वाढतो.
G09 ज्या ब्लॉकमध्ये प्रोग्रॅम केले असेल त्या ब्लॉकपुरतेच कार्यान्वित (ॲक्टिव्ह) राहते.
ज्या ठिकाणी टोकदार कोपरे हवे आहेत, अशा ठिकाणी G09 चा वापर अतिशय फायदेशीर ठरतो. (चित्र क्र. 2 )
प्रोग्रॅम फॉर्मॅट
G09 X/U.. Z/W-D/R.FESB..M.
G10 कोड फानुक
सी.एन.सी. मशिन प्रोग्रॅमेबल ऑफसेट सेटिंग
बहुतेक सर्व सी.एन.सी नियंत्रकामध्ये टूल ऑफसेट सेटिंग आणि झीरो ऑफसेट सेटिंग (वर्क शिफ्ट व्हॅल्यू, शिफ्ट व्हॅल्यू, मशिन झीरो ऑफसेट व्हॅल्यू इत्यादी) स्वतंत्र पानावर दिलेल्या असतात. सी.एन.सी. प्रोग्रॅममधून प्रोग्रॅमर व्हॅल्यू टाकू शकतो. परंतु, फानुक नियंत्रकामध्ये G10 नावाचे स्वतंत्र G कोड या कामासाठी दिलेले असते. यालाच प्रोग्रॅमेबल ऑफसेट सेटिंग असे म्हणतात.
सी.एन.सी. लेथ/मिलिंग मशिनवर दोन प्रकारांनी ऑफसेट सेटिंग करता येते.
1. टूल/कटर ऑफसेट सेटिंग
2. वर्क शिफ्ट सेटिंग
G10 चा वापर करून या दोन्ही प्रकारचे काम करता येते. फानुकमध्ये P00 - म्हणजे आपल्याला वर्क शिफ्ट व्हॅल्यू सेट करायच्या आहेत. हे नियंत्रकाला समजते. X अक्षाची व्हॅल्यू सर्वसामान्यपणे शून्य निश्चित (सेट) केली जाते, तर Z अक्ष व्हॅल्यू म्हणजे मशिन झीरो पॉइंटपासून कार्यवस्तू झीरो पॉइंटपर्यंतचे अंतर. या अंतरालाच वर्कशिफ्ट किंवा झीरो ऑफसेट असे म्हणतात.
प्रोग्रॅम
N10 G10 P00 X0 Z 200
या लाइनमध्ये अक्षाची व्हॅल्यू झीरो आहे आणि अक्षाची व्हॅल्यू मशिन झीरो पॉइंटपासून 200 मिमी. आहे.
G10 वापरून टूल वेअर
प्रोग्रॅम
N10 G10 P1 U0.02 W0.02
यामध्ये P च्या पुढे येणारा आकडा, ज्या टूलला बदल करायचे आहेत ते टूल. या G10 कोडमुळे दिलेली व्हॅल्यू, टूल वेअर ऑफसेटमध्ये टाकली जाते.
P1 : वर्कशिफ्ट व्हॅल्यू टूल नंबर 1 ला बदलायच्या आहेत. व्हॅल्यू U आणि W ॲड्रेस खाली दिल्या आहेत.
टूल ऑफसेट सेटिंग किंवा टूल भूमिती ऑफसेटिंग फानुकमधील G10 वापरून
G10 मधून टूल ऑफसेट सेटिंग करता येते. समजा टूल नंबर 8 चे टूल ऑफसेट सेटिंग करायचे आहे, तर 10,000 मध्ये 8 मिळवायचे म्हणजे (10,000 + 8 = 10,008)
प्रोग्रॅम
N10 G10 P10,008 X 95 Z54
(10,000 ही व्हॅल्यू फानुक नियंत्रकाने ठरवून दिलेली आहे. P10,000 म्हणजे टूल भूमिती ऑफसेटिंग/टूल ऑफसेट सेटिंगमध्ये व्हॅल्यू टाकायच्या आहेत. यापुढे येणारा आकडा ज्या टूलसंबंधी या व्हॅल्यू टाकायच्या आहेत, त्या टूलचा नंबर असतो.)
G15/G16 पोलर कोऑर्डिनेट कमांड
G15 आणि G16 समजावून घेण्यापूर्वी पोलर आणि कार्टेशिअन कोऑर्डिनेट म्हणजे काय हे समजावून घेऊया.
आतापर्यंत आपण फक्त कार्टेशिअन कोऑर्डिनेटवर काम केलेले आहे. त्यामध्ये X, Y, Z अक्ष पुढे दिलेली अंतरे पार्ट झीरो (ॲबसोल्युट कोऑर्डिनेट) किंवा सध्याची पोझिशन यापासून दिलेली असतात. बहुतेक G कोड प्रोग्रॅमिंग कार्टेशिअन कोऑर्डिनेट वापरून केले जाते. परंतु, काही अडचणीच्यावेळी पोलर कोऑर्डिनेटच्या वापराने अडचणीतून बाहेर पडता येते. या पद्धतीमध्ये कोन आणि ओरिजिनपासून अंतर हे दोन मुद्दे महत्त्वाचे ठरतात. नियंत्रकाच्या प्रकारावरून आपल्याला ॲबसोल्युट झीरो किंवा करंट पोझिशन ओरिजिनची निवड करता येते. (चित्र क्र. 3)
यामध्ये X आणि Y अक्ष असून, पुढील आकडे ओरिजिनपासून अंतर दर्शवितात. X = 10, Y = 10 म्हणून पॉइंट P चे कोऑर्डिनेट X10 आणि Y10 असे होते. P (10,10) अशा पद्धतीने त्याचे लिखाण केले जाते.
पोलर कोऑर्डिनेटचा वापर करताना कोन (θ) डिग्रीमध्ये दर्शविला जातो, तर अंतर R अक्षराने दर्शविले जाते. चित्र क्र. 4 मध्ये R = 10 आणि θ = 300 आहेत. म्हणून P या पॉइंटचे पोलर कोऑर्डिनेट P (10,300) असे होतील.
कार्टेशिअन ते पोलर आणि पोलर ते कार्टेशिअन यामध्ये G कोड वापरून सहजपणे बदल करता येतात.
G16 : स्विच टू पोलर
G15 : स्विच टू कार्टेशिअन
महत्त्वाची सूचना : प्रोग्रॅममध्ये गरजेप्रमाणे G90 किंवा G91 यापैकी एक कमांड टाकावी.
G90 : ॲबसोल्युट डायमेन्शनिंग
G91 : इनक्रिमेंटल डायमेन्शनिंग
पोलर कोऑर्डिनेटचा वापर नेहमी केला जात नाही. परंतु, काही समस्या पोलर कोऑर्डिनेटचा वापर करून सहज सोडविता येतात. उदाहरणार्थ, समजा बोल्ट सर्कल बनवायचे असून त्याची त्रिज्या 8' आहे आणि त्यावर समान अंतरावर 6 भोके पाडायची आहेत. (चित्र क्र. 5 )
03000 (G15, G16 पोलर कोऑर्डिनेट उदाहरण)
N1G20
G0 G40 G49 G50 G80 G94 G90
N2 G17
N3 G00 X 0 Y 05800 M03 (सेंटर पॉइंट)
N4 G43 Z1.0 H01 M08
N5 G16 (पोलर कोऑर्डिनेट ऑन)
N6 G99 G81 X 8 Y0 R0.1 Z-0.163 F3.0
N7 X8 Y60.0
N8 X8 Y120
N9 X 8 Y180°
N10 X8 Y 240
N11 X8 Y 300
N12 G15 (पोलर कोऑर्डिनेट ऑफ)
N13 G80 M09
M14 G91 G28 Z0M05
N15 G28 X0 Y0
N16 M30
%
वरील प्रोग्रॅम रोलर कोऑर्डिनेटचा वापर न करता करायचा झाल्यास, कॅल्क्युलेटर घेऊन आणि त्रिकोणमितीचा वापर करून प्रत्येक भोकाचे कोऑर्डिनेट काढणे अत्यावश्यक आहे. यामध्ये बराच वेळ जातो तसेच कॅल्क्युलेशनमध्ये चुका होण्याची शक्यता असते. चूक झाल्यास संपूर्ण यंत्रभाग बाद होण्याचा धोका निर्माण होतो.
नियंत्रकामध्ये पोलर कोऑर्डिनेटची सोय असल्यास सहजपणे आणि अचूक यंत्रभाग होऊ शकतो, हे वरील प्रोग्रॅममधून लक्षात येईल.
वरील प्रोग्रॅममध्ये पहिल्या पायरीला सुरक्षित सुरुवातीची स्थिती निश्चित केली आहे.
G40 : टूल नोज त्रिज्या (रेडियस) ऑफसेट कॅन्सल
G49 : टूल लेथ ऑफसेट
G50 : स्केलिंग फंक्शन कॅन्सल
G80 : फिक्स सायकल कॅन्सल
G94 : यंत्रण सायकल
G90 : ॲबसोल्युट
G00 वापरून सेंटर पॉइंट (0,0) आणला आहे.
N5 ब्लॉकमध्ये पोलर कोऑर्डिनेट सुरू केले आहे. पुढच्या लाइनला G81 कॅम सायकल चालू केली आहे. X8 Y0 हे पोलर कोऑर्डिनेट आहेत, ज्यामध्ये X हे ओरिजिनपासून अंतर 8' आहे, तर Y (00) आहे. त्यामुळे ओरिजिन (X0,Y0) हा आहे. G90 ॲबसोल्युट कोऑर्डिनेटचा वापर करून (0,0) हा ओरिजिन आहे. एकामागून एक असे प्रत्येक भोकाचे 8 इंच अंतर ठेवून कोन 600, 1200, 1800, 2400, 3000 या वर Y अक्ष बेतला आहे.
अशा प्रकारे योग्य प्रोग्रॅमिंग करून कार्यवस्तूचे टोकदार कोपरे बनविता येतात.
8625975219
sheetalcomp@yahoo.com
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.