उच्च गुणवत्ता आणि उच्चत्तम उत्पादकतेच्या स्पर्धेमध्ये यशस्वी उद्योजकांच्या बरोबरीने, त्यांना पोषक असे यंत्रभाग निर्माण करणारे कारखानदारही नवनवीन उत्पादने निर्माण करीत आहेत. परदेशी बाजारपेठ, ‘मेक इन इंडिया’ हा पुढाकार आणि ‘भारतामध्येही आम्ही अतिशय क्लिष्ट उत्पादने सहज करू शकू’ असा विेशास बहुकृतिशील (मल्टी टास्किंग) उत्पादनांमुळे भारतीय उद्योजकांच्या मनात निर्माण होतो आहे. मझाक कंपनीने नुकतेच सादर केलेले ‘इंटिग्रेक्स आय् सीरीज बहुकृतिशील टर्न मिल मशिन’ (चित्र क्र. 1) हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. वाहन उद्योगासाठी लागणारे अनेक क्लिष्ट यंत्रभाग तयार करण्यासाठी हे मशिन उपयुक्त आहे.
या मशिनद्वारे बहुविध यंत्रणे एकाचवेळी करता येतात. त्यामुळे उत्पादकता आणि गुणवत्ता अनेक पटीने वाढते. ज्या यंत्रभागासाठी टर्निंग, मिलिंग, लोकलाइज्ड ग्राइंडिंग, गिअर शेपिंग, हेलिकल ग्रूव्ह, ड्रिलिंग इत्यादी कार्यपद्धती लागतात, असे यंत्रभाग या मशिनवर कोणत्याही फिक्श्चरशिवाय सहजी निर्माण करता येतात. एखादा पूर्णपणे नवीन आणि क्लिष्ट यंत्रभाग नमुन्यासाठी तयार करणे बऱ्याचवेळी जिकिरीचे असते. असे विविध यंत्रण अंतर्भूत असलेले भाग नमुन्यासाठी तयार करणे आणि नमुना ऑर्डर मिळाल्यावर मर्यादित उत्पादन कमी वेळेत करणे या बाबी इंटिग्रेक्स आय् सीरीजमुळे शक्य होतात.
चित्र क्र. 2 मध्ये दर्शविल्याप्रमाणे या मशिनमध्ये अनेक रचनात्मक वैविध्य निर्माण करण्यात आले आहे. सर्व प्रकारचे क्लिष्ट यंत्रभाग या मशिनवर सहजपणे निर्माण करता येतात. लेथ, मिलिंग, मशिनिंग सेंटर इत्यादींबरोबरच निरनिराळ्या कोनांमध्येही यावर सुलभ यंत्रण करता येते.
चित्र क्र. 3 मधील यंत्रभाग पाहताच लक्षात येते की, अशा यंत्रभागांचे यंत्रण करताना सर्वसाधारणतः एकापेक्षा अधिक मशिनची आवश्यकता असते. एकापेक्षा अधिक मशिनवर यंत्रण करताना अर्थातच अधिक इन्व्हेंटरी, टूल, हँडलिंग या गोष्टींचा अंतर्भाव होतो. या सर्वांना पर्याय देण्यासाठी ‘डन इन वन’ हे
ब्रीदवाक्य घेऊन ‘इंटिग्रेक्स आय् सीरीज बहुकृतिशील मशिन’ निर्माण करण्यात आली आहेत. या मशिनमध्ये ‘डन इन वन’ म्हणजे सर्व यंत्रण एकाच ठिकाणी साध्य होण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये अंतर्भूत केली आहेत. या मशिनमध्ये तीन पर्याय उपलब्ध आहेत.
अ. फक्त टेलस्टॉकसह
ब. दुसऱ्या स्पिंडलसह
क. दुसरा स्पिंडल + लोअर टरेटसह
विविध श्रेणीमध्ये उपलब्ध असलेल्या या आय् सीरीज मशिनवर 260 मिमी. X 615 मिमी.पर्यंत यंत्रण क्षेत्र (मशिनिंग एरिया) उपलब्ध आहे. तसेच, 150 मिमी. ते 381 मिमी.पर्यंत चक साइज उपलब्ध आहे. 150 मिमी. ते 381 मिमी.पर्यंत आकाराच्या स्पिंडलचा 12,000 आर.पी.एम.पर्यंत प्रमाणित वेग आणि 5.5 ते 24 किलोवॅट इतक्या शक्तीची सोय केलेली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार 20,000 आर.पी.एम.पर्यंत स्पिंडल उपलब्ध आहेत.
इंटिग्रेक्स आय् सीरीजमध्ये मिलिंग स्पिंडल आणि लोअर टरेट अशा दोन व्यवस्थांच्या साहाय्याने अतिशय जलद यंत्रण करता येते. या मशिनवर 2 अक्षीय, 3 अक्षीय तसेच 5 अक्षीय यंत्रण एकाचवेळी (सायमल्टेनिअस) करता येते. त्यामुळे इम्पेलरसारख्या क्लिष्ट यंत्रभागांची निर्मिती सहज करता येते.
ग्राहकाच्या मागणीनुसार 36, 72 किंवा 110 टूलची ऑटोमॅटिक टूल चेंजर (ATC) व्यवस्था मिळू शकते. टूलचे मॅगेझिन मशिनच्या पुढील भागातच बसविलेले असल्यामुळे ऑपरेटरला टूलसंबंधी कार्य करण्यासाठी आपली जागा सोडून मशिनला वळसा घालून मागे जाण्याची गरज पडत नाही.
मशिनमध्ये औष्णिक संवेदक (थर्मल सेन्सर) बसविलेले आहेत, त्यायोगे यंत्रभागाचे यंत्रण करताना कॉम्पेन्सेशन केले जाते.
मुख्य आणि दुसऱ्या स्पिंडलचे C अक्षामध्ये अत्यंत अचूक नियमन केले जाते. 0.00010 पर्यंत स्थान (पोझिशन) नियंत्रित करता येते. मिलिंग स्पिंडलमध्येही उच्च प्रतिच्या रोलर गिअरमुळे 0.00010 पर्यंत इंडेक्सिंग करता येते.
मजबूत घडणीचे रोलर गाइड वापरल्यामुळे मशिनमध्ये अत्यंत कमी घर्षण आणि अचूकता आणणे शक्य होते.
मशिनच्या बॉल स्क्रूचे शीतकाद्वारे तापमान नियंत्रित केल्याने मशिनची अचूकता दीर्घकाळापर्यंत कायम राहते.
इंटिग्रल स्पिंडल/मोटर डिझाइनमुळे कमीतकमी कंपने, उत्तम पृष्ठीय फिनिश आणि अचूकता राखली जाते.
या मशिनच्या मिलिंग स्पिंडलची व्यवस्थादेखील लक्षणीय आहे. बहुउद्देशीय यंत्रणेसाठी हे स्पिंडल (चित्र क्र. 4) अतिशय उपयुक्त आहे. X अक्षाच्या पुढे 2100 पर्यंत आणि मागे - 300 पर्यंत हे स्पिंडल 0.00010 च्या अचूकतेने यंत्रण करू शकते. C अक्षावर संपूर्ण कंटूर हव्या त्या आकारात निर्माण करता येतो. Y अक्षावर सरकणारी आणि B अक्षामध्ये फिरणारी मिलिंग स्पिंडलची व्यवस्था आहे. हेच मिलिंग स्पिंडल लॉक केल्यास टर्निंग ऑपरेशनसाठी वापरता येते.
या मिलिंग स्पिंडलला आणि लोअर टरेटवर लाइव्ह टूल लावता येतात. यामुळे मिलिंग, शेपिंग, गिअर स्कायव्हिंग या सारखे वैशिष्ट्यपूर्ण यंत्रण करता येते. मिलिंग स्पिंडल 12,000 आर.पी.एम.पर्यंत 7.5 kW एवढ्या शक्तीने काम करू शकते. B अक्षावर फिरताना या स्पिंडलवरून यंत्रभागावर 1000 मिमी. लांबीचे आणि 80 मिमी. व्यासाचे लांब भोक पाडता येते.
लोअर टरेटमध्ये 9 टूलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. (चित्र क्र. 5) यामध्ये लाइव्ह टूलचाही पर्याय उपलब्ध आहे. यामुळे 6000 आर.पी.एम. आणि 3.7 kW एवढ्या शक्तीने यंत्रण करता येते. मिलिंग स्पिंडल आणि लोअर टरेटवर वेगळी टूल वापरून वेगवेगळे यंत्रण करता येते. लहान व्यासाच्या यंत्रभागावर बॅलन्स कटने कमी वेळात अचूक यंत्रण करून उच्च पृष्ठीय फिनिश आणणे शक्य होते.
लोअर टेरटमुळेही एकावेळी दोन्ही बाजूला टूल लावून यंत्रण करणे शक्य होते. यामुळे खर्चात बचत तर होतेच, परंतु वारंवार सेटअप बदलल्यामुळे यंत्रभागांमध्ये येणारे फरक कमी होऊन गुणवत्ता वाढते. आवश्यकतेनुसार एकाच वेळी दोन कटिंग टूलचा वापर करण्यासाठी लोअर टरेट आणि अप्पर स्पिंडलचा उपयोग केल्याने टर्निंग दुप्पट वेगाने होऊ शकते. या दोन्ही स्पिंडलची शक्ती आणि वेग जास्त असल्याने, साधारण मशिनच्या दुप्पट वेगाने यंत्रण करता येते. स्पिंडलचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शीतकाची व्यवस्था केली आहे.
या मशिनवर NC टेलस्टॉकची सुविधा असल्यामुळे ऑपरेटरला टेलस्टॉकची स्थिती आधी स्क्रीनवर निश्चित करता येते आणि तो टेलस्टॉक योग्य ठिकाणी मेनूद्वारा सरकवून स्थिर करू शकतो. यंत्रणाच्यावेळी टेलस्टॉकचा यंत्रभागावरील दाबदेखील 2 kN ते 10 kN पर्यंत नियमित करता येतो. काही पर्यायी मॉडेलमध्ये दुसऱ्या स्पिंडल चकमध्ये एक सेंटर पकडून तेही टेलस्टॉकप्रमाणे वापरता येते.
इंटिग्रेक्स आय् सीरीजचे संपूर्ण नियमन मझाट्रोल स्मूथएक्स या सी.एन.सी. प्रणालीद्वारे केले जाते. आधुनिक यंत्रणाच्या गरजा पूर्ण करण्याचे तंत्रज्ञान येथे विकसित केले आहे. याचे कंट्रोल पॅनेल टचस्क्रीन प्रणाली वापरून विकसित केले असल्यामुळे ऑपरेटरला यंत्रण नियमित करणे आणि सूचना देणे सुलभ झाले आहे. या प्रणालीची संगणक यंत्रणाही विंडोज् 8 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारलेली आहे. आधुनिक सॉफ्टवेअर तंत्रज्ञानामुळे अत्युच्च वेगाने अत्यंत अचूक यंत्रण करणे शक्य झाले आहे. निरनिराळ्या आकाराच्या आणि निरनिराळ्या धातुंपासून बनविलेल्या अत्यंत जटिल अशा यंत्रभागांचे यंत्रण करण्यासाठी लागणारी विविध परिमाणे या प्रणालीमध्ये सहज निर्माण करता येतात आणि स्मृतीमध्ये साठविली जातात. तसेच, झालेल्या प्रोग्रॅमिंगनुसार व्हर्च्युअल ॲनालिसिस आणि टूल पाथ ॲनालिसिस 3D मध्ये दिसू शकते आणि त्यामुळे प्रोग्रॅमिंगमध्ये काही बदल हवे आहेत काय याचेही मार्गदर्शन मिळते.
याच्या पॅनेलवरील स्क्रीनवर यंत्रण होणाऱ्या कार्यवस्तुची 3D प्रतिमा उपलब्ध होत असल्यामुळे यंत्रणामधील तात्कालिक त्रुटी ऑपरेटरच्या लगेच लक्षात येऊन त्यात आवश्यक दुरुस्ती सहजपणे करता येते.
माहितीचे जलद आदान प्रदान करण्यासाठी पॅनेलवरील एका USB पोर्टद्वारे इतर व्यवस्थेशी आणि संगणकांशी संपर्क केला जाऊ शकतो. महत्त्वाचे प्रोग्रॅम आणि टूल डाटा स्टँडर्ड SD कार्डद्वारे जतन केला जातो. अक्षाची निवड आणि टूलचा सरकवेग यामध्ये सातत्याने बदल करावे लागतात. त्यासाठी सहज वापरता येतील अशी बटने दिलेली असल्यामुळे कार्य सोपे होते. इंटिग्रेक्स आय् सीरीजची सिस्टिम पाच मशिन कार्य करीत असताना एकमेकांशी जोडता येते. यामुळे एका ठिकाणी असलेल्या ऑपरेटरलाही, बाकी मशिनवरील यंत्रणाची स्थिती आणि प्रगती पाहता येते.
उद्योगामध्ये नवनवीन यंत्रभागांची ऑर्डर मिळविण्यासाठी उद्योजकाला एका महत्त्वाच्या आव्हानाला तोंड द्यावे लागते, ते म्हणजे पूर्णपणे नवीन असलेला आणि उत्तम गुणवत्तेचा नमुना यंत्रभाग प्राथमिक चाचणीसाठी अतिशय कमी वेळेत निर्माण करून देणे. या मशिनचा योजनाबद्ध उपयोग करून केवळ एका बारमधून, कोणतेही फिक्श्चर न वापरता क्रँकशाफ्टसारखा क्लिष्ट यंत्रभागही अत्यंत कमी वेळेत निर्माण करता येतो. त्यामुळे बाजारपेठेमध्ये ‘डिझाइनपासून प्रत्यक्ष पहिल्या उत्पाद बाजारात आणण्यापर्यंतचा (प्रॉडक्ट लाँच) वेळ’ लक्षणीयरीत्या कमी होतो आणि उद्योजकाला स्पर्धेमध्ये पुढे जाणे शक्य होते. मझाककडे याव्यतिरिक्त 300 हून अधिक मॉडेल उपलब्ध आहेत. त्यातून यंत्रभागाच्या आकारमानाप्रमाणे योग्य मॉडेल सुचविले जाते.
मझाक ही मशिन टूल बनविणारी जगातील एक अग्रगण्य कंपनी आहे. विविध देशांमध्ये असलेली सुमारे 83 ‘टेक्नॉलॉजी सेंटर’ ग्राहकांना आवश्यक सेवा पुरवितात. भारतातील वाढती बाजारपेठ लक्षात घेता पुण्यामध्ये ‘मझाक टेक्नॉलॉजी सेंटर’ आणि इतर पाच शहरांमध्ये ‘टेक्निकल सेंटर’ची निर्मिती करण्यात आली आहे. पुण्यात एक स्पिंडल सर्व्हिस सेंटरही सुरू केले आहे. मशिन टूलच्या ग्राहकांचे यंत्रभाग तपासून, त्यांचा अभ्यास करून उत्पादनाविषयी आणि मशिन टूलच्या निवडीविषयी सेवाही मझाकतर्फे पुरविली जाते.
7387038566
prashant_ghugare@mazakindia.com
प्रशांत घुगरे ‘मझाक इंडिया’ कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. मेटल कटिंग आणि मशिन टूल क्षेत्रातील कामाचा त्यांना सुमारे 20 वर्षांचा अनुभव आहे.