कार्यवस्तूमध्ये असलेल्या विविध खाचा, उदाहरणार्थ की-वे, करण्यासाठी विविध पद्धती उपलब्ध आहेत. जेव्हा उत्पादनाची संख्या जास्त असते तेव्हा ब्रोचिंग पद्धती वापरली जाते, तर काही विशिष्ट कमी संख्येत होणारे उत्पादन टर्निंग अथवा मिलिंग मशीनवरसुद्धा करता येते.
पारंपरिक पद्धतीने ब्रोचिंग ऑपरेशन एक स्वतंत्र ऑपरेशन असते. ब्रोचिंग ऑपरेशन एक पासमध्ये सर्व यंत्रण पूर्ण करते. काळाच्या ओघात जसजसे सी.एन.सी. तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसतसे सी.एन.सी.वर खाचा तयार करण्याची मागणी जोर धरू लागली, ज्यामुळे एकाच मशीनमध्ये इतर टूलसोबत खाच करणारे टूलही वापरणे शक्य होऊ लागले. सी.एन.सी. मशीनसाठी विशिष्ट टूल, टूल बॉडी, टूल होल्डर डिझाइन केले गेले. त्यापुढील प्रगती म्हणजे इंडेक्स होऊ शकणारे इन्सर्ट प्रकारचे स्लॉटिंग टूल आणि टूल होल्डर. या होल्डरमध्ये अनेक विशिष्ट इन्सर्ट ग्राहकाच्या गरजेप्रमाणे बसविता येणे शक्य झाले. खाचेच्या आकारानुसार पूर्ण टूल बदलण्याऐवजी होल्डरवरील टिप बदलली की झाले काम. यामुळे लवचिकता वाढली.
सी.एन.सी. स्लॉटिंग टूलला काही उत्पादक इंडेक्सेबल ब्रोच असेही म्हणतात. लेथ/मिल, कोणत्याही आकारमानाच्या की वे पासून ते गुंतागुंतीचे प्रोफाइल (अनेक त्रिज्यायुक्त), स्पाइनसुद्धा करता येतात. कमी किंवा जास्त उत्पादन असणाऱ्या ठिकाणी हे टूल वापरता येतात आणि ड्रिव्हन हेडला जोडून यंत्रण वेग 300 टक्क्यांनी वाढविता येऊ शकतो. सी.एन.सी. मशीनवर होणाऱ्या कार्यवस्तूंमध्ये इंटर्नल, एक्स्टर्नल प्रोफाइल असे निरनिराळे आकार करता येतात. (उदाहरणार्थ, षट्कोन, चौकोन, स्प्लाइन, टॉर्क्स (वीण असलेला धातुचा हार), डबल षट्कोन, डी आकार चौकोन, की वे, सिंगल D, सरेशन त्रिकोण, अक्षरे, आकडे, काही ग्राहकानी सांगितलेले खास आकार)
सी.एन.सी. स्लॉटिंगचे फायदे
⦁ अधिक वेग
⦁ जास्त अचूकता
⦁ कमी उष्णता
⦁ जास्त पुनरावर्तनक्षमता (रिपीटॅबिलिलीटी)
⦁ सहज ऑपरेशन (स्टँडर्ड G कोडचा वापर करून)
⦁ अतिरिक्त ऑपरेशनची गरज पडत नाही.
उदाहरण म्हणून आपण सरेशन असलेली कार्यवस्तू घेऊ.
पारंपरिक यंत्रणात टर्न केलेल्या भागावर सरेशन पाडणे ही एक स्वतंत्र प्रक्रिया होती. एका विशिष्ट टूलने पारंपरिक मशीनवर C अक्ष घेऊन एकाच ऑपरेशनमध्ये सरेशन पूर्ण करता येते. ब्रोचिंग टूलवर ¼ सर्कल भूमिती (जॉमेट्री) घेतलेली असून त्यावर अनेक दात असतात. फक्त पहिल्या दातावर संपूर्ण फिनिश डेप्थ प्रोफाइल असते, तर उरलेले दात रफिंग ऑपरेशनसाठी असतात.
सरेशनचे ब्रोचिंग हे दोन पायऱ्यांचे ऑपरेशन असते. पहिल्या पायरीमध्ये स्पिंडल हलत नाही आणि ब्रोचिंग टूल सर्वसाधारण टूलच्या तीनपट फीड करते. ही प्रक्रिया पहिला दात पूर्ण प्रस्थापित होईपर्यंत चालू राहते. दुसऱ्या पायरीत स्पिंडल इंडेक्स होण्यास चालू होते आणि पुढचा दात अखंडितपणे खोली पूर्ण होईपर्यंत ब्रोचिंग करीत राहतो.
उदाहरण
पुढील उदाहरणात स्लॉटिंगचा वापर करून की वे करावयाचा आहे. पहिले उदाहरण मिल स्लॉटिंगचे तर, दुसरे उदाहरण लेथ स्लॉटिंगचे आहे.
मिल स्लॉटिंग उदाहरण
कार्यवस्तूवर की वे करावयाचा असून त्याची त्रिज्यात्मक खोली 5 मिमी. आहे, तर खोली 25 मिमी. आहे. प्रथम टूल X0 Y0 आणि Z7.00 मिमी. ते 12.00 मिमी. मधील कोणत्याही एका मूल्याला सेट करावे. हे अंतर (Z) सध्या की वे करावयाच्या पृष्ठभागापासून वर आहे. त्यानंतर सबप्रोग्रॅमचा वापर करून इन्क्रिमेंटल फॉर्ममध्ये टूल वर खाली होईल.
प्रोग्रॅम
M19
G00 X0 Y0 Z10.00
M98 P500 L100 (यामध्ये प्रोग्रॅम नंबर आणि L100 म्हणजे तो सबप्रोग्रॅम (500) 100 वेळा रिपीट करावयाचा आहे). ज्या मशीनमध्ये L काम करीत नाही, अशा ठिकाणी P प्रोग्रॅमनंतर रिपीट आकडा घालावा म्हणजे P500 100 अशी पायरी होईल.
सबप्रोग्रॅम
सबप्रोग्रॅम M98 नंतर कार्यान्वित होतो.
G00 G91 Y0.050 (प्रत्येक पासची खोली)
G90 G01 Z-25 F100 (कटिंग स्ट्रोक खाली)
G00 G91 Y-7.00 (Y माघारी)
G00 G90 Z10 (बोअरच्या बाहेर Z)
G91 Y7.00 (टूल रिपोझिशन जेथे शेवटची कापाची खोली
घेतली होती.)
M99 (सबप्रोग्रॅम रीस्टार्ट)
लेथ स्लॉटिंग : लेथमध्ये टूल, व्यासावरील मूल्यावर जाते. ही टूलची गती X अक्षावर असते. म्हणजे X दिशेत 50 मायक्रॉन मूल्याला प्रत्यक्ष टूल 250 मायक्रॉन जाईल. बोअर व्यास 50 मिमी. असून त्रिज्यात्मक खोली 5 मिमी. आहे, तर खोली 25 मिमी. आहे.
लेथवर होणाऱ्या स्लॉटिंगचा व्हिडिओ पाहा.
प्रोग्रॅम
M19
G00 G98 X50.00 Z10.00
M98 P500 L100
M98 मुळे कंट्रोल प्रोग्रॅम नंबर 500 ला जातो. सबप्रोग्रॅम 100 वेळा रिपीट करतो.
G00 U0.10 (इन्क्रिमेंटल X कापाची खोली 0.10 मिमी. व्यासावर त्रिज्या घेतली तर 0.05 मिमी.)
G010 Z-50.0 F100 (बोअरमधील कटिंग स्ट्रोक)
G00 U-12 (टूल मागे की वे तून बाहेर)
(त्रिज्यात्मक खोलीच्या दुपटीपेक्षा जास्त पाहिजे म्हणून 12 मिमी.)
G00 Z10 (बोअरच्या बाहेर टूल)
G00 U12 टूल रिपोझिशन
M99 सबप्रोग्रॅम रिपीट
सतीश जोशी
सल्लागार
8625975219
sheetalcomp@yahoo.com
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करीत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकाविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.