स्पिंडल का बिघडतात?

13 Dec 2020 09:00:00
यंत्रगप्पाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सेटको स्पिंडल्सचे ( spindles) राजेश मंडलिक यांनी उद्योजकांशी संवाद साधला. मशीनचे हृदय समजल्या जाणाऱ्या स्पिंडलविषयी त्यांनी या दुसऱ्या सत्रामध्ये चर्चा केली. या वेबिनारचा संक्षिप्त आढावा त्यांच्याच शब्दात धातुकामच्या वाचकांसाठी देत आहोत.
मी आज खूप उत्साहात आहे, कारण आतापर्यंत जेवढे काही सेमिनार किंवा वेबिनार मी सादर केले ते सर्व इंग्रजी आणि हिंदी भाषेतून होते. पूर्ण मराठीमध्ये बोलण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मराठीमधून तुमच्याशी गप्पा मारणे आणि तेही स्पिंडलविषयी... असा दुहेरी योग या यंत्रगप्पाच्या निमित्ताने आला आहे. 
स्पिंडल का बिघडतात (फेल)? हा आपला आजचा विषय आहे. स्पिंडल केव्हा न केव्हा दुरुस्तीसाठी येणार हे आपण गृहीत धरावे. याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, स्पिंडलचे पूर्ण आयुष्य आपल्याला मिळाले पाहिजे. स्पिंडल बेअरिंगचे आयुष्य कोणीही स्पेसिफाय करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, स्पिंडल दुरुस्त करण्यासाठी कमी वेळ लागला पाहिजे आणि त्यासाठी खर्चदेखील कमीतकमी आला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे, दोन वेळा स्पिंडल दुरुस्ती करताना त्याच्यामधील कालावधी, ज्याला मेंटेनन्सच्या भाषेमध्ये 'मीन टाईम बिटविन फेल्युअर' (MTBF) असे म्हणतात, तो सर्वात जास्त असला पाहिजे. स्पिंडल दुरुस्तीमधल्या या नेहमीच्या 3 बाबी आहेत. त्यावर कशा पद्धतीने काम करावे याबद्दल आपण या वेबिनारमध्ये विस्तृत चर्चा करणार आहोत. त्यातही मशीनिंग सेंटरच्या स्पिंडलविषयी ही चर्चा असेल. कारण, टर्निंग सेंटर किंवा ग्राइंडिंग मशीनपेक्षा मशीनिंग सेंटरचे स्पिंडल दुरुस्तीसाठी जास्त अवघड असतात. 
स्पिंडलचे विविध अॅप्लिकेशन 
आज सर्वच कामांच्या बदलत्या गरजांनुसार अधिक क्षमतेचे आणि जास्त आर.पी.एम. असलेले स्पिंडल वापरले जातात. मशीनिंग सेंटर स्पिंडलचे ढोबळ अर्थाने त्याच्या ड्राइव्ह सिस्टिमवरून 4 प्रकारांत वर्गीकरण केले जाते. 
1.बेल्ट ड्रिव्हन स्पिंडल : या प्रकाराच्या नावावरूनच आपल्याला हे समजते की, स्पिंडलला फिरविण्यासाठी टाइमर बेल्ट किंवा पॉली व्ही बेल्टचा वापर केला जातो. एका पॅसिव्ह इलेक्ट्रिकल मोटरपासून (इंडक्शन मोटर/ सर्व्हो मोटर) बेल्टच्या मदतीने स्पिंडलला ड्राइव्ह दिला जातो आणि नंतर स्पिंडल फिरतो. 

1_1  H x W: 0 x

2.गिअर ड्रिव्हन स्पिंडल : या प्रकारामध्ये एक सर्व्हो मोटर असते आणि त्याच्यापुढे गिअर ट्रेन असते. गिअर ट्रेनपासून स्पिंडलपर्यंत ड्राइव्ह नेलेला असतो. जिथे जिथे टॉर्क अधिक आहे आणि आर.पी.एम. कमी लागतो तिथे शक्यतो गिअर ड्रिव्हन स्पिंडल वापरले जातात.

2_1  H x W: 0 x

3.डायरेक्ट ड्राइव्ह स्पिंडल : यात स्पिंडल आणि सर्व्हो मोटर यांच्यामध्ये एक कपलिंग असते. थोडक्यात बेल्ट आणि गिअरच्यामध्ये जो ट्रान्स्मिशन लॉस होतो, तो या डायरेक्ट ड्राइव्ह स्पिंडलमधून होत नाही. कारण मोटरमधून कपलिंगच्या माध्यमातून स्पिंडलला आर.पी.एम. किंवा थेट पॉवर मिळते.

3_1  H x W: 0 x
4.बिल्ट इन स्पिंडल किंवा इंटिग्रेटेड स्पिंडल : हे भविष्यातील तंत्रज्ञान असणार आहे. भारतामध्ये उच्च वारंवारितेच्या (हाय फ्रीक्वेन्सी) स्पिंडलचा वापर जास्त नसला तरी, युरोप, जपान आणि थोड्याफार फरकाने तैवान या देशांतील बहुतांश मशीन या इंटिग्रेटेड स्पिंडल आधारित असतात. बिल्ट इन मोटर स्पिंडलचे अनेक फायदे आहेत. यासाठी वेगवेगळ्या मोटर एलिमेंट, वेगवेगळ्या बेल्ट ट्रान्स्मिशनची आवश्यकता भासत नाही. या स्पिंडलची कंपने (व्हायब्रेशन व्हॅल्यू) कमी असतात. 

4_1  H x W: 0 x
स्पिंडलचे वजन कमी ठेवण्यासाठी, म्हणजेच त्या स्पिंडल अॅसेम्ब्लीचे वजन कमी ठेवण्यासाठी याचा फार चांगला वापर होतो. क्लॅम्पिंग डीक्लॅम्पिंग करण्यासाठी वेगळा सिलिंडर असतो. अशापद्धतीने हे सर्व ऑपरेशन एका छोट्या अॅसेम्ब्लीमध्ये होणारा हा स्पिंडल आहे. इंटिग्रेटेड स्पिंडलची रचनेचा व्हिडिओ.
 

स्पिंडल बिघडण्याची कारणे 
1. अँटी फ्रिक्शन बेअरिंग : अँटी फ्रिक्शन बेअरिंग असल्यामुळे स्पिंडल केव्हा ना केव्हा खराब होणारच असतो. स्पिंडलचे स्वतःचे एक आयुष्य आहे आणि ते जास्तीतजास्त कसे असेल यावर आपण अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. 
2. कॉन्टॅमिनेशन : कॉन्टॅमिनेशन म्हणजे बाहेरचा कोणतातरी घटक स्पिंडलमध्ये शिरणे. यंत्रण करण्यासाठी जे शीतक (कूलंट) वापरले जाते, ते शीतक कुठल्यातरी मार्गाने स्पिंडल बेअरिंगपर्यंत पोहोचते आणि स्पिंडल बेअरिंग खराब होते. किंवा बऱ्याचदा असेही घडते की, स्पिंडल बेअरिंगला वंगण (ल्युब्रिकेशन) पुरविण्यासाठी ऑइल एअर ल्युब्रिकेशन सिस्टिम वापरली जाते. त्या ऑइल एअर ल्युब्रिकेशन सिस्टिममध्ये, हवेमध्ये आर्द्रता असेल (मॉइश्चरचे घटक) तर, तेसुद्धा स्पिंडल बेअरिंगर्यंत जाऊन स्पिंडल बेअरिंगला खराब करू शकतात. कॉन्टॅमिनेशनमुळे स्पिंडलचे कुलिंग सर्किट बऱ्याचदा क्लॉग होते. ते क्लॉग झाले की स्पिंडलचे तापमान अपेक्षेप्रमाणे व्यवस्थित टिकून रहात नाही. त्यामुळेदेखील स्पिंडल बिघडतात. 
3. वंगण : ऑइल एअर ल्युब्रिकेशनमध्ये त्याचा एक पंप असतो आणि जर सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून (सेफ्टी बायपास) जर स्पिंडल चालविला जात असेल, तर कदाचित तो वंगण पंप खराब झाल्यानंतरसुद्धा तो स्पिंडल चालू राहतो. त्या परिस्थितीमध्ये जर स्पिंडल बेअरिंगपर्यंत वंगण पोहोचले नाही तर तो खराब होणार. जर चूकीचे वंगण टाकले गेले, म्हणजे जर ऑइलमध्ये स्पिंटेक 5, स्पिंटेक 12 या उच्च व्हिस्कॉसिटीचे ऑइल (ज्याला थिन ऑइल म्हटले जाते) न वापरता जाड व्हिस्कॉसिटीचे ऑइल वापरले, तर स्पिंडल बिघडू शकतात. कमी दर्जाचे किंवा नियमितपणे उपलब्ध असलेले ग्रीस जर स्पिंडल बेअरिंगमध्ये वापरले गेले, तर स्पिंडल बेअरिंग लवकर खराब होतात. वंगण पंप व्यवस्थित चालू आहे, पण वंगणाच्या मार्गात (पाथ) काही गडबड असेल, समजा त्यात क्लॉगिंग झालेले असेल, वंगण वाहून नेणारे पाईप तुटलेले असतील, वंगणाचा पुरवठा होत नसेल, अशा अनेक कारणामुळे जर बेअरिंगपर्यंत वंगण पोहोचत नसेल, तर त्यामुळे स्पिंडल बेअरिंग खराब होऊ शकतात. 
4. अपघात : सेटिंग करताना मशीनवर काही ऑफसेट चुकले, गृहीत धरल्यापेक्षा जास्त मशीनिंग अलाउन्स आलेला असेल तर यंत्रणादरम्यान अपघात होतात. उदाहरणार्थ, चित्रामध्ये दाखविल्यानुसार, संपूर्ण टूल होल्डर टेपरमध्ये फिरलेले आहे. त्याच्यामुळे टेपरचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीमध्ये स्पिंडल आपल्याला रीफर्बिश करता येतात, परंतु त्यासाठी जास्त खर्च येतो आणि वेळदेखील जास्तीचा लागतो. 

5_1  H x W: 0 x
5. कंपने (व्हायब्रेशन) : स्पिंडल अॅसेम्ब्लीमध्ये त्यातील सर्व भाग हे 8000-10,000 आर.पी.एम. वेगाने फिरतात. त्याच्यामध्ये जर काही अनियमित पद्धतीचे वियर आणि टीयर झाले, तर त्याचा संयुक्त परिणाम (क्युम्युलेटिव्ह एरर) तयार होऊन कंपने तयार होण्याची शक्यता असते. स्पिंडल बेअरिंगमधील क्लिअरन्स जर वाढला, तर कंपने येण्याचे तेदेखील एक कारण असते. स्पिंडलमध्ये एक पॅसिव्ह इलेक्ट्रिकल मोटर असते, इंडक्शन मोटर किंवा सर्व्हो मोटर म्हणा, त्या इंडक्शन मोटरच्या बेअरिंग खराब झालेल्या असतील, तर त्याच्यामधून निर्माण झालेली कंपने स्पिंडलवरदेखील येतात. अशा परिस्थितीत सातत्याने उच्च कंपनांदरम्यान स्पिंडल चालू ठेवला, तर स्पिंडल बेअरिंगमध्ये जे बॉल किंवा रोलर आहेत, ते एका उच्च वारंवारितेला आदळत राहतात आणि त्यामुळे स्पिंडल बेअरिंग बिघडतात. 
6. डिझाइन स्पेसिफिकेशनच्या पलीकडे (अमर्याद) वापर : स्पिंडलच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन काही टूल वापरली, उदाहरणार्थ, BT 40 मध्ये 200-250 मिमी.चा मिलिंग कटर वापरला. BT 40 टेपरमध्ये ते टूल सहन करण्यासाठी आवश्यक ताकद नसते. त्यातील बेअरिंग या साधारण 70 मिमी.च्या असतात. त्या तेवढ्या सक्षम नसतात. पण काही कारणामुळे ते तसेच वापरले गेले, तर नैसर्गिकपणे स्पिंडल बेअरिंगवर लोड येऊन किंवा स्पिंडल टेपरमधून डॅमेज होऊन तो स्पिंडल खराब होण्याची शक्यता असते. 
7. तापमान : इंटिग्रेटेड स्पिंडल, बेल्ट ड्रिव्हन स्पिंडल किंवा डायरेक्ट ड्रिव्हन स्पिंडल यांच्यामध्ये आजकाल स्पिंडल बेअरिंगचे तापमान नियमित ठेवण्यासाठी चिलर वापरले जातात. जर या चिलरचे तापमान वाढले, चिलर खराब झाला आणि जास्त तापमानाने जर त्या स्पिंडलच्या भोवती पाणी फिरत राहिले, तर अशा परिस्थितीमध्ये आतमधील उष्णता बाहेर फेकली जात नाही. त्यामुळे तापमानात वाढ होणार. कोणत्याही बेअरिंगची तापमान सहन करण्याची क्षमता ही साधारण 90°सें.-100°सें. असते. अगदी चांगल्या प्रकारचे केज वापरले तरीही 110°सें.-120°सें. च्या पलीकडे तापमान गेले, तर स्पिंडल बेअरिंगच्या केज वितळतात. हे आम्ही प्रत्यक्षात बघितलेले आहे. तसेच चिलरचे तापमान खूप कमी ठेवले म्हणजे अॅम्बियंट तापमान आणि चिलरच्या तापमानामध्ये जर खूप जास्त फरक असेल आणि स्पिंडल थांबलेला असताना चिलिंग मात्र चालू राहिलेले असेल, तर कमी तापमानामुळे आजूबाजूच्या हवेतील आर्द्रतेचे कंडेन्सेशन होते. कंडेन्स्ड मॉइश्चर जर स्टेटर वाइंडिंगमध्ये गेले, तर ते स्टेटर वाइंडिंगपण खराब करू शकते. त्यामुळे तापमान या बाबीवर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. जे अॅम्बियंट तापमान आहे त्याच्यापेक्षा चिलरचे तापमान साधारण 15°सें. कमी ठेवा. 
 
8. अयोग्य दुरुस्ती आणि अयोग्य हाताळणी हीदेखील दोन कारणे आहेत. अयोग्य दुरुस्ती म्हणजे उदाहरणार्थ, दोन बेअरिंगच्यामधील स्पेसरचा वेव्हीनेस किती असायला हवा, स्पेसरच्या जाडीमध्ये (विड्थ) किती फरक पाहिजे, तो शून्य असला पाहिजे की त्याच्यामध्ये काही फरक असला पाहिजे, याची माहिती अनेकदा आपल्याकडे नसते आणि यालाच अयोग्य दुरुस्ती असे म्हणतात. हाउसिंगमधून स्पिंडल बेअरिंगचा संच काढण्यासाठी ट्रॉली आणि चांगल्या प्रकारच्या प्रेस असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा प्रेस जर नसतील, तर पंच आणि हॅमर वापरून त्या बेअरिंग्ज काढण्याचा प्रयत्न केला जातो. स्पिंडलची अचूकता अवलंबून असणाऱ्या शाफ्ट किंवा हाउसिंगमध्ये काहीतरी बिघाड होतो आणि मग स्पिंडल दुरुस्ती होत नाही. 
9. इंटिग्रेटेड स्पिंडल खराब होणे किंवा एन्कोडर खराब होणे किंवा क्लॅम्प किंवा डीक्लॅम्प होणे याच्यासाठी त्याचे संवेदक (सेन्सर) असतात, ते खराब होणे किंवा ड्रॉ बार खराब होणे किंवा हेलिकल स्प्रिंग झिजलेल्या असतात अशी छोटी छोटी कामे असतात. पण ती कामे जरी निघाली, तर त्यासाठी पूर्ण स्पिंडलच दुरुस्तीसाठी काढावा लागतो. 
प्रतिबंधात्मक आराखडा (प्रिव्हेन्शन प्लॅन) 
स्पिंडलचे आयुष्य संपण्यापूर्वी त्याच्याकडून ऑपरेटरला काही विशिष्ट संदेश मिळत असतात. त्याचवेळेला जर तो स्पिंडल दुरुस्त केला गेला, तर स्पिंडल दुरुस्तीचा वेळ कमी असण्याची आणि खर्चदेखील कमी येण्याची शक्यता असते. अनेकदा असे घडते स्पिंडलमधून आवाज येत असतो. अशावेळी 'स्पिंडल चालतोय ना, मग चालू द्या, एवढी बॅच काढून घ्या, त्यानंतर बघू काय होते', अशी भूमिका घेतली जाते. आणि ती बॅच पूर्ण करण्याच्या कामात स्पिंडल बेअरिंगमध्ये दोष येतो, ते फेल्युअर खूप गंभीर असते. अशावेळी नुसता स्पिंडल खराब होत नाही, नुसत्या बेअरिंग खराब होत नाहीत, तर कधी कधी स्टेटर, एन्कोडरही खराब होऊ शकतो. हे भाग अतिशय लहान असले तरी त्याच्या किंमती खूप जास्त असतात. स्पिंडल दुरुस्तीमध्ये आपण उशीर केला, तर त्याच्यामध्ये आपले महत्त्वाचे यंत्रभाग खराब होऊ शकतात. 
 
त्यामुळे स्पिंडलच्या आवाजामध्ये फरक जाणवला, तापमानामध्ये आणि कंपनांमध्ये फरक जाणवला, तर त्याकडे वेळेवर लक्ष देणे आवश्यक आहे. तशा सूचना ऑपरेटरला दिल्या तर स्पिंडल दुरुस्तीचा वेळ आणि खर्च कमी असेल. 
याला पूरक म्हणून स्पिंडल हेल्थ चेकअप अशी एक संकल्पना आहे. किती वारंवारितेने स्पिंडल हेल्थ चेकअप व्हायला पाहिजे, त्यामध्ये कोणते पॅरामीटर तपासायचे याबद्दल आता आपण माहिती घेऊ. स्पिंडल हेल्थ चेकअप साधारणपणे 6 महिने किंवा 1 वर्षांनी करावे. तपासणी किती कालावधीने झाली पाहिजे हे कामावर अवलंबून असते. एक वर्षाच्यावर तो कालावधी नसावा. 3,6,9 महिने असे त्याचे प्रमाण ठेवू शकता. अंतिम उत्पादाचे गुणवत्तेचे पॅरामीटर जर क्लिष्ट (क्रिटिकल) असतील तर, 3 महिन्यांनी स्पिंडल हेल्थ चेकअप केला पाहिजे. 
 
  • स्पिंडलचे ब्लू मॅचिंग : मशीनिंग सेंटरच्या स्पिंडलमध्ये BT40, BT50, HSK टेपर असतो. या टेपरचे जॉमेट्रिकल कॉन्फिगरेशन चांगले असणे फार गरजेचे असते. ब्लू मॅचिंग करण्यासाठी जर BT40 स्पिंडल किंवा BT50 स्पिंडलच्या 5 पेक्षा जास्त मशीन असतील, तर तो टेपर गेज बाजारपेठेमधून विकत घेणे असा सल्ला मी देत असतो. टूल होल्डरने ब्लू मॅचिंग तपासू नये. समजा ही उपकरणे तुमच्याकडे नसतील, तर सेट्को कंपनी स्पिंडल हेल्थ चेकअपची सेवा देते. तुम्ही ते आमच्याकडून करून घेऊ शकता. स्पिंडल दुरुस्त केला जातो, त्यावेळेला स्पिंडलचा टेपर ग्राइंड करावाच लागतो. तो ग्राइंड केल्यानंतर त्याचे ब्लू मॅचिंग 90 टक्क्यांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. जेव्हा स्पिंडल मशीनवर चालू असतो तेव्हा 70 टक्क्यांपर्यंत ब्लू मॅचिंग असेल, मँड्रेलवरती 20 मायक्रॉनपर्यंत रनआउट मिळतो आणि तो ISO च्या प्रमाणे अंतिम उत्पादाच्या गुणवत्तेसाठी (एंड प्रॉडक्ट क्वालिटी) तो रनआउट स्वीकारार्ह असतो. दुरुस्त केल्यानंतर ब्लू मॅचिंग 90 टक्क्यांपेक्षा जास्तच पाहिजे. 70 टक्क्यांपेक्षा कमी ब्लू मॅचिंग असेल, तरच त्याला दुरुस्त करण्याची गरज आहे अन्यथा दुरुस्तीची गरज नाही. 
  • गेज प्लेन : प्रत्येक BT 40 आणि BT 50 स्पिंडलला गेज प्लेन असतात. हे एक विनिर्दिष्ट (स्पेसिफाइड) गेज प्लेन असते आणि गेजवरती गेज प्लेनचे मार्किंग केलेले असते. तो गेज प्लेन प्रत्येकवेळी तपासणे आवश्यक आहे. स्पिंडलचा गेज प्लेन जर टेपरच्या आतमध्ये गेला किंवा टूल होल्डर जर आतमध्ये गेला असेल, तर क्लॅम्पिंग फोर्स कमी झालेला असतो. यामुळे गेज प्लेन हे सदैव विनिर्दिष्ट असावेत. गेज प्लेन भूमिती व्यवस्थित नसेल, तर मँड्रेलच्या रनआउटवर परिणाम होतो. मशीनिंग सेंटरच्या स्पिंडलमध्ये स्पिंडल फेसपासून 300 मिमी. लांबीचे मँड्रेल असते, त्या मँड्रेलवरती ISO स्पेसिफिकेशनप्रमाणे 20 मायक्रॉनपेक्षा कमी रनआउट पाहिजे. एअरोस्पेससाठी जी मशीन वापरली जातात तिथे 8-10 मायक्रॉनच्या आतमध्ये मँड्रेल रनआउट लागतो. वाहन उद्योगातील यंत्रभागांसाठी 20 मायक्रॉनच्या आतमध्ये रनआउट अपेक्षित असतो. काही अॅल्युमिनिअमच्या यंत्रभागांसाठी 25 मायक्रॉनपर्यंत रनआउट चालतो. मात्र 25 मायक्रॉनच्या पुढे जर रनआउट गेला, तर बेअरिंगवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तेव्हा स्पिंडल दुरुस्त करण्याची गरज असते.
  •  स्पिंडलमध्ये अरीय (रेडियल) आणि अक्षीय (अॅक्शियल) प्ले नसला पाहिजे. तो मशीनवरदेखील तपासता येतो. तो 5-7 मायक्रॉनच्या मर्यादेमध्ये असावा. मात्र दुरुस्त केल्यानंतर तो शून्य पाहिजे. थोडक्यात फेसवरती डायल लावली किंवा स्पिंडलच्या किंवा शाफ्टच्या बाह्य व्यासावर (OD) प्ले तपासला आणि डायल 10 मायक्रॉननी डीफ्लेक्ट झाली, तर दाब (फोर्स) काढून घेतल्यानंतर तो परत शून्यावर आला पाहिजे. याचा अर्थ असा की त्याच्यावर अरीय आणि अक्षीय प्ले नाही. 
  • क्लॅम्प फोर्स : सर्व मशीनच्या स्पिंडलला असणारा क्लॅम्पिंग फोर्स हा विनिर्दिष्ट असतो. हा महत्त्वाचा पॅरामीटर आहे आणि त्याची तपासणीदेखील अतिशय सोपी आहे. त्यासाठी विशेष उपकरणे असतात. बाजारपेठेत ती उपलब्ध आहेत. साधारण BT 40 स्पिंडलसाठी 800-1000 Kg, BT 50 स्पिंडलसाठी 1500-1800 Kg क्लॅम्पिंग फोर्स असावा. क्लॅम्पिंग फोर्स व्यवस्थित नसेल तर टूल होल्डर व्यवस्थित पद्धतीने बसत नाहीत. नुसत्या डोळ्यांनी ते दिसत नाहीत, परंतु क्लॅम्पिंग फोर्स व्यवस्थित नसल्यामुळे त्याच्यावर जी हार्मोनिक कंपने तयार होतात त्याच्यामुळे स्पिंडल टेपर लवकर खराब होऊ शकतो. 
  • कंपने : स्पिंडलची कंपने संनियंत्रित (मॉनिटर) करावयाची असतात. अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये त्याचे स्वीकारार्ह मूल्य 2.5 मिमी./सेकंदपर्यंत (मशीनवरती स्पिंडल असताना) असते. जेव्हा स्पिंडल दुरुस्त करून घेतलेला असेल त्यावेळी त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी 1 मिमी./सेकंदपेक्षा कमी असली पाहिजे. तरच तो स्पिंडल स्वीकारायचा. स्पिंडल कंपने तपासण्यासाठी अँग्युलर व्हेलॉसिटी हा पॅरामीटर अत्यंत योग्य आहे.
  • याच्याशिवाय इंटिग्रेटेड स्पिंडल असतील, तर त्याचे 3 फेस समतोल (बॅलन्स) आहेत का, त्याच्या रेझिस्टन्सची मूल्ये, इंडक्टन्स मूल्ये सारखी आहेत का, त्याचे इन्सुलेशन व्यवस्थित आहे ना, या गोष्टी तपासाव्यात. स्पिंडल रन होत असेल, तर शक्यतो या मूल्यामध्ये फारसा फरक नसतो. त्यामुळे स्पिंडल हेल्थ चेकअपमध्ये हा मुद्दा आम्ही घेतलेला नाही. पण जेव्हा स्पिंडल रीकंडिशनिंगसाठी, बेअरिंग बदलण्यासाठी पाठविला जातो, तेव्हा हा पॅरामीटर आम्ही आवर्जून तपासतो. एन्कोडर चेकरद्वारे एन्कोडर तपासणे, क्लॅम्प डीक्लॅम्पच्या सेन्सरसाठी काही साधने उपलब्ध आहेत, ती व्यवस्थितपणे चालत आहेत की नाहीत, अशा या सर्व गोष्टी आपण तपासू शकतो आणि त्याची नोंद ठेवू शकतो. 
थोडक्यात, स्पिंडलची काळजी घेणे आपल्या हातात आहे आणि तो जेव्हा काही लहानसहान तक्रारी करू लागतो तेव्हाच त्याच्यावर योग्य उपचार करणे मशीनच्या आणि आपल्या हिताचे असते.
Powered By Sangraha 9.0