धातुकाम जुलै 2019 च्या अंकात आपण फ्लॅट टॉप ड्रिल जिगचा वापर कधी, केव्हा आणि कसा करायचा याविषयी सविस्तर जाणून घेतले आहे. अशा प्रकारची जिग प्लेट कधी वापरायची यासाठी काही महत्त्वाचे निकष आपण बघितले आहेत, त्याचा संक्षिप्त आढावा पुढे घेतला आहे.
• जेव्हा कार्यवस्तूचे वजन जास्त असते किंवा कार्यवस्तू आकाराने मोठी असते, तसेच ती हाताळण्यास गैरसोयीची असल्यास अशा प्रकारची जिग प्लेट वापरली जाते. कारण कार्यवस्तुच्या मानाने ही जिग प्लेट हलकी, आकाराने सुटसुटीत आणि हाताळण्यास सोयीची असते.
• जेव्हा लहान आकाराची भोके करायची असतात तेव्हा कर्तन बल कमी असल्याने लोकेटिंग पिन तुटण्याचा किंवा जिग प्लेटसह कार्यवस्तू फिरण्याचा धोका संभवत नाही.
• थ्रेडिंग असलेली भोके असल्यास ही पद्धत वापरू नये. कारण आटे करताना किंवा टॅप वर काढताना कार्यवस्तू वर उचलण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघात होऊ शकतो. तसेच कार्यवस्तू खराब होऊ शकते किंवा टॅपसुद्धा तुटू शकतो.
• जिग प्लेटचा आकार लहान असावा आणि तिचे वजन मर्यादित असणे गरजेचे आहे. शक्यतो हे वजन 12 ते 15 किलोपेक्षा जास्त नसावे. मात्र ही प्लेट उचलण्यास सोयीची असावी.
ड्रिलिंग जिगच्या अनेक प्रकारांपैकी हा एक महत्त्वाचा प्रकार आपण बघितला.आता आपण इंडेक्सिंग प्रकारच्या जिगविषयी माहिती घेणार आहोत. चित्र क्र.1 मध्ये कार्यवस्तूवर 8 भोके दाखविली आहेत. जर ही भोके करावयाची असतील तर प्रत्येक भोकासाठी कार्यवस्तू फिरवावी लागेल. या फिरविण्यालाच इंडेक्सिंग म्हणतात. दोन भोकांमधील कोन 450 आहे तसेच कोनीय अंतर समान आहे.
आता आपण हे जिग कसे कार्य करते ते पाहू. कार्यवस्तू लोकेटरच्या व्यासावर लोकेट केलेली आहे आणि C वॉशरच्या साहाय्याने घट्ट पकडली आहे. तसेच कार्यवस्तुचा पृष्ठभाग इंडेक्स प्लेटवर टेकलेला आहे. कार्यवस्तूवर पहिले भोक केल्यानंतर इंडेक्स पिन मागे ओढून, इंडेक्स प्लेट फिरविली जाते. इंडेक्स प्लेटवरील पुढच्या भोकात असलेल्या बुशमध्ये इंडेक्स पिन लोकेट करून कार्यवस्तूवर दुसरे भोक केले जाते. अशाप्रकारे कार्यवस्तूवर एकापाठोपाठ एक अशी आठही भोके केली जातात. कार्यवस्तुची काढघाल न करता सर्व भोके केल्यामुळे (एकाच सेटिंगमध्ये) भोके अचूक होतात आणि त्यातील परस्परसंबंधसुद्धा अचूक मिळतो. जेवढी भोके कार्यवस्तूवर असतात तेवढीच भोके इंडेक्स प्लेटवर केलेली असतात. जो परस्परसंबंध कार्यवस्तूवरील भोकांचा असतो तोच परस्परसंबंध इंडेक्स प्लेटवरील भोकांमध्ये ठेवणे गरजेचे आहे. आता आपण या जिगमधील काही महत्त्वाच्या भागांची माहिती घेऊ. (चित्र क्र. 3)
1. जिग बॉडी/सांगाडा
हा सांगाडा वेल्ड केलेला असल्यामुळे याला स्ट्रेस रिलीव्ह करणे आवश्यक आहे. हा सांगाडा अत्यंत मजबूत असावा लागतो, कारण हा सांगाडा हालविताना जर कुठे धडकला तर त्याचा जिगवर विपरीत परिणाम होत नाही, अर्थात ही हालचाल काळजीपूर्वकच केली पाहिजे.
2. इंडेक्स पिन
इंडेक्स पिन बुशमध्ये मागेपुढे होते. इंडेक्स पिनवर बसविलेला नॉब मागे ओढला की, इंडेक्स पिनचा डायमंड आकाराचा भाग इंडेक्स प्लेटवर बसविलेल्या बुशमधून बाहेर येतो आणि मग आपल्याला इंडेक्स प्लेट फिरविता येते. इंडेक्स पिनच्या पुढच्या भागाला डायमंडचा आकार दिलेला असतो, याचे कारण म्हणजे इंडेक्स प्लेटच्या केंद्रामध्ये असलेले भोक आणि इंडेक्सिंगसाठी असलेले भोक +/-0.01 मिमी.मध्ये नियंत्रित केलेले असते. इंडेक्स पिनच्या पुढच्या भागाला डायमंडचा आकार दिल्यामुळे ही पिन इंडेक्स प्लेटवरील बुशमध्ये सहजपणे जाते आणि तशीच सहजपणे बाहेर येते. इंडेक्स पिनच्या मागच्या बाजूला स्प्रिंग दिलेली आहे. ही स्प्रिंग का बसविली आहे, असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. कारण पिन हाताने मागे पुढे करता येते. परंतु, जेव्हा इंडेक्स पिन हाताने मागे ओढली आणि इंडेक्स प्लेट थोडी जरी फिरविली किंवा इंडेक्स पिन सोडून दिली तरी या स्प्रिंगमुळे इंडेक्स पिन इंडेक्स प्लेटवर टेकते. जेव्हा इंडेक्स प्लेटवरील बुश इंडेक्स पिनच्या समोर येते तेव्हा आपोआपच इंडेक्स पिन इंडेक्स प्लेटवर असलेल्या बुशमध्ये घुसते. इंडेक्स पिन आणि बुशला दिलेल्या चॅम्फरमुळे आणि स्प्रिंगच्या बलामुळे इंडेक्स पिन इंडेक्स प्लेटवर असलेल्या बुशमध्ये सहजपणे लोकेट होते. ऑपरेटरला इंडेक्स पिन लोकेट करण्यासाठी काहीही करावे लागत नाही. हे अतिशय महत्त्वाचे कार्य स्प्रिंग करते. स्प्रिंग नेहमी आतील किंवा बाहेरील व्यासावर लोकेट केलेली असते.
3. लोकेटर
अशा प्रकारच्या लोकेटरचे काम आपण जुलै 2019 च्या लेखात पाहिले आणि त्याचप्रमाणे लोकेटरवर खाचा (स्लॉट) का दिलेल्या आहेत हेदेखील पाहिले आहे. कार्यवस्तूवर 8 भोके करावयाची असल्यामुळे 8 खाचा दिलेल्या आहेत. हा लोकेटर सांगाड्यावर दिलेल्या बुशमध्ये लोकेट केलेला असून तो गोल फिरविता (गाइड फिट केलेला असतो H7/g6) येतो. लोकेटरचा डावीकडचा पृष्ठभाग बुशच्या पृष्ठभागाच्या बाहेर 0.02 मिमी. ठेवलेला आहे. (चित्र क्र. 2) यामुळे स्पेसर आणि बुश यामध्ये 0.02 मिमी. अंतर राखता येते.
हे अंतर नियंत्रित ठेवल्यामुळे इंडेक्स प्लेट गोल फिरविणे सोपे जाते. त्याचप्रमाणे ती मागे पुढे जास्त हलतही नाही. स्क्रूच्या साहाय्याने लोकेटर इंडेक्स प्लेटवर बसविलेला आहे. लोकेटरचा जो पृष्ठभाग इंडेक्स प्लेटवर बसतो त्या बाजूचा व्यास थोडा कमी करून एक स्टेप दिलेली आहे. त्यामुळे लोकेटर, बुशवर न बसता इंडेक्स प्लेटवरच बसेल. लोकेटरच्या डावीकडे नर्ल नॉब आणि स्पेसर हे कॅप स्क्रूच्या साहाय्याने लोकेटरवर बसविलेले आहेत. लोकेटरला डावीकडे आंतरआटे आणि उजवीकडे बाह्यआटे असल्याने हा लोकेटर केस हार्ड करून आवश्यक ठिकाणी ग्राइंडिंग करावे लागते. त्याची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
अ. ज्या व्यासावर कार्यवस्तू बसते तो व्यास,
ब. ज्या व्यासावर इंडेक्स प्लेट बसते तो व्यास,
क. ज्या व्यासावर खास बुश बसते तो व्यास, (हे तीनही व्यास समकेंद्रित असलेच पाहिजेत.)
ड. जो पृष्ठभाग इंडेक्स प्लेटवर बसतो,
इ. जो पृष्ठभाग खास बुशच्या संपर्कात येतो.
लोकेटर इंडेक्स प्लेटवर कॅप स्क्रूच्या साहाय्याने बसविला आहे.
4. स्लिप बुश आणि लाइनर
स्लिप बुशचे काम आपण पूर्वी पाहिले आहेच. शक्यतो प्रमाणित बुश वापरण्याला प्राधान्य द्यावे. जर कार्यवस्तूमध्ये फक्त 10 मिमी. व्यासाचे भोक करावयाचे असेल, तर फिक्स रिन्युएबल बुश वापरता येते. परंतु, 10H7 व्यासाचे भोक करायचे असेल तर स्लिप रिन्युएबल प्रकारची 3 बुश वापरावी लागतील. उदाहरणार्थ,
क. Ø 9.5 ड्रिलसाठी बुश
ख. Ø14 ड्रिलसाठी बुश (कार्यवस्तुतील भोकाला चॅम्फर करण्यासाठी)
ग. Ø10 रीमरसाठी वापरावे लागणारे बुश
त्यामुळे वरील उदाहरणात 3 स्लिप रिन्युएबल बुशच वापरावी लागतील. जिग प्लेटमध्ये स्लिप बुश वापरण्यासाठी त्या मापाचा लाइनर बसविला आहे.
5. स्पेसर
इथे वापरलेला स्पेसर कठीण (हार्ड) आणि ग्राइंड केलेला आहे. इंडेक्स प्लेट फिरविताना हा स्पेसर बुशच्या पृष्ठभागावर घासल्यामुळे झिजू शकतो आणि हे आपल्याला चालणार नाही. त्यामुळे 0.02 मिमी. हे नियंत्रित माप टिकणार नाही. म्हणून स्पेसर कठीण आणि ग्राइंडिंग करणे आवश्यक आहे.
6. नर्ल नॉब
हा नॉब इंडेक्स पिन मागे पुढे करण्यासाठी दिलेला आहे. तो बुशच्या पृष्ठभागावर टेकतो आणि त्यामुळे इंडेक्स पिन जास्त पुढे जाऊ शकत नाही. ही इंडेक्स पिन मागे खेचताना स्प्रिंगच्या बलाविरुद्ध कार्य करावे लागते. पिन नीट पकडता यावी म्हणून पुढच्या भागात नॉबचा व्यास कमी करून नॉबला हेडसदृश आकार दिलेला आहे, जेणेकरून पिन मागे खेचणे सुलभ व्हावे. स्प्रिंगच्या बलामुळे मात्र पिन पुढे जाते.
7. इंडेक्स पिनचे बुश
हे बुश इंडेक्स पिनची हालचाल अचूकपणे व्हावी यासाठी दिलेले आहे. इंडेक्स पिन या बुशमध्ये गाइड केलेली आहे. हे बुश कठीण आणि ग्राइंडिंग केलेले आहे. स्क्रूच्या साहाय्याने ते सांगाड्यावर बसविले आहे. या बुशचा आतील व्यास थोड्या लांबीत मोठा करून ग्राइंडिंगची लांबी कमी केलेली आहे. ग्राइंडिंग करावा लागणारा पृष्ठभाग नेहमीच कमीतकमी ठेवावा. इंडेक्स पिनला गाइड करणारा व्यास आणि सांगाड्यावर टेकणारा पृष्ठभाग हे एकमेकांस लंबरूप असलेच पाहिजेत.
या जिगमधील महत्त्वाच्या भागांचे कार्य आपण पाहिले. इतर भागांचे कार्य आपण आधीच्या लेखात बघितले आहेच. यासंबंधी आपल्या काही समस्या/शंका असल्यास कळवा. त्याचे निराकरण जरूर करू.
अजित देशपांडे
अतिथी प्राध्यापक, ARAI, SAE
0 9011018388
ajitdeshpande21@gmail.com
अजित देशपांडे यांना जिग्ज आणि फिक्श्चर्समधील जवळपास 36 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी किर्लोस्कर, ग्रीव्हज् लोम्बार्डिनी लि., टाटा मोटर्स अशा विविध कंपन्यांत काम केले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ते अतिथी प्राध्यापक आहेत.