औद्योगिक क्षेत्रामध्ये गेल्या तीन दशकांमध्ये मशिनिंग सेंटर, सी.एन.सी. यंत्रणाची आवश्यकता आणि वापर जसा वाढला आहे, तशाच पद्धतीने सी.एम.एम.ची मागणी आणि वापरही वाढत चालला आहे. सी.एम.एम.चा वापर, योग्य प्रोबची निवड, मशिनची देखभाल इत्यादींचा उहापोह करणारी प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारित एक कथामाला आम्ही सुरू करीत आहोत. प्रत्यक्षात सोडविलेल्या समस्यांबरोबर इतर पोषक गोष्टींचे महत्त्वही यामध्ये विशद केलेले असेल.
ऑफिसच्या वळणावर असतानाच विजय देशमुखचा मोबाईल खणखणला. इतक्या सकाळी विजय कोणाचा फोन घेत नसे, कारण ‘अभिनव उद्योगा’ची धुरा हाती घेतल्यापासून सर्वात आधी शॉप फ्लोअरवर फेरी मारून मगच दिवसातील स्वतःच्या कामांना सुरुवात करण्याचा त्याचा शिरस्ता त्याने कसोशीने सांभाळला होता. परंतु, अनंतराव ठाकूरांचा बंगळुरूवरुन सकाळीच फोन आहे, म्हणजे काहीतरी महत्त्वाचे आहे हे त्याने ओळखले.
“गुड मॉर्निंग ठाकूरसाहेब, आज भल्या पहाटे आमची कशी काय आठवण काढलीत?” त्याने अदबीने विचारले. गेल्या तीन वर्षांमधे अनंतरावांच्या बालाजी इंडस्ट्रीबरोबर निरनिराळ्या प्रकल्पांमध्ये विजय देशमुखच्या अभिनव उद्योगाने बरोबरीने सहभाग घेतला होता. सी.एम.एम.चे उत्पादन करणाऱ्या जगभरातील नामांकित कंपन्या व्यवसायासाठी स्पर्धा करीत असताना भारतातील अभिनव उद्योग ही सी.एम.एम. बनविणारी कंपनी विजयने 20 वर्षांत आपल्या धडाडीवर आणि उत्तम टीमवर्कच्या जोरावर नावारूपाला आणली होती. आपल्या निर्यात प्रकल्पासाठीच्या पहिल्या बैठकीतच अनंतराव ठाकूर ‘अभिनव’च्या टीमवर खूश झाले होते. त्यांच्या कंपनीला जर्मनीतील एका कंपनीकडून मोठ्या आकाराच्या गिअर बॉक्स कास्टिंग आणि यंत्रणासाठी मोठी ऑर्डर मिळाली होती. त्या यंत्रभागांचे मोजमापन करण्यासाठी परदेशी सी.एम.एम. विकत घेण्याची आवश्यकता होती. त्याची किंमतही जास्त होती. साठीतील ठाकूरसाहेब नवीन प्रकल्पासाठी जर्मनीला जाताना विजयलाही बरोबर घेऊन गेले होते आणि भारतीय बनावटीची ‘अभिनव’ची सी.एम.एम. जर्मनीतील विदेशी सी.एम.एम.पेक्षा कशी योग्य किंमत असलेली आणि उच्चतम दर्जाची आहेत हे विजयने तिथे सोदाहरण पटवून दिल्याने हा प्रकल्प चांगलाच ‘कॉस्ट इफेक्टिव्ह’ झाला होता. तेव्हापासून दोघांचे इतके सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित झाले होते की ते विजयशी कामाविषयी बोलतानाही एकेरीतच बोलत.
“विजय, तुझ्याकडे सगळ्यात चांगला ॲनालिस्ट कोण आहे? त्याला आमच्याकडे जरा आठ दिवस पाठवावे लागेल.” विजयच्या मनात लगेचच मोहनचे नाव आले. परंतु, तो ग्राहकांना ओशासन देण्याआधी आपल्या सहकार्यांशी बोलून प्रश्न समजून घेत असे. “सर, मी तुम्हाला बरोबर चार तासांत फोन करतो” असे सांगून त्याने फोन बंद केला आणि तो ऑफिसमध्ये शिरला. मार्केटिंग डायरेक्टर पवारांना कल्पना देऊन, सर्व माहिती घेऊन त्याने संबंधितांची मिटिंग अर्ध्या तासात बोलवायला सांगितली.
काही वेळातच विजय देशमुख, मार्केटिंग डायरेक्टर प्रकाश पवार आणि कस्टमर इंजिनिअरिंग टीम लीडर मोहन हे सर्व शेजारील मिटिंग रूममध्ये जमले.
“एम. डी. साहेबांना बंगळुरूहून ठाकूर साहेबांचा फोन आला होता. तेव्हा बालाजी इंडस्ट्रीची काय समस्या चालू आहे?” पवारांनी मोहनला विचारले.
“मी आतापर्यंतची सर्व माहिती सांगतो,” मोहनने ओव्हरहेड प्रोजेक्टरवर एका गिअर बॉक्सचे चित्र दाखविले. (चित्र क्र.1)
“बालाजी इंडस्ट्रीच्या बेळगांव फाऊंड्रीमध्ये या गिअर बॉक्सचे कास्टिंग तयार होते आणि इनिशियल पिकअपचे (मूलभूत) यंत्रण करून ती पुण्यात व्हर्साटाईल इंजिनिअरिंगमध्ये पुढील यंत्रणासाठी पाठविली जाते. पुण्यात सर्व क्लिष्ट (क्रिटिकल) आणि पुढील आवश्यक यंत्रण पूर्ण केल्यावर आपल्या सी.एम.एम.वर त्याचे पूर्ण मोजमापन होते. हे गिअर बॉक्स ‘बालाजी’च्या बंगळुरूच्या मशिनिंग सेंटर युनिटला पाठविली जातात. तिथे राहिलेले अंतिम यंत्रण, प्रिझर्व्हेशन आणि पॅकेजिंग करून हे गिअर बॉक्स जर्मनीला पाठविले जातात. बंगळुरूलाही सी.एम.एम. आहे. तिथे दर दहापैकी एक गिअर बॉक्स ऑडिट म्हणून तपासला जातो.”
“बरोबर आहे, याच ऑर्डरसाठी आपण मागच्या वर्षी ‘व्हर्साटाईल’ला एक सी.एम.एम. विकले आहे. आता काय समस्या आली आहे?” पवार म्हणाले.
“या गिअर बॉक्सला समोरील (फ्रंट) A फेसवर यंत्रण आहे, तसेच मागील (रिअर) फेस B वरही यंत्रण आहे. यंत्रणाचे सर्व अहवाल (रिपोर्ट) योग्य आहेत. बंगळुरूमधील ऑडिटचे अहवालसुद्धा सर्वसाधारणपणे जुळतात. परंतु, गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी पहिले ऑडिट केले. त्यामध्ये एका महत्त्वाच्या मापाच्या रीडिंगमध्ये फरक आला. बाकी सर्व रीडिंग बरोबर आहेत. दोन्हीकडील रीडिंग दाखविणारा हा तक्ता (तक्ता क्र. 1) पहा”, मोहनने सांगितले.
“हा फरक पाहिल्यावर त्यांनी व्हर्साटाईल इंजिनिअरिंगशी संपर्क केला. परंतु, ‘व्हर्साटाईल’ने पुन्हा तपासून त्यांची रीडिंग बरोबर असल्याचे सांगितले. इकडे ‘बालाजी’मध्ये आणखी एक पॅक केलेला यंत्रभाग पुन्हा बाहेर काढून त्यांनी तपासला. त्यातही वरील प्रकारचा फरक सापडला.” मोहन म्हणाला.
“ठाकूर साहेबांना असे वाटते आहे की, त्यांचे सी.एम.एम. मशिन विदेशी असल्याने अचूक आहे आणि ‘व्हर्साटाईल’मधील मशिन भारतीय बनावटीचे असल्याने हा फरक येत असावा. जर असे असेल, तर खूप मोठा खर्च येईल. त्यामुळे ते चिंतित झाले आहेत.” पवार म्हणाले, “मी कालच त्यांच्याशी या विषयावर बोललो आणि हा प्रश्न आपण निश्चित सोडवू असे त्यांना मी सांगितले आहे. त्यांच्याकडे 10 गिअर बॉक्स पॅक करून निर्यातीसाठी तयार आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये कंटेनर बुक झाला आहे. आपल्याला हा प्रश्न येत्या तीन दिवसांत सोडवावा लागेल.”
विजयने थोडा वेळ विचार केला, “मोहन, तुझे या आठवड्याचे काय शेड्युल आहे?” त्याने विचारले.
“सर, पुढील आठवड्यात आपले सर्व्हिस ट्रेनिंग सुरू आहे. त्याची तयारी चालू आहे, पण मी आज दुपारी पुण्यातच ‘व्हर्साटाईल’ला भेट देऊन उद्या सकाळी बंगळुरूला जाऊ शकेन” मोहनने सांगितले. “प्रवासामध्ये मी सर्व प्रशिक्षण साहित्य तपासू शकेन.”
“गुड”, असे म्हणून विजयने ठाकूरांना फोन लावला. “हॅलो विजय, मला माहीत होते, तू चार तास म्हटल्यावर तीन तासांतच फोन करणार. काय करूयात?” ठाकूर म्हणाले.
“सर, मोहन तुमच्याकडे बंगळुरूला उद्या सकाळी येईल.” विजय.
“व्हेरी गुड, मला वाटते या प्रकरणाचा लवकर सोक्षमोक्ष लावायला हवा. मी आमच्या लक्ष्मणला त्याला विमानतळावरून थेट फॅक्टरीत घेऊन यायला सांगतो.” असे म्हणून त्यांनी फोन बंद केला.
मोहनने दुपारच्या वेळेत व्हर्साटाईल इंजिनिअरिंगमध्ये जाऊन ड्रॉईंग, यंत्रण आणि तपासण्याची पद्धत जाणून घेतली. सकाळी पहिल्या विमानाने तो बंगळुरूला पोहोचला. बालाजी इंडस्ट्रीचा क्वालिटी मॅनेजर लक्ष्मण त्याची वाट पहातच होता. मध्ये एक इडली, कॉफीचा ब्रेक घेऊन ते दोघेही कारखान्याकडे निघाले.
“मोहन तू लवकरच्या फ्लाईटने आलास ते बरं झालं, नाहीतर बंगळुरूचे एकदा सकाळचे ऑफिस ट्रॅफिक सुरू झाले की, पोहोचायला साडेतीन तास लागतात. आता आपण दीड तासातच पोहोचू” लक्ष्मणने सांगितले. “तुझी हरकत नसेल तर ठाकूर साहेबांना फक्त हॅलो करून आपण थेट आमच्या लॅबमध्येच जाऊ. कारण ही सी.एम.एम.ची समस्या नसावी असे मला वाटत आहे आणि जर हे सर्व गिअर बॉक्स नाकारण्यात आले तर पुन्हा पुण्याला मशिनिंगसाठी पाठवावे लागतील, त्यात खूप वेळही जाईल. आमची कन्साइनमेंटची तारीख जवळ आली आहे, तेव्हा सर्वांनाच काळजी आहे.”
मोहनने अर्थातच होकार दिला आणि जुजबी उपचार आटोपून ते दोघेही बालाजी इंडस्ट्रीच्या लॅबमध्ये पोहोचले. “आपण एकदा तुमची सर्व मोजमापने तपासून पाहू आणि ‘व्हर्साटाईल’ची सर्व मोजमापनेही तपासून पाहू.” मोहनने सुचविले. त्या दोघांनी सर्व मोजमापे तपासली. “व्हर्साटाईलची गिअर बॉक्सची रीडिंग साधारणतः एकाच रेंजमध्ये आहेत. याचा अर्थ त्यांची कार्यपद्धती आणि कार्यपद्धतीची क्षमता चांगली दिसते, परंतु या सर्व रीडिंगमध्ये आणि ‘बालाजी’मध्ये घेतलेल्या एका रीडिंगमध्ये काय फरक आहे?” मोहनने विचारले.
“या गिअर बॉक्सच्या समोरच्या A फेसवर आणि पाठीमागील B फेसवर असलेली बाकी सर्व रीडिंग मर्यादेत आहेत. परंतु, या दोन्हींशी संबंधित बोअरची लंबमापने (समोरील फेसशी स्क्वेअरनेस) मर्यादेच्या बाहेर दिसतात. अ फेसवर जो 400 मिमी. आकाराच्या बोअरचा बाहेरील फेस आहे त्या फेसशी इ फेसवर असलेल्या 100 मिमी. बोअरची सेंटर लाईन ही 60 मायक्रॉन स्क्वेअरनेसमध्ये (होल पोझिशन) पाहिजे. हे रीडिंग सुमारे 100 मायक्रॉन दिसत आहे. त्यामुळे ऑपरेशनमध्ये काही सुधारणा कराव्या लागतील असे दिसते.” लक्ष्मण म्हणाला.
“तुम्ही पार्ट ड्रॉईंगप्रमाणे सर्व रीडिंग घेतली आहेत ना?” मोहनने सी.एम.एम.च्या टेक्निशियन राजूला विचारले. “होय सर, मी ही प्रिंटआऊट काढूनच ठेवली आहे. याची सर्व रीडिंग दर्शविणारा तक्ताही समोर ठेवला आहे.” राजू.
“आपण एक गिअर बॉक्स पुन्हा एकदा तपासूया काय?” मोहनने सुचविले. “पूर्ण प्रोग्रॅम आपण रन करूया.”
काही वेळातच गिअर बॉक्स बसवून राजूने मशिनवर प्रोब चढवून संपूर्ण स्कॅनिंग सुरू केले. सुमारे 30 मिनिटांमध्ये सर्व मापने घेण्यात आली. मोहन हे सर्व लक्षपूर्वक पहात होता. मध्येच त्याच्या काहीतरी लक्षात आले, परंतु तेथील सर्व मापन पूर्ण होईपर्यंत तो काही बोलला नाही. मोजमापनाचा अहवाल घेऊन पुन्हा ते एकत्र जमले. सर्व अहवाल आधीसारखेच दिसत होते. किरकोळ पुनरावृत्ती फरक सोडता बाकी मापने तक्ता क्र. 2 प्रमाणे जुळत होती.
“तुम्ही मध्ये प्रोब बदलत नाही का?” मोहन.
“नाही सर. गिअर बॉक्स खूप मोठा आहे आणि बहुतेक रीडिंग फेस A आणि B वरच आहेत. त्यामुळे एका बाजूने A फेसची सर्व रीडिंग आम्ही संपवितो. बाजूची काही किरकोळ रीडिंग घेतो. पुन्हा दुसऱ्या बाजूच्या फेस B वरील रीडिंग घेऊन तो प्रोब थांबतो.” राजू.
“पण मग हा मुख्य इनपुट फेस आणि आऊटपुट बोअरचा स्क्वेअरनेस कशाने मोजता?” मोहन.
“सर A बाजूवरील सर्व फेस, बोअरची रीडिंग आणि B बाजूवरील सर्व फेस, बोअरच्या रीडिंगवरून प्रोग्रॅममधून स्क्वेअरनेसची व्हॅल्यू मिळते.” राजू.
“हा मशिनवरील प्रोब अंदाजे 150 मिमी. लांबीचा आहे. तुमच्याकडे जास्तीतजास्त किती लांबीचा प्रोब आहे?” मोहन.
“आमच्याकडे सर्वात लांब प्रोब 250 मिमी. लांबीचा आहे.” लक्ष्मणने सांगितले.
“या गिअर बॉक्सची रुंदी 400 मिमी. आहे. आपल्याला कमीतकमी 400 मिमी.चा प्रोब पाहिजे. एखादा कुठे मिळू शकेल काय?” मोहन.
“या इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये रेल्वेचे भाग तयार होतात. त्यांच्याकडे मोठे सी.एम.एम. आणि प्रोब आहेत. ठाकूर साहेबांनी त्यांच्या मित्रास फोन केला तर बहुतेक मिळेल. पण एवढा प्रोब कशासाठी? त्यावर कंपनेही जास्त येतील.” लक्ष्मण म्हणाला.
“आपण आधी एका लांब प्रोबने ट्रायल करूया, मग पाहू काही मिळते का?” मोहनने सुचविले.
“मी साहेबांशी बोलून प्रोबची व्यवस्था करतो. आपल्याला बहुतेक दुपारपर्यंत मिळेल, तोपर्यंत आपण जेवण करून घेऊ.” लक्ष्मण म्हणाला.
सांबारभात खाऊन ते सर्व परत आले, तोपर्यंत नवीन प्रोबचा बॉक्स टेबलवर आणून ठेवलेला होता.
“ठाकूर साहेबांचे मित्र इकडे सगळीकडे असल्यामुळे अर्ध्या वाक्यात काम होते बुवा!” असे म्हणून लक्ष्मण आणि राजूने तो प्रोब काळजीपूर्वक प्रोब स्टेशनवर बसविला. मोहनने या दोघांबरोबर सल्लामसलत करून प्रोग्रॅममध्ये आवश्यक ते बदल केले.
“आता प्रथम तुम्ही प्रोबने आधीचे रीडिंग तपासून घ्या आणि त्यानंतर फक्त 400 मिमी. बोअरच्या फेसचे रीडिंग घेऊन तो प्रोब तसाच आतमध्ये सरळ जाऊ द्या. समोरील 100 मिमी. बोअरची सेंटर लाईन काढून त्याच्या स्क्वेअरनेसचे रीडिंग घ्या.” मोहन.
“अरे हे रीडिंग एकदम ओके आले, काय झाले होते?” राजूने आश्चर्याने विचारले. (तक्ता क्र. 3)
“आपण रीडिंगचे तीन सेट घेऊ आणि शेजारी टेबलवर चर्चा करू.” मोहन म्हणाला.
कॉन्फरन्स रूममध्ये कॉफी घेत घेत मोहनने त्यांना त्याचे विचार सांगितले. “प्रथम या गिअर बॉक्सचे कार्य कसे चालते हे आपण समजून घेऊ. याच्या A फेसवर जे 400 मिमी.चे बोअर आहे, त्यामध्ये पॉवरचा इनपुट बसविला जातो. त्यामध्ये हाउसिंग बेअरिंगवर असलेला आऊटपुट शाफ्ट आणि त्यावर 300 मिमी.चा एक मोठा गिअर आणि त्यापुढे दोन छोटे गिअर बसतात. B फेसवरील 100 मिमी. बोअरमध्ये हा आऊटपुट शाफ्ट एका बेअरिंगच्या साहाय्याने बसविलेला असतो. त्यामुळे A फेसवर बसणारे हाउसिंग आणि शाफ्ट यांची अलाईनमेंट योग्य राखली जाते.”
“हो, हे साधारण आम्हाला माहीत आहे.” लक्ष्मण म्हणाला.
“प्रत्यक्ष कार्य लक्षात घेऊनच प्रत्येक कंपोनंटचे डिझाइन तयार होते.” मोहनने सांगितले. “कंपोनंटचे यंत्रण कसे करायचे हे ठरविताना ड्रॉईंग आणि फॉर्म टॉलरन्स समजून घेऊन त्याप्रमाणे मशिनिंगची पद्धती आणि निरनिराळे टप्पे ठरविले जातात. हे करीत असताना दिलेल्या टॉलरन्सचा अर्थ आणि व्याप्ती समजून घेणे आवश्यक असते. त्यानंतरच प्रत्यक्ष कंपोनंटचे मशिनिंग चालू होते. बहुतेक मोठ्या उद्योगांमध्ये हे आतापर्यंत मी सांगितलेले कार्य ‘मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग’ विभाग करतो. मी काल इथे येण्यापूर्वी व्हर्साटाईल इंजिनिअरिंगमध्ये जाऊन आलो. त्यांच्याकडे मशिनिंग करतानादेखील एकाच सेटअपमध्ये A फेस आणि B फेसवरील वर्तुळाकार बोअर, यांचे मशिनिंग केले जाते. तिथे सी.एम.एम.वर तपासणी करताना, स्क्वेअरनेससाठी लांब प्रोबच्या साहाय्याने अचूक तपासणी होते.”
“पण, आमच्याकडे एवढा लांब प्रोब नसल्याने आणि छोट्या प्रोबने सर्व तपासण्या करता येत असल्याने आम्ही हा प्रोग्रॅम वापरला” लक्ष्मण म्हणाला. “मला एक शंका आहे की, दोन्ही प्रकारामध्ये नक्की फरक कशामुळे पडला? छोट्या प्रोबनेही अचूक तपासण्या होतात आणि कंपनेही येत नाहीत.”
“हा दोन रीडिंगमधील फरक का पडला याचे कारण एकच असावे. एकाच छोट्या प्रोबने सर्व तपासण्या करताना तो जेव्हा कंपोनंटच्या चारी बाजूंनी फिरून पुढील फेसवर जातो, तेव्हा रीडिंगमधील अनिश्चितता थोडी वाढते. लिनिअर रीडिंगमध्ये त्याचा एवढा परिणाम दिसत नाही. परंतु, क्लिष्ट मापने करत असताना या टप्प्यांच्या रीडिंगचा आणि त्यातील अनिश्चिततेचा एकत्रित परिणाम म्हणून मापन चुकीचे झालेले दिसते.” मोहनने समजावून सांगितले.
“अरे व्वा!” मागून आवाज आला. अनंतराव ठाकूर आले आहेत, हे कोणाच्या चटकन लक्षात आले नव्हते. “म्हणजे सर्व गिअर बॉक्स ओके आहेत तर!” ते म्हणाले.
“आता आपण सगळ्यात आधी 400 मिमी.चा प्रोब ऑर्डर करू...अन् ‘व्हर्साटाईल’ला कळवून टाका की तुमच्याकडे झालेल्या कामामध्ये काहीही समस्या नाही.”
“येस सर, मी आजच हे करतो. मोहन इथे आल्याने ही समस्या लवकर सुटली. आम्हाला एकदा असेही वाटत होते की, आमचे सी.एम.एम. परदेशी आहे आणि ‘व्हर्साटाईल’चे ‘अभिनव’ कडून घेतलेले आहे. त्यामुळे काही चुकीचे मोजमापन होत आहे काय? पण, तोही प्रश्न मिटला हे चांगले झाले.” लक्ष्मण मोहनकडे पहात हसून बोलला.
“सर, मी उद्या रात्री परत जाणार होतो, पण आज आपण प्रश्न सोडविला आहे तर आज रात्री किंवा उद्या सकाळी मी गेलो तर चालेल ना?” मोहनने विचारले.
“बेलाशक! काहीच अडचण नाही. मी आजच विजय देशमुखांना फोन करून सांगतो, तुमचा हिरा लगेच परत पाठवितो. इथल्या इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये पाच-सहा जण सी.एम.एम. वापरणारे आहेत. पुढे केव्हातरी एकदा सर्वांचा एक सेमिनार घेऊ आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या अनुभवातून एक ट्रेनिंग सेशन करा... काय?”
“सर... थँक्स” मोहन विनयाने म्हणाला. एक कूट प्रश्न सोडविण्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते.
अच्युत मेढेकर
औद्योगिक सल्लागार
9764955599
achyut.medhekar@gmail.com
अच्युत मेढेकर यांत्रिकी अभियंते असून, त्यांना उत्पादन आणि दर्जा नियंत्रण क्षेत्रातील जवळपास 42 वर्षांचा अनुभव आहे.
(तांत्रिक तपशील : मोमिन ए. वाय, ॲप्लिकेशन अँड ट्रेनिंग हेड, ॲक्युरेट गेजिंग अँड इन्स्ट्रुमेंटस् प्रा. लि.)