धातुकाम एप्रिल 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या लेखात आपण ड्रिलिंग प्रक्रियेतील काही मूलभूत गोष्टींचा अभ्यास केला होता. यामध्ये इंडेक्सेबल ड्रिलिंग टूलचा वापर करून काही कामे, उदाहरणार्थ, स्टील, कास्ट आयर्नच्या यंत्रभागांचे अंतर्गत बोरिंग आणि बाह्य टर्निंग करणे शक्य असते. त्याबाबत जाणून घेतले. आम्ही सामान्यत: सेंटरिंग टूल, ड्रिल, बोरिंगसाठी अंतर्गत बोरिंग टूल आणि बाह्य टर्निंगसाठी बाह्य हत्यारधारक (टूल होल्डर) अशी वेगळी टूल निवडतो. या दोन टूलच्या जागी एकच ड्रिलिंग टूल वापरणे शक्य असते. या कामांसाठी इंडेक्सेबल ड्रिलिंग टूल कशी वापरता येतील, ते आपण या लेखात समजून घेणार आहोत.
ड्रिलिंग प्रक्रियेत टूलमध्ये मध्यवर्ती (सेंटर) कटिंग आणि परिघी (पेरिफेरल) असे दोन इन्सर्ट असतात. सेंटर इन्सर्टचा वापर भोकाच्या मध्यभागी असलेले मटेरियल काढण्यासाठी आणि परिघी इन्सर्टचा वापर भोकांचे अंतिम माप प्राप्त करण्यासाठी केला जातो. त्याचे तपशील चित्र क्र. 1 मध्ये दाखविले आहेत.
ड्रिल बॉडीमध्ये इन्सर्ट अशा प्रकारे बसविले जातात की, ड्रिलिंग प्रक्रियेदरम्यान ते एकमेकांच्या क्षेत्रात काम करतात. याचा उपयोग चिप तोडण्यात आणि फ्ल्यूटद्वारे त्यांना सहजपणे बाहेर काढण्यास होतो. फ्ल्यूटवरील हेलिक्स कोन कमी असला म्हणजे डीप होल ड्रिलिंगमध्ये चिप सुलभतेने बाहेर काढता येतात. ड्रिलिंगमध्ये केव्हाही वेगवेगळ्या स्थानांसाठी एकच समान इन्सर्ट वापरणे, भिन्न प्रकारचे इन्सर्ट वापरण्यापेक्षा अधिक किफायतशीर असते. ड्रिल बॉडीमध्ये वापरला जाणारा एक सर्वसाधारण इन्सर्ट चित्र क्र. 2 मध्ये दाखविला आहे. त्याला 4 कडा (एज) आहेत. ड्रिलच्या व्यासांनुसार इन्सर्टचे आकार बदलतात. मोठ्या व्यासांसाठी (D12.5 आणि त्याहून अधिक) आणि 5D इतक्या खोलीपर्यंत ड्रिलिंग करण्यासाठी इंडेक्सेबल ड्रिल वापरली जातात.
इंडेक्सेबल ड्रिल 2 किंवा 3 टूलची जागा घेऊ शकतात. परिघी इन्सर्ट अंतर्गत बोरिंग तसेच बाह्य टर्निंग कामासाठी वापरले जातात. केवळ काही यंत्रभागांसाठीच अशी कामे केली जातात. ड्रिलिंग आणि बोरिंगच्या एका अॅप्लिकेशनमध्ये आम्ही कसे काम केले ते पाहिले की, ही बाब स्पष्ट होईल.
यंत्रभाग चित्र क्र. 3 मध्ये दाखविला आहे. सध्याच्या सेटअपमध्ये ड्रिल आणि बोरिंग टूल अशी दोन टूल आहेत.
कामाचा तपशील
यंत्रभाग : शाफ्ट
मटेरियल : एस.जी. आयर्न
कठीणपणा : 220-260 BHN
काम : ड्रिलिंग आणि बोअरिंग
मशीन : सी.एन.सी. लेथ
विद्यमान प्रक्रियेमध्ये वापरलेले पॅरामीटर आणि टूल, तक्ता क्र. 1 मध्ये दिले आहेत. बोरिंगसाठी 2 कोपऱ्यांचा इन्सर्ट असलेले टूल वापरले आहे. या कामात ड्रिलिंग हे रफिंग ऑपरेशन आहे आणि नंतर फिनिशिंग ऑपरेशन केले जाते.
सुधारित प्रक्रियेत ड्रिलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रिलचा वापर फिनिशिंगसाठीसुद्धा केला गेला. यामुळे हवी ती बोरिंग गुणवत्ता आणि पृष्ठीय फिनिश मिळू शकला. आम्ही ड्रिलिंगसाठी सध्याचे पॅरामीटरच कायम ठेवले. मात्र, बोरिंगमध्ये सरकवेग वाढविला. दोन्ही कामांसाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या इन्सर्टच्या श्रेणीपेक्षा नव्या इन्सर्टची श्रेणी अधिक कडक (टफ) आहे. ड्रिलच्या परिघी इन्सर्टद्वारे फिनिश बोरिंग केले.
विद्यमान 0.4 मिमी. त्रिज्येच्या तुलनेत नवीन ड्रिलिंग इन्सर्टच्या कोपऱ्यांची त्रिज्या 0.8 मिमी. आहे. त्रिज्येमध्ये झालेल्या या बदलामुळे आणि सरकवेगात झालेल्या वाढीमुळे चांगले टूल आयुर्मान आणि पृष्ठभाग फिनिश मिळण्यास मदत झाली, कारण 0.8 मिमी. त्रिज्येचा इन्सर्ट, वायपर इन्सर्टचे कार्य करीत होता.
कार्यवस्तूंसाठी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे, ते नेहमीच तपासून घेणे आणि त्यानंतरच टूल निश्चित करणे महत्त्वाचे आहे. एकच टूल वापरून दोन/तीन कामे एकत्रित करता येतात का ते पहा. यामुळे टूलिंगचा खर्च, टूल बदलण्यात लागणारा वेळ आणि टूलचा साठा (इन्व्हेंटरी) कमी होईल.
टूलिंगच्या नवीन पद्धतीमुळे ग्राहकांना मिळालेले फायदे पुढे दिले आहेत.
अ. टूल आयुर्मान 15 टक्क्यांनी वाढले.
ब. फिनिशिंगमधील यंत्रणास लागणारा वेळ 20 टक्के कमी झाला.
क. इन्व्हेंटरीमध्ये घट झाली.
ड. दोन्ही कामांना एकच टूल वापरले.
विजेंद्र पुरोहित
व्यवस्थापक (तांत्रिक साहाय्य),
ड्युराकार्ब इंडिया
9579352519
purohit@duracarb-india.com
विजेंद्र पुरोहित यांना मशीन टूल, कटिंग टूल डिझाइनमधील सुमारे 20 वर्षांचा अनुभव असून, सध्या ते 'ड्युराकार्ब इंडिया' कंपनीमध्ये तांत्रिक साहाय्य विभागाचे प्रमुख आहेत.