आजवर मानवाने प्रगती, शोध आणि अमर्याद वाढीच्या मागे लागून निसर्गाचे लचके तोडलेत. त्यामुळे निसर्गाची कधीही न भरून येणारी हानी झाली. त्याचाच परिणाम म्हणून निसर्गाने आजवर जे काही गमावले, ते परत घेतल्याशिवाय राहणार नाही असेच घडू लागले आहे.
कोविड-19 च्या अभूतपूर्व महाभयंकर संकटाशी सर्व जग सामना करीत असतानाच, या लॉकडाउनदरम्यान मनाला आनंद देणाऱ्या काही गोष्टी घडू लागल्या आहेत. वातावरणातील प्रदूषण कमी झाले आहे, 100 किलोमीटर दूर अंतरावरून न दिसणाऱ्या हिमालयाचे दर्शन व्हायला लागले आहे, शहरालगतच्या मोकळ्या रस्त्यावरून हरिण, मोर हिंडू फिरू लागले आहेत, आकाशात पक्षी स्वच्छंदीपणे सैर करू लागले आहेत. नद्या, नाले निर्मळपणे वाहू लागल्या आहेत. म्हणूनच कोविडच्या या सद्यस्थितीत ग्रीन मॅन्युफॅक्चरिंगच्या न संपणाऱ्या शाश्वत प्रवासात आलेले अनुभव आपल्या सर्वांना सांगणे मला या क्षणी अत्यंत महत्त्वाचे वाटते.
आम्ही 2016 साली सी.आय.आय. गोदरेज अप्लायन्सेस ग्रीनको क्लस्टरचे सदस्य होतो आणि आजही उत्तमतेचा हा प्रवास सी.आय.आय. गोदरेज इंटेरिओ अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स क्लस्टर आणि ZED-झीरो डिफेक्ट झीरो इफेक्ट क्वालिटी क्लस्टरच्या माध्यमातून सुरू आहे.
या दहा वर्षांच्या शिक्षणाचा परिणाम माझ्या कंपनीत शाश्वत लीन आणि ग्रीन कार्यपद्धती, संस्कृती रुजविण्यात झाला. ग्रीनको रेटिंग कार्यपद्धती आमच्या खुटाळे इंजिनिअरिंग उद्योगात रुजविल्यामुळे त्याचे 'ऑर्गनायझेशन विथ ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स'मध्ये झालेले परिवर्तन खूप सुखावह, समाधानकारक आणि अभिमानास्पद आहे.
एक उद्योजक म्हणून आपल्या युनिटमधील कामगार आणि अधिकाऱ्यांचे हित जपणे, त्यांच्यासाठी सोयीसुविधा पुरविणे हे माझे कर्तव्य आहे. कंपनीचे कामकाज 70 कामगार आणि अधिकारी सुव्यवस्थित पार पाडीत आहेत. यात 30 टक्के महिला कामगार आहेत. कंपनीत 'एक्सलन्स थ्रू कंटीन्युअस इम्प्रूव्हमेंट' ही संस्कृती आहे. गार्डन ग्रीन आउटसाइड अँड हॉस्पिटल क्लीन इनसाइड ही कार्यपद्धती आहे.
औद्योगिक सुरक्षितता, पर्यावरण रक्षण आणि उचित व्यवहार ही ध्येये आहेत.
महात्मा गांधी म्हणत, "Everyone must be his own scavenger" या विचारांना अनुसरून कंपनी सुरू झाल्यापासूनच आमच्याकडे दररोज माझ्यापासून प्रत्येकजण आपापली प्रसाधनगृहे स्वतः आळीपाळीने साफ करण्याची पद्धत आहे, ती नियमित पाळली जाते.
सी.आय.आय. मोठ्या उद्योगासाठी 'ग्रीनको' रेटिंग देत असते. अलीकडे त्यांनी लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ग्रीनको रेटिंग सिस्टिम तयार केली. हे रेटिंग देण्यासाठी सी. आय.आय.च्या तज्ज्ञांची समिती पुढील बाबींवर कंपनीचे परीक्षण आणि मूल्यांकन करते.
1. ऊर्जा कार्यक्षमता (एनर्जी एफिशियन्सी)
2. जलसंधारण (वॉटर कॉन्झर्वेशन)
3. पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी)
4. हरितगृह वायू उत्सर्जन (ग्रीनहाउस गॅस एमिशन)
5. कचरा व्यवस्थापन (वेस्ट मॅनेजमेंट)
6. मटेरियल संधारण 'पुनर्वापर आणि पुनर्वापर क्षमता' (मटेरियल कॉन्झर्वेशन : रिसायकलिंग आणि रिसायकलॅबिलिटी)
7. ग्रीन सप्लायचेन
8. इतर (वायु वीजन, आसपासचा प्रदेश, कल्पकता इत्यादी)
या सर्व घटकांमध्ये कंपनीने काय काम केले आहे त्याची छाननी करून कंपनीला योग्य ती श्रेणी (रेटिंग) दिली जाते.
त्यामध्ये देशात प्रथमच तीन एस.एम.ई. सेक्टरमधील कंपन्यांनी भाग घेतला आणि ग्रीनको रेटिंग प्राप्त केले. त्यापैकी खुटाळे इंजिनिअरिंग प्रा. लि. पहिल्याच प्रयत्नात प्लॅटिनम रेटिंग मिळविणारी देशातील अग्रेसर कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही कंपन्या सातारा जिल्ह्यातील असून गोदरेज अप्लायन्सेस, शिरवळच्या प्रमुख पुरवठादार आहेत. उद्योगात पर्यावरणाशी मैत्र राखणाऱ्या कार्यपद्धती अंमलात आणल्याबद्दल खुटाळे इंजिनिअरींग प्रा. लि. ला भारतीय उद्योग महासंघाच्या वतीने (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, सी. आय.आय.) दिला जाणारा ग्रीनको प्लॅटिनम हा सर्वोच्च दर्जा हैदराबाद येथे झालेल्या सी.आय.आय.च्या पाचव्या ग्रीनको शिखर परिषदेत देण्यात आला.
गोदरेज उद्योग समूहाचे प्रमुख आणि सी.आय.आय. सोहराब गोदरेज ग्रीन बिझनेस सेंटर हैदराबादचे अध्यक्ष जमशेद गोदरेज यावेळी म्हणाले, "पर्यावरण आणि आर्थिक विकास हे परस्परविरोधी नसून हातात हात घालून जातात. उद्योगांनी त्यांच्या भागधारकांशी पर्यावरणाबाबत अधिक खुले आणि पारदर्शक असायला हवे."
पर्यावरणाशी मैत्र राखण्याच्या या प्रवासात खुटाळे इंजिनिअरिंगने वीज, पाणी, कच्चामाल या नैसर्गिक स्रोतांचे जतन करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या आणि कार्यपद्धतीत सुधारणा केल्या. एनर्जी ऑडिट करून विविध प्रॉडक्शन लाइन्ससाठी वेगळे वीज मीटर बसविले. जास्त अश्वशक्ती असलेल्या विजेच्या मोटरना व्ही.एफ.डी. बसविले, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर बदलून कमी वीज वापरणारा स्क्रू कॉम्प्रेसर बसविण्यात आला. साताऱ्यात पहिलीच 40 kW क्षमतेची रूफटॉप सोलर पॉवर पीव्ही ग्रीड इंटरॅक्टिव्ह सिस्टिम उभारली. अशाप्रकारे शाश्वत ऊर्जा स्रोतांचा अधिक वापर करून 2022 पर्यंत 100% हरित ऊर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
पाण्याच्या बचतीसाठी प्रक्रियेत वापरलेल्या पाण्यावर एफ्लुअंट ट्रीटमेंट प्लांटमध्ये (ETP) पुनर्प्रक्रिया करून पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, भूजल पातळी वाढण्यासाठी मॅजिक पिट, सभोवतालच्या गार्डनमध्ये ठिबक सिंचन आणि काम करणाऱ्या सर्व लोकांच्यामध्ये जागरूकता वाढवून वीज, कच्चामाल (रॉ मटेरियल) आणि पाण्याची बचत केली आहे.
सी.आय.आय. ग्रीन बिझनेस सेंटर, हैदराबादच्या मदतीने कंपनीने आपल्या उद्योगात निर्माण होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा (ग्रीन हाउस गॅस एमिशन) अभ्यास केला. त्या अनुषंगाने हरित उद्योग धोरण आणि ग्रीन सप्लायचेन बनविण्यात आले. मिल्करन पद्धत राबविल्यामुळे वाहतुकीमध्ये (ट्रान्स्पोर्ट) होणारे अतिउत्सर्जन कमी झाले. रॉ मटेरियल कट टू साइझ, लेंग्थ, कॉइल फॉर्ममध्ये मागवून, टूल्समध्ये सुयोग्य बदल करून त्याची नासाडी कमी करण्यात यश मिळाले. उद्योगात ऊर्जा, पाणी, धातू या नैसर्गिक स्रोतांचे जतन आणि सुयोग्य वापर करण्यासाठी सतत सुधारणेचे कायझन तत्त्व राबविले जात आहे. उत्पादनात तयार होणाऱ्या औद्योगिक कचऱ्याची योग्य नोंद आणि नियंत्रण करणाऱ्या सर्व कार्यपद्धतींचा येथे अवलंब केला जातो. अत्युच्च ऊर्जा बचत करणाऱ्या प्रक्रिया, वस्तू आणि तंत्रज्ञानाचा वापर करणारी तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी कामगार कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची, घेतलेल्या परिश्रमांची योग्य दखल घेऊन बक्षीस देणारी आणि कायदेशीर बाबींच्या चौकटीत राहून कार्य करणारी ही कंपनी आहे. ISO 9001-2015 दर्जा आणि ISO 14001-2015 पर्यावरण सर्टिफिकेशन, ERP आणि लीन, ग्रीनको प्लॅटिनम रेटिंग क्लस्टर अंमलबजावणी, पुनरावलोकन, लेखा परीक्षण, प्रशिक्षण हे सर्व एकाचवेळी एकाच फॉर्मॅटमध्ये एकत्र करणे असाही एक महत्त्वाचा सुटसुटीत प्रयोग आम्ही साधला आहे. ज्यामुळे वेगवेगळे फॉर्मॅट, मिनिट्स राखणे या गोष्टींचा ताण कमी झाला.
"पृथ्वी आपल्या पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळाली नसून ती आपल्याला भावी पिढीकडून उधार मिळाली आहे, ती मानवाची भूक भागवू शकेल पण हाव नाही आणि इथे आपण केलेली घाण आपणच काढायला पाहिजे, बदलाची सुरुवात स्वतःपासून हवी!" या महात्मा गांधींच्या पर्यावरणाबद्दलच्या विचारांचा प्रभाव, पर्यावरणाप्रती असलेली काळजी, गोदरेजसारख्या पर्यावरणाप्रती जागरूक ग्राहकाकडून मिळालेली प्रेरणा आणि ISO 14001:2015 या पर्यावरण प्रमाणपत्राची पूर्तता या सर्व गोष्टी हरित सुधारणा करताना महत्त्वाच्या ठरल्या. सुधारणा ही एक अखंड प्रक्रिया आहे आणि ती सुरुच आहे. शाश्वत विकासाचा तोच मार्ग आहे.
शिरीष खुटाळे
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, खुटाळे इंजिनिअरिंग प्रा. लि.
9822032220
shirish@khutaleengg.com
शिरीष खुटाळे, खुटाळे इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ साताराचे (MAS) माजी अध्यक्ष असून गेली 42 वर्षे ते औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत.