संपादकीय

04 Jan 2021 10:42:04




1_1  H x W: 0 x
 
धातुकामच्या सर्व वाचक, लेखक, जाहिरातदार आणि हितचिंतकाना नवीन वर्षाच्या आणि दशकाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
2020 हे वर्ष केव्हा संपेल अशीच सार्वत्रिक भावना होती. गेल्या वर्षात वणवे, भूकंप, वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्ती तर होत्याच पण त्याचबरोबर कोविड विषाणूचे आक्रमण सर्व मानवी व्यवहाराला हतबल करणारे ठरले. पूर्ण जग या संकटात असतानाच त्याच्याशी सामना करण्याचे विविध पर्याय शोधत होते आणि आता जगण्याच्या नवीन पद्धती शिकून एका मोठ्या ‘ठप्प’ अवस्थेतून बाहेर पडत आहे. दुसऱ्या महायुद्धाने जशी नवीन जीवन पद्धती रूढ केली तसेच काहीसे जगण्याचे नवीन आयाम कोविड महामारीने पुढे आणले आहेत.
 
बंद झालेले व्यवसाय सुरू करताना उत्पादनक्षेत्रातील समूहाने आलेली आव्हाने मोठ्या हिंमतीने झेलली आणि त्यावर मात करण्यास सुरुवात केली आहे. सरकारी धोरणांचा सकारात्मक आधार आणि परस्पर सामंजस्य यांच्या जोरावर आज भारतातील उत्पादन उद्योग पुन्हा जोमाने सुरू झाला असल्याचे चित्र आहे. 2020 वर्षात सुमारे 43 लाख कोटींचा निवेश भारतीय उत्पादन क्षेत्रात झाला आहे. या क्षेत्राचा 2016 ते 2020 या कालावधीतील CAGR म्हणजेच कंपाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट 5% राहिला आहे. यामध्ये अर्थातच उत्पादन उद्योगाचा कणा असलेला वाहन उद्योग आघाडीवर आहे. या उद्योगासाठी लागणारे सुटे भाग पुरविणारा उत्पादन उद्योग पुन्हा झपाट्याने कामाला लागल्याचे दिसते आहे. 2016 ते 2020 याच काळात या क्षेत्रात 6% CAGR नोंदविला गेला आहे. नुसत्याच देशी बाजारपेठेसाठी नाही तर विदेशी बाजारातसुद्धा भारतीय उत्पादनांची मागणी वाढताना दिसते आहे. या क्षेत्रातील एकूण उलाढालीपैकी 21% उलाढाल निर्यातीमधून झालेली असेल, असा 2021 या वर्षाचा अंदाज वर्तविला जात आहे. युरोप आणि लॅटिन अमेरिकेच्या तुलनेत 15 ते 20% कमी उत्पादन खर्च असल्याने आणि सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणामुळे उपलब्ध झालेल्या नव्या संधींचा उपयोग केला जात असल्याने निर्यातवाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे.
 
गेल्या वर्षाने आपल्याला बरेच काही शिकविले. आपल्या खऱ्या गरजा काय आहेत ते सामान्य माणूस काय किंवा उद्योग काय, सर्वांनाच याचे यथार्थ भान आले आहे. रोजच्या आयुष्यातील संवाद, हालचाल, काम करावयाच्या पद्धती अशा अनेक गोष्टी आता नव्या स्वरूपात होताना दिसत आहेत. गेल्या वर्षापर्यंत फक्त IT क्षेत्रात वापरली जाणारी ‘वर्क फ्रॉम होम’ ही सवलत आता सर्व क्षेत्रात सहजपणे वापरली जाणारी रूढ पद्धत बनत चालली आहे. त्याला अनुरूप बदल कार्यपद्धतीमध्ये होत आहेत आणि ही कार्यपद्धती सक्षमपणे राबविली जाण्यासाठी उत्पादनक्षेत्रातही आधुनिक उपकरणे आणि प्रणाली वापरल्या जात आहेत. आपले उत्पादन वेळेवर, दर्जेदार आणि कमीतकमी खर्चात होण्यासाठी पारंपरिक उत्पादन पद्धतीतील बदल वेगाने होताना दिसत आहेत.
 
उत्पादकांना आणि कारखान्यात काम करणाऱ्या तंत्रज्ञांना उपलब्ध नवीन तंत्रांविषयी धातुकाम नेहमीच सर्वांगीण माहिती देण्याचा प्रयत्न करीत असते. गेल्या दशकामध्ये यंत्रण उद्योगातील कुठल्याही कारखान्यात सी.एन.सी. मशीन असणे ही बाब सर्वसामान्य झाली आहे. लघु, मध्यम क्षेत्रातील बहुसंख्य उद्योजकसुद्धा आता बहुअक्षीय मशीनचा वापर करू लागले आहेत. बाजारातील वाढती मागणी हे यामागचे प्रमुख कारण आहे. आता वेगाने निर्माण होणारे यंत्रभाग/उत्पाद ‘झीरो डिफेक्ट-झीरो इफेक्ट’ निकषावर कसे उतरतील याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजेच उत्पाद दर्जेदार तर हवाच पण त्याने वातावरणावर कुठलाही वाईट परिणाम करता कामा नये ही आता नुसती अपेक्षा नाही तर, गरज निर्माण झाली आहे. यासाठी आता गेजिंग आणि मेट्रॉलॉजी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे येऊ लागली आहेत. गेजिंग आणि मेट्रॉलॉजी हाच प्रमुख विषय असणाऱ्या या अंकात अचूक आणि क्षणार्धात होणाऱ्या मोजमापनासाठी लेझर तसेच कॅमेरा वापरून 100% खात्रीशीर तपासणी कशी करता येते याची सविस्तर माहिती आपणास वाचावयास मिळेल. आधुनिक उपकरणांना उत्पादन व्यवस्थेत सामावून घेताना कारखान्यातील पारंपरिक तपासणी उपकरणांची कशी काळजी घ्यावी, तसेच त्यांच्या कॅलिब्रेशनचे महत्त्व सांगणारे लेखही आपल्याला उपयुक्त वाटतील.
सर्वांनी आत्तापर्यंत 'धातुकाम'ला दिलेला आधार पुढील दशकातही अधिकाधिक बळकट होत जाईल हा विश्वास आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी यातील लेखन अधिक सकस, वाचकाभिमुख होईल यासाठी सहकार्य करावे हीच अपेक्षा.

दीपक देवधर
deepak.deodhar@udyamprakashan.in
Powered By Sangraha 9.0