उपकरणांची हाताळणी आणि कॅलिब्रेशन

08 Jan 2021 12:10:36
मोजमापनासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या उपकरणांच्या हाताळणीमध्ये आजही अनेक कारखान्यांमध्ये सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या परंतु चुकीच्या असलेल्या बऱ्याच पद्धतींचा वापर केला जातो. या लेखात नेहमी वापरल्या जाणाऱ्या मोजमापन उपकरणांच्या बाबतीतील काही निरीक्षणे आणि उपकरणांची हाताळणी, कॅलिब्रेशन ( calibretion )करण्याचा क्रम आदी गोष्टींवर विश्लेषणात्मक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे.


मागील 15 वर्षांपासून आम्ही 'उपकरणांचे (इन्स्ट्रुमेंट) कॅलिब्रेशन' करण्याच्या व्यवसायात आहोत. अनेक MSME तसेच मोठ्या कारखान्यांच्या उत्पादन प्रक्रियेमधील या महत्त्वाच्या कामाची आम्ही काळजी घेत असतो. सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या परंतु चुकीच्या असलेल्या बऱ्याच पद्धती आम्ही या व्यवसायात काम करीत असताना पाहिल्या. या पद्धतींमुळे उपकरणांच्या आणि ओघानेच उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. या लेखात आम्ही नेहमी वापरल्या जाणाऱ्या मोजमाप उपकरणांच्या बाबतीतील आमची काही निरीक्षणे आपल्यासमोर मांडत आहोत.

मापन उपकरणांची योग्य आणि परिणामकारक हाताळणी
आमच्या एका ग्राहकाकडील उपकरणे वारंवार बिघडत होती. त्याने आम्हाला बोलाविले आणि चर्चेदरम्यान त्यांनी असे सांगितले की, 'आमच्याकडील उपकरण योग्यप्रकारे काम करीत नाहीत किंवा रीडिंगमध्ये पुनरावर्तनक्षमता (रिपीटॅबिलिटी) नसल्याची तक्रार आमचे ऑपरेटर वारंवार करतात. आमच्या उपकरणामध्ये वारंवार बिघाड होतो आणि ती वारंवार दुरुस्त करावी लागतात.' त्यांची समस्या आम्ही लक्षात घेतल्यानंतर आम्ही त्यांच्या कारखान्यामध्ये जाऊन ऑपरेटर ती उपकरणे कशी वापरतात, त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवतात की नाही हे पाहिले. त्यावेळी असे लक्षात आले की तेथील उपकरणांची हाताळणी योग्य पद्धतीने होत नाही.
त्यानंतर आम्ही या ग्राहकाकडील संबंधित कर्मचाऱ्यांना उपकरणे हाताळताना काय काळजी घ्यावी, ती कशी हाताळावीत, याबाबतचे प्रशिक्षण दिले.
 
हे ही वाचा : तपासणी उपकरणांचे कॅलिब्रेशन 
 
 
उपकरण हाताळणीतील काही महत्त्वाचे मुद्दे
· मोजमाप घेण्यासाठी कोणतेही उपकरण वापरण्यापूर्वी आपण त्याची पुनरावर्तनक्षमता तपासली पाहिजे आणि ते त्याच्या पूर्ण मर्यादेपर्यंत चालते आहे की नाही, ते तपासले पाहिजे.
· उपकरणांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी ती उपकरणे प्लॅस्टिकच्या किंवा लाकडी पेट्यांमध्ये ठेवली पाहिजेत.
· जर आपण डायल कॅलिपरचा विचार केला, तर कॅलिपरचा जॉ सरकविण्यासाठी एक बटण दिलेले असते, जे अंगठ्याने दाबून कॅलिपरचा हलणारा भाग पुढे-मागे केला जातो. परंतु, बहुतेक वेळी कॅलिपर पकडण्यासाठी ऑपरेटर हलणारे स्केल हातात धरतो आणि घाईघाईमध्ये तिला पुढे-मागे करतो. यामुळे कॅलिपरच्या आतील गिअर अॅसेम्ब्ली खराब होते. डायल कॅलिपर पकडण्याची अयोग्य आणि योग्य पद्धत चित्र क्र. 1 आणि 2 मध्ये दाखविली आहे.
 

1-2_1  H x W: 0 

1-2_2  H x W: 0
 
 
 
 
· जर आपण बाह्य (एक्स्टर्नल) मायक्रोमीटरचा विचार केला, तर ऑपरेटर रॅचेटऐवजी थिम्बल पकडून मायक्रोमीटर वापरतो. बऱ्याचवेळा ऑपरेटर रॅचेट त्याच्या मर्यादेपेक्षा अधिक फिरवितो. त्यामुळे रॅचेटमधील स्प्रिंग खराब होते. बाह्य मायक्रोमीटर पकडण्याची अयोग्य आणि योग्य पद्धत चित्र क्र. 3 आणि 4 मध्ये दाखविली आहे.
 

3-4_1  H x W: 0 

3-4_2  H x W: 0
 
· अनेकदा हाइट गेज पकडण्यासाठी किंवा तो उचलण्यासाठी ऑपरेटर बेसऐवजी कॉलमचा वापर करतो. त्यामुळे गेजची लंबता (परपेन्डिक्युलॅरिटी) बिघडते. हाइट गेज पकडण्याची अयोग्य आणि योग्य पद्धत चित्र क्र. 5 आणि 6 मध्ये दाखविली आहे.

5_1  H x W: 0 x


· कंपॅरेटर स्टँड बेसचा विचार केला तर, इथेही ऑपरेटर बेसऐवजी कॉलम वापरून स्टँड पकडतो किंवा उचलतो. त्यामुळे लंबता बिघडते. बेसच्या एकाच भागाचा उपयोग केल्यामुळे त्यावर पोचे (डेंट), खड्डे पडतात आणि त्याचा योग्य सपाटपणा (फ्लॅटनेस) रहात नाही. म्हणूनच बेसचा सपाटपणा टिकविण्यासाठी त्याचे नियमितपणे लॅपिंग केले जाणे आवश्यक आहे. 
 
· मोजमाप झाल्यानंतर उपकरण एका बॉक्समध्ये ठेवणे आवश्यक आहे. बऱ्याचवेळा उपकरण जमिनीवर पडते आणि खराब होते. गंज टाळण्यासाठी, विशेषत: पावसाळ्यात, ऑपरेटरने उपकरण आणि गेजवरती पेट्रोलियम जेली लावावी.
· बऱ्याचवेळा मशीन बेडवर किंवा टेबलवर उपकरणे ठेवली जातात. ही चुकीची प्रथा आहे.


7_1  H x W: 0 x

कॅलिब्रेशन म्हणजे काय?

ज्याचे कॅलिब्रेशन करावयाचे असेल त्या उपकरणाने घेतलेली रीडिंग आणि त्याच्यापेक्षा दसपट अचूक असलेल्या मास्टर उपकरणाद्वारे घेतलेली रीडिंग, यांच्यात तुलना करून कॅलिब्रेशन करावयाच्या उपकरणातील प्रत्यक्ष त्रुटी/विचलन यांचे मापन करण्याची प्रक्रिया म्हणजे कॅलिब्रेशन.

कॅलिब्रेशन प्रक्रियेचा क्रम
1. उपकरण प्रयोगशाळेत येते.
2. उपकरण अॅसिटोन/पेट्रोल/आयसोप्रोपाइल अल्कोहोलद्वारे (IPA) साफ केले जाते. गेजवरील गंज काढण्यासाठी सूक्ष्म ग्रेडचा खरकागद (फाइन पेपर) वापरला जातो.
3. कॅलिब्रेशन सॉफ्टवेअरमध्ये उपकरणाचा तपशील नोंदविला जातो. यात ग्राहकाचे नाव, पत्ता, उपकरणाची रेंज, आकार, लघुत्तम माप (लीस्ट काउंट), मेक, आय.डी. क्रमांक, अनुक्रमांक, स्थान, कॅलिब्रेशन वारंवारिता इत्यादी सर्व बाबी समाविष्ट असतात.
4. ही नोंद करताना कॅलिब्रेशनच्या पूर्वीची स्थिती तपासली जाते. यात मापन करण्याच्या क्षेत्रात कोणतेही पोचे किंवा खराबी आहे का, उपकरण नीट काम करीत आहे का आणि एकंदरीत ते सुस्थितीमध्ये आहे का, ते पाहिले जाते.
5. उपकरण आणि मास्टर, प्रयोगशाळेतील वातावरणाशी रुळण्यासाठी आणि स्थिर तापमानावर येण्यासाठी 2-4 तास प्रतीक्षा केली जाते.
6. कॅलिब्रेशनच्या कार्यपद्धतीत नमूद केल्यानुसार वेगवेगळ्या पॅरामीटरचे मोजमाप घेण्यास सुरुवात केली जाते.
7. सामान्य रूढीनुसार रीडिंग, मर्यादेच्या आत आहे की नाही हे पाहिले जाते. तसे नसल्यास ग्राहकाला उपकरणाची दुरुस्ती करण्याचे अथवा उपकरण बदलण्याचे सुचविले जाते.
8. कॅलिब्रेशन अहवालाची तांत्रिक व्यवस्थापकाद्वारे पडताळणी करून त्याच्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली जाते.

कॅलिब्रेशन अहवालाबद्दल समजून घेणे

कॅलिब्रेशन अहवाल हातात पडल्यानंतर, वापरकर्त्याला त्यातील बऱ्याच गोष्टी समजत नाहीत. हे कॅलिब्रेशन अहवाल कसे पहावेत, कसे समजून घ्यावेत त्यासाठी चित्र क्र. 8 मध्ये दिलेला नमुना कॅलिब्रेशन अहवाल आणि त्यातील संज्ञा पहा.

A).... ला कॅलिब्रेट केले : ही कॅलिब्रेशन केल्याची तारीख आहे.
B).... रोजी जारी केला : ही अहवाल दिल्याची तारीख आहे.
C) प्रमाणपत्र क्रमांक : हा अनन्य (युनिक) प्रमाणपत्र क्रमांक आहे.
D).... पुढील कॅलिब्रेशनची नियुक्त तारीख : या तारखेला पुन्हा कॅलिब्रेशन करावयाचे आहे.
E) आय.डी. क्रमांक : हा ग्राहकाने दिलेला अनन्य ओळख क्रमांक आहे.
F) अनुक्रमांक : हा उपकरणाचा अनुक्रमांक आहे.
G) CCSPL आय.डी. क्रमांक : हा प्रयोगशाळेने दिलेला अनन्य ओळख क्रमांक आहे.
H) पर्यावरणीय स्थिती : कॅलिब्रेशन करताना असलेले तापमान आणि आर्द्रता
I) संदर्भ मानक : त्या विशिष्ट उपकरणासाठी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मानक (दस्तऐवज) क्रमांक. हा भारतीय/जर्मन/अमेरिकन/ब्रिटिश मानक असू शकतो.
J) कॅलिब्रेशन कार्यपद्धती : विशिष्ट उपकरण कॅलिब्रेशन करण्याच्या कार्यपद्धतीचा हा क्रमांक असतो. यात कॅलिब्रेशनची सविस्तर प्रक्रिया असते.
K) उपकरण ओळख चिन्ह (ट्रेसेबिलिटी) :
एका विशिष्ट उपकरणाचे कॅलिब्रेशन करण्यासाठी जे मास्टर उपकरण वापरले जाते त्याचा तपशील. यात नाव, आय.डी. क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, जिथून मास्टरचे कॅलिब्रेशन केले त्या लॅबचा प्रमाणपत्र क्रमांक, तिची पुढील कॅलिब्रेशन करण्याची तारीख (ड्यू डेट) वगैरे असते.
L) मापनाची अनिश्चितता : हा मापनाच्या परिणामांशी संबंधित पॅरामीटर आहे. मापन केलेली मूल्ये मोजल्या जाणाऱ्या परिमाणाच्या (डायमेन्शन) संदर्भात किती विस्तारात पसरणे योग्य मानले जाऊ शकते, हे यातून दाखविले जाते.
M) कॅलिब्रेशनचे निकाल : कॅलिब्रेशन केलेल्या उपकरणाच्या विविध पॅरामीटरची कॅलिब्रेशन केलेली मूल्ये यात दिली जातात.
या मापनामध्ये निरीक्षण केलेला आकार निर्दिष्ट (स्पेसिफाइड) मर्यादेत आहे. म्हणून गेज OK आहे. जर गेजने झीज मर्यादा (वेअर लिमिट) ओलांडली, तर गेज NOT OK असते.
जेव्हा कॅलिब्रेशन अहवाल ग्राहकाकडे जातो आणि ग्राहक तो अहवाल अगदी बारकाईने पाहतो, तेव्हाही ते उपकरण वापरण्यासाठी ठीक आहे की नाही, हे त्याला ठरविता येत नाही. फारच थोड्या उपकरणांच्या संदर्भ मानकांमध्ये (भारतीय/आंतरराष्ट्रीय मानक) त्यांच्या स्वीकृतीचे निकष स्पष्टपणे सांगितलेले असतात. आपण व्हर्नियर कॅलिपरचे उदाहरण घेऊ.
'अ' ग्राहक 0.04 मिमी. असा अगदी कमी टॉलरन्स असलेल्या यंत्रभागांसाठी कॅलिपर वापरतो. 'ब' ग्राहक 0.50 मिमी. म्हणजे तुलनेने सौम्य टॉलरन्स असलेल्या यंत्रभागांसाठी कॅलिपर वापरतो. 'अ' ग्राहकाचा स्वीकृती निकष 0.02 मिमी. आणि 'ब' ग्राहकाचा निकष 0.10 मिमी. असू शकतात. म्हणूनच ज्या त्या यंत्रभागाच्या क्लिष्टतेवर स्वीकृती निकष अवलंबून असतात. त्यामुळे, ग्राहकाने प्रत्येक उपकरणाचा स्वीकृती निकष निश्चित करून, तो त्याच्या हिस्टरी कार्डमध्ये नोंदविणे आवश्यक आहे.
जर आपण 0.0005 मिमी. रेझोल्यूशन असलेली डायल वापरून 0.1 मिमी. टॉलरन्स असलेल्या कार्यवस्तूचे मापन करीत असाल, तर आपण फारच उच्च अचूकता असलेले उपकरण वापरीत आहात.
जर आपण 0.1 मिमी. टॉलरन्स असलेल्या कार्यवस्तूसाठी 0.1 मिमी. रेझोल्यूशन असलेली डायल वापरीत असाल, तर आपण फारच कमी अचूकता असलेले उपकरण वापरीत आहात. या कामात 0.01/0.001 मिमी. रेझोल्यूशनचे उपकरण वापरणे योग्य असेल.

मापन उपकरणाची कॅलिब्रेशन वारंवारिता ठरविणे

उपकरण/गेजची कॅलिब्रेशन वारंवारिता कशी ठरवायची, असा प्रश्न ग्राहक आम्हाला नेहमी विचारतात. ग्राहकाला उपकरणाच्या वापरानुसार कॅलिब्रेशनची वारंवारिता ठरविण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते. क्वचितच वापरल्या जाणाऱ्या उपकरणाची कॅलिब्रेशन वारंवारिता 1 वर्षापर्यंत असू शकते आणि सतत वापरल्या जाणाऱ्या उपकरणासाठी ती 1 वर्षापेक्षा कमी असू शकते.
नवीन आणि वापरात असलेल्या अशा दोन्ही उपकरणांसाठी कॅलिब्रेशन करणे हे आवश्यक आहे. कारण नवीन उपकरणामध्येही काही त्रुटी असू शकतात, ज्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे उपकरण पडले अथवा आपटले तर त्याचे कॅलिब्रेशन तातडीने करावे.

उपकरण कॅलिब्रेट केले नाही तर काय होईल?
जर ऑपरेटरने कॅलिब्रेट न केलेले उपकरण/गेज वापरले तर...
अ. उत्पादाची अस्वीकृती (रीजेक्शन)
ब. ऑपरेटर/गुणवत्ता हमी (QA) अभियंत्यांचा आत्मविश्वास जातो.
क. ISO/IATF/ग्राहक ऑडिटमध्ये 'अनुरूप नाही (NC)' असा शेरा
ड. ग्राहकांच्या ऑर्डर गमावल्या जाऊ शकतात.
इ. कारखान्यात मोठा अपघात होऊ शकतो.
जर आपल्याला आपण केलेल्या उत्पादनाच्या गुणवत्तेची ग्वाही द्यायची असेल तर, त्यासाठी वापरल्या गेलेल्या प्रक्रियेबरोबरच तपासणीसाठी वापरली जाणारी उपकरणे योग्य वेळी कॅलिब्रेट करणे तसेच कारखान्यात ती काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0