चुकीच्या सरकवेगामुळे कटर तुटले

16 Oct 2021 15:38:42
कारखान्यात काम करताना आलेल्या समस्यांवर प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळे उपाय शोधले जातात. या लेखमालेमध्ये अशा प्रकारच्या समस्यांवर उपाय शोधताना वापरलेल्या युक्त्या आणि क्लृप्त्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
 
 Improper method_1 &n
 
 
 
आमच्या कंपनीत रीअर अॅक्सलवर असलेल्या खाचेचे (स्लॉट) यंत्रण स्पेशल पर्पज मशीनवर (एस.पी.एम) करण्यात येत होते. जेव्हा दोन रीअर अॅक्सल असलेल्या ट्रकेच्या मागणीत वाढ झाली, त्यावेळी या कामासाठी आम्ही आणखी एक मशीन वापरण्यास सुरुवात केली. हे मशीन आधी तशाच प्रकारची परंतु थोड्या वेगळ्या डिझाइनची खाच तयार करण्यासाठी वापरण्यात येत होते. खाचेच्या डिझाइनप्रमाणे दोन्ही एस.पी.एम. वेगवेगळी बनविलेली होती.
 
दुसऱ्या मशीनचा वापर पूर्ण क्षमतेने सुरू केल्यानंतर स्लॉटिंग कटर तुटण्याची समस्या येऊ लागली. केवळ याच खाचेचे यंत्रण करण्यासाठी बनविण्यात आलेला कटर तुटत असल्याने कामामध्ये अडचणी येऊ लागल्या. तुटलेल्या कटरची बारकाईने तपासणी केली असता खाच करण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला जात होता ती पद्धत चुकीची (चित्र क्र. 1) असल्याची बाब आमच्या लक्षात आली. दोन वेगवेगळ्या अॅक्सलच्या खाचेच्या डिझाइनमध्ये फरक होता. तो फरक यंत्रणादरम्यान लक्षात घेतला गेला नव्हता. त्यामुळे ही समस्या येत होती.
 

Improper method_1 &n 

चित्र क्र. 1 : अयोग्य पद्धत

 
पहिल्या अॅक्सलवरील खाच केवळ परीघावर (पेरिफेरल) होती. ती अक्षाला समांतर अशी व्यासावर होती. त्यासाठी कार्यवस्तूला सरकवेग (फीड) देणे योग्य होते. दुसऱ्या अॅक्सलची खाच अक्षाला काटकोनात आरपार होती. त्यामुळे दुसऱ्या अॅक्सलमध्ये कटरचा प्रवेश वेगळ्या प्रकारचा होता. यामध्ये कटरच्या 'आर्क ऑफ काँटॅक्ट' या सूत्राचा वापर केला होता. जी पद्धत पहिल्या अॅक्सलसाठी होती तीच पद्धत दुसऱ्या अॅक्सलसाठी वापरून चालणार नव्हते आणि नेमके तेच केले गेले. मशीन नियोजन विभागाने याकडे दुर्लक्ष केले. आरपार खाचेसाठी समांतर खाचेच्या मशीनमध्ये पूर्वीप्रमाणेच कार्यवस्तूला सरकवेग देऊन खाचेचे यंत्रण केले, ज्यात 'आर्क ऑफ काँटॅक्ट' अगदी अयोग्य होता. त्यामुळे कटर तुटायला लागले. जेव्हा कटरची सरकवेग देण्याची पद्धत बदलून योग्य प्रकारे (चित्र क्र. 2) सरकवेग देण्यास सुरुवात केली तेव्हा कटर तुटण्याची समस्या थांबली.
 

The right method_1 & 

चित्र क्र. 2 योग्य पद्धत

 

निष्कर्ष : टूल निवडणाऱ्या तज्ज्ञांकडून आणि नियोजन करणाऱ्या विभागाशी चर्चा न करता बदल करू नयेत. तसेच एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणतेही प्रयोग करू नयेत हे या घटनेवरून लक्षात घेणे गरजेचे आहे. जेव्हा यंत्रण (मशीनिंग) प्रणालीमध्ये सरकवेग देण्याची पद्धत बदलली तेव्हा कटर तुटण्याची समस्या थांबली.
 
9225631129
sbd20766@gmail.com
सुरेंद्र दातार यांत्रिकी अभियंते असून, टाटा मोटर्समध्ये 34 वर्षे टूल इंजिनिअरिंग विभागात DGM पर्यंतच्या विविध पदांवर काम करून निवृत्त झाले आहेत.

 
 
Powered By Sangraha 9.0