डिझेल इंजिनमधील सिलिंडर हेड हा एक महत्त्वाचा भाग (पार्ट) आहे. त्याच्या कार्यक्षमतेवर इंजिनची कामगिरी (परफॉरमन्स) अवलंबून असते. यातील कॉन्सेंट्रिसिटी, रनआउट आणि स्वेअरनेस तपासणी गेजबद्दल सखोल भाष्य करणारा लेख.
चित्र क्र. 1 : सिलिंडर हेडमधील व्हॉल्व्ह गाइड आणि व्हॉल्व्ह सीट इन्सर्टची सेक्शनल सबअॅसेम्ब्ली
डिझेल इंजिनमधील सिलिंडर हेड हा एक महत्त्वाचा भाग (पार्ट) आहे. त्याच्या कार्यक्षमतेवर इंजिनची कामगिरी (परफॉरमन्स) अवलंबून असते. चित्र क्र. 1 मध्ये सिलिंडर हेडची महत्त्वाची मापे दिलेली आहेत. चित्र क्र. 2 मध्ये व्हॉल्व्ह सीट, व्हॉल्व्ह स्लीव्ह, व्हॉल्व्ह आणि स्प्रिंग यांची जोडणी दाखविली आहे.
चित्र क्र. 2 : व्हॉल्व्ह सीट, व्हॉल्व्ह स्लीव्ह, व्हॉल्व्ह आणि स्प्रिंग यांची जोडणी
कार्य
सिलिंडर हेडमध्ये कॅमशाफ्टच्या हालचालीमुळे (मेकॅनिझम) व्हॉल्व्हची कायम वर खाली हालचाल होत असते. व्हॉल्व्ह हा स्प्रिंग भारीत (लोडेड) असल्यामुळे तो कायम सिलिंडर हेडमधील व्हॉल्व्ह सीटवर बसत असतो. कॅमशाफ्टच्या हालचालीमुळे व्हॉल्व्हवर दाब (F) पडतो आणि व्हॉल्व्ह, व्हॉल्व्ह सीटपासून वेगळा होऊन वर-खाली हालचाल करतो. व्हॉल्व्ह आणि व्हॉल्व्ह स्लीव्ह या दोन्हींच्या व्यासामधील कमीतकमी क्लिअरन्स 4 ते 6 मायक्रॉन असावा. त्यामुळे दोन्हींच्या त्रिज्येमधील प्ले 2 ते 3 मायक्रॉनच्या मर्यादेमध्ये राहतो. प्लेमुळे वर-खाली दिशेतील हालचालीमध्ये अपेक्षित असलेली अचूकता मिळते.
व्हॉल्व्ह सीट संकेन्द्रीयता तपासणी
सिलिंडर हेडमध्ये व्हॉल्व्ह स्लीव्हच्या भोकाशी व्हॉल्व्ह सीटची (चित्र क्र. 2) संकेन्द्रीयता (कॉन्सेंट्रिसिटी) अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे त्याची तपासणी करावी लागते. व्हॉल्व्ह सीटची संकेन्द्रीयता मोजण्यासाठी लागणाऱ्या गेजच्या डिझाइनचे तपशील चित्र क्र. 3 मध्ये दिले आहेत. व्हॉल्व्ह सीटची संकेन्द्रीयता कशी मोजायची याचे तपशील पुढे दिले आहेत.
चित्र क्र. 3 : व्हॉल्व्ह सीटची एककेंद्रियता मोजण्यासाठीचे तपासणी गेज
1. सुधारित (मॉडिफाइड) रॉड, व्हॉल्व्ह स्लीव्ह भोकामध्ये घालणे. सुधारित रॉड आकुंचन-प्रसरण तत्त्वावर डिझाइन केला आहे. त्यामुळे व्हॉल्व्ह स्लीव्हचे भोक आणि सुधारित रॉडमध्ये प्ले रहात नाही आणि मोजमापन अचूक होते.
2. सुधारित रॉड, कार्बन बॉलवर एम. एस. प्लेटवर टेकविला जातो. बॉल योग्य आकाराचा आणि प्लेट ग्राइंडिंग केलेली असावी.
3. गेजवरील डायल इंडिकेटरचा (LC 0.001 मिमी.) दर्शक (पॉइंटर), व्हॉल्व्ह सीटवर टेकवून '0' वर सेट केला जातो. डायल प्रेशर अपेक्षित अचूकतेच्या (टॉलरन्स) दुप्पट असावे.
4. हँडल धरून गेज स्वतःभोवती फिरविले जाते आणि डायलवरील रीडिंगमधील नोंद केली जाते. जो जास्तीतजास्त बदल असतो तो म्हणजे एककेंद्रियतेतील 'एरर' समजला जातो.
5. अशी दहा रीडिंग पाहून त्याची सरासरी काढून एककेंद्रियतेची खात्री केली जाते. हे सर्व करताना डायलचा '0' सेट केलेला असतो. तो हलला नाही याची खात्री करून घेणे प्रत्येकवेळी आवश्यक असते.
फेस रनआउट तपासणी
चित्र क्र. 4 : फेस रनआउट आणि स्क्वेअरनेस तपासणीचे गेज
व्हॉल्व्ह स्लीव्ह भोकाशी (चित्र क्र. 2) सिलिंडर फेसचा रनआउट तपासला जातो. चित्र क्र. 4 मध्ये फेस रनआउट तपासण्यासाठी लागणाऱ्या डिझाइनचे तपशील दिले आहेत. व्हॉल्व्ह सीट संकेन्द्रीयता तपासणीच्या तपशीलामधील क्रमांक 1 ते क्रमांक 5 टप्प्यांप्रमाणेच फेस रनआउटची तपासणी केली जाते. फक्त क्रमांक 3 मध्ये दर्शक सिलिंडर हेड फेसवर टेकविला जातो. क्रमांक 4 मध्ये जो जास्तीतजास्त बदल असतो, तो फेस रनआउट एरर समजला जातो.
फेस स्क्वेअरनेस तपासणीमध्ये व्हॉल्व्ह सील भोकाशी (चित्र क्र. 2) सिलिंडर फेसचा स्क्वेअरनेस तपासला जातो. चित्र क्र. 4 मध्येच फेस स्क्वेअरनेस तपासण्यासाठी लागणाऱ्या डिझाइनचे तपशील दिले आहेत. व्हॉल्व्ह सीट संकेन्द्रीयता तपासणीच्या तपशील क्रमांक 1 ते 3 आणि 5 प्रमाणेच फेस स्क्वेअरनेसची तपासणी केली जाते. फक्त क्रमांक 3 मध्ये दर्शक, सिलिंडर हेड फेसवर टेकविला जातो. हँडल, बॉडीमध्ये फिरवून (स्विंग) आणि पुढे मागे हलवून पाहिजे असलेल्या ठिकाणी डायल इंडिकेटर नेला जातो. डायल इंडिकेटरवरील रिडिंगमधील नोंद केली जाते. जो जास्तीतजास्त बदल असतो तो म्हणजे फेस स्क्वेअरनेस एरर समजला जातो.
प्रत्यक्ष मोजमापन
चित्र क्र. 3 आणि 4 मध्ये दाखविलेल्या गेजच्या साहाय्याने सिलिंडर हेडची संकेन्द्रीयता, फेस रनआउट आणि फेस स्क्वेअरनेसची तपासणी केल्यानंतर मिळालेली रीडिंग तक्ता क्र. 1 मध्ये दिली आहेत. या रीडिंगच्या माध्यमातून असे लक्षात येते की, अपेक्षित रीडिंगपेक्षा मिळालेली रीडिंग कमी आहेत, म्हणून यंत्रभाग बरोबर आहे.
तक्ता क्र. 1
वरील सर्व मोजमापनात जे गेज वापरले आहे त्यात सुधारित रॉडचे महत्त्व खूप आहे. जर संकेन्द्रीयता, फेस रनआउट आणि फेस स्क्वेअरनेसची अपेक्षित अचूकता नसेल, तर सुधारित रॉडऐवजी दंडगोलाकार (सिलिंड्रिकल) पिन वापरून ही तपासणी करता येते. यामध्ये पिन आणि व्हॉल्व्ह स्लीव्हमधील क्लिअरन्स कमीतकमी ठेवावा. यामध्ये ग्रीज वापरावे म्हणजे त्यामधील क्लिअरन्स कमी होतो. हे एक स्वस्त आणि सोपे गेज होऊ शकेल. एम. एस. प्लेटऐवजी सरफेस प्लेट वापरल्यास त्यात आणखी चांगली अचूकता मिळते.
9822324248
rgjoshi.kop@gmail.com
रामचंद्र जोशी यांत्रिकी अभियंते आहेत. त्यांना मशीन टूल, जिग्ज, फिक्श्चर, एस.पी.एम. टूलिंग, प्रॉडक्ट डिझाइन, डेव्हलपमेंट, क्वालिटी सिस्टिम आदी क्षेत्रातील कामाचा सुमारे 45 वर्षांचा अनुभव आहे. ते सध्या सल्लागार म्हणून काम करतात.