दंडगोलाकार यंत्रभागांचे अंतर्गत पृष्ठभाग फिनिश करण्यासाठी होनिंग प्रक्रियेला प्राधान्य दिले जाते. अनेकदा ग्राइंडिंग, लॅपिंग आणि बर्निशिंगसारखे सुपर फिनिशिंग ऑपरेशन जुळवून घेणे कठीण असते, तेव्हा होनिंग प्रक्रिया योग्य ठरते. या होनिंग प्रक्रियेचे तपशील आणि प्रकार विस्तृतपणे सोदाहरण सांगणारा हा लेख.
बंगळुरू स्थित असलेली आमची ProB कंपनी विविध प्रकारची होनिंग मशीन बनविते. ग्राहकांसाठी मजबूत, सुरक्षित आणि स्थिर तंत्रज्ञानाधारित उपाययोजना विकसित करण्यामध्ये आमचा तांत्रिक सेवा विभाग नेहमीच सज्ज असतो. कोणत्याही प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच त्यामध्ये नाविन्यतापूर्ण, आधुनिकतायुक्त उपाययोजना अंमलात आणून आम्ही आमचे उत्पादन सुरक्षितपणे पूर्णत्वास नेण्याबाबत आग्रही असतो. गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती करणे, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार होनिंग मशीनची निर्मिती आम्ही करतो. उत्पादन केल्यानंतर कार्यक्षमता (एफिशिअन्सी), टिकाऊपणा (ड्युरॅबिलिटी) आणि मितीय अचूकता (डायमेन्शनल अॅक्यूरसी) या 3 घटकांवर त्या मशीनचे काटेकोरपणे परीक्षण आणि संनियंत्रण (मॉनिटर) केले जाते.
या लेखात आपण होनिंग प्रक्रिया आणि आमच्या कारखान्यात तयार होणाऱ्या मशीनची माहिती घेणार आहोत.
चित्र क्र. 1 : होनिंग प्रक्रियेचे संकल्पनात्मक चित्र
होनिंग प्रक्रिया
होनिंग ही दंडगोलाकार अंतर्गत पृष्ठभाग (सरफेस) फिनिश करण्यासाठी, तसेच त्याचा व्यास, आकार, पृष्ठीय रचना (स्ट्रक्चर), भोकाच्या (बोअर) आकाराचे नियंत्रण इत्यादी सुधारण्यासाठी अपघर्षक (अॅब्रेजिव्ह) टूलचा वापर करणारी एक यंत्रण प्रक्रिया आहे. संपूर्ण प्रक्रियेसाठी यामध्ये कठीण (हार्ड) टूलिंग आणि अपघर्षक दगड (अॅब्रेजिव्ह स्टोन) वापरण्यात येतात.
यंत्रभागावरील संपूर्ण फिनिशिंग प्रक्रिया अपघर्षक दगडांच्या मदतीने केली जाते. आवश्यक ग्रेड आणि ग्रिटचे अपघर्षक दगड, कार्यवस्तूच्या पृष्ठभागावर घासण्यात येतात. जिथे होनिंग आवश्यक आहे, त्या भागाला अपघर्षक दगडांद्वारे लक्ष्य केले जाते. त्यानंतर ते फिरविले जातात आणि पुढे मागे हलविले जातात. अशा प्रकारच्या फिरविण्याचे आणि पुढे मागे हलविण्याच्या पद्धतीमुळे, होनिंग केल्या जाणाऱ्या पृष्ठभागावर एक क्रॉसहॅच पॅटर्न तयार होतो. अंतिम आकार मिळेपर्यंत ही प्रक्रिया नियंत्रित दाबाखाली (कंट्रोल्ड प्रेशर) केली जाते. चित्र क्र. 1 आणि 2 पहा.
चित्र क्र. 2 : होनिंग प्रक्रिया सुरू असताना
बोअर L/D रेशोचे प्रमाण खूप जास्त असल्यास होनिंग करणे योग्य आहे. उत्कृष्ट टॉलरन्स नियंत्रित करण्यासाठी आणि निश्चित केलेल्या मर्यादेजवळचा टॉलरन्स प्राप्त करण्यासाठी होनिंग ही अतिशय योग्य प्रक्रिया ठरते.
तक्ता क्र. 1 : ग्राइंडिंग आणि होनिंग प्रक्रियेची तुलना दाखविणारा तक्ता
होनिंग मशीनद्वारे केली जाणारी विविध कार्ये
1. स्टॉक काढणे (रीमूव्हल) : अपेक्षित असलेला यंत्रभागाचा आकार आणि भूमिती मिळविण्यासाठी नको असलेले मटेरियल (स्टॉक) काढणे.
2. फिनिश केलेल्या पॅटर्नची निर्मिती : इष्टतम वंगण करण्यासाठी शक्य तितका चांगला पृष्ठभाग निर्माण करणे.
3. अचूकतेची हमी : संबंधित दंडगोलाकार पृष्ठभागाचा अपेक्षित आकार (साइज), घाट (शेप), वर्तुळाकारिता (राउंडनेस), सरळपणा (स्ट्रेटनेस) यांची अचूकता होनिंग मशीनच्या विस्तृत श्रेणीचे वर्गीकरण काही प्रमुख प्रकारांमध्ये (चित्र क्र. 3) केले जाऊ शकते.
चित्र क्र. 3 : होनिंग मशीनचे वर्गीकरण
1. उभे (व्हर्टिकल) होनिंग मशीन : या मशीन कोणत्याही प्रकारच्या यंत्रभागांसाठी योग्य असतात. विशेषत: जेव्हा यंत्रभाग होनिंग टूलपेक्षा जास्त जड असतो आणि त्यामध्ये अनेक भोकांचा (बोअर) समावेश असतो, तेव्हा या मशीन अधिक योग्य असतात. या प्रकारच्या मशीनमध्ये एक सरळ उभी स्पिंडल ड्राइव्ह यंत्रणा वापरलेली असते.
2. आडवे (हॉरिझाँटल) होनिंग मशीन : या मशीन लहान यंत्रभागांसाठी योग्य असतात. विशेषत: जेव्हा यंत्रभाग होनिंग टूलपेक्षा हलका असतो आणि यंत्रभाग सममितीय (सिमेट्रिक) असतो, तेव्हा या मशीन अधिक योग्य असतात. या मशीनमध्ये सममितीय नसलेल्या लहान यंत्रभागांवरदेखील होनिंग केले जाऊ शकते. झटपट बदल (क्विक चेंजओव्हर) आणि उत्तम नियंत्रण करण्यासाठी ही मशीन उपयुक्त ठरतात.
3. आडवे (हॉरिझाँटल) ट्यूब होनिंग मशीन : आवश्यकतेनुसार हे मशीन पूर्णपणे स्वयंचलित करता येते. 6 मिमी. आणि त्यापेक्षा जास्त व्यास असलेल्या आणि 10,000 मिमी. लांबीच्या भोकाचे होनिंग या मशीनद्वारे करणे शक्य आहे. हायड्रॉलिक सिलिंडर ट्यूब (जिथे ट्यूबची लांबी 12 मीटरपर्यंत असते.), गन बॅरलसाठी या मशीन योग्य आहेत.
4. सिंगल पास होनिंग मशीन : लहान यंत्रभागांसाठी या मशीन योग्य असतात. तसेच जिथे उच्च दर्जाची अचूकता अपेक्षित असते तिथे या मशीन प्रामुख्याने वापरल्या जातात. या मशीनमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक स्पिंडलसह काम करता येते. अधिक संख्येने (हाय व्हॉल्यूम) उत्पादनाची मागणी या मशीनद्वारे पूर्ण करता येते.
आडव्या आणि उभ्या होनिंग मशीनमधील फरक
होनिंग या विशिष्ट प्रकारच्या यंत्रणामध्ये एक गोल फिरणारे अपघर्षक टूल (चित्र क्र. 1 आणि 2) सिलिंडरच्या किंवा बोअरच्या आतील पृष्ठभागावरून धातू (मेटल) काढून टाकते. पृष्ठभागास गुळगुळीत किंवा अपेक्षित फिनिश देणे आणि त्याला एका विशिष्ट व्यासावर आणि भूमितीय संरचनेवर आणणे हा या प्रक्रियेचा हेतू असतो. होनिंग मशीनचे, उभे (व्हर्टिकल) होनिंग मशीन आणि आडवे (हॉरिझाँटल) होनिंग मशीन असे दोन सर्वसाधारण प्रकार असतात. उभ्या होनिंग मशीनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सरळ किंवा उभी स्पिंडल ड्राइव्ह यंत्रणा. ही यंत्रणा वापरून लहान आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या भोकाचे होनिंग करता येते. उभ्या स्पिंडल ड्राइव्ह यंत्रणेमुळे होनिंग केलेल्या पृष्ठभागावर एक अचूक क्रॉसहॅच पॅटर्न तयार होतो. सामान्यतः तुलनेने छोट्या पृष्ठभागांवर उच्च दर्जाचे परिणाम जेव्हा अपेक्षित असता तेव्हा उभ्या होनिंग मशीनची शिफारस केली जाते.
आडवे होनिंग मशीन वापरून लांब नलिका (ट्यूब), सिलिंडर यांसारख्या पृष्ठभागाचा इच्छित फिनिश आणि त्याबरोबर अत्यंत उच्च पातळीची अचूकता मिळविता येते. उभे होनिंग मशीन हे अधिक वेगवान आणि सोयीस्कर असते आणि त्यात प्रभावी नियंत्रण करता येते.
तक्ता क्र. 2 : आडव्या आणि उभ्या होनिंग मशीनमधील मूलभूत फरक
उदाहरण
बंगळुरू येथील एका कंपनीमध्ये Pro Hone SVHM 1+ हे उभे होनिंग मशीन (चित्र क्र. 4) आम्ही दिले. या मशीनमध्ये 6 मिमी. व्यासाच्या आणि 65 मिमी. लांबीच्या भोकाचे होनिंग केले जाते. या मशीनवर ज्या यंत्रभागाचे होनिंग केले जाणार होते त्यामध्ये 30 ते 40 मायक्रॉन स्टॉक होता. ग्राहकाला व्यास 5 मायक्रॉन टॉलरन्सच्या मर्यादेमध्ये अपेक्षित होता. तसेच दंडगोलाकारिता (सिलिंड्रिसिटी) आणि वर्तुळाकारिता (सर्क्युलॅरिटी) 2 मायक्रॉनच्या मर्यादेमध्ये अपेक्षित होती. या मशीनवर ग्राहकाला ते साध्य करता आले. पृष्ठीय फिनिशही 0.5 (Ra) मायक्रॉनपेक्षा कमी मिळविण्यात त्यांना शक्य झाले. एका भोकासाठीचा आवर्तन काळ (सायकल टाइम) 2 मिनिटांपेक्षा कमी होता. हे मशीन ऑनलाइन गेजिंगसाठी सक्षम नसले तरी, प्रक्रियेच्या आधी आणि नंतर तपासणी करणे शक्य आहे. इतर सर्व होनिंग मशीनप्रमाणेच या मशीनमध्ये शीतक (कूलंट) व्यवस्था करण्यात आलेली आहे. मशीन, सर्व्हो मोटरद्वारे नियंत्रित केलेली असल्यामुळे, 1 किंवा 2 मायक्रॉनच्या त्रुटीने, भोकाचा आकार नियंत्रित केला जाऊ शकतो. हे मशीन प्लॅटू होनिंगसाठी वापरता येत नाही.
चित्र क्र. 4 : Pro Hone SVHM 1+ मशीन
आमच्या सर्व्हो व्हर्टिकल होनिंग मशीनमध्ये 6 मिमी. ते 40 मिमी.पर्यंत व्यास आणि 50 मिमी. ते 1500 मिमी.पर्यंत लांबी असलेल्या कार्यवस्तूचे होनिंग करणे शक्य आहे. स्ट्रोकिंग व्यवस्था (सिस्टिम), स्पिंडल रोटेशन आणि टूल एक्स्पान्शन, सर्व्हो मोटरद्वारे चालते. टेबल स्लाइडिंग हे मॅन्युअल किंवा स्वयंचलित अशा दोन्ही प्रकारे होते. या मशीनमध्ये अॅक्ट्युएटरचे सर्व पॅरामीटर टच स्क्रीनवर सेट केले जाऊ शकतात आणि ते मित्सुबिशी PLC नियंत्रकाद्वारे नियंत्रित केलेले आहेत. मशीनमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक स्पिंडल असू शकतात. जेव्हा उच्च उत्पादकता आणि सातत्यपूर्ण अचूकता अपेक्षित असते, तेव्हा अशा प्रकारच्या उत्पादनासाठी हे मशीन मुख्यतः वापरले जाते.
सर्व्हो व्हर्टिकल होनिंग मशीनवरील प्रत्यक्ष यंत्रण पाहण्यासाठी शेजारी दिलेला QR कोड आपल्या मोबाइलवर स्कॅन करा.
चित्र क्र. 5
कनेक्टिंग रॉड, रॉकर आर्म, सिलिंडर ट्यूब, वाल्व्ह ब्लॉक, सिलिंडर ब्लॉक, लहान बुश, रिंग आणि विमान उद्योगातील भाग, अशा यंत्रभागांचे (चित्र क्र. 5) होनिंग या मशीनवर करता येते.
आमच्या कंपनीमध्ये गुणवत्तेबाबतच्या धोरणांचे काटेकोरपणे पालन केले जाते आणि गुणवत्तापूर्ण मशीन टूलचा पुरवठा करण्याची खात्री आम्ही ग्राहकाला वेळोवेळी देत असल्यामुळे आमचे ग्राहक पूर्णपणे संतुष्ट असतात. याव्यतिरिक्त, गुणवत्ता निरीक्षकांचा (क्वालिटी इन्स्पेक्टर) आमचा तज्ज्ञ कार्यगट, उत्पादनाच्या प्रत्येक स्तरावर आमच्या विविध श्रेणीतील उत्पादांची संपूर्ण तपासणी करतो.
9035809927
kmurthy68@rediffmail.com
कृष्णमूर्ती एम. टी. ProB प्रोडक्ट कंपनीचे भागीदार आहेत. होनिंग प्रक्रियेतील तज्ज्ञ म्हणून ते प्रख्यात आहेत. आर. व्ही. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. मशीन टूल, स्वयंचलनामध्ये त्यांना 25 वर्षांहून अधिक अनुभव आहे.