50 चे दशक म्हणजे भारतासाठी नवनवीन स्वप्ने पाहण्याचा आणि नुकतेच स्वातंत्र्य मिळालेला आपला देश जगाच्या नकाशावर नेऊन ठेवण्याची ईर्षा असणारा काळ होता. 1940 मध्ये जन्मलेल्या अशोक साठे ( Ashok Sathe ) यांच्या विद्यालयीन आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा हाच कालखंड. या काळाचा प्रभाव आणि त्या काळात त्यांच्या मनात रुजलेली ध्येयं त्यांच्या पूर्ण कारकिर्दीवर परिणाम करणारी होती. 1960 साली पुण्यातील सी.ओ.ई.पी.मधून यंत्र अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर IIT मुंबईमधून त्यांनी मशीन टूल डिझाइनमध्ये M.Tech केले. भारतातील अभियांत्रिकी उद्योगाला पूरक काम करणाऱ्या CMTI या बंगळुरूच्या सरकारी आस्थापनेत ते 1963 मध्ये रुजू झाले. भारतीय अभियंत्यांनी जागतिक दर्जावरील यंत्रण उद्योगातील प्रगती समजावून घेण्यासाठी आणि त्यातून पुढे तशी निर्मिती सुरू करण्याच्या हेतूने अशोक साठे यांच्यासह CMTI मधील 5 तरूण अभियंत्यांना झेकोस्लोव्हाकियामध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले.
भारतामध्ये ज्या ज्या गोष्टींची आयात केली जाते ती सर्व उत्पादने भारतातच तयार झाली पाहिजेत, आपण स्वावलंबी झाले पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न समोर ठेवून 1977-78 च्या दरम्यान CMTI सोडून त्यांनी 1978 मध्ये प्रगति ऑटोमेशन आणि नंतर 1979 मध्ये एस डिझाइनर्स या कंपन्या सुरू केल्या. सर्वात प्रथम FIE समूहाकरिता एस.पी.एम. बनविण्यापासून 'प्रगति' कंपनीची सुरुवात झाली. 1986 मध्ये त्यांनी पहिल्यांदा टरेट बनविले. ते युनिडायरेक्शनल टरेट होते. तेथून खऱ्या अर्थाने प्रगतिच्या टरेटचा प्रवास सुरू झाला. 1989 मध्ये प्रगतिचे पहिले बायडायरेक्शनल टरेट तयार झाले. 1995 मध्ये प्रगतिला पहिली, खऱ्या अर्थाने मोठी निर्यातीची ऑर्डर जपानमधील प्रख्यात मियानो मशीन्सकडून मिळाली.
“ जागतिक बाजारपेठेत उत्तम दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करून बाजारपेठेतील पहिल्या 10 कंपन्यांमध्ये आपली कंपनी असावी असा त्यांचा ध्यास होता. याच विचाराने ते कायम प्रेरित असायचे, त्यांची धडपडही त्याच दिशेने सुरू असायची.”
बी. मचाडो
व्यवस्थापकीय संचालक, एस डिझायनर्स लि.
साठे यांनी उत्पादांच्या दर्जामध्ये निर्यातीसाठी वेगळा दर्जा आणि स्थानिक बाजारपेठेसाठी वेगळा दर्जा असा भेदभाव कधीच ठेवला नाही. चिनी किंमत आणि युरोपिअन गुणवत्ता हे पथ्य त्यांच्या सर्व कंपन्यांमध्ये नेहमी पाळले जाते. त्यांनी कायमच एकूण भारतीय उद्योग क्षेत्र कसे पुढे जाईल आणि त्याकरिता आपण जास्तीतजास्त काय करू शकू यावर विचार आणि त्यानुसार कृती करण्यावर भर दिला. कमी किंमत आणि मोठया संख्येने उत्पादन या धोरणाप्रमाणे प्रगतिने 1992-93 मध्ये स्वयंचलित हत्यार बदलक (ATC) बनवायला सुरुवात केली. आज दरमहा 1 हजार ATC ची निर्मिती करून विविध मशीन उत्पादकांना त्यांचा पुरवठा केला जातो.
अशोक साठे कायमच स्वतःला आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या क्षमतांना आव्हान देणाऱ्या नवीन संकल्पना सुरू करून त्या अंमलात आणीत असत. 1997-98 मध्ये त्यांनी पूर्णपणे स्वदेशी सी.एन.सी. लेथ तयार करण्याचे ठरविले. त्यासाठी अर्थातच सर्व्हो मोटर ड्राइव्ह आणि एन्कोडरसुद्धा प्रगतिनेच बनविला. कोणतीही नवीन संकल्पना राबविताना, त्यातील भागांचे विकसन करताना, कोणाशीही कोलॅबोरेशन न करता आपणच सर्व काम करावयाचे असा त्यांचा शिरस्ता होता. त्यामध्ये बराच कालावधी जायचा. परंतु त्यातून होणारी निर्मिती पूर्णपणे स्वदेशी असायची आणि त्याच्या विक्रीवर कोणतीही बंधने नसायची. 1990 पासून दरवर्षी प्रगति आणि एस समूह परदेशी प्रदर्शनांमध्ये भाग घेत आहेत. प्रदर्शनात भाग घेतल्यामुळे बाजारपेठेत काय नवीन आहे याची माहिती कळणे हादेखील त्यामागचा उद्देश असायचा.
भारतीय उद्योगाची वाढ होण्यासाठी युरोपिअन किंवा दक्षिण पूर्व देशांप्रमाणे भारतीय भाषा या ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत हा त्यांचा ध्यास पूर्ण करण्यासाठी त्यांनी 2007 मध्ये 'उद्यम प्रकाशन' संस्थेची स्थापना केली. कारखान्यात काम करणाऱ्या अभियंत्यांना आणि कामगारांना अभियांत्रिकीविषयक ज्ञान आणि माहिती त्यांच्या मातृभाषेत मिळावी या हेतूने मराठी, हिंदी, कन्नड आणि गुजराती या 4 भाषांमध्ये 2017 पासून त्यांनी मासिके सुरू केली. त्याच सुमारास अभियांत्रिकीविषयक पुस्तके तयार करण्याच्या कामालादेखील सुरुवात झाली.
1963 ते 2020 या 57 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये अशोक साठे यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे अनेक अभियंते उद्योजक बनले आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.
साठे यांच्या अत्यंत प्रसन्न आणि त्याचबरोबर कर्तव्यकठोर व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंपैकी काही महत्त्वाच्या पैलूंविषयी त्यांच्याबरोबर काम केलेल्या विविध मान्यवरांशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी समोर आलेल्या त्यांच्यातील विविध गुणवैशिष्ट्यांची ओळख करून देणे याप्रसंगी उचित ठरेल.
“आमचा सुमारे 70 च्या दशकापासून सुरू झालेला संवाद त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता. सुरुवातीला मशीन उत्पादक या नात्याने होणारी देवाणघेवाण असो किंवा आताचे उद्यम प्रकाशनचे काम असो, त्यांच्यातील ज्ञानी अभियंता आणि एक वेगळा विचार करणारा माणूस कायमच समोर येत राहिला.”
भारत जोशी
संचालक, उद्यम प्रकाशन
मशीन टूल डिझाइयनर
एखाद्या उत्पादाच्या डिझाइनवर जर काम पूर्ण झाले असेल आणि त्याचवेळी एखाद्या डिझाइनमध्ये जर बाजारात काही नवीन बदल झाले असतील तर, ते बदल आपल्या उत्पादाच्या डिझाइनमध्ये झालेच पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. ड्राफ्टिंगमध्ये त्यांना एक साधीदेखील चूक चालत नसे. कोणत्याही उत्पादाचे डिझाइन करण्यापूर्वी त्याची देखभाल कशा पद्धतीने करता येईल याबद्दल ते सुरुवातीलाच विचार करायचे.
बहुतेकवेळा डिझाइन करताना उत्पाद नाकारला गेला तर, अपेक्षेप्रमाणे यश आले नाही तर, हे नुकसान कोण भरून देणार अशा प्रकारची भीती अभियंत्याच्या मनात येत असे. परंतु साठ्यांचे एक महत्त्वाचे सूत्र असे की, नवीन कोणतीही गोष्ट करताना ताण, बाक, पीळ किंवा मोडणे याव्यतिरिक्त काही होत नसते आणि नवीन निर्मिती करताना हे गृहीत धरून चालावे लागते. त्यामुळे नवीन उत्पादाचे डिझाइन करताना अभियंत्याच्या मनात येणारी भीती पूर्ण नाहीशी होत असते.
द्रष्टा उद्योजक साठे सरांबरोबर सुमारे 40 हून अधिक वर्षे काम करणारे अतुल भिरंगी यांच्या मते, सरांच्या व्यक्तिमत्वात एक अभिजात कल्पक अभियंता आणि नवीन वाटा तयार करणारा देशभक्त उद्योजक यांचे अपूर्व मिश्रण होते. एक मार्गदर्शक आणि गुरु म्हणून त्यांच्याविषयी बोलताना भिरंगी म्हणाले, "कारखान्यातील सर्वांशी थेट संबंध असल्याने एक मोकळे विश्वासपूर्ण वातावरण तयार करणारे विनम्र उद्योजक साठे सर, प्रसंगी रागवायचे पण कधीही कुणाची अवहेलना करीत नसत. किंमत कमीतकमी ठेवल्यानेच जागतिक बाजारात आपले वर्चस्व निर्माण होईल यावर ठाम विश्वास आणि ते साध्य करण्यासाठीचा संयम सरांकडे होता. भारतीय उत्पादने निर्यात करून देश आणि कारखान्यातील प्रत्येकाची मान अभिमानाने ताठ व्हावी ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती. आपल्याला लागणाऱ्या मशीन आयात न करता स्वत: बनवाव्यात, उद्योगाच्या विकासासाठी कर्ज घेणे आवश्यक असेल तर ते बेलाशक घ्यावे, सर्वोत्तम निर्मितीसाठी जे जे गरजेचे आहे ते ते सर्व करावे असे त्यांचे धोरण होते. विचारांमध्ये स्पष्टता असल्याने चीनमध्ये स्वत:चा कारखाना काढण्यासारखा धाडसी निर्णय ते घेऊ शकले. त्यातून इतर भारतीय उद्योजकांना प्रेरणा मिळावी हाच महत्त्वाचा हेतू होता."
भारतातील मशीन टूल उद्योगात आघाडीच्या स्थानावर असलेला एस मायक्रोमॅटिक समूह अशोक साठे, श्रीनिवास शिरगुडकर आणि बी. मचाडो या तीन तरूण अभियंत्यांनी सुरू केला. त्या आठवणींचा प्रवास श्रीनिवास शिरगुडकर आणि बी. मचाडो यांनी मांडला. "आम्ही CMTI पासून ते आतापर्यंत जवळपास 40 ते 50 वर्षे एकत्र काम केले. भारतीय उत्पादने जागतिक दर्जाची असणे हे त्यांचे स्वप्न होते, ते त्यांचे 'पॅशन' होते. आम्ही साठ्यांना बरोबर घेऊन एस डिझाइनर्स ही कंपनी 1979 मध्ये एका घराच्या गॅरेजमध्ये सुरू केली."
“जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांना त्यांच्या गुणवत्तेबाबत कमी लेखले जायचे. ते आव्हान स्वीकारलेल्या साठे सरांनी कोणत्याही उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत कधीच तडजोड केली नाही.”
अम्बर जोशी
संचालक, अॅडेप्ट प्रोसाइन
"कोणत्याही उत्पादाची निर्मिती करताना त्यासाठी आवश्यक असणारे सर्व भाग आपणच तयार केले पाहिजेत, तुमचा उत्पाद जागतिक दर्जाचाच असला पाहिजे. क्लिष्ट आणि काटेकोर भागांची (क्रिटिकल कंपोनंट) निर्मिती आपल्याकडेच झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांच्या याच वैशिष्ट्यांमुळे चीनसारख्या देशातसुद्धा ते स्पर्धा करू शकले. त्यांनी पहिल्यापासून 'बॅकवर्ड इंटिग्रेशन अॅप्रोच' ठेवला होता."
"समूहाच्या बोर्ड मिटिंगमध्ये ते जास्त सहभाग घ्यायचे नाहीत. परंतु तंत्रज्ञानासंदर्भात काही चर्चा असल्यास, ते जातीने हजर असायचे. अशावेळी ते नेहमी सकारात्मक टीकाकाराची भूमिका बजावायचे. कोणत्याही मुद्द्यावर त्यांनी त्यांचे मत कोणावर लादले नाही. समोरच्याचे मत ऐकून घेतानासुद्धा ते कायम मोठ्या मनाने लक्षपूर्वक ऐकत असत. समोरच्या माणसाला दुखवायचे नाही असा त्यांचा स्वभाव होता. ते मनाने खूप शुद्ध आणि निर्मळ होते."
“कंपनी स्थापित केल्यापासून साठे साहेबांनी सर्व आर्थिक व्यवहार हे नैतिक तत्त्वाने केले. त्यांनी पहिल्या दिवसापासून कुठेही रोख रकमेचे व्यवहार केले नाहीत आणि सहकाऱ्यांनादेखील करू दिले नाहीत. तसा पांयंडाच त्यांनी आम्हा सर्वांना घालून दिलेला होता.”
श्रीनिवास शिरगुडकर
व्यवस्थापकीय संचालक, एस डिझानर्स लि.
ते 'व्हिजनरी' होते. 10 वर्षांनंतर आपण कुठल्या पातळीला कसे पोहोचलेले असू, त्यावेळी बाजारपेठा कशा असतील, त्यानुसार आपण काय करायला पाहिजे, या सर्वांबद्दलची दूरदृष्टी त्यांच्याकडे असायची. त्यांची कायम अशी धारणा होती की, तुम्ही आज गुंतवणूक करा, उद्या तुम्हाला त्यामधून नक्की परतावा मिळेल. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून 2011 मध्ये त्यांना दुसरा IMTMA - Vinod Doshi Outstanding Entrepreneur Award in Machine Tools पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
व्यवस्थापन गेली 40 वर्षे प्रगतिमध्ये कार्यरत असलेल्या दीपक जोगळेकरांनी साठे यांच्या व्यवस्थापन प्रणालीची वैशिष्ट्ये सांगितली.
1. आपल्या टीममधील अभियंते/सहकारी यांना सतत नवीन आव्हानांना सामोरे जाण्यास उद्युक्त करणे.
2. एकदा एखादी जबाबदारी, मग ती एखाद्या उत्पाद विकसनाची असो अथवा एखादे पूर्ण युनिट चालविण्याची असो, एखाद्या सहकाऱ्याला दिल्यानंतर त्या व्यक्तीवर संपूर्ण विश्वास टाकणे ही त्यांची कामाची पद्धत होती.
3. प्रत्येकाला त्याच्या कामाशी संबंधित सर्व गोष्टींची माहिती असली पाहिजे हा त्यांचा आग्रह असे. म्हणजे एखाद्या यांत्रिकी अभियंत्याला एखाद्या यंत्राची दुरुस्ती करावयाची असेल तर, दोन तारा जोडण्यासाठी दुसऱ्या विद्युत अभियंत्याला बोलावणे त्यांच्या कार्यसंस्कृतीमध्ये बसत नव्हते.
4. कारखान्यात बनणाऱ्या उत्पादांचा उत्पादन खर्च कमीतकमी कसा करता येईल यावर त्यांचा सातत्याने आग्रह असे. कमीतकमी खर्चात जास्त संख्येने उत्पादन हा मंत्र त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जपला.
5. चालू असलेल्या उत्पादांमध्येसुद्धा सातत्याने तांत्रिक सुधारणा कशा करता येतील यावर ते कायम आग्रही असायचे.
6. उच्च व्यवस्थापनाच्या प्रचलित शब्दजंजाळात ते कधीच अडकले नाहीत. उत्तम गुणवत्तेचे उत्पादन बाजारात रास्त दरात देणे हे एकमेव सूत्र त्यांच्या सर्व व्यवहारात त्यांनी अंगिकारले होते.
7. तत्कालिक फायद्या-तोट्यापेक्षा त्यांनी कायम भविष्यलक्षी ध्येय ठेवले होते. हे करताना एखाद्या व्यवहारात कधी नुकसान होत असले तरी आपला शब्द पाळणे आणि उत्पादाचे नाव कायम राहिले पाहिजे यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असे.
“साठे सरांचे दुसऱ्यांना प्रेरणा देण्याचे एकच तत्त्व होते, ‘मागचे दोर कापले की लोक पुढे जातात.’ ते नेहमी तानाजीचे उदाहरण द्यायचे. सहकाऱ्यांच्या क्षमतेला ते सातत्याने आव्हान द्यायचे. ते खूप कमी वेळा पाठ थोपटायचे. त्यांनी पुढचे टार्गेट तुम्हाला दिले की, आपण समजाचे की ती आपल्याला मिळालेली शाबासकी आहे.”
दीपक जोगळेकर
टेक्निकल डारेक्टर, प्रगति ऑटोमेशन प्रा. लि.
8. ग्राहकावर अथवा पुरवठादारावरही पूर्ण विश्वास ठेवणे आणि आपल्यावरील विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देणे हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर पाळले.
9. ग्राहकाला मशीन विकल्यानंतर स्वत: विक्रीपश्चात सेवा देणे ही संकल्पना त्यांनी 80 च्या दशकापासून अंमलात आणली.
10. नवीन संकल्पनांचे डिझाइन करणे हे काम तर ते सातत्याने आत्तापर्यंत करीत होतेच पण त्याचबरोबर कारखान्यात मशीनपाशी जावून स्वत: त्याचा पाठपुरावा करणे, त्यातील अडचणी सोडविणे हेही त्यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवले होते. कारखान्याची नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही.
11. कंपनीतील कुठल्याही स्तरावरील कर्मचाऱ्याशी ते एकाच आत्मीयतेने संवाद साधत असल्यामुळे कंपनीतील कुणालाही त्यांचे दार कायम उघडे असे. त्यातून तयार झालेला परस्परविश्वास हा त्यांच्या व्यवस्थापनाचा कणा होता.
12. स्वतःला पटलेल्या गोष्टीला कितीही विरोध झाला, अडचणी आल्या तरीही चिकाटीने त्याच्या मागे लागून ती गोष्ट
पूर्णत्वास नेणे.
मार्गदर्शक
'स्फूर्ती'चे रामचंद्र पुरोहित यांनी साठे सरांसोबत जवळपास 26 वर्षे काम केले आहे. ते म्हणाले, ''त्यांच्या आधारामुळे, मार्गदर्शनामुळे आम्ही स्फूर्ती कंपनी चालू करू शकलो. त्यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही स्थानिक बाजारपेठेबरोबरच परदेशी बाजारातही आमची उत्पादने विकत आहोत.''
प्रगतिमध्ये साठे यांच्याबरोबर जवळून काम करणारे दिनेश सांगतात की, ''कंपनीत येणाऱ्या नवीन अभियंत्याला अगदी ड्रॉइंग वाचायला शिकविण्यापासून ते कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन, एखादा प्रकल्प स्वतंत्रपणे सोपविण्यापर्यंत साठे सर त्याच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन तो एक उद्योजक बनण्याच्या क्षमतेचा कसा होईल याचे सर्व धडे द्यायचे.''
“FIE मध्ये पंडितराव कुलकर्णी यांच्याकडे डिझाइन विभागात काम करताना अशोक साठे सरांशी संपर्क येत असे. त्यांची मार्गदर्शन करण्याची हातोटी आणि अतिशय सोप्या भाषेत समस्येचे विश्लेषण करण्याची पद्धत कामाचे दडपण अथवा ताण काढून टाकत असे.”
रामचंद्र जोशी
AMTC ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख
अभियांत्रिकी उद्योगातील असंख्य लोक साठे यांचे 'एकलव्य परंपरेतले' शिष्य होते. गेली 40 वर्षे मशीन टूल क्षेत्रात काम करीत असलेले पुण्याचे प्रदीप खरे सांगतात की, ''1995 च्या इम्टेक्समध्ये त्यांच्याशी झालेल्या माझ्या भेटीमध्ये, तुमची सर्व उत्पादने अगदी चांगली आहेत. त्यामध्ये असेच सातत्य ठेवले तर, भारताची भरभराट व्हायला वेळ लागणार नाही, असे सांगितले. त्यांचे हे एक वाक्य माझ्या पुढील पूर्ण करिअरसाठी स्फूर्तीदायक ठरले. त्यांच्या चेहऱ्यावर असलेली विद्येची प्रसन्नता हे माझेच काय पण संपूर्ण उद्योग जगताचे एक आकर्षण होते. गंभीर समस्येवर काही आततायी उपाय सुचविले गेले तर, 'थोडे समजुतीने घ्या रे. एकदम अस्थिर होऊ नये. आज जरी त्याचा फायदा झाला तरी पुढे न भरून येणारे नुकसान होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या,' असा त्यांचा सल्ला मला माझ्यात बदल करायला पुरेसा होता. साठेसाहेब म्हणजे ऊर्जेचा अखंड वाहणारा एक स्रोत होते.''
“साठेसाहेब म्हणजे कुमारांनी गायलेलं कबीराचे भजन... गुरूजी ने दिया अमर नाम गुरु तो सरीखा कोई नहीं!”
प्रदीप खरे
संचालक, एजी गेजिंग सिस्टिम्स अँड इक्विपमेंट्स
व्यावसायिक जीवनात अनेक मार्गाने इच्छुकांना मदत करणारे अशोक साठे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही अनेक संस्थांना पाठबळ पुरवित राहिले. विशेषतः शिक्षणासाठी त्यांनी बाहेरच्या संस्थांना मदत करतानाच त्यांच्या कारखान्यातील सहकाऱ्यांच्या कुटुंबातील कोणाचेही शिक्षण पूर्ण होण्यासाठी वरचेवर सढळ हाताने मदत केली आणि अर्थातच या गोष्टीचा त्यांनी कधीच बोलबाला होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली.
हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मशीन टूल बनविणाऱ्या कंपन्या भारतात असतानाच्या काळात अशोक साठे यांनी भारतीय उत्पाद जागतिक बाजारात सन्मानाचे स्थान मिळवतील असे स्वप्न बघितले आणि काही दशकातच ते पूर्ण केले. शेवटपर्यंत नावीन्याचा ध्यास घेतलेला आणि नवीन तंत्रज्ञान स्वतः शिकून त्याच्याशी जुळवून घेण्याची वृत्ती असलेला हा अभियंता, अंतर्बाह्य निर्मळ मनुष्य होता. सध्या कार्यरत असलेल्या आणि पुढे येणाऱ्या कित्येक पिढ्यांना अशोक साठे यांचे काम कायम प्रेरणा देत राहील.
9595031562
deepak.deodhar@udyamprakashan.in
दीपक देवधर (संपादक, धातुकाम मासिक)