संपादकीय

08 Feb 2021 11:44:07

1_1  H x W: 0 x
29 डिसेंबर, 2020 हा दिवस ‘उद्यम’साठी आणि एकूणच मशीन टूल उद्योगासाठी एक धक्कादायक दिवस होता. मशीन टूल निर्मिती आणि त्यातही त्याचे डिझाइन हेच जीवनकार्य मानलेल्या अशोक साठे या भीष्माचार्याने त्या दिवशी जगाचा निरोप घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या ध्येयासाठी कार्यरत असलेला हा अभियंता अलौकिक काम करीत राहिला. जरी त्यांनी प्रगति ऑटोमेशन, ACE डिझाइनर्स आणि पुढे ACE मायक्रोमॅटिक समूह अशा भारतीय मशीन टूल उद्योगासाठी ललामभूत अशा संस्था शून्यातून उभ्या केल्या, नावारूपाला आणल्या तरी त्यांचा ध्यास एकूण भारतीय उद्योग, जगात सर्वश्रेष्ठ कसा होईल याकडेच राहिला. त्यासाठी त्यांनी असंख्य तरुण उद्योजकांना, काही वेळा स्पर्धकांनासुद्धा मोकळेपणाने हवी ती मदत केली. ‘आपल्या उद्योजकांमध्ये परदेशी लोकांच्या तुलनेत काहीही कमी नाही. 200 वर्षांच्या ब्रिटिश गुलामगिरीने आपल्या मनावर बसलेल्या इंग्रजीच्या जोखडाने आपल्या लोकांची नवीन काही करण्याची जिद्द नाहीशी केली आहे. ती पुन्हा जागी करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण मिळणे आवश्यक आहे.’ ही त्यांची दृढ धारणा होती आणि त्यासाठी गेली काही वर्षे ते सतत काम करीत होते.
 
एकदा स्वत:ला पटलेला कुठलाही विचार अंमलात आणताना कित्येकदा त्यावर सहकाऱ्यांशी चर्चा होतांना ते त्यांच्या धारणेशी ठाम असत पण त्यात सुचविलेले बदल जर त्या ताकदीचे (हा खास साठे सरांचा शब्द) असतील तर, ते मान्य करण्याचा उमदेपणाही त्यांच्याकडे होता. याच निर्मळ आचरणामुळे ते शब्दश: अजातशत्रू बनले. त्यांचे सहकारीच काय पण स्पर्धकही साठे सरांचे नाव घेतल्यावर त्यांना गुरुस्थानी मानल्याचे मोकळेपणाने (संगीतातील परंपरेप्रमाणे कानाच्या पाळीला हात लावून) मान्य करीत. मासिकाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक छोट्या मोठ्या मशीन टूल उद्योजकांना भेटताना या गुरुचे अनेक ‘एकलव्य’ असल्याचे लक्षात आले.
 
उपलब्ध देशी/विदेशी तंत्रज्ञान आत्मसात करून त्यातून लखलखीत भारतीय उत्पादने बनविणाऱ्या आस्थापना त्यांनी सुरू केल्या आणि जागतिक बाजारपेठेवर त्यांची मोहोर उमटविली. भारतीय भाषा ज्ञानभाषा बनल्या पाहिजेत ही घोषणा करणारे खूप आहेत, पण या ध्येयासाठी स्वत:चा वेळ आणि धन देणारे साठे एकटेच आहेत. तशा त्यांनी सुरू केलेल्या बऱ्याच संकल्पना अव्यवहार्य म्हणून बघितल्या गेल्या. मग ते टरेट किंवा स्वयंचलित हत्यार बदलकाची (ATC) निर्मिती असो, तेच उत्पादन चीनमध्ये तयार करण्यासाठी तिथे कारखाना सुरू करणे असो किंवा भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकीविषयक पुस्तके आणि मासिके निर्माण करणे असो. सुरुवातीला ‘हे काय करताय, हे कोण घेणार, चिनी उत्पादकांसमोर तुमचा काय टिकाव लागणार, मराठीत कोण वाचतो हल्ली ?’ असे काहीसे हेटाळणीचा सूर असलेलेच प्रश्न त्यांना विचारले गेले. पण साठे त्यांच्या विचारावर ठाम राहिले आणि आज त्यांच्या प्रगति ऑटोमेशनमध्ये तयार होणाऱ्या ATC ला भारतात अजूनही पर्याय नाही. तो अनेक भारतीय आणि बहुराष्ट्रीय मशीन टूलचा अविभाज्य भाग तर आहेच, तसेच चीनमध्ये तो तिथल्या उत्पादकांशी कडवी स्पर्धा करीत आहे. प्रथम मराठीत सुरू झालेले ‘धातुकाम’ मासिक आज हिंदी, गुजराथी, कन्नड अशा एकूण चार भाषांतून प्रसिद्ध होत आहे आणि सुमारे 50,000 कारखान्यांमध्ये पोहोचत आहे. जे काही करायचे ते मोठ्या प्रमाणात आणि कुठल्याही आंतरराष्ट्रीय मापदंडांना पूर्ण करणारेच असले पाहिजे हा त्यांचा आग्रह असे आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याची तयारी असे.
आता ‘धातुकाम’ची इथून पुढची वाटचाल करताना सरांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन असणार नाही, त्यांना फोन केल्यावर ‘ हं..बोला देवधर ..’ असा काहीसा अनुनासिक आश्वासक स्वर ऐकू येणार नाही, पण त्यांनी घालून दिलेला पाया इतका भक्कम आहे की, ‘तुम्ही जिद्दीने काम करीत राहा. आपण इतिहास निर्माण करीत आहोत’ हे त्यांचे शब्द खरे ठरविण्यासाठीची पुढची वाटचाल दमदारपणे सुरूच राहणार आहे.
 
आमच्या प्रयत्नांना आमचे सर्व वाचक, लेखक, जाहिरातदार आणि सर्व संबंधित आम्हाला आवश्यक ते सामर्थ्य पुरवतील असा विश्वास आहे.
 
 
दीपक देवधर
deepak.deodhar@udyamprakashan.in
Powered By Sangraha 9.0