’ॲक्युशार्प’: वर्कशॉप ते टूल उत्पादन

02 Mar 2021 13:17:34

1_1  H x W: 0 x
1990 च्या दशकात पुणे एम.आय.डी.सी.मध्ये कर्तन हत्यारांना (कटिंग टूल्स) पुन्हा धार लावण्यासाठी (रीग्राइंडिंग) केवळ एक जुना टूल अँड कटर ग्राइंडर घेऊन आम्ही एक छोटासा उद्योग सुरू केला. तसे पाहिले तर मला व्यावसायिक शिक्षणाची फारशी पोर्शभूमी नव्हती. परंतु धातू कापणाऱ्या हत्यारांविषयी (मेटल कटिंग टूल्स) असलेला अनुभव आणि हत्यारांना धार लावून घेण्याची गरज असलेल्या ग्राहकांना हवे तसे काम करून देण्याची तयारी असल्यामुळे हा व्यवसाय पुढे वाढविला. त्यामागचा मूळ हेतू केवळ हत्यारांची कार्यक्षमता सुधारणे एवढाचनव्हता, तर हत्यारांचे आयुष्य वाढविणे हा सुद्धा होता. गरजेप्रमाणे हत्यार भूमितीमध्ये योग्य तो बदल करण्यावर आम्ही भर दिला.

2_1  H x W: 0 x
’ॲक्युशार्प’चा प्रवास
1999 पासून आजपर्यंतच्या प्रवासात ’ॲक्युशार्प’ने पारंपरिक मशिनपासून ते सी.एन.सी. मशिन या तंत्रज्ञानातील बदलाचे आव्हान यशस्वीपणे पेलले. प्रथमतः हत्यारांना धार लावण्यापासून सुरुवात केल्यानंतर त्यांचे उत्पादन करण्यापर्यंत हे मोठे आव्हान होते. तसेच आमच्या उद्योगाचे मूळचे ’हत्यारांना धार लावणे’ हे ध्येय नंतर हत्यारांचे डिझाईन, त्यात सुधारणा आणि त्यांचे उत्पादन असे बदलत गेले. यामागचे कारण अगदी तर्कशुद्ध होते. छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये असलेली बरीचशी यंत्रसामुग्री पारंपरिक पद्धतीची होती. त्यामुळे कर्तन वेग (कटिंग स्पीड) आणि फीड रेट यांच्यावर मर्यादा होत्या. म्हणजे ते एका मर्यादेपलीकडे वाढविता येत नव्हते. त्यामुळे या मशिन्सवर एच.एस.एस. हत्यारे वापरली जायची, मात्र जसजशी या छोट्या उद्योगातील पारंपरिक मशिनची जागा सी.एन.सी. मशिन्सनी घेतली तसतशी हाय स्पीड स्टील हत्यारांची जागा कार्बाईड हत्यारांनी घेतली आणि विशिष्ट कामासाठी विशिष्ट हत्यारे असण्याची गरजही वाढू लागली. हे सर्व करण्यासाठी आज ॲक्युशार्पफकडे 130 कुशल कर्मचाऱ्यांसह, 3 डी सॉफ्टवेअर असणारा सुसज्ज डिझाईन विभाग, 10 सी.एन.सी. मशिन्सचा सुसज्ज उत्पादन विभाग तर आहेच, शिवाय तयार होणाऱ्या हत्यारांची गुणवत्ता तपासण्यासाठी ’झोलर’ कंपनीचे लेझर तंत्रज्ञानाचे तपासणी यंत्र आहे. तसेच हत्यारांवर आवश्यक ते आवरण (कोटिंग) देऊन त्यांचे आयुष्य वाढविण्याची सोयही उपलब्ध आहे. स्पर्धात्मक बाजारपेठेत आपले स्थान टिकवून चांगला ठसा उमटविण्याच्या दृष्टीने आम्हाला 2011 साली आय.एस.ओ. 9001-2008 हे प्रमाणपत्रदेखील मिळाले. सुरुवातीच्या काळात ’ॲक्युशार्प’ने गोल आकाराच्या हत्यारांना (राऊंड टूल्स) धार लावण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे आम्हाला या उद्योगाच्या एका विशिष्ट विभागात स्पर्धा करणे शक्य झाले आणि हत्यारांच्या विविध घटकांवर लक्ष केंद्रित करून त्याच्या बारकाव्याचा अभ्यास करून एखाद्या विशिष्ट गरजेसाठी योग्य ते उपाय मिळविण्याच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग करता आले.
सर्वसाधारणपणे कर्तन हत्यारांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार म्हणजे टर्निंग, मिलिंग, ड्रिलिंग, रीमिंग इत्यादीसाठी लागणाऱ्या हत्यारांच्य तपशीलांचे (स्फेसिफिकेशन) प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) झालेले आहे. या उद्योगात आघाडीचे स्थान मिळविण्यासाठी एखाद्या हत्याराचा कच्चा माल, भूमिती आणि चिप ब्रेकिंगची पद्धत यांपैकी एका घटकात काहीतरी वैशिष्ट्य असावे लागते. याकरिता मोठ्या कंपन्यांत त्यांच्या कुशल संशोधन आणि विकास विभागाचे पाठबळ असते, मात्र याबाबतीत स्वतःचा संशोधन आणि विकास विभाग सुरू करून स्वतःची प्रगती केल्याचा आम्हाला अभिमान आहे.
उत्पादन क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीप्रमाणे आम्ही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कंपनीत बदल घडवून आणण्याची इच्छाशक्ती आणि जिद्द दाखविली आहे. उद्योगातील वाढ, ग्राहकांचे अभिप्राय आणि जर ग्राहकांकडून कधी तक्रारी आल्या, तर त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि संपूर्ण उद्योगाची सातत्याने माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी SAP (सॅप) प्रणाली वापरून आम्ही हे सिद्ध करून दाखविले आहे. ग्राहकाच्या नव्या गरजेनुसार नवीन कार्बाईड हत्यारांची निर्मिती करणे, हे आमचे प्रमुख बलस्थान आहे. सध्या आम्ही ही निर्मिती 8 ते 10 दिवसांत करू शकतो याचे कारण म्हणजे -
• हत्यार उत्पादनामधील आमची क्षमता आणि कौशल्य
• हत्यार डिझाईन करणे, उत्पादन करणे आणि गुणवत्ता तपासणी करणे या सर्व गोष्टी एकाच छताखाली होतात.
• कामाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा विलंब होऊ नये यासाठी व्यवसायाच्या सर्व प्रक्रियांमध्ये आवश्यक माहितीची देवाणघेवाण होऊन काम कुठेही अडणार नाही याची काळजी घेतली जाते.
पारंपरिक हत्यारांशिवाय आमची स्वतःच्या उत्पादनांचीसुद्धा मोठी मालिका आहे. त्यापैकी काही ठळक पुढीलप्रमाणे...
1) वुड रफ कटर

3_1  H x W: 0 x
सर्वसाधारणपणे वुड-रफ कटर्स असलेल्या धारा (फ्लुटस) या अक्षाशी समांतर किंवा एक बाजूला काही ठराविक कोनामध्ये कललेल्या असतात, ज्याला हेलिक्स अँगल म्हणतात. हे हेलिक्स अँगल सामान्यत: अक्षाच्या एकाच दिशेला असतात. अशी हत्यारे ऑटोलॉक चक किंवा स्पिंडलवर बसवलेल्या होलर्समध्ये पकडून यंत्रणासाठी वापरले जातात. या प्रकारची हत्यारे काही प्रमाणात स्पिंडलच्या विरुध्द बाजूला अधांतरी (ओव्हरहँग) राहतात. त्यामुळे अशी हत्यारे वापरताना कर्तन वेग (स्पीड), फीडरेट आणि कापाची खोली (डेप्थ ऑफ कट) लावताना मर्यादा येतात. याचे कारण म्हणजे यंत्रण चालू असताना हत्यारावर दाब (लोड) येऊन स्पिंडलवर कंपने निर्माण होतात. याचा परिणाम म्हणून कार्यवस्तूच्या पृष्ठभागावर खडबडीतपणा (चॅटर-मार्क्स) येतो, जो दर्जेदार उत्पादनासाठी आक्षेपार्ह असतो. या स्पीड-फीड च्या मर्यादांमुळे आवर्तन काळ (सायकल टाइम) वाढून उत्पादकता मार खाते.
’अक्युशार्प’ने यावर मात करण्यासाठी, म्हणजे कर्तन करताना अशा हत्यारावर येणारा दाब कमी करण्यासाठी हत्याराच्या भूमितीमध्ये थोडा बदल केला. अशा हत्याराच्या धारांना (फ्लुट्स) अक्षाशी जो कोन दिलेला असतो तो एका आड एक विरुध्द केला. म्हणजे एक धार उजव्या बाजूला व एक धार डाव्या बाजूला कोन देऊन त्याची रचना केली. याचा परिणाम असा झाला की शेजारील विरुध्द कोनांच्या धारामुळे हत्यारावर येणाऱ्या दाबाचे संतुलन होऊन तो काही प्रमाणात सीमित झाला. कर्तन करताना कर्तन वेग, फीडरेट आणि कापाची खोली यावरची मर्यादा काही प्रमाणात शिथिल होऊन कार्यवस्तूचा दर्जा न खालावता उत्पादकता वाढू शकली.
अशा प्रकारचे कटर्स हे ऑटोमोबाईल उद्योगामध्ये क्रँकशाफ्टचा चावी गाळा (की-वे) आणि कनेक्टिंग रॉड या जॉबवर नॉचिंग या ऑपरेशनसाठी वापरतात.
2) स्टेप ड्रिल

4_1  H x W: 0 x
हे स्टेप ड्रिल एकाच वेळी दोन पृष्ठभागावर क्रिया करतात. छिद्राचा आकार आणि त्यांची वेगवेगळी लांबी यांच्यावर हत्याराला धार लावताना अचूक नियंत्रण ठेवले गेल्यामुळे कंपोनंटवर पाहिजे ते आकार अचूकपणे मिळतात. या हत्यारांना धार लावण्याची प्रक्रिया खास प्रोग्रॅम केलेल्या विशिष्ट यंत्रावर होऊ शकते, कारण त्या प्रोग्रॅममध्ये सर्व आवश्यक आकार, लांबी आणि भूमिती अचूकपणे नियंत्रित केलेली असते. अशा प्रकारचे स्टेप ड्रिल सिलिंडर हेडच्या नॉझल बोअरच्या मशिनिंगसाठी किंवा इतर कार्यवस्तूच्या तत्सम ॲप्लिकेशनसाठी वापरले जातात.
3) ड्रिल काउंटर रीमर

5_1  H x W: 0 x
या विशिष्ट प्रकारच्या स्टेप-ड्रिलमध्ये छिद्राचा आकार तसेच लांबी अचूकपणे नियंत्रित केली असल्यामुळे सातत्याने तेच आकार (परिमाण) मिळत राहतात. एकाच आवर्तनात (पासमध्ये) सर्व क्रिया पूर्ण केली जाते. आम्ही हे ड्रिल सुरुवातीला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये लिव्हर गिअर सिलेक्टरच्या छिद्राचे यंत्रण करण्यासाठी वापरले आहे.
4) डाय बनविण्यासाठी लागणारे बॉल नोज कटर आणि रीमर
डाय (Die) बनविण्याच्या उद्योगांमध्ये ही हत्यारे नेहमी वापरली जातात. ’ॲक्युशार्प’ने अतिशय किफायतशीरपणे ही गरज भागवून आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे.

6_1  H x W: 0 x
 

7_1  H x W: 0 x 
5) अतिशय अचूक टॉलरन्ससाठी वापरले जाणारे ड्रिल
38 ते 40 रॉकवेल (Rc) हार्डनेस असणाऱ्या कार्यवस्तूवर छिद्र पाडताना H7 टॉलरन्समध्ये छिद्राचे माप नियंत्रित करून 6Rt चे पृष्ठीय फिनिश (सरफेस फिनिश) मिळवायचे असेल तर सामान्यत: किमान तीन हत्यारे क्रमाने वापरावी लागतात. 1) ड्रिल, 2) होल मिल आणि 3) योग्य मापाचा रीमर. यामुळे या कार्यपद्धतीने लागणारा आवर्तन काळ हा सुमारे एका हत्याराच्या वापराच्या तिप्पट लागतो. शिवाय प्रत्येक हत्याराने कर्तन करून काढायचा कार्यवस्तूचा भाग जर कमी जास्त झाला तर तयार होणाऱ्या छिद्राच्या अचूकतेवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, छिद्राचे माप कमी-जास्त होणे, पृष्ठभागावर कर्तनाचे व्रण दिसणे इ. त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे कार्यवस्तूच्या दर्जातील सातत्याचा अभाव आणि कमी उत्पादकता.

8_1  H x W: 0 x
’ॲक्युशार्प’ने यावर तोडगा म्हणून नवीन संकल्पनेचे अचूक टॉलरन्स असलेले एक ड्रिल विकसित केले. यामध्ये एकाच ड्रिलने वरील तीन हत्याराचे काम एकत्रितपणे करण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवली. या एका हत्याराच्या सिंगल पासमध्ये अपेक्षित असलेले छिद्राचे माप व त्यावरील पृष्ठीय गुळगुळीतपणा हमखास येऊ शकतो. 35 Rc पेक्षा कमी हार्डनेस असलेल्या कार्यवस्तूवर मात्र या ड्रिलने अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.
’ॲक्युशार्प’ने बनवलेली अशी ड्रिल्स ही दगड/खडक फोडायच्याड्रिलवर (रॉक ड्रिल) ज्या कार्बाईडच्या गुंड्या (इन्सर्टस् , बटन्स) बसवायच्या असतात त्याच्या अचूक टॉलरन्सच्या छिद्रांसाठी अतिशय भरवशाने वापरली जातात.

6) आतून शीतकाचा प्रवाह असणारे ट्विस्ट ड्रिल
सी.एन.सी. मशिनमध्ये जास्त दाबाने मिळणाऱ्या शीतकाचा वापर करता यावा म्हणून हेलिकल ड्रिल फ्लुटमध्ये या शीतकाच्या प्रवाहाला मार्ग उपलब्ध करून दिला म्हणजे चांगल्या पद्धतीने कर्तन करता येते. हे करताना छोट्या व्यासाची हत्यारे बनविण्यामध्ये त्यांची रचना, उत्पादन यामध्ये अनेक मर्यादा येतात. पण ’ॲक्युशार्प’ने या गरजा भागविण्यासाठी स्पिंडलमधून शीतक आरपार जाऊ देणारी विविध प्रकारची ड्रिल्स बनवली आहेत, ज्याची सुरुवात 3 मिमी व्यासाच्या ड्रिलपासून होते आणि शीतक जाणाऱ्या छिद्रांचा व्यास सुमारे 0.5 मिमी असतो. ही ड्रिल्स कार्बाईडमध्ये बनविली जातात.

9_1  H x W: 0 x
7) खास गरजांसाठी बनविलेले बॉल नोज कटर्स
आमच्या एका ग्राहकाने एक वेगळीच गरज कंपनीसमोर मांडली. क्रँकशाफ्टमधील बेअरिंग्जच्या वंगणासाठी लागणाऱ्या वंगण तेलाचा पुरवठा करणारी ’गॅलरी’ छिद्रे पाडलेली असतात. ही छिद्रे पाडताना दोन छिद्रांच्या छेदबिंदूच्या ठिकाणी धारदार कडा तयार होण्याची शक्यता असते. इंजिन सुरू असताना त्यातून वाहणारे वंगण तेल हे दाबयुक्त असते. या दाबयुक्त तेलामुळे या धारदार कडा अतिसूक्ष्म आकाराच्या धातू कणांच्या स्वरूपात वेगळ्या होतात. हे धातूचे कण बेअरिंग्जच्या पृष्ठभागावर पोहोचले तर बेअरिंग्ज खराब होतात आणि इंजिन बंद पडते. त्यामुळे मूळ यंत्र उत्पादकाची (OEM) ख्याती आणि प्रतिमा डागाळली जाते. यामुळे आजकाल मूळ यंत्र उत्पादकांनी भागाच्या आतील बाजूला असलेल्या छिद्रांच्या छेदबिंदूचे दुर्बिणीतून (एंडोस्कोपिक) निरीक्षण करायला सुरुवात केली आहे. या समस्येवर मात करणारी हत्यारे विकसित करणे हे कर्तन हत्यारे उत्पादकांसमोर एक मोठे आव्हान होते. आम्ही यासाठी ’बॉल नोज’ प्रकारचे खास हत्यार बनविले आहे. हे हत्यार हँड टूलच्या चकमध्ये बसून आधी पाडलेल्या छिद्रामधून आरपार छिद्रांच्या छेदबिंदूजवळ पोहोचविले जाते आणि गोलाकार फिरवून छेदबिंदूजवळील धातूच्या धारदार कडा काढून टाकल्या जातात. ही पद्धत वापरल्यानंतर दुर्बिणीतून केलेल्या निरीक्षणातून छेदबिंदूपाशी धारदार कडा राहत नाहीत असे दिसून येते. आकृतीमध्ये क्रँकशाफ्टच्या धारदार कडा तयार होतात अशा ठिकाणी आडवा छेद घेतलेला दाखविला आहे.

10_1  H x W: 0
8) लग ड्रिल
लग ड्रिल हे ’ॲक्युशार्प’ने विकसित केलेले आणखी एक विशेष हत्यार आहे. मोठ्या व्यासाच्या सॉलिड कार्बाईड हत्याराची सुरुवातीची किंमत अधिक असते. हे हत्यार झिजल्यामुळे वापरण्यास अयोग्य झाले तसेच, जिथे कमी रिजिड सेटअप असल्याने हत्यार तुटण्याची शक्यता असते तिथे हत्यार बदलणे/दुरुस्त करणे हा एक मोठाच खर्च होत असतो. याचे साधे कारण म्हणजे ते हत्यार संपूर्णपणे कार्बाईडचे असते. हत्यार फेकून दिल्यामुळे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी एक नवीन हत्यार विकसित करण्यात आले ज्याचा शँक ’टफन्ड स्टील’चा (कठीण पोलाद) असतो आणि ज्यात कार्बाईडचे तुकडे (बिट्स) बसविलेले (एम्बेडेड) असतात. अशा हत्याराला नंतर ’लग ड्रिल’ असे नाव देण्यात आले. लग टूल्स ही सर्वसाधारण 6 ते 8 या लांबी ते व्यासाच्या गुणोत्तरात (L/D) जास्त परिणामकारक चालतात आणि चांगले दर्जात्मक उत्पादन देतात.

11_1  H x W: 0
नजिकच्या भविष्यात आमच्या योजनांमध्ये डिझाईन आणि उत्पादन विभाग अधिक प्रगतीशील बनवून त्यात क्युबिक बोरॉन नायट्राईड (CBN) आणि पॉली क्रिस्टल डायमंडची (PCD) हत्यारे बनवून त्यांची उलाढाल वाढवायची प्रमुख योजना आहे. ’ॲक्युशार्प’ ही आता फक्त कर्तन हत्यारे बनविणारी कंपनी नाही, तर आता आमची ओळख ’कर्तन हत्यारे क्षेत्रातील हत्यार विषयक समस्यांवर संपूर्ण उपाय देणारी कंपनी’ अशी झाली आहे.
Powered By Sangraha 9.0