गृहिणी ते उद्योजक, एक प्रवास

09 Mar 2021 15:22:14
आज महिलावर्ग अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहे, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्यास अभियांत्रिकी क्षेत्रदेखील अपवाद नाही. अभियांत्रिकी क्षेत्रातील कोणताही अनुभव पाठीशी नसताना केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर मशीनिंग क्षेत्रातील कारखाना यशस्वीपणे चालविणाऱ्या प्रकाश होम इंडस्ट्रीच्या अनघा नाईक यांचा प्रवास उलगडणारी मुलाखत, 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ( Women’s day ).
 
 
1_1  H x W: 0 x
जेव्हा कुटुंबात मुलगा नसतो, तेव्हा त्या कुटुंबाच्या चालू असलेल्या व्यवसायाचे काय होणार? तो कोण चालविणार? त्याचे वारसदार कोण? असा प्रश्न त्या व्यवसायाशी संबंधित लोकांना आणि समाजालाही पडतो. अशावेळी आपल्या व्यवसायाविषयी खात्री देताना, आपली मुलगीच आपल्या कंपनीचे भवितव्य आहे, असे प्रकाश होम इंडस्ट्रीजचे मालक शरद पंडित यांनी मानले. अभियांत्रिकीचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसले, तरीही अंगभूत कौशल्याच्या जोरावर त्यांची मुलगी अनघा नाईक, आज त्यांच्या कंपनीचा सर्व कारभार यशस्वीपणे चालवित आहे. वडिलांनी आपल्यावर टाकलेला विश्वास त्या आज सार्थ ठरविताना दिसत आहेत. ज्या क्षेत्रात आपण काम करीत आहोत त्यास संबंधित शिक्षणाची जोड असल्यास ते केव्हाही उत्तमच असते. परंतु तसे नसताना तो व्यवसाय जिद्दीने यशस्वीरित्या चालविला जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे अनघा नाईक! 8 मार्च, जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.
 
प्रश्न : यांत्रिकी क्षेत्र महिलांसाठी तितकेसे अनुकूल नाही, असे बरेचदा म्हटले जाते. तुमच्या कंपनीमध्ये आज तुम्ही उच्च पदावर काम करीत आहात. हे क्षेत्र निवडताना तुम्ही काय विचार केला होता?
उत्तर : प्रकाश होम इंडस्ट्रीज हा व्यवसाय मशीन टूल उद्योगाशी संबंधित आहे. पूर्वी आम्ही ड्रिलिंग मशीनची अॅसेम्ब्ली करायचो. माझे आजोबा आणि त्यांचे भाऊ, या दोघांनी मिळून 1961-62 च्या सुमारास हा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर माझे वडील या व्यवसायात शिरले. माझ्या आई वडिलांना मी आणि माझी बहिण अशा आम्ही दोन्ही मुलीच होतो. व्यवसाय तर चांगला चालला होता. परंतु एक वेळ अशी आली की, या व्यवसायाचे पुढे काय होणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यावेळी 2008 साली वडिलांनी मला विश्वासात घेऊन, मी ही कंपनी बघावी असा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला. माझ्यासाठी सगळीच सुरुवात शून्यातून करावी लागणार होती. तशी तयारी माझ्या वडिलांनीही ठेवली होती. सर्व प्रकारचे प्रशिक्षण द्यायला, लागेल ती मदत करायला मी तुझ्यासोबत आहे असा विश्वास त्यांनी मला दिला आणि 1 जून 2008 रोजी माझा उद्योग विश्वात प्रवेश झाला.
 
प्रश्न : कंपनीतील तुमच्या प्रवासाविषयी काय सांगाल?
उत्तर : वडिलांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मी रोज कंपनीत जायचे आणि फक्त निरीक्षण करायचे. शॉप फ्लोअरवर काय काम चालले आहे, हे मला त्यावेळी कळायचे नाही. काही गोष्टींचा मी स्वतःच अर्थ लावायचे. कधी तिथल्या लोकांना विचारायचे. साधारणतः 3 महिन्यानंतर मला हळूहळू गोष्टी समजायला लागल्या आणि कामाच्या ठिकाणी असलेले 'लूप होल्स' ही समजायला लागले. त्यासंदर्भात काय करता येईल याबाबत वडिलांशी चर्चा करायचे. तांत्रिक ज्ञान अजिबातच नसल्यामुळे, विशेषतः तांत्रिक समस्यांमध्ये काय निर्णय घ्यायचे, कसा विचार करायचा हे थोडे अवघड जात होते. प्रथम HR विभाग मी सांभाळला. त्यानंतर पर्चेस विभाग, शॉप फ्लोअर अशा सर्व विभागांत मी काम केले.
2_1  H x W: 0 x
 
प्रश्न : कंपनीत गेल्यानंतर तेथील लोकांनी तुम्हाला कसे स्वीकारले?
उत्तर : मी कंपनीमध्ये रुजू होणे हा तेथील लोकांसाठी आणि माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता. एक महिला अधिकारी म्हणून मला त्यांनी सुरुवातीला जरा जड मनानेच स्वीकारले होते. 'या आत्ता आल्यात. आम्ही आधीपासून येथे काम करतोय. त्यांना काय कळतंय याच्यातलं...' असे संवाद त्यावेळी माझ्या कानावर पडायचे. या परिस्थितीला कसे सामोरे जायचे हा प्रश्न माझ्यासमोर होता. कंपनी चालवायची म्हटल्यावर मला लोकांचा विश्वास संपादन करावा लागणार होता. त्याची सुरुवात म्हणून प्रत्येक महिन्याला एका कामगाराच्या कुटुंबाला आम्ही कंपनीमध्ये आमंत्रित करायला सुरुवात केली. त्यांना सर्व कंपनी फिरवून कंपनीच्या कामाबद्दल माहिती दिली जायची. त्यामुळे त्या प्रत्येक कुटुंबाचे आणि आमचे एक नाते तयार व्हायला मदत झाली. आम्ही कामगारांचा वाढदिवसदेखील साजरा करायला लागलो. त्यानंतर पुढे केव्हाही मला आमच्या लोकांशी जुळवून घेताना फारशी अडचण आली नाही. मला त्यांना समजून घेण्यात आणि त्यांनी मला सांभाळून घेण्यामध्ये याची फार मदत झाली. मला एक गोष्ट येथे आवर्जून सांगावी वाटते की, आज आमच्या कंपनीमध्ये 30-35 वर्षे काम केलेले लोक अजूनही काम करीत आहेत. माझ्या वडिलांच्या काळात काम करणारे लोक आजही माझ्यासोबत राहून काम करीत आहेत, हेच माझे यश आहे असे मी मानते आणि ही बाब मला समाधान देऊन जाते.
 
प्रत्येक ग्राहकाला आणि पुरवठादाराला दिलेल्या कमिटमेंट 100 टक्के पाळण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे आज तेदेखील माझ्यावर विश्वास ठेवत आहेत. डिलिव्हरी वेळेत होत असल्यामुळे ग्राहकदेखील समाधानी आहेत आणि तेच आमचे प्रमाणपत्र आहे, असे म्हणायला हरकत नाही.
 
 
प्रश्न : शॉप फ्लोअरवरील तांत्रिक किंवा इतर समस्या तुम्ही कशा हाताळता?
उत्तर : HR मधून बाहेर पडल्यानंतर मी पर्चेस आणि तांत्रिक बाबींमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. माझ्या वडिलांनी मला ड्रॉइंग वाचायला शिकविले. ड्रॉइंगमधील खूप खोलवरचे बारकावे जरी मला समजत नसले तरी, जेव्हा एखादा ग्राहक आमच्याकडे येतो आणि त्याने दिलेल्या ड्रॉइंगनुसार ते काम आपल्याकडे करणे शक्य आहे की नाही हे मी आज त्यांना सांगू शकते. आमच्याकडे तांत्रिक आणि गुणवत्ता विभागात उत्तम लोक आहेत. त्यांच्याकडून मी ही कामे करून घेते. आमच्याकडे सुरुवातीपासून धातुकाम मासिक येते. या मासिकाचे नियमित वाचन करून त्यातील माहितीचा उपयोग आमच्याकडे शॉप फ्लोअरवर कसा करता येईल, याविषयी आमच्याकडे चर्चा होतात. त्याबरोबर इतर तांत्रिक मासिके, पुस्तके वाचूनही मी स्वत: ज्ञान घेत असते.
 
शॉप फ्लोअरवर एखादी छोटी समस्या असली, तरी बरेचदा माझ्या तांत्रिक शिक्षणाअभावी त्याचा गैरफायदा घेतला जायचा. प्रत्यक्षात समस्या लहान असायची, परंतु त्याचा खूप मोठा बाऊ केला जायचा. अशावेळी मी वेगवेगळ्या 3-4 लोकांकडून त्याविषयी माहिती घेत गेले, त्यांची काय मते आहेत ते जाणून, त्याचे विश्लेषण करून ते काम कमीतकमी वेळेत कसे करता येईल हे पाहत गेले आणि त्यातून खूप काही शिकत गेले. अशा घटनांसाठी मला कायम तयार रहावे लागते.
शॉपवर होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे आवश्यक तपशील घेऊन योग्य तो पाठपुरावा करणे हे मी सातत्याने करीत असल्याने आता खूपच सुलभतेने व्यवस्थापन होत आहे.
 
प्रश्न : तुमच्याकडे किती महिला काम करतात? कंपनीमध्ये महिलांना निर्णय प्रक्रियेत कसे स्थान असते?
उत्तर : जेव्हा मी कंपनीत रुजू झाले, तेव्हा सुरुवातीला फक्त हाउस कीपिंगचे काम करण्यासाठी महिला होत्या. आज एकूण 100 कर्मचारी आमच्याकडे काम करीत असून त्यापैकी 10-12 महिला आहेत. पेंटिंग शॉप, ड्रिलिंग विभाग, HR, विपणन अशा विविध विभागांत त्या काम करीत आहेत. मशीनिंग विभागातील आमची एक महिला स्वतंत्रपणे व्ही.एम.सी.देखील चालविते. आमचा संपूर्ण HR विभाग आणि विपणन विभाग या दोन महिलाच सांभाळत आहेत. कंपनीच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग 60% असतो. हे चित्र जेव्हा मी बघते तेव्हा मी स्वतः खूप समाधानी आहे. आपण जे काही प्रयत्न करतो आहोत ते सर्व सार्थकी लागत आहेत.
 
एकूणच कामामध्ये महिला खूप मन लावून काम करतात, त्या कामात सिन्सिअर असतात. मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या बेळगाव परिसरात खूप महिला उद्योजक आहेत आणि वर्किंग क्लासमध्येसुद्धा महिलांचे प्रमाण खूप आहे.
 
प्रश्न : महिला दिनाच्या निमित्ताने यांत्रिकी क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या आणि या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या महिलांना काय संदेश द्याल?
उत्तर : या कंपनीच्या गेटमधून जेव्हा मी प्रथम आत आले, तेव्हाच मी ठरविले होते की, माझ्या वडिलांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, ती जबाबदारी मला पार पाडायची आहे. ही कंपनी मी बंद पडू देणार नाही. त्यासाठी आपल्याला कशा सुधारणा करता येतील याचा मी सातत्याने विचार करायचे. कोणतेही काम हातात घेतले की ते अर्धवट न ठेवता चिकाटीने पूर्ण करणे या गुणांचा मला खूप उपयोग झाला. जेव्हा ही कंपनी सुरू झाली होती, तेव्हा आमच्याकडे सर्व पारंपरिक सेटअप होता. त्यामध्ये सुधारणा करीत बाजारपेठेच्या मागणीनुसार आम्ही प्रत्येकवर्षी आमच्या शॉप फ्लोअरवर एका नव्या मशीनचा समावेश करीत आता पूर्ण सेटअप सी.एन.सी. मशीनचा झाला आहे.
 
 
या क्षेत्रात यायचे असेल तर त्यासाठी तांत्रिक ज्ञान हे पाहिजेच, जे माझ्याकडे नाहीये. तो माझा फार मोठा तोटा आहे. असे खूपदा वाटते की, जर मला हेच करायचे होते तर मी या क्षेत्राचे ज्ञान घेऊन येथे आले असते तर आज त्याची खूप मदत झाली असती. त्यामुळे मला असे वाटते की, आता ज्या महिला या क्षेत्रात काम करू इच्छितात, त्यांच्याकडे 3D म्हणजे ड्रीम (स्वप्न), डिझायर (इच्छाशक्ती) आणि डेडिकेशन (समर्पण) हे तीन गुण असणे खूप आवश्यक आहे. या तीन गोष्टी त्यांच्याकडे असतील, तर त्यांच्यासाठी यश निश्चितच लांब नाही.
शब्दांकन : सई वाबळे,
सहाय्यक संपादक, उद्यम प्रकाशन
Powered By Sangraha 9.0