स्विस लेथची उपयुक्तता

07 May 2021 16:31:14
आकाराने छोट्या आणि संख्येने मोठ्या प्रमाणात उत्पादन करावयाच्या यंत्रभागांसाठी पारंपरिक अथवा सी.एन.सी. लेथपेक्षाही स्लायडिंग हेड अथवा स्विस लेथ (चित्र क्र. 1) जास्त कार्यक्षम ठरतात. स्विस लेथमध्ये कार्यवस्तू पकडण्याची यंत्ररचना किंवा कॉलेट एका गाइड बुशिंगच्या मागे बसविलेली असते. स्विस लेथला अनेकदा स्विस स्क्रू मशीन, स्विस स्वयंचलित (ऑटोमॅटिक) लेथ किंवा स्विस टर्निंग सेंटर या नावांनीदेखील ओळखले जाते. बार स्टॉक पकडणारी यंत्ररचना किंवा कॉलेट, लेथ बेड आणि टूलिंगच्या थेट संपर्कात येऊ दिली जात नाही, हा स्विस लेथ आणि पारंपरिक लेथ यांच्यातील मुख्य फरक आहे. या विशिष्ट कॉन्फिगरेशनमुळे पारंपरिक लेथच्या तुलनेत हे विशिष्ट मशीन अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.

1_1  H x W: 0 x
स्विस लेथची कार्यपद्धती

2_1  H x W: 0 x
 
 
पारंपरिक लेथमध्ये हेडस्टॉक स्थिर असतो आणि कार्यवस्तू कॉलेट किंवा चकमध्ये पकडली जाते. ही पकडसाधने (होल्डिंग डिव्हाइस) कार्यवस्तूला एका बाजूने पकडून मशीनमधल्या मोकळ्या जागेत एकतर कॅन्टीलीव्हरप्रमाणे मोकळी सोडलेली असतात किंवा कार्यवस्तूला दुसऱ्या टोकावर टेलस्टॉकद्वारे आधार दिला जातो. स्विस मशीनमध्ये (चित्र क्र. 2) हेडस्टॉकची हालचाल होते, हा इतर लेथच्या तुलनेत मोठा फरक आहे. म्हणजेच, हेडस्टॉकच्या ज्या क्षेत्रामध्ये चकिंग कॉलेट क्लॅम्प केले जाते, त्यामधून बार स्टॉक आरपार जातो. यानंतर तो बार गाइड बुशिंगमधून जाऊन टूलिंग क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. यंत्रण करताना, बुशिंगद्वारे बारचे अरीय (रेडियल) दिशेतले स्थान निश्चित केले जाते. बारला सोबत घेऊन Z दिशेमध्ये हेडस्टॉक अचूकपणे मागे आणि पुढे हालचाली करतो. गँग स्लाइडवर असलेले टर्निंग टूल गाइड बुशिंगच्या अगदी जवळ या बारच्या संपर्कात येते. बारच्या हालचालीद्वारा यंत्रणासाठी लागणारा सरकवेग दिला जातो. स्थिर एकल बिंदू (फिक्स्ड् सिंगल पॉइंट) टूल किंवा इतर आवश्यक टूल ज्यावर बसविलेली असतात अशा हत्यारधारकांना (टूल होल्डर) घेऊन गँग स्लाइड पुढे मागे फिरते. गँग स्लाइडवर लाइव्ह टूलिंगदेखील बसविता येते. बऱ्याच मशीनमध्ये बॅक वर्किंग टूल स्टेशन आणि दुय्यम स्पिंडल असतात आणि काही मशीनमध्ये अतिरिक्त टूल असणारे टरेट किंवा अजून काही सोयीसुद्धा असतात.
 
 
स्विस लेथची क्षमता आणि फायदे

3_1  H x W: 0 x
 
 
ज्यांची लांबी आणि व्यास यांचे गुणोत्तर अधिक असते, अशा कार्यवस्तूंमध्ये (चित्र क्र. 3) यंत्रण प्रक्रियेदरम्यान विक्षेपण होण्याची खूप शक्यता असते. ज्या यंत्रभागांच्या लांबी आणि व्यासाचे गुणोत्तर 20:1 आहे अशा यंत्रभागांचे यंत्रण करण्याची क्षमता स्विस मशीनमध्ये आहे. त्याचे कारण असे की, बारला आधार देणाऱ्या गाइड बुशिंगपासून केवळ काही मिमी. अंतरावर हे यंत्रण केले जाते. इतक्या जवळ यंत्रण करण्याच्या या पद्धतीमुळे अचूकता वाढते आणि कार्यवस्तूला स्थिरता मिळते. त्याबरोबरच टूलचे आयुर्मानही वाढते. या वैशिष्ट्यांमुळे काटेकोर टॉलरन्स असणाऱ्या यंत्रभागांचे उत्पादन स्विस लेथवर सहजपणे आणि उच्च वारंवारितेने करता येते. सध्या उपलब्ध असलेल्या स्विस टर्निंग मशीनमध्ये लांब आणि सडपातळ कार्यवस्तूंच्या टर्निंग व्यतिरिक्त अजूनही वेगळी यंत्रण कामे करण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ, क्रॉस मिलिंग, क्रॉस ड्रिलिंग, प्रोफाइल मिलिंग, खोल आणि लांब छिद्रांचे ड्रिलिंग आणि थ्रेड व्हर्लिंग, बॅक टर्निंग, बॅक ड्रिलिंग, सबस्पिंडलच्या मदतीने स्लॉटिंग वगैरे. या क्षमतेमुळे लहान परिमाणांच्या (डायमेन्शन) क्लिष्ट यंत्रभागांचे यंत्रण करणे खरोखरच सोपे होते.
 
 
उदाहरणे

1. कॅन्सलस स्क्रू

4_1  H x W: 0 x 
 
पारंपरिक टर्निंग सेंटरवर कॅन्सलस स्क्रूचे (चित्र क्र. 4) उत्पादन करताना बार पकडण्यासाठी विशेष कॉलेटचे डिझाइन आणि निर्मिती करावी लागते. समकेंद्रियता आणि रेडियल टॉलरन्स मिळविण्यासाठी बार विशेष सेंटरमध्ये पकडणे आवश्यक असते. चित्र क्र. 4 मध्ये आपण पाहू शकता की, बारच्या दोन्ही टोकांवर विशिष्ट भूमितीमध्ये यंत्रण करणे जरूरी आहे. याचा अर्थ असा की, मशीनचे सेटअप अनेकवेळा बदलावे लागतील आणि यंत्रणादरम्यान एकाहून जास्त काप आणि पास घ्यावे लागतील. स्विस लेथवर कॅन्सलस स्क्रूचे यंत्रण अधिक चांगले होते, कारण त्यात कोणत्याही विशेष धारक (होल्डर) आणि विशिष्ट सेंटरची गरज नसते. मशीनमधील गाइड बुशमुळे हे सहज साध्य होते. स्विस मशीनमध्ये बॅक टर्निंग हे ऑपरेशनही असल्याने, एकाधिक सेटअप आणि कापदेखील आवश्यक नसतात. याचा अर्थ असा की, उत्पादन करताना फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत, आवर्तन काळ कमी होतो आणि यंत्रण प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने चालते. त्याचा परिणाम म्हणजे उत्पादन अधिक किफायतशीर होते.
 
 
2. पेडिकल स्क्रू हेड

5_1  H x W: 0 x 
 
कॅन्सलस स्क्रूच्या यंत्रणाप्रमाणेच पेडिकल स्क्रू हेडच्या ड्रॉइंगमध्येसुद्धा (चित्र क्र. 5) क्लिष्ट भूमितीचे यंत्रण करावे लागते असे दिसते आहे. पारंपरिक टर्निंग सेंटरवर यासाठी जास्त सेटअप करावे लागतात. त्यामुळे याच्या यंत्रणाचा आवर्तन काळ वाढतो. यामध्ये मिलिंग, स्लॉटिंग, ड्रिलिंग आणि थ्रेडिंग प्रक्रियांचा समावेश आहे. स्विस मशीन सेंटरवरील बॅक टर्निंग हे वैशिष्ट्य वापरून हे यंत्रण सहज करता येते आणि ही सर्व कामे एकाच सेटअपमध्ये करणे शक्य असते. स्विस मशीनमधील गाइड बुशमुळे बारला जिथे आधार दिलेला असतो, तिथे अगदी जवळून काप घेतले गेले जातात. यामुळे चांगल्या दर्जाचे काटेकोर काप घेता येतात.
 
 
3. स्टॉपरसह वायर
 
6_1  H x W: 0 x
 
स्विस प्रकारची मशीन का वापरावी याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे चित्र क्र. 6 मध्ये दाखविलेला यंत्रभाग. चित्र क्र. 6 मध्ये दाखविल्यानुसार लांबी आणि व्यास यांचे गुणोत्तर खूप जास्त आहे. पारंपरिक लेथवर, कार्यवस्तू मुख्य स्पिंडलच्या कॉलेटमध्ये पकडली जाते. हे कॉन्फिगरेशन लांबलचक कार्यवस्तूंसाठी योग्य नसते, कारण त्यात विक्षेपण होण्याची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत बारला कॉलेटमध्ये पकडल्याने पुरेसा आधार मिळत नाही आणि टूल जेव्हा धातू कापते, तेव्हा निर्माण होणाऱ्या बलामुळे कार्यवस्तू वाकू शकते. स्विस मशीनच्या बाबतीत, बार फीडर बार स्टॉकला गाइड बुशिंगमध्ये सरकवितो. अशाप्रकारे, कटिंग टूल गाइड बुशच्या अगदी जवळ कार्यवस्तूच्या संपर्कात येते आणि आधाराच्या अगदी जवळ यंत्रण केले जाते. यामुळे कार्यवस्तूमध्ये कोणत्याही प्रकारचे विक्षेपण किंवा वेडेवाकडेपणा येणार नाही, हे सुनिश्चित होते आणि इच्छित टॉलरन्स मिळविले जाऊ शकतात.
 
 
निष्कर्ष
स्विस मशीनचा वापर करण्याचा कल जगामध्ये अतिशय वेगाने वाढत आहे. पारंपरिक सी.एन.सी. लेथच्या तुलनेत सी.एन.सी. स्विस लेथमधील उच्च कार्यप्रदर्शन देणारे गाइड बुशिंग आणि जवळजवळ शून्य विक्षेपण, या दोन बाबी यंत्रणाच्या पुष्कळशा कामांमध्ये अतिशय लाभदायक असतात.
 
 
 
भूषण पिटकर यांत्रिकी अभियंता आहेत. ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कामाचा त्यांना 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे.
टर्निंग सेंटर आणि स्विस लेथचा वापर करून अचूक आणि लहान भाग तयार करण्यात त्यांचे प्राविण्य आहे.
9764443068
bhushan.pitkar@gmail.com 
Powered By Sangraha 9.0