प्रचलित कार्यसंस्कृतीमध्ये उत्पादनाचा अत्युच्च दर्जा, जास्तीतजास्त वेग आणि कमीतकमी किंमत या गोष्टींबरोबरच सुरक्षिततेलाही महत्त्व देणे गरजेचे बनले आहे. कारखान्यात प्रत्यक्ष घडलेल्या काही घटनांच्या आधारे या लेखमालेमध्ये कारखान्यातील सुरक्षिततेबाबत चर्चा केली आहे.
रमेश एका प्रसिद्ध दुचाकी बनविणाऱ्या कंपनीच्या शोरूममधे तांत्रिक कर्मचारी आहे. एक गाडी दुरुस्तीसाठी आली होती आणि आज ती ग्राहकाला वेळेत द्यायची होती. रमेशने काम पूर्ण करत आणले होते. पेट्रोलची टाकी त्याने बसवायला घेतली आणि त्याच्या लक्षात आले, की एक अर्थिंग केबल तुटली आहे. त्याने स्टोअरमधून दुसरी अर्थिंग केबल घेतली, पण तिचा लग लहान आकाराचा होता. त्यामुळे त्यामधे बोल्ट बसेना. दुसरी मोठ्या भोकाची अर्थिंग केबल शिल्लक नाही असे त्याच्या लक्षात आले. अॅल्युमिनिअमच्या या लगचेच भोक जरा मोठे करू, या विचाराने त्याने एक गोल कानस घेतली आणि तो केबलवरचा लग घासत बसला. बराच वेळ काम करूनही तो हवा तसा होईना, तेव्हा त्याने हे काम तेथीलच एका ड्रिल मशीनवर करायचे ठरविले.
चित्र क्र.1 लगसह अर्थिंग केबल
कॉटनचे हातमोजे घातलेल्या हातांनीच त्याने हवे त्या मापाचे ड्रिल शोधून मशीनमध्ये बसविले. मशीनवर ड्रिलखालच्या व्हाइसमधे तो लग कसा पकडायचा हे त्याला समजेना. तेव्हा त्याने केबलचा तो लग एका पकडीमध्ये (ग्रिप प्लायरमध्ये) पकडून ड्रिलच्या खाली डाव्या हाताने धरला आणि उजव्या हाताने ड्रिल चालू करून खाली आणले. ड्रिल फिरत असतानाच त्याच्या डाव्या हाताच्या मोजाचा काही सुटा भाग ड्रिलच्या जवळ आला. क्षणार्धात मोज्याचे धागे ड्रिलमधे अडकून त्याचा हातच ओढला गेला आणि काही कळण्याच्या आत त्याचा डावा अंगठा उभ्या ड्रिलने कापला गेला. त्याची किंकाळी ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले. त्याला कसेबसे सोडवून जवळच्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
अपघाताची कारणे आणि उपाय
1. ड्रिल मशीन चालविताना यंत्रभाग खालच्या व्हाइसमध्ये घट्ट पकडून मगच यंत्रण करावे हे पाळले गेले नाही. तसे केले असते तर हा अपघात झाला नसता.
2. ड्रिल मशीन चालविताना हातमोजे घालू नयेत हेदेखील पाळले गेले नाही.
3. प्रत्यक्ष काम करताना ड्रिल मशीनवर स्पिंडल आणि चकभोवती सुरक्षा गार्ड बसविलेला नव्हता. गार्ड असल्यास असे अपघात कमी होतात.
4. काम चालू करताना कोणती काळजी घ्यायची याची जुजबी माहिती शोरूम कर्मचाऱ्यांना दिली होती. अशाप्रकारचे सुरक्षाविषयक प्रशिक्षण कंपनीने तयार केले होते, परंतु प्रत्यक्ष कामासंबंधीचे सुरक्षाविषयक प्रशिक्षण शोरूममधील रमेश किंवा इतरांना दिले गेले नव्हते.
5. विविध प्रकारची कामे करताना सुरक्षा कशी सांभाळायची यासाठी स्टँडर्ड वर्किंग प्रोसिजर (SWP) कंपनीने तयार केल्या आहेत. याचे सर्व कामगारांना प्रशिक्षण दिले गेले नव्हते.
6. शॉपवर सर्व ठिकाणी सुरक्षाविषयक माहितीचे आकर्षक फलक लावणे एकंदर सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. सुरक्षेचे महत्त्व येता जाता सर्वांच्या मनावर ठसविणे यामुळेच शक्य होते.
7. ठराविक काळाने सर्वांचे सुरक्षा प्रशिक्षण आणि त्याच्या उपयुक्ततेचा मागोवा घेणे सुरक्षा अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे.
चित्र क्र. 2 ड्रिल मशीन
चित्र क्र. 3 मध्ये दाखविल्याप्रमाणे ड्रिल मशीनला सुरक्षा गार्ड असणे आवश्यक असते. ड्रिल ज्यावेळी सर्वात वर असेल, त्यावेळी गार्ड ड्रिलच्या पुढच्या टोकाच्या खाली हवा. यामुळे ड्रिलशी बोटांचा किंवा हातमोज्यांचा संपर्क होणे टळते आणि अर्थातच अपघाताची शक्यता नाहीशी होते.
उद्धव दहिवाळ यांना मेंटेनन्स आणि औद्योगिक सुरक्षितता या क्षेत्रातील सुमारे 35 वर्षांचा अनुभव आहे.
ते सध्या विविध कारखान्यांना सुरक्षितता सल्लागार सेवा पुरवितात.
9822650043
uddhavdahiwal@gmail.com