संपादकीय

02 Aug 2021 17:05:21
 
gffg_1  H x W:
 
गेल्या दीड वर्षामध्ये जागतिक कार्यसंस्कृतीमध्ये मूलभूत बदल झालेले आहेत. सध्या येत असलेल्या बातम्यांवरून जगभर थैमान घालणाऱ्या कोविडचा प्रभाव अजूनही बराच काळ असणार आहे, हेही स्पष्ट होत आहे. या सगळ्या बदलांमध्ये उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या भूमिका, धोरणे आणि पद्धती अंमलात आणून निर्मितीवर कमीतकमी परिणाम कसा होईल हे बघितले आहे.
 
 
उत्पादनाचा दर्जा आणि संख्या अपेक्षित पातळीवर राखण्यासाठी महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे कारखान्यात काम करणारा मनुष्य. कोविडमुळे झालेल्या स्थलांतरामुळे कुशल कर्मचारी टिकवून ठेवणे, हे आव्हान उद्योजकांसमोर असल्याचे त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेमधून जाणविते. मानव संसाधन तज्ज्ञ या समस्येवर उत्तर शोधताना प्रामुख्याने 4 घटकांचा विचार करतात.
 
 
• कामाचा दर्जा : उत्पादन क्षेत्राकडे बघण्याचा पारंपरिक ‘3D’ (डार्क, डेंजरस आणि डर्टी) दृष्टिकोन बदलून त्याऐवजी उत्पादन क्षेत्रातील कामाकडे ‘4C’ (कूल, चॅलेंजिंग, क्रिएटिव्ह आणि कटिंग एज) या प्रकारामध्ये वर्णन केलेल्या विचारातून बघितले गेले पाहिजे.
• कार्यसंस्कृती : कारखान्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात ‘आपल्याला येथे योग्य तो सन्मान मिळतो,’ अशी भावना निर्माण करणे.
• सर्वंकष विचार : कंपनीत असलेल्या मनुष्यबळ विषयक व्यवस्था आणि कंपनीतील उत्पादनाला आवश्यक असणारे इतर सर्व घटक यांच्यामध्ये योग्य तो समतोल राखला जाणे.
• करिअरचा मार्ग : आपल्याकडील प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी पूरक वातावरण आणि संधी उपलब्ध करणे.
 
 
या 4 मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडील लघु, मध्यम उद्योजकांकडे सध्याच्या काळात मिळालेल्या ऑर्डर गुणवत्तेसह वेळेत देणे याच प्राथमिक जबाबदारीसाठी मोठ्या प्रमाणात धडपड चालू असलेली दिसून येते. कुशल कामगारांच्या अभावामुळे विविध प्रकारची अतिरिक्त कामे उपलब्ध असलेल्या कामगारांकडून करून घेणे आणि सातत्याने कुशल कामगारांच्या शोधात असणे, यामध्येच उद्योजकाची शक्ती अधिक प्रमाणात खर्च होत असते. याचा अप्रत्यक्ष परिणाम सर्वांच्याच मानसिकतेवर आणि परिणामी कारखान्यातील उत्पादकतेवर होतो.
 
 
या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपल्याकडील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक (प्रशिक्षण, सन्मान आणि बांधिलकी) करून, कुशल कर्मचाऱ्यांचा सतत मोठा होत जाणारा प्रवाह निर्माण करणे, हा प्रभावी मार्ग आहे. यामुळे अर्थातच आपण काम करीत असलेल्या उद्योगाकडे ‘जुलमाचा रामराम’ म्हणून न बघता कर्मचारी ‘स्वेच्छेने निवडलेला पर्याय’ म्हणून बघण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अर्थातच सर्व कर्मचारी एकाच दिशेने काम करणाऱ्या कार्यगटाचे सदस्य असल्यासारखे काम करू शकतील. त्याचे अर्थातच सहजपणे दिसणारे परिणाम म्हणजे उत्पादकतेत वाढ, वाया जाणाऱ्या संसाधनांमध्ये कपात, अनुपस्थितीमध्ये कपात आणि अंतिमतः उद्योजकाच्या उत्पादनक्षमतेमध्ये भरीव वाढ झाल्याचे दिसून येईल. हे वातावरण तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण. यामध्ये त्यांना सध्या करीत असलेल्या कामाविषयीची सखोल आणि शास्त्रीय माहिती देण्याबरोबरच बाजारात उपलब्ध असलेल्या नवीन तंत्रांची ओळख करून देणे, यांचाही समावेश असतो. ‘धातुकाम’ मासिकातून आम्ही याच उद्देशाला पूरक ठरणारी ज्ञान आणि माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो.
 
 
गेल्या काही अंकांमधून यंत्रणातील एक एक प्रक्रिया निवडून त्याच्याशी संबंधित लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. या अंकामध्ये थ्रेडिंग विषयाशी संबंधित प्रक्रिया उलगडून सांगितल्या आहेत. थ्रेड व्हर्लिंग, थ्रेड ग्राइंडिंग अशा धातू कापून आटे तयार करण्याच्या प्रक्रियांबरोबरच थ्रेड रोलिंग या बहुसंख्येने उत्पादन करण्यासाठी उपयुक्त असलेल्या प्रक्रियेची सविस्तर माहिती देणारे लेख या अंकात दिलेले आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये रोजच्या वापरात असलेल्या फास्टनरचे तांत्रिक तपशील देणारा लेखही आपणास उपयुक्त वाटेल. उत्पादन केलेले यंत्रभाग अथवा कच्चा माल स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त असलेल्या लेझर क्लीनिंग तंत्राचीही माहिती देणाऱ्या लेखातून एक नवीन तंत्र आपल्यासमोर उलगडेल. याबरोबरच कामादरम्यान घडलेले कारखान्यातील किस्से, काम करताना घ्यावयाची काळजी, आर्थिक नियोजन कसे करावे या संदर्भातील लेखमालांमधून आपल्याला उपयुक्त माहिती मिळेल अशी खात्री आहे.
 
 
 
दीपक देवधर
deepak.deodhar@udyamprakashan.in
Powered By Sangraha 9.0