कॉलेटची गुणवत्ता : साधी की उत्तम ?

10 Sep 2021 11:35:14
रोजच्या कामाच्या धबडग्यात अनेक समस्या व्यक्तिगत किंवा उद्योग पातळीवर समोर येत असतात. जेव्हा ती घटना घडते तेव्हा त्याच्याशी संबंधित कर्मचारी एखाद्या फार मोठ्या समस्येला तोंड दिल्यासारखे झटत असतात. परंतु नंतर मात्र त्याचे मूळ कारण अगदीच क्षुल्लक असल्याचे लक्षात येते. अशा सर्व घटनांमधून नक्कीच काही शिक्षण होत असते. अशाच काही गमतीदार आणि गंभीर घटना सांगणारे हे सदर .
 

img00_1  H x W: 
 

रवा संध्याकाळी कारखान्यात बसलो होतो. आता निघू या असा विचार करीत होतो. इतक्यात शेजारच्याच इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका कारखानदार मित्राचा फोन आला. "सर, आज परत दोन कॉलेट तुटली, काहीतरी करायला पाहिजे, पण का तुटतात कळत नाही."

कॉलेट हा शब्द मी माझ्या लहानपणीच ऐकला होता. माझे वडील नागपूरला चिनी मातीच्या बरण्या तयार करणाऱ्या कारखान्यात काम करीत. त्यावेळी "अर्धा इंची शॉब्लिन पाहिजे, लवकर पाठवा" असे संवाद मी ऐकले होते. अर्धा इंची शॉब्लिन म्हणजे त्या आकाराचे शॉब्लिन कॉलेट हे मला पुढे बऱ्याच वर्षांनी कळले. जसे फोटोकॉपीला सर्रास झेरॉक्स कॉपी म्हटले जाते, (प्रत्यक्षात झेरॉक्स हे एका कंपनीचे नाव आहे) तसेच कॉलेटना बऱ्याच ठिकाणी सहजी 'शॉब्लिन कॉलेट' असे संबोधले जाते.

मी मित्राला म्हणालो, "तुला जमेल तेव्हा थोडा वेळ काढून ये, मला माहिती आहे तेवढे मी सांगतो".

एके दिवशी दुपारी तो मित्र आला. कॉलेटचा विषय निघाला. मी म्हणालो, "माझ्याकडे असलेली कॉलेट जवळ जवळ एक लाख पार्टचे मशीनिंग झाले तरी तुटत नाहीत, हे तुला माहीत आहे का?"

तो अर्थातच आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला,'' तुम्ही म्हणता ते खरे असेल कदाचित, पण माझा सप्लायर असे सांगत नाही. मी याविषयी त्याच्याशी बऱ्याच वेळा चर्चा केली. त्याचे मत आहे, की कॉलेट ज्या भागात तुटतात तो भागच मुळी लवचीक केलेला असल्याने तेथे कालांतराने तुटणारच. त्यामध्ये भारतातील इतर पुरवठादारांच्या मानाने आमची कॉलेट जास्त टिकतात. मलाही त्याचे मत पटते, यासाठीच मीदेखील त्याचीच कॉलेट वापरतो. त्याच्या किंमतीसुद्धा मला परवडतात.''

मग मी त्याला माझ्याकडे असलेली काही जर्मन आणि स्विस कॉलेट आणि काही आपल्याकडील कॉलेट दाखविली आणि मला जाणविलेले काही फरक सांगितले.

 

img01_1  H x W: 
 

"तुला माहीतच आहे की, हल्ली विविध प्रकारची कॉलेट निर्माण होत असतात आणि वापरानुसार त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. सर्वसाधारणपणे बार मटेरियलवर यंत्रण करताना ट्रॉब, विकमन, स्कोडासारख्या मशीनवर वापरात आलेली कॉलेट ही वेगळी असतात, तर ग्राइंडिंग, टूल ग्राइंडिंगसारख्या यंत्रणात वापरलेली कॉलेट त्या त्या डिझाइनची असतात. ही माझ्याकडील कॉलेट ट्रॉबची आहेत."

"सर्वात पहिले म्हणजे, जर्मन आणि स्विस कॉलेटच्या मागच्या बाजूस पाहिले, तर तिच्या आतल्या व्यासावर सुमारे 2 मिमी. खोल आणि 3 मिमी. लांब अशी एक 'वुडरफ की कटर' ने निर्माण केलेली खाच (स्लॉट) दिसते. आपण याला ओरिएंटेशन खाच म्हणूया. याचे कॉलेटच्या प्रत्यक्ष कार्यामध्ये काही योगदान दिसत नाही. परंतु, कॉलेटची निर्मिती होत असताना त्यातील विविध आकार आणि खाचा इत्यादींचे यंत्रण करताना इंडेक्सिंग आणि इनिशियल पिकअप राखण्यासाठी याचा चांगला उपयोग होत असावा. समोरच्या बाजूच्या खाचा अतिशय अचूक पद्धतीने समकेंद्रित राखल्या जातात आणि त्यामुळे डायनॅमिक बॅलन्सिंग उत्तम राखले जाते. आपल्याकडील कॉलेटमधे हे दिसत नाही." त्याला लक्षात येते आहे याची खात्री करण्यासाठी मी थोडा थांबलो.

 

IMG02_1  H x W: 
 

खराब झालेले कॉलेट

 

"या कॉलेटचा समोरचा जो शंकूसदृश (कोनिकल) भाग बाहेरच्या स्पिंडलच्या संपर्कात असतो, त्याचेही एक वेगळे वैशिष्ट्य आहे. सर्वसाधारणतः तीन किंवा अधिक खाचा यावर असल्याने हा भाग लवचीक बनलेला असतो. स्पिंडल लॉक झाली, की या भागावर बाहेरून दाब येऊन तो कॉलेटमधील यंत्रभाग घट्ट धरून ठेवतो आणि त्याचे यंत्रण होते. बाहेरच्या, म्हणजे स्पिंडलच्या संपर्कातील या शंकू आकाराचे ग्राइंडिंग करताना सरळ रेषेत होत नाही, तर त्या भागावर, कॅमशाफ्टला जसे लोब करताना कॅम रिलीफ असतात, तसा आकार निर्माण केला जातो. अर्थात हे खूप सूक्ष्म फरकाचे आहे, माझ्या अंदाजाने सुमारे 50 मायक्रॉन इतका हा व्यासातील फरक असावा. जर्मन आणि स्विस कॉलेट प्रकाशात धरून जर बारकाईने पाहिलेस तर तुला प्रकाशाच्या परिवर्तनातून हा लोबचा सूक्ष्म फरक दिसेल. यामुळे कॉलेट लॉक-अनलॉक होताना सर्व बाजूने संपर्क होत नाही, योग्य ठिकाणी दाब येऊन यंत्रभाग व्यवस्थित पकडला जातो आणि कॉलेटचे आयुष्य वाढते. हे ग्राइंडिंग झाल्यानंतर स्लॉटिंग केले जात असावे. तेदेखील, आधी म्हटल्याप्रमाणे अतिशय अचूकपणे समकेंद्रित केले जाते.''

"आपल्या कॉलेटच्या मागच्या दंडगोलाकार भागावर असलेल्या आडव्या खाचा बहुतेक वेळा एकाच रुंदीच्या असतात. अर्थातच, हे यंत्रण करणे सोपे आहे. पण जर्मन कॉलेटची हीच खाच मागच्या बाजूस कमी रुंदीची आणि पुढच्या बाजूस, जिथे व्हर्टिकल खाच येऊन मिळते, अशा ठिकाणी जास्त रुंदीची आणि जास्त व्यासाची असते. तसेच, या संपूर्ण खाचेवर बाहेरील बाजूस सुमारे 85 अंशाचा चँफर विशिष्ट पद्धतीने यंत्रण केलेला असतो. याचबरोबर, तिचा मागचा भाग (इनर डायमीटर) आतल्या बाजूस कमी व्यासाचा (म्हणजे जास्त जाडीचा) आणि समोरचा भाग आतल्या बाजूस जास्त व्यासाचा (म्हणजे कमी जाडीचा) असतो. वास्तविक पाहता, हे सर्व क्लिष्ट प्रकारचे यंत्रण आहे. मला असे वाटते, की कॉलेटच्या, वारंवार क्लॅम्पिंग आणि डीक्लॅम्पिंगच्या कार्यामध्ये विविध ठिकाणी निर्माण होणारे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन या एकंदर वैशिष्ट्यांमुळे टाळले जाते. तिच्या दीर्घायुष्याचे हे रहस्य असावे. तुला लक्षात आले असेल, की आपल्याकडील बहुतेक कॉलेट याच भागात तुटतात." मी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

त्याने एक लांब सुस्कारा सोडला. "आपल्याकडील बहुतेक कॉलेट तुटण्याची कारणे मला समजली. आपल्याकडे बरीच तांत्रिक प्रगती करायला वाव आहे. जर्मन कॉलेट आपल्यापेक्षा अतिशय खर्चिक आहेत आणि त्यांचा वापर मला माझ्या सध्याच्या उद्योगात तरी करता येणार नाही. पण माझे तांत्रिक कुतूहल तरी पूर्ण झाले, याबद्दल धन्यवाद. चला या गोष्टीवर एक फर्मास चहा होऊन जाऊ देत."

 

9552528341

agsystemequipments@gmail.com
प्रदीप खरे फाय फाउंडेशन पुरस्काराचे विजेते आहेत. त्यांना मशीनिंग क्षेत्रातील जवळपास 50 वर्षांचा अनुभव आहे. नवीन माहिती, अनुभव, ज्ञान, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0